‘दुभंगलेला गुजरात’ भारतभर पसरला तर…?

Gujrat2017
Gujrat2017

गुजरात विधानसभा निकालानं गुजरात हे दुभंगलेलं राज्य आहे हे स्पष्ट झालं. शहरी आणि ग्रामीण या मनोवस्थांमध्ये ही विभागणी तीव्र झालेली दिसते. एकाच राज्यातील ही दोन वेगवेगळी राज्यं आहेत. त्यांची जीवनशैली आणि आकांक्षा, स्वप्न निरनिराळी आहेत. गरजा, भूमिका वेगळ्या आहेत.

सहाव्यांदा भाजप या राज्यात जिंकला. त्याला मोठा हातभार शहरी गुजरातनं लावला. शहरातल्या ५५ आमदारांपैकी ४३ आमदार भाजपचे आहेत, तर काँग्रेसच्या ८० आमदारांपैकी बहुतांश ग्रामीण आहेत. भाजपला सुरत, वडोदरा, राजकोट, अहमदाबाद या शहरी पट्ट्यात वाढता पाठिंबा आहे. शहरातला तरुण मतदार भाजपबरोबर, तर ग्रामीण भागातला तरुण मतदार काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा देणारा आहे. शेतकरी, दलित, आदिवासी काँग्रेससोबत दिसतो. दोन आदिवासी आमदार जनता दलाचे आहेत. त्यातून आदिवासींची वेगळी भूमिका दिसते.

ग्रामीण मतदार ‘गुजरात विकास मॉडेल’, ‘अच्छे दिन’बद्दल शंका व्यक्त करतो, तर शहरी मतदारांना ‘विकास’, ‘अच्छे दिन’ या घोषणा भूलवताहेत. शहरात राहणारा मध्यमवर्ग खुशीत दिसतोय. त्याला फ्लाय ओव्हर, नव्या टाऊनशीप, चकाकणारे मॉल हवे आहेत. त्यांची कामं सुरू होणं, त्याची धूमधडाक्यात उदघाटन होणं म्हणजे विकास, अच्छे दिन हे त्याला मनोमन पटलंय. ग्रामीण भागात नोटबंदीनं अडचणी वाढल्या, शेतमालाला हमी भाव तर जाऊच दे, पण शेतकऱ्याला तगण्यासाठी भाव मिळत नाही. तरुणांना रोजगार नाही, शिक्षण, आरोग्य या प्रश्नांशी ग्रामीण जनता झुंजत आहे. त्यांना ‘अच्छे दिन’ दिसत नाहीत. गेल्या २२ वर्षांत ‘अच्छे दिन’ आले नाहीत, तेव्हा आता आणखी वाट पाहण्याची त्यांची सहनशीलता संपलीय. त्यातून तो वर्ग भाजपवर नाराज दिसतोय. यापुढे ‘अच्छे दिन’ येतील असं त्याला वाटत नाही. गुजरात दुभंगलेला आहे हे समजण्यासाठी सुरत या शहराचं उदाहरण घेता येईल. तापी नदीच्या काठी वसलेलं हे शहर. इथं मोठं बंदर आहे. कापड, हिरे आणि आयटी हे उद्योग भरभराटीला आले आहेत. इथले ७० टक्के लोक इंटरनेट वापरतात. गुजरातचं हे दुसरं मोठं शहर. भारतातलं हे  आठवं विकासशील शहर मानलं जातं. इंग्रजांनी या शहरात पहली व्यापारी कंपनी उभारली. तेव्हापासून आधुनिक व्यापाराची परंपरा या शहराला आहे. पोर्तुगीजांनी इथं इंग्रजांपूर्वी व्यापारात नवे प्रयोग केले. मुंबईपूर्वी या शहरात व्यापार, उद्योगाची मोठी परंपरा होती. या शहराचा स्वभाव व्यापारी केंद्र असल्यानं कॉस्मापॅलिटन. इथं गुजराती, सिंधी, हिंदी, मारवाडी, मराठी, तमिळ, तेलुगू, उडिया या भाषा बोलल्या जातात. हा विविध भाषी शहरी वर्ग स्वत:ला भाजपसमर्थक म्हणवतो.

