मोर्चाला पाठिंबा देणारे 'मराठे' पाकिस्तानमध्ये काय करतायत..? 

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला थेट पाकिस्तानमधून पाठिंबा मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एक मूळ प्रश्‍न साहजिकच कुणाच्याही मनात उपस्थित होणार.. 'पाकिस्तानमध्ये मराठे काय करतायत..?'! याचं उत्तर आपल्या इतिहासामध्ये आहे.. 

मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला थेट पाकिस्तानमधून पाठिंबा मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एक मूळ प्रश्‍न साहजिकच कुणाच्याही मनात उपस्थित होणार.. 'पाकिस्तानमध्ये मराठे काय करतायत..?'! याचं उत्तर आपल्या इतिहासामध्ये आहे.. 

'मराठा ट्राईब' या फेसबुक पेजवर पाकिस्तानमधील एका नेत्याने पाठिंब्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानमधील बुगटी मराठा यांनी पत्रक काढून मुंबईतील मराठा मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुंबईत बुधवारी आतापर्यंतचा महामोर्चा होत असून या मोर्चात लाखो नागरिक सहभागी होण्याची शक्‍यता आहे. 

बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या 'कौमी इतेहाद' या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. 'भारतामध्ये मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात सुरु असलेल्या आंदोलना'ला 'कौमी इतेहाद'च्या प्रमुखाचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले गेले पाहिजे. हा त्यांचा हक्क असून त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांचा प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. पाकिस्तानात मराठ्यांना हक्क मिळत असताना, भारतात ते का मिळत नाहीत. पाकिस्तानातील मराठा समाजाकडून जाहीर निषेध, असे त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. 

पाकिस्तानमध्ये मराठे? कसं शक्‍य आहे..!
पानिपतमधील युद्धात पराभव झाल्यानंतर अहमद शहा अब्दालीने मराठी सैन्यातील अंदाजे 22 हजार युद्धकैदी अफगाणिस्तानमध्ये नेण्यास सुरवात केली होती. सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पश्‍चिम पंजाबमध्ये बलुचिस्तान प्रांतात डेरा बुगटी हा भाग आहे. असं सांगितलं जातं, की बलुचिस्तानमधील सैन्य अब्दालीच्या बाजूने पानिपतात लढले होते. या बदल्यात अब्दालीने खंडणी देण्याचे कबुल केले होते. पण या युद्धातून अब्दालीच्या हाती फारसे काहीच पडले नव्हते. त्यामुळे खंडणीच्या बदल्यात अब्दालीने मराठी युद्धकैदीच त्यांना दिले. त्यातही, हे सारे युद्धकैदी एकाच ठिकाणी ठेवले नाहीत. त्यांना विविध बलुच जमातींमध्ये विभागण्यात आले. आता यापैकी अनेकांचे धर्म बदलले असले, तरीही त्यांना आपल्या मराठीपणाचा अभिमान असल्याचे यासंदर्भात गेल्या काही वर्षांत विविध वृत्तपत्रे आणि संकेतस्थळांवरून प्रसिद्ध झालेल्या माहितीतून दिसून येते. दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, डेरा बुगटी गावाच्या 20 हजार लोकसंख्येपैकी 30 टक्के नागरिक मराठा आहेत. येथे मराठा म्हणजे जात अपेक्षित नाही, तर पानिपतच्या युद्धात लढलेल्या अठरापगड जातीच्या सैनिकांचे वारस असा त्याचा अर्थ आहे. 

अगदी अलीकडच्या इतिहासात डोकावून पाहायचे ठरविले, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हाही लाहोरसारख्या शहरांमध्ये अंदाजे 40 हजार मराठी कुटुंबे राहत होती. फाळणीनंतरही जवळपास तीन हजार कुटुंबे पाकिस्तानमध्येच राहिली. या कुटुंबांनी जमेल त्या पद्धतीने मराठी संस्कृतीशी असलेली नाळ टिकविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, आपल्याप्रमाणेच पाकिस्तानमध्येही गणेशोत्सव साजरा होतो. यासंदर्भात 'डॉन' या पाकिस्तानमधील प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये बातमीही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याकडे दहा दिवसांचा गणेशोत्सव असतो, तर पाकिस्तानमध्ये-मुख्यत: कराचीमध्ये हा उत्सव दीड दिवसांचा असतो. 

(टीप : वरील माहिती विविध बातम्या आणि लेखांतील माहितीवर आधारलेली आहे.)

'मराठा क्रांती मोर्चा'संदर्भातील इतर घडामोडींसाठी क्लिक करा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील शाळांना बुधवारी सुटी

सर्व जाति-धर्मांनी मराठा समाजाला पाठबळ द्यावे- राणे

मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईकडे कूच...(व्हिडिओ)

मुंबईत मराठा मोर्चाचा 'फिव्हर'