म्युझिकल फीलिंग : ...मन वाहूनी नेतात ! 

हेमंत जुवेकर​
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कुठलं गाणं कशामुळे आवडेल हे कुठं सांगता येतं आपल्याला? कुठले सूर, कोणते शब्द काय आठवणी छेडतील, हेही नाहीच येत सांगता.

हिलीत असताना वर्गशिक्षिका होत्या जोशीबाई. पालिकेची शाळा. त्यामुळे पहिलीचा वर्ग असला तरी वर्गातली इतर सगळीच मुलं माझ्यापेक्षा उंच. तरीही मॉनिटर मीच. कारण जोशीबाई. त्यांचा मी आवडता विद्यार्थी. 
खूप प्रेमाने वागायच्या. खरं तर सगळ्यांशीच; पण माझ्याशी अंमळ जास्तच, किंवा मला तरी तसंच वाटायचं. 
पहिलीतून दुसरीत आणि मग तिसरीतही गेलो. वेगवेगळे वर्गशिक्षक होते दोन्ही वर्षात. तिसरीच्या वर्गात असतानाची गोष्ट. एक पावसाळी दिवस. सकाळपासूनच खूप पाऊस होता. गाड्या बंद असाव्यात बहुतेक. कारण, आमच्या वर्गशिक्षिका आल्या नव्हत्या. त्यामुळे आमच्या पूर्ण वर्गाला एका दुसऱ्या वर्गात नेऊन बसवलं. त्या वर्गावर बाई आल्या. जोशीबाई. 

मला खूप बरं वाटलं. म्हटलं, आता त्या मला ओळखणार, जवळ बोलावणार. 
पण त्यांनी शिकवायलाच सुरुवात केली. 
माझ्या डोळ्यातून अचानक पाणीच यायला लागलं. 
शेजारी बसलेल्या मुलाला काहीच कळेना. त्याने बाईंना सांगितलं. त्यांनी मला पुढे बोलावलं. मी डोळे पुसत गेलो. 
त्यांनी विचारलं 'का रडतोयस?' 
त्यांनी ओळखलंच नव्हतं. 
मग मात्र मी भोकाड पसरलं. 
त्यांना कळेचना मी का रडतोय. नंतर त्यांना कदाचित कारण कळलं असावं... त्यांनी जवळही घेतलं असावं बहुतेक. 
पण गंमत म्हणजे मला ते आठवत नाही. आठवतंय ते त्यांचं अनोळखी नजरेने 'का रडतोयस' असं विचारणं. मी जोरात रडणं, साऱ्या वर्गाने माझ्याकडे आश्‍चर्याने पाहत राहणं आणि बाहेर पडणारा जोरदार पाऊस... 
काही वर्षांपूर्वी एका मित्रानं, 'एक मस्त गाणं ऐक' म्हणून एक गाणं ऐकवलं. ते गाणं ऐकल्यावर का कोण जाणे, हे सगळं आठवलं. डोळ्यातल्या पाण्यासकट... 
म्हटलं तर तसा त्या आठवणीचा आणि त्या गाण्याचा संबंध काहीच नाही. मग का आठवलं ते सगळं? 

कुठलं गाणं कशामुळे आवडेल हे कुठं सांगता येतं आपल्याला? कुठले सूर, कोणते शब्द काय आठवणी छेडतील, हेही नाहीच येत सांगता. या गाण्याचं तसंच काहीतरी झालं असावं. 
गाण्याची चाल भारी गोड आहे हे नक्कीच. सौमित्रचे शब्दही. साधना सरगमनी ते गायलंयही छानच. 

ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात 
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात 
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची, सर येते माझ्यात ।। 
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद 
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध 
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात 
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात... 

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा ती शाळा, जोशीबाई, तो वर्ग आणि तो पाऊस आठवला होता. पण नंतर हे गाणं अनेकदा ऐकलं. अधिकाधिक आवडत गेलं आणि मग हे गाणंच वेगवेगळ्या वेळी आठवायला लागलं. 
यातल्या 'झाडे पाऊस होतात'चा फील एकदा भीमाशंकरच्या जंगलात आला होता. इतका पाऊस नि धुकं होतं, की समोरचं दाट जंगल फॉग लेन्समधून दिसतं तसंच दिसत होतं. पाऊस होता जोरदार; पण वादळी नव्हता. त्यात निथळणारी झाडं नि तो पाऊस एकच झालं होतं सगळं... 

जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख 
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग 
शब्द भिजूनि जातात, अर्थ थेंबांना येतात 
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात... 
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची, सर येते माझ्यात 

यातला 'जीव होतो ओला चिंब'ला पत्कींनी सुरात खूप मस्त भिजवलंय; त्यामुळेच नंतरचं पाखरांचं पंख लेवून उडायला लागणं जाणवतंच. त्याच्या पुढच्याच ओळीतला रंग पुन्हा पुन्हा येऊन अनेक रंगांनी व्यक्त होतो. 
'आईशप्पथ' या सिनेमातलं हे गाणं जेव्हा पडद्यावर पाहिलं ना, तेव्हा तितकंसं नाही भावलं. एक तर या गाण्यामुळे मनात उमटलेलं चित्र वेगळं होतं नि पडद्यावर दिसणारं वेगळं. या गाण्यातली न आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या कडव्याआधी येणारं 'सुंबरान गाऊ चला'वालं कडवं. इतर दोन्ही कडव्यांपासून फारच फटकून वाटतं ते. 
पण एकुणात हे गाणं मनात पावसाच्या सुंदर आठवणी नक्कीच जागवतं. अर्थात त्यासाठी त्या आधीपासून रुजलेल्या मात्र हव्यात... 
कानावर पडलेल्या गाण्यातले शब्द आठवणींनी भिजले ना, तरच त्यातले सूर अर्थवाही होऊन मनाला भिडतात. 
सौमित्रने याच गाण्यात सांगितलंय ते, 
'शब्द (जेव्हा) भिजून जातात, अर्थ थेंबांना (तेव्हाच) येतात...'