अमृताभ

अमृताभ

शांत आणि विनम्र कलाकार 
सुलोचना : अमिताभ बच्चन आणि माझी पहिली भेट ‘रेश्‍मा और शेरा‘ या चित्रपटाच्या वेळी झाली. राजस्थानमध्ये जैसलमेर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण होतं. सुनील दत्त, नर्गीस, अमिताभ, विनोद खन्ना, वहिदा रेहमान, राखी अशी आम्ही कित्येक मंडळी तिथं होतो. तेव्हा अमिताभ यांची नुकतीच इंडस्ट्रीत सुरवात झाली होती. त्यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच मला जाणवलं, की हा मुलगा नक्कीच काही तरी करणार आहे. शरीरयष्टी तशी साधारण किंवा किरकोळ. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि एकूणच आत्मविश्‍वास पाहता ते नक्की मोठी झेप घेतील, असं मला वाटलं होतं आणि नंतर तसंच झालं.

अमिताभ यांच्याबरोबर मी ‘मजबूर’, ‘गंगा की सौगंध’, ‘कसौटी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ असे चित्रपट केले. बहुतेक चित्रपटात मी त्यांच्या आईचं काम केलं. अत्यंत नम्र स्वभावाचा हा कलाकार. सेटवर ते कधी फारसे कुणाशी बोलायचे नाहीत. कामाच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर. अमिताभ, जितेंद्र आणि शशी कपूर हे कलाकार वेळेचं बंधन तंतोतंत पाळणारे. सकाळी सातची शिफ्ट असली, की ही मंडळी पावणेसातलाच सेटवर हजर. त्यामुळं त्यांच्याबरोबर शूटिंग असलं, की आदल्या दिवसापासूनच मनात भीती असायची. सकाळी लवकर जायचं टेन्शन असायचं.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतानाची एक वेगळी आठवण आहे. जुहू गार्डनजवळ ‘मजबूर’चं चित्रीकरण होतं. दुपारी आमचा ‘लंच ब्रेक’ झाला. अमिताभ यांच्या बंगल्याजवळच शूटिंग असल्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये ते घरीच जेवायला जायचे. ते ‘लंच ब्रेक’ झाल्यानंतर घरी जेवायला निघाले आणि मला म्हणाले : ‘‘चला दीदी, जयानं तुम्हाला जेवायला बोलावलं आहे.’’ खरं तर अमिताभ यांच्यापेक्षा जयाबरोबर मी अधिक काम केलं आहे आणि तिची व माझी पहिली ओळख. नंतर अमिताभ यांच्याशी ओळख झाली. असो. मी त्यांना सांगितलं : ‘‘मला आज रमेश आणि सीमा देव यांनी घरी जेवायला बोलावलं आहे.’’ तेव्हा रमेश आणि सीमा तिथं जवळच राहत होते. मी अमिताभ यांना असं सांगितलं आणि माझ्या गाडीची वाट पाहत बसले. माझी गाडी आत कुठं तरी पार्क केलेली होती. त्यामुळे गाडीला यायला उशीर होत होता. तेव्हा अमिताभ मला म्हणाले : ‘‘चला माझ्या गाडीतून.. मी तुम्हाला सोडतो.’’ मग मी त्यांच्या गाडीत बसले. त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि माझी हेअर ड्रेसरही माझ्याबरोबर होती. आमची गाडी रमेश व सीमा यांच्या बिल्डिंगजवळ आली. आमची गाडी डाव्या बाजूला होती, तर सीमाची बिल्डिंग उजव्या बाजूला होती.

अमिताभ यांनी गाडी थांबवली आणि ते स्वत: गाडीतून खाली उतरले. त्यांनी मला उतरायला सांगितलं आणि स्वत: माझा हात धरून रस्ता क्रॉस करून त्यांनी मला त्या इमारतीच्या जिन्याजवळ सोडलं. खरं तर त्यांनी मला गाडीतून उतरल्यानंतर निरोप दिला असता; पण त्यांनी तसं केलं नाही. ते स्वत: मला तिथं सोडायला आले. त्यांचा हा नम्र आणि दुसऱ्याला नेहमी मदत करण्याचा स्वभाव. 

एकदा वांद्रे इथं मेहबूब स्टुडिओत चित्रीकरण होते. मी गाडीतून निघाले होते. माझी गाडी सिग्नलला थांबली. तिथं एक भिकारी भीक मागत होता. माझ्याकडं एक नाणं होतं. मी गाडीची काच खाली केली आणि ते नाणं त्या भिकाऱ्याला दिलं. त्या भिकाऱ्यानं ते नाणं माझ्या गाडीकडं पुन्हा भिरकावलं आणि मला म्हणाला ‘‘अमिताभ की मां होती हो और एक रुपया भीक देती हो?’’ हा किस्सा मी अमिताभ यांना सांगितला. ते हा किस्सा ऐकून खळखळून हसले. अमिताभ हा अमिताभ आहे. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. मला ते कधी भेटले, तर माझ्या आवर्जून पाया पडतात आणि तब्येतीची विचारपूस करतात. दोनेक वर्षांपूर्वी ते माझ्या घरी वाढदिवसाला दहा मिनिटांसीा आले होते आणि पाऊण तास थांबले. आम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी मला सुंदर गणपतीची मूर्ती भेट दिली. अत्यंत शांत आणि नम्र स्वभावाचा हा कलाकार. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. 