सुरत हे शहर आहे कॉस्मॉपिलिटन, पण इथं हिंदू-मुस्लिम भेद तीव्र आहेत. अयोध्येत बाबरी मशीद पडली आणि त्यानंतर १९९२ साली इथं तीव्र दंगे झाले. तेव्हापासून आजतागायत हे शहर मनानं हिंदुत्ववादी आहे. एका बाजू विकासाचं, दुसरी हिंदुत्वाचं असं हे नाणं आहे. या निवडणुकीत सुरतमधील आमदारकीच्या सर्व म्हणजे १२ जागा भाजपकडे गेल्या आहेत. सुरतसारखीच मानसिकता अहमदाबाद, वडोदरा या शहरी पट्ट्यात आहे. गुजरातचा शहरीकरणाचा वेग ४३ टक्के आहे. तो भारतात सर्वांत जास्त मानला जातो. २००२ साली गोध्रा ट्रेन जळीत कांडानंतर उसळलेल्या दंगलीचं केंद्र अहमदाबाद-वडोदरा हे होतं. या दंगलीनंतर ‘मुसलमानांची कशी जिरवली!’, ‘त्यांना कसा धडा शिकवला!’ अशी शहरी गुजरातची भावना झाली होती. ती आजही कायम दिसते. या दंगलीत मुस्लिम समुदाय जो मुख्य प्रवाहापासून तुटला, तो आजतागायत तुटलेलाच आहे. या निवडणुकीत मुस्लिम समुदायाचा फारसा सहभाग जाणवला नाही. ना त्यांना भाजप, काँग्रेसनं उमेदवाऱ्या दिल्या; ना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. शहरी गुजराती मतदाराला नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व का भावलं? एक तर ते विकासपुरुष आहेत असं त्याला वाटतं. दुसऱ्या बाजूला ते हिंदुहृदयसम्राट आहेत अशी त्याची खात्री झालेली आहे. कारण मोदी सोमनाथ ते अयोध्या या यात्रेचे संयोजक होते. २००२च्या गुजरात दंगलीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मुस्लिमांना धडा शिकवलाय.

या निवडणुकीतही राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार  टल्यावर मोदींनी त्याची तुलना ‘औरंगजेब राज’शी केली होती. औरंगजेबाला जसं त्याच्या बापाकडून राज्य मिळालं, गादी मिळाली. त्यांची जशी घराणेशाही, राजेशाही होती, तशी गांधी घराण्यात आहे, हे मोदींनी सुचवलं. शिवाय राहुल म्हणजे साक्षात आजचे औरंगजेबच अशी तुलनाही त्यात सूचक आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदचा. तो मुस्लिम, आक्रमक. सोरटी सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या, उदध्वस्त करणाऱ्या अल्लाउद्दिन खिलजीशी मोदी औरंगजेबाचं नातं जोडतात. खिलजी, औरंगजेब, राहुल असे आपले शूत्र म्हणून उभे करतात, तेव्हा गुजराती शहरी मतदारांना काँग्रेसशी आपलं शत्रुत्व कसं आहे हे मनोमन पटतं.

खिलजी, औरंगजेब, राहुल यांच्याशी शत्रुभावी नातं स्पष्ट झालं की, या मतदारांना अहमद पटेल यांना पाकिस्तानेनं गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीत मणिशंकर अय्यर यांच्या घरी गुप्त बैठक घेतली, हे पटायला जड जात नाही. खरं-खोटं याची खात्री करायच्या भानगडीत गुजराती मतदार पडेलच कसा? मोदींच्या साऱ्या बातांवर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला. या मुस्लिम, पाकिस्तानद्वेषी शहरी मतदाराला मोदींचे विकास, अच्छे दिनचे वायदे जास्त लुभावतात. अहमदाबादला साबरमती किनारी मोदींनी सी प्लेन सफर, भरारी घेतली, त्याचं भारी कौतुक वाटतं. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीज, ही स्वप्नं त्याला मनोरंजक आणि खास वाटतात. माणूस हा प्राणी मेंदूनं विचार करत नाही तर खिशानं विचार करतो, हे गुजराती शहरी मध्यमवर्गीयांकडे बघून पटतं.

शहरी आणि ग्रामीण विभागात झालेला दुभंग जातीच्या स्तरावरही दिसतो. पटेल-पाटीदार समाजाचं उदाहरण पाहू. या समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतं. तशी त्याची जोरदार मागणी आहे. त्यासाठी हिंसक आंदोलन तो करतो. पण या शहरातल्या पाटीदार समाजातल्या मध्यमवर्गीय आधी  दुत्ववादी योद्धे आहेत. नंतर हार्दिकच्या आर्मीचे सैनिक होणं ते पसंत करतात. म्हणजे आरक्षणाच्या मागणी आंदोलनात ते हार्दिकबरोबर असतील, तर हिंदुत्व युद्धात ते मोदींचे भक्त असतात. म्हणून निवडणूक युद्धात ते भाजपचे मतदार असतात, पटेल आयडेंटीटी ते विसरून जातात.

