राग बिहारी

Nitish Kumar
Nitish Kumar

नितीशकुमार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडवला. आणि अवघ्या १५ तासांत भाजपच्या पाठिंब्याने सरकार बनवत सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वास्तविक १९९६ ते २०१३ अशी १७ वर्षे भाजपबरोबर संसार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या मुद्यावरून नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर पूर्वीच्या कट्टर शत्रूसोबत म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करत, कॉंग्रेसच्या सहभागाने `महागठबंधन` बनवले आणि देशभर चौखुर उधळलेला भाजप आणि मोदींचा वारू बिहारमध्ये अडवण्याचा पराक्रम केला. नितीशकुमारांनी मुस्लिम समाजात असलेला जनाधार टिकवून ठेवण्यासाठी मोदींना विरोध करत लालूप्रसादांशी पाट लावला खरा; परंतु सुरूवातीपासूनच ही महायुती किती काळ टिकेल याविषयी शंकाच होती. अखेर लालुंचे चिरंजीव उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व इतर कुटुंबियांवरील बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांचे निमित्त करून नितीश यांनी काडीमोड घेतला. वास्तविक तेजस्वी यांनी राजीनामा देऊन केंद्रातील व इतर राज्यांतील भाजपच्या कलंकित मंत्र्यांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली असती तर हा सगळा पट बदलून गेला असता. परंतु लालूंचे परिस्थितीचे व नितीशकुमारांच्या चालीचे आकलन पुरते चुकले.

बिहारमधील घडामोडींचे प्रादेशिक संदर्भ लक्षात न घेता केवळ राष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून (सेक्युलर राजकारण) विश्लेषण करण्याच्या नादात नितीश यांना राजकीय संधिसाधू ठरवले जात आहे. परंतु लालू आणि नितीश यांचे सामाजिक आधार वेगवेगळे आहेत आणि एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे दोघे दीर्घकाळ सत्तेत भागीदारी करू शकत नाहीत हे वास्तव आहे. गेल्या निवडणुकीत लालूंच्या राजदला मिळालेल्या सर्वाधिक जागा, तेजस्वी यांचे वाढते वर्चस्व, राजदच्या हस्तक्षेपामुळे कायदा व सुव्यवस्था आणि सरकारच्या एकूण कामगिरीवर झालेला परिणाम या सगळ्यांचा विचार करता नितीश आज ना उद्या महागठबंधनाचे जोखड फेकून देणार, हे स्वाभाविक होते. `सुशासनबाबू` ही स्वतःची प्रयत्नपूर्वक घडवलेली प्रतिमा, बिहारमध्ये केलेली विकासकामे, स्वच्छ प्रतिमा, लोकप्रियता यांना तडा जाऊ न देता आपला राजकीय आलेख कसा उंचावता येईल यासाठी नितीशकुमार अत्यंत सजग आहेत. नोटाबंदीला दिलेला पाठिंबा हा त्याचाच भाग होता. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ही अतिमागास वर्गातील सामाजिक आधाराला धक्का लागू नये, यासाठीची धडपड होती. पण या दोन्ही गोष्टींमुळे नितीश भाजपच्या जवळ जात असल्याचे मानले गेले. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर लगोलग पंतप्रधानांनी केलेले ट्विट आणि बिहार भाजपचा नितिशकुमारांना पाठिंबा यामुळे नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब झाले.    

नितीशकुमार यांनी भाजपशी समीकरण जुळवून एक प्रकारे पंतप्रधानपदाच्या संभाव्य शर्यतीतून आपले नाव स्वतःहून काढून घेतले आहे. प्रादेशिक पक्षांची मोट बांधून मोदींना पर्याय उभा करण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांचा त्यामुळे हिरमोड झाला आहे. मध्यंतरीच्या काळात नितीशकुमार स्वतः राष्ट्रीय राजकारणातल्या शक्यता चाचपून पाहत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकारच्या विरोधात पर्याय उभा करता येईल, असे संकेत देत होते. महाराष्ट्रातील कांद्याचा प्रश्न असो वा खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढलेली देशव्यापी यात्रा असो त्यात नितिशकुमार यांनी मोठा रस दाखवला होता. परंतु आता या सगळ्या शक्यतांना खो बसला आहे. राष्ट्रीय राजकारण आता काय वळण घेईल, याची उत्तरे येणारा काळच देईल.

(लेखक अॅग्रोवनचे उपवृत्तसंपादक आहेत.)   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com