अभ्यासू नट, उत्तम माणूस
विक्रम गोखले : गेल्या चाळीस दशकांहून अधिक काळ त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे; परंतु त्या मैत्रीचं आम्ही कधी लोकांसमोर प्रदर्शन केले नाही किंवा सतत एकमेकांना कधी भेटलो नाही. जवळजवळ १९६९पासून आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ‘खुदा गवाह’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचा प्रसंग. एक दिवस अमिताभ येणार नाहीत, असं आम्हाला समजलं. खरं तर असं कधीच होत नाही. त्यांनी कधी कुणाला दिलेली वेळ आणि तारीख ते नक्कीच पाळतात; परंतु त्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि ते अर्ध्या रस्त्यातून आपल्या हॉटेलवर परतले. ते हॉटेलात गेल्यानंतर मी काही वेळानं फोन केला. ‘त्यांना फोन अजिबात देऊ नका...त्यांची तब्येत आता कशी काय आहे एवढंच सांगा...’ अशी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दुसऱ्या दिवशी ते सेटवर चित्रीकरणासाठी आले, तेव्हा सहनिर्मात्यानं हळूच माझ्या कानात येऊन सांगितलं, की अमिताभ यांनी तुम्हाला बोलावलं आहे. मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते एका खुर्चीत बसलेले होते. त्यांनी मला बसण्यासाठी खुर्ची मागवली; पण मी काही खुर्चीत बसलो नाही.

‘‘काल तुम्ही मला फोन केला होता माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी. आता माझी तब्येत चांगली आहे. डॉक्‍टरांनी काही औषधं घेण्यास सांगितलं आहे,’’ वगैरे वगैरे त्यांनी मला सांगितलं. एवढा मोठा सुपरस्टार आणि माझ्यासारख्या सहकलाकाराची त्यानं घेतलेली दखल पाहता तो माणूस म्हणून किती ग्रेट आहे, हे मला समजलं. दुसऱ्या कलाकाराची तो किती कदर करतो, यातून त्याच्या माणुसकीचं दर्शन मला घडलं. दुसऱ्याची काळजी घेणं, हा त्याचा मोठा गुण आहे.

हरिवंशराय बच्चन यांचं कंबरेचं हाड तुटलं होतं. त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मला हे कुणी तरी सांगितलं आणि मी लगेच तिकडं गेलो. जाताना मी एक पुष्पगुच्छ आणि ‘गेट वेल सून’ कार्ड घेऊन गेलो. तिथं अमिताभ यांचे बंधू अजिताभ होते. मी त्यांना म्हणालो : ‘‘अजिबात त्यांना (हरिवंश राय) उठवू नका. त्यांची तब्येत कशी आहे एवढंच सांगा.’’ आणि मी लगेच निघून गेलो. बरोबर दोन दिवसांनी मला अमिताभ आणि जया बच्चन यांचं एक पत्र तेही दोघांच्याही सह्यांचं आलं : ‘रुग्णालयात तुम्ही जाऊन आलात आणि वडिलांच्या तब्येतीची चौकशी केलीत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. आता त्यांची तब्येत ठीक आहे.’ माझ्या वडिलांचं २० जून २००८ रोजी निधन झालं. तेव्हा बच्चन यांनी मला स्वत:च्या हस्ताक्षरात एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं : ‘ज्याचे आई-वडील गेलेले आहेत, असा माणूस तुला पत्र लिहीत आहे. आपले आई-वडील कधीच सोडून गेलेले नसतात, तर ते आपल्याच आजूबाजूला असतात. तुला वडील दिसणार नाहीत; पण ते जवळच आहेत. माझे आई-वडीलही मला सोडून गेलेले नाहीत तर ते माझ्या आसपास आहेत. मी तुझ्या दु:खात सहभागी आहे.’ 

सूत्रसंचालक कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावं, अभ्यासू नट कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावं, उत्तम माणूस कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावं. अत्यंत मोठा माणूस. सुख आणि दु:खात नेहमीच बरोबर असणारा. त्यांना माहीत असतं, की कोण आपल्याजवळ कशासाठी येत आहे ते! त्यांची आणि माझी एवढी चांगली मैत्री आहे; परंतु कधीच आम्ही एकत्र फोटो अद्याप काढलेला नाही. आम्ही वारंवार फोनवर बोलत नाही. कधी तरी वर्षातून एकदा बोलणं होतं. 

मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा पन्नास कमळं आणि स्वत: लिहिलेलं एक पत्र त्यांनी सकाळी साडेसात वाजता पाठवलं. त्या पत्रात ‘विक्रम, तुला खरं आधीच पुरस्कार मिळायला हवा होता. हा पुरस्कार तुला देण्यात उशीर झाला आहे. संपूर्ण बच्चन परिवार तुझे अभिनंदन करीत आहोत.’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं ते पत्र मी फ्रेम करून घरी लावलेले आहे. तेव्हा माझं मुंबईत घर नव्हतं. मग तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना बच्चन यांनी स्वत: पत्र लिहिलं होतं.

‘खुदा गवाह’चं चित्रीकरण जोमोसोम इथं होतं. त्यांचा वाढदिवस होता आणि तेव्हा मी दोनशे अंड्यांचं आम्लेट केलं होतं. ते त्यांनी चाखून पाहिलं होतं.

‘आनंद’ वाटणारा कलाकार
सीमा देव : ‘आनंद’ चित्रपटात काम करण्यापूर्वी एके दिवशी मी आणि रमेश अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो. काही तरी कामानिमित्त आम्ही गेलो होतो. तेव्हा आम्ही त्यांच्याशी आणि जयाजींशी छान गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट ‘आनंद’ चित्रपटाच्या सेटवर झाली. ‘आनंद’ चित्रपटात सुरवातीला मी काम करीत नव्हते. एके दिवशी हृषिकेश मुखर्जी यांनी रमेशला सांगितलं, की या चित्रपटासाठी मी सीमाच्या नावाचा विचार करीत आहे. तू तिला मला भेटायला घेऊन ये. त्याप्रमाणं मी गेले आणि या चित्रपटात रमेशबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. तिथं राजेश खन्ना आणि अमिताभ असे दोन्ही दिग्गज कलाकार; परंतु त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली. नवीन आहे म्हणून सुरवातीला अमिताभ कितीसे सहकार्य करतील, असं वाटललं होतं; परंतु त्यांनी चांगलं सहकार्य केलं. सेटवर ते फारसे कुणाशी बोलायचे नाहीत. सतत पुस्तक वाचत असायचे. नंतरनंतर त्यांची आणि आमची म्हणजे रमेश आणि माझी चांगली ओळख झाली. मग काय! आम्ही एकत्र गप्पा मारायचो. शांत स्वभावाचा हा कलाकार. आजही ते काम करत आहेत. अगदी उत्साहानं आणि त्याच दमानं ते काम करत आहेत. अत्यंत ग्रेट ग्रेट आणि ग्रेट कलाकार.

दुसऱ्याही कलाकारांचा विचार
स्मिता जयकर : माझे नशीब बलवत्तर म्हणून मला अमिताभ यांच्याबरोबर एक ‘सोलो सीन’ करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर मी एकच चित्रपट केला - ‘बाबूल.’ रवी चोप्रा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक. त्या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्याबरोबर माझा ‘सोलो सीन’ नव्हता. त्यामुळं मी चोप्रा यांना विनंती केली. एक तरी ‘सोलो सीन’ बच्चन यांच्याबरोबर द्या, असं त्यांना सांगितलं; परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळं मी देवाकडं सतत प्रार्थना केली आणि मला ‘सोलो सीन’ मिळाला. त्याचं असं झालं, की चित्रपटाचा सेट तोडायचा तो शेवटचा दिवस होता. शरद सक्‍सेना आणि अमिताभ यांच्यावर सीन चित्रीत होणार होता. अचानक शरदचं गोव्यातलं चित्रीकरण लांबलं आणि त्यानं येण्यास नकार दिला. मग काय...रवी चोप्रा मला म्हणाले : ‘‘स्मिता, तू खूप नशीबवान आहेस. देवानं तुझी प्रार्थना ऐकली आहे. शरद जो सीन करणार होता तो सीन आता तुला करायचा आहे...’’ 

बस्स...त्यांचं हे बोलणं ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला स्वत: अमिताभ यांनी तो सीन छानपैकी समजावून सांगितला. त्यांची ती सांगण्याची पद्धत खूप चांगली होती. रवी चोप्रा तेव्हा आमच्या बाजूला बसले होते आणि तेदेखील ते ऐकत होते. अमिताभ यांनी त्या प्रसंगाची पार्श्‍वभूमी सांगितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की हा माणूस किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो. तो केवळ आपलाच विचार करत नाही, तर अन्य कलाकारांचाही विचार करतो. 

आज कोणताही कलाकार त्यांच्याबरोबर काम करायचं म्हटल्यानंतर आतून दचकतो; परंतु ते स्वत: त्याला विश्वासात घेतात. त्याच्याशी सीन्सबद्दल बोलत राहतात आणि मग तो ‘टेक ओके’ होतो. समोरच्या कलाकाराशी कसं वागावं, त्याला कसं सहकार्य करावं, हे मी त्यांच्याकडून शिकले. 
(शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com