महानायक (डॉ. दीपक हवालदार)

डॉ. दीपक हवालदार
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

‘दीवार’चा देवळातला प्रसंग! सकाळी नऊ वाजता सर्व युनिट चित्रीकरण करण्यासाठी तयार होतं. अमिताभ मात्र त्या शॉटसाठी पूर्ण तयार नव्हता. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्याला हवा तेवढा वेळ घेण्याची मुभा दिली. अमिताभ दिवसभर संवाद घोटत राहिला. लेखक जोडी सलीम-जावेद यांच्याशी बोलत राहिला. व्हॅनमध्ये आरशासमोर प्रॅक्‍टिस करत राहिला आणि रात्री दहाच्या पुढं कधीतरी त्यानं तो शॉट दिला. एक ते दीड मिनिटांच्या शॉटसाठी ही तयारी. तो प्रसंग त्यानं अजरामर करून टाकला...

तुम्ही त्याला अमिताभऐवजी ‘बच्चन’ म्हटलंत, की तुम्ही त्याचे फॅन आहात हे कळतं. त्याचा अभिनय म्हणजे आदर्शच. त्याच्या अभिनयाचा मी अभ्यास करत गेलो, तसा अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अमिताभचे काही चित्रपट पुनःपुन्हा पाहताना नव्या गोष्टी समजतात. ‘दीवार’सारखा चित्रपट तर शंभरच्या पुढं आपण किती वेळा पाहिला हे मोजणं मी सोडून दिलं. त्याच्या काही चित्रपटांमधले त्याचे अभिनयाचे क्‍लासिक भाग पुनःपुन्हा बघा. ‘शक्ती’मध्ये त्याची आई राखीच्या मृत्यूच्या वेळेचा वडील दिलीपकुमारचं सांत्वन करतानाचे भाव, त्यानंतर पोलिसांबरोबर जीपमधून जाताना रेल्वे क्रॉसिंगपाशी आरशात दिसलेले त्याचे भाव किंवा आईचा मारेकरी अमरीश पुरी कुठं आहे हे हौदात पडलेल्या अमरीश पुरीच्या गॅंगमधल्या एकाला विचारतानाचे त्याचे भाव आणि आवाज, तो घरी परतताच पोलिस अटक करण्यास येतात तेव्हा त्यावेळी एकाचवेळी दिसलेली त्याची हतबलता, वडिलांबद्दलचा तिरस्कार आणि आईचा सन्मान राखण्याची पराकाष्ठा....व्वा!

‘हम’मधे ज्यावेळी त्याच्या भावांना तो भूतकाळात ‘टायगर’ नावाचा गुंड असल्याची माहिती कळते तेव्हा त्याला आलेली उद्विग्नता आणि त्याचवेळी भावांबद्दलचं प्रेम हे भाव पुनःपुन्हा पाहिले, त्यावेळी मंत्रमुग्ध झालो. 

‘दीवार’मधे परवीन बाबीचा खून मदन पुरीनं केल्याचं कळल्यावर डोळ्यांत असलेला राग आणि त्याचवेळी पाठीत किंचित वाकल्यानं ‘जिंदगी से लढतेलढते थक गया हूं’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी त्यानं दाखविल्या. कोणीतरी म्हटलं होतं ः अमिताभ हा ‘मॅरेजुआना’सारखा आहे. हळूहळू तो मेंदूवर चढत जातो.

‘दीवार’चा देवळातला प्रसंग! सकाळी नऊ वाजता सर्व युनिट चित्रीकरण करण्यासाठी तयार होतं. अमिताभ मात्र त्या शॉटसाठी पूर्ण तयार नव्हता. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्याला हवा तेवढा वेळ घेण्याची मुभा दिली. अमिताभ दिवसभर संवाद घोटत राहिला. लेखक जोडी सलीम-जावेद यांच्याशी बोलत राहिला. व्हॅनमध्ये आरशासमोर प्रॅक्‍टिस करत राहिला आणि रात्री दहाच्या पुढं कधीतरी त्यानं तो शॉट दिला. एक ते दीड मिनिटांच्या शॉटसाठी ही तयारी. तो प्रसंग त्यानं अजरामर करून टाकला. 