शहरी ओबीसी समूहातल्या राजपुत, ठाकूर, क्षत्रिय या जातीतही दुभंग दिसतो. जातीच्या प्रश्नावर ते जातीनेत्यांसोबत असतात, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते मोदी-शहा- भाजपबरोबर असतात. या विभागणीला जैन समाजही अपवाद नाही. गुजरात ही जैन तत्त्वज्ञान वाढवणारी, सांभाळणारी भूमी आहे. पण आजचे जैन स्वत:ची ओळख विसरून हिंदुत्ववादी योद्धे बनलेत. दंगलीच्या काळात मुस्लिमांना धडा शिकवायला ते अहिंसा गुंडाळून ठेवतात, असं निरीक्षण आहे. म्हणून शहा व इतर भाजप नेते स्वत:ची ओळख जैन सांगायचं टाळतात. भाजप, संघ परिवाराला ही शहरी-ग्रामीण विभागणी हवीच आहे. ही विभागणी २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत देशभर वाढवली जाईल. पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या मोठ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये हा दुभंग विस्तारित करायचा भाजपचा प्रयत्न राहणार, हे आता लपून राहिलेलं नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्यांत हा दुभंग वाढवण्याला भाजप, संघ परिवाराला पूरक भूमी उपलब्ध आहे.

राजस्थानात अफराजूल या मुस्लिम मजुराची हत्या झाली. त्यावर मोदी काही बोलले नाहीत. तिथल्या लव-जिहाद कारवायांना मोदींचा आक्षेप नाही. अफराजुल प्रकरणात आरोपी असलेल्या शंभुलालला शहरी भाजपेयी मदत म्हणून बँकेत पैसे जमा करतात, न्यायालयावर भगवा झेंडा फडकवण्यात वकील आणि शिकलेले नागरिक पुढाकार घेतात. हे दुभंगाचं खूप बोलकं उदाहरण आहे. शहरी गुजरात आणि राजस्थान एकमेकांशी किती जवळ आहेत नाही का?

मध्यप्रदेशात नाताळच्या सणासाठी गाणी म्हणण्यासाठी जमणाऱ्या कलाकारांना सरकार अटक करतं. त्यांचा काही गुन्हा नाही हे स्पष्ट असताना हे होतं. उलट व्यापम घोटाळ्यात नोकरी लावण्यासाठी पैसे खाणारे भाजप-संघ नेते मोकाट फिरतात. त्याबद्दल मोदी-शहा काही बोलत नहीत. गुजरात आणि मध्यप्रदेशात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची पद्धत  कसारखीच दिसते. कर्नाटकात पत्रकार, कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या झाली. एम.एस. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्याविरोधात मोदी यांनी ट्विट केलं नाही. उलट गौरी यांना ‘कुत्री’ म्हणणाऱ्या एका ट्रोलला मोदी फॉलो करत असल्याची माहिती पुढे आली. त्यावरही मोदींनी काही स्पष्टीकरण दिलं नाही. ही उदाहरणं खूप बोलकी आहेत. त्यात मोदी ‘विकासपुरुष’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ हे दोन्ही किताब ५६ इंच छातीवर कसे मिरवू इच्छितात हे दिसतं. गुजरातमध्ये उघडा पडलेला विशिष्ट प्रकारचा विकासवादी, द्वेषवादी मतदार भारतभर विस्तारला तर २०१९ मध्ये देशाचा ‘गुजरात’ होऊ शकतो. मोदींना जो न्यू इंडिया हवाय, तो असा असेल तर संविधानानं दिलेली ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पना धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. माणसाचा विचार करण्याचा अवयव हा मेंदू नसून खिसा आहे, हे जागतिकीकरणोत्तर काळात जास्त स्पष्ट होतंय. जगभर हे दिसतंय. त्यामुळे घडणाऱ्या भल्या-बुऱ्याला आपल्याला समोरं जायचं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ च्या रणकंदनाचा ‘आँखो देखा हाल’ असलेले ‘गुजरात २०१७ : चित्र, चरित्र आणि चारित्र्य’ हे किशोर रक्ताटे – राजा कांदळकर लिखित पुस्तक डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित होत आहे. राजकीय अभ्यासक प्रा. प्रकाश पवार, काँग्रेस खासदार राजीव सातव, भाजप आमदार योगेश टिळेकर आणि साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते पुण्यात १६ फेब्रुवारी रोजी चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे सायंकाळी ६-३० वाजता पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण प्रकाशित करीत आहोत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com