लेनिनला उखडा, फेका, पण...

lenin
lenin

लेनिन केवळ एक परकीय शासक होता की देशांच्या सरहद्दी ओलांडून साम्यवादाचा विचार प्रत्यक्षात आणणारा आणि भगतसिंगांसारख्या तरुणांना आकर्षित करणारा, क्रांतीचा प्रणेता होता? जगभरातील शोषित कामगारांच्या लढ्याचे प्रेरणास्थान होता?

लेनिन नेमका कोण होता? आणि आपल्याशी त्याचा काय संबंध? असा सवाल करून त्याचा पुतळा उखडणाऱ्यांचं समर्थन करू पाहणाऱ्या मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोकांना लेनिन विषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न...

लेनिन हा रशियन क्रांतीचा प्रणेता. तो खरंतर तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांतून पुढे आलेला होता. मार्क्सच्या अर्थविषयक सिद्धांताचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात प्रशासनात आणणारा राज्यकर्ता म्हणजे लेनिन.

त्याचा क्रांतीचा लढा, त्याची शासनव्यवस्था, लोकशाहीविषयी त्याचे मत हे सर्व बाजूला ठेवून त्याने रशियात 1921 मध्ये आणलेला कामगार कायदा, सिव्हिल कोड त्यानुसार नोकरदार, कामगार आणि शेतमजूर यांचं केलेलं वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नियम, कामगारांचे इतर हक्क यासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.

आज मध्यमवर्ग सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत काम करतो, त्या कामाचे ठराविक तास असतात. याची नियमावली जगभर ठरवून दिली गेली  लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसनी दिलेल्या लढ्यानंतर! त्यापेक्षा जास्त काम केलं की हक्काने ओव्हरटाईम मागता... राहायला क्वार्टर किंवा घरभाडे मालकाकडून घेता... प्रवासभत्ते, हक्काच्या सुट्या, मेडिकल ट्रीटमेंट हे सगळं लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडस नी मिळवलंय...

रिटायरमेंट बेनिफिट, ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेलं आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.

अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकऱ्या आणि तसे नियम आणि करार सुद्धा याच कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे झालेले आहेत.

बँक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे आणि सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीत निघतो... तो लाल बावटा लेनिन चा...

कोणताही भांडवलदार उद्योगपती आणि कोणतंही सरकार हे स्वतः होऊन स्वयंप्रेरणेने या गोष्टी करत नसतं. हे सर्व लढून मिळवलंय लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसनी. जगभर स्थापन झालेल्या कामगार संघटना, त्यांचे उद्देश, त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे सरकार आणि इतर खाजगी उद्योगांशी होत असलेले करार याचा उद्गाता लेनिन होता.

विरोधात असणाऱ्या काँग्रेस सरकारने पण सकारात्मक विचार करून यातील बरीशी धोरणे राबवली होती. वेळोवेळी त्यात सुधारणाही केलेली होती. पण सुस्थापित झाल्यावर मध्यमवर्गाला आता या सर्व गोष्टींची गरज उरली नाही. माहिती घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही. ना लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसची ना मध्यममार्गी काँग्रेसची. आता फक्त मंदीरं, अध्यात्म, गौरवशाली संस्कृती वगैरे महत्वाच्या बाबी आहेत आणि डार्विन, आईनस्टाईन, न्यूटन हे भारतीय नाहीत म्हणून त्यांची 'ऐशी की तैशी' करणारे बुद्धिमान राज्यकर्ते आहेत.

तेव्हा चालू द्यात... लेनिन ला उखडा, फेका... आणि या उन्मादाचे समर्थनही करा... पण त्या आधी आपले फंड, भत्ते यांना पण काडी लावायला विसरू नका. कारण त्यामागे पण लेनिनचाच विचार होता. 

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत)

(या लेखाचा आपल्याला प्रतिवाद करायचा असल्यास आपली प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर पाठवू शकता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com