‘मुकद्दर का सिंकदर’ या चित्रपटात त्याचं ‘ओ साथी रे’ हे गाणं. पूर्ण गाण्यात तो पुतळ्यासमोर निश्‍चल उभा आहे. शरीराची हालचाल अगदी किमान! फक्त चेहऱ्यावरचे आणि डोळ्यांतले भाव आणि कपाळावर पडलेल्या थोड्या सुरकुत्या यांवर त्यानं ते गाणं जिवंत केलं आहे. ‘सात हिंदुस्तानी’ या पहिल्या चित्रपटापासून ते ‘पिंक’पर्यंत त्याचा अभिनय प्रगल्भ होत गेला; पण पहिल्यापासून त्यानं एक खास शैली विकसित केली. ‘आनंद’मध्ये ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ या गाण्यात तिसऱ्या कडव्याआधी त्याची जिना चढण्याची शैली आणि ‘डॉन’मध्ये झिनत अमानला त्याच्या ग्रुपमध्ये घेतल्यावर परत वरती जिना चढतानाची शैली यांत फारसा फरक नाही!

काही गाणी तर फक्त अमिताभची म्हणून मेलोडियस वाटतात. उदाहरणार्थ, ‘कस्मे वादे निभाएंगे हम’ हे ‘कस्मे वादे’ चित्रपटातलं गाणं. ते राजेश खन्ना, शम्मी कपूर, देव आनंद यांच्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या तुलनेत कुठंच सरस नाही, तरीही आपल्याला ते आवडतं!

दिलीपकुमार हा महान अभिनेता आहे; पण अमिताभची ‘रेंज’ दिलीपकुमारपेक्षा जास्त वाटते. १९७५ या एकाच वर्षात आलेले त्याचे ‘शोले’, ‘दीवार’, ‘चुपके चुपके’, ‘मिली’ आणि ‘फरार’ ही ‘रेंज’ सिद्ध करतात. ‘पा’ आणि बुढ्ढा होगा तेरा बाप’ या दोन्हींतही तो तेवढाच भावतो. ‘डॉन’मध्ये (कोणता ‘डॉन’ विचारता? माझ्या मते डॉन एकच आहे) त्यानं चार भूमिका केल्या आहेत, असं मला वाटतं. पहिली भूमिका डॉनची, दुसरी लुंगी नेसून पान खाऊन ‘डान’ म्हणणाऱ्या विजयची, तिसरी ‘डॉन’मध्ये परिवर्तित झालेल्या विजयची आणि चौथी ज्यावेळी सर्वांना कळतं की हा डॉन नाही, तर विजय आहे त्याची! यात तिसऱ्या भूमिकेमध्ये डॉनचा ‘फाइननेस’ जास्त; पण पहिल्या डॉनएवढा फाइन नाही आणि विजयची वैशिष्ट्यंही कमी. चौथ्या भूमिकेत विजयची वैशिष्ट्यं जास्त आणि ‘डॉन’ची कमी....या प्रत्येक ठिकाणी तो शोभून दिसतो. सध्याचे हिट चित्रपट पूर्वीच्या हिशेबानं नऊ ते दहा आठवडे चालतात. अमिताभचा ‘शोले’ शंभर आठवडे, ‘दीवार’ ७५ आठवडे, ‘नमक हलाल’ ५२ आठवडे (म्हणजे पूर्ण एक वर्ष) चालला होता. याला म्हणतात ‘हिट!’ याला म्हणतात ‘ब्लॉकबस्टर!!’’

१९७८ च्या एका महिन्यात एकापाठोपाठ एका शुक्रवारी ‘त्रिशूल’, ‘डॉन’, ‘कस्मे वादे’ आणि बेइमान असे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी रणधीर कपूर म्हटला होता ः ‘‘मी पहिल्यांदाच पाहतोय, की एकाच कलाकाराचे चार-चार चित्रपट एकाच वेळी थिएटरमध्ये चालू आहेत आणि सर्व चित्रपट ओव्हरफुल!’’

...मला वाटतं माझा जन्म अगदी योग्य वेळी झाला! अमिताभच्या अभिनयाचा प्रवास- जो अजूनही चालू आहे. अगदी ‘नो मिन्स नो’पर्यंत’- तो मला पाहता आला. आपण किती नशीबवान ना?