नावात काय आहे? (आनंद घैसास)

Article in Saptraga Anand Ghaisas
Article in Saptraga Anand Ghaisas

‘नावात काय आहे, नाव काही का असेना, गुलाबाचा वास नेहमीच गुलाबासारखाच राहणार,’ हे शेक्‍सपिअरचं प्रसिद्ध वाक्‍य. त्याच्या एका नाटकातलं. आजपर्यंत अनेकदा अनेकांनी याचा उपयोग करून घेतला. कधी संपूर्ण उधृत करून, तर कधी फक्त ‘नावात काय आहे’ एवढंच वापरून. मात्र, एखाद्या नव्यानं सापडलेल्या, वेगळ्याच गोष्टीला ओळखण्यासाठी तिला काहीतरी नाव द्यावंच लागतं. त्याचा वेगळेपणा जाणवण्यासाठी. आपण थोडं इतिहासात डोकावलो, तर अशी ‘विशेषनामं’ काही गुणांवरून ठेवण्याची पद्धत दिसते. महाभारतातला भीषण प्रतिज्ञा करणारा ‘भीष्म’, मेलॅनिनच्या अभावानं पांढराफटक पडलेला राजा ‘पंडू’ आणि त्याची मुलं ‘पांडव.’ कुरू घराण्याची जमीन म्हणजे ‘कुरूक्षेत्र’ वगैरे. विज्ञानात अशा नव्यानं सापडलेल्या वस्तू, पदार्थ, सजीव, त्यांच्या जाती, पानं, फुलं, वृक्ष-वल्लींना त्यांची जागा, म्हणजे त्या गोष्टी जिथं सापडल्या ते स्थान, त्या गोष्टी दिसतात कशा त्याचं काही वर्णन, किंवा त्यांच्यातली समानता दिसणाऱ्या, आधी माहीत असलेल्या काही गोष्टी यांच्या आधारे नव्या वस्तूंना नावं देण्यात येतात. कधी कधी नव्या गोष्टी ज्यांनी शोधल्या, त्या संशोधकांच्या नावानंही त्या ओळखल्या जातात. भौतिकशास्त्रात अशी उदाहरणं खूप आहेत.

एककांच्या बाबतीतही हे घडलेलं दिसतं. फॅरनहाइट, सेल्सिअस, वॉट, अँपिअर, न्यूटन किंवा पास्कलपासून अगदी ‘हिग्ज बोसॉन’पर्यंतची नावं पाहा. कधी कधी जुन्या मूळ कोणत्यातरी नावाचा अपभ्रंशही आजच्या प्रचलित नावात असतो. जसं, मूळ मल्याळी ‘मम्मा’वरून मराठीत ‘आंबा’, तर इंग्रजीत ‘मॅंगो’ झाले आणि त्यातल्या एका कलम करून तयार केलेल्या आंब्याला ‘अल्फान्सो ऑफ अल्बुकर्क’ या पोर्तुगीज लष्करी अधिकाऱ्याच्या नावावरून ‘अल्फान्सो’ आणि त्याचा अपभ्रंश ‘हापूस’ अशी नावं तयार झाली, जी आपण आजकाल सर्रास वापरतो. विज्ञानात मात्र याच आंब्याला ‘मांगिफेरा इंडिका’ म्हणजे ‘भारतीय आंबा’ असं नाव आहे, कारण आंबा हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. धूमकेतू, लघुग्रह किंवा इतर ग्रहांचे चंद्र यांची नावं त्यांच्या संशोधकांच्या नावावरून किंवा त्यांनी सुचवलेल्या एखाद्या नावावरून दिली जातात. ग्रहांच्या चंद्रांची, नैसर्गिक उपग्रहांची नावं तर ग्रीक पुराणातल्या देवी-देवतांच्या नावावरून देण्याची प्रथा आजही आहे. शनीच्या चंद्रांची नावं पाहा...टायटन, एन्सेलॅडस, मिमास, इआपेटस, डायोन इत्यादी... 

आकाशातल्या दूरवरच्या दीर्घिकांची नावं तर त्या कशा दिसतात, त्यावरून पडली आहेत. म्हणजे सिगारेटसारखी दिसणारी ‘सिगार गॅलेक्‍सी’, ‘सोम्ब्रेरो हॅट गॅलेक्‍सी’, ‘व्हर्लपूल गॅलेक्‍सी’ एवढंच नव्हे, तर तारकागुच्छांना ‘बटरफ्लाय क्‍लस्टर’, ‘कोट हॅंगर क्‍लस्टर’ तर काही तेजोमेघांना ‘की होल नेब्युला’, ‘क्रॅब नेब्युला’, ‘इगल नेब्युला’ अशा प्रकारे साधर्म्य दर्शवणाऱ्या वस्तू किंवा सजीवांची नावं आहेत. 

प्रत्येक बाबतीत ही वैज्ञानिक नावं कशी, कोणी, केव्हा द्यायची आणि ती सर्वमान्य जागतिक स्तरावर कशी मान्य करायची याचे काही दंडकही विविध वैज्ञानिक संस्थांनी ठरवले आहेत. यातलीच एक संस्था आहे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसीज एक्‍स्प्लोरेशन’ (आयआयएसई). या जागतिक जैवसंशोधन संस्थेनं गेल्या वर्षातल्या म्हणजे २०१६मध्ये सापडलेल्या नव्या सजीवांची आणि वनस्पतींची एक एकत्रित यादी तयार केली आहे. हे काम प्रामुख्यानं ‘सनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’च्या ‘कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड फॉरेस्ट्री’तर्फे करण्यात आलं. या सर्वांवर ‘इंटरनॅशनल टेक्‍झॉनॉमिस्ट कमिटी’चं अधिपत्य असतं. तिच्या मान्यतेनं या एकत्रित केलेल्या यादीची तपासणी होते, फेरतपासणी होते आणि नंतर त्यांच्यातर्फे ती प्रसिद्धीस देण्यात येते. मुख्य मुद्दा असा, की २०१६मध्ये शोध लागलेल्या एकूण अठराशे नव्या जातींच्या वनस्पती आणि सजीव यांच्यातले सर्वोत्कृष्ट दहा प्रकार त्यांची छायाचित्रं आणि नावांसह प्रसिद्ध झाले, तेव्हा ती नावं मला स्वत:ला फारच मजेशीर वाटली. रक्ताळ, भळभळणाऱ्या टोमॅटोला ‘टोमॅटो दॅट ब्लीड्‌स’, ड्रॅगन अँट अशी ती नावं. एका कोळ्याला तर हॅरी पॉटर सिनेमात वापरलेल्या ‘मॅजिकल हॅट’चं नाव दिलं आहे, तर एका सुंदर छोटेखानी ऑर्किड (बांडगूळ) फुलाला चक्क ‘डेव्हिल’ म्हणजे ‘सैतानी ऑर्किड’ म्हटलं आहे. 

सर्वांत प्रथम २००८मध्ये अशी नव्यानं शोधलेल्या सजीवांची आणि वनस्पतींची वार्षिक यादी प्रसिद्ध करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्याच वेळी त्यातल्या मनोवेधक, खास आणि सर्वोत्तम अशा दहा नमुन्यांची छायाचित्रांसहित माहितीही प्रसिद्ध करणं सुरू झालं. सर्वसाधारणपणे ३१ मे या दिवशी ही यादी जगासमोर ठेवली जाते. त्याचंही कारण म्हणजे जागतिक कीर्तीचे जैववर्गिकीचे शास्त्रज्ञ (टॅक्‍झॉनॉमिस्ट) कार्लोस लिन्नाएस यांचा तो जन्मदिवस. या अठराव्या शतकातल्या वनस्पतीशास्त्राच्या संशोधकाला टॅक्‍झॉनॉमीचा म्हणजे ‘जैववर्गीकरण’शास्त्राचा जनक मानलं जातं. त्यानं तयार केलेल्या जैववर्गीकरण पद्धती आजही वापरल्या जातात. 

नष्ट होण्याचं प्रमाण जास्त
गेल्या दशकाच्या कालखंडात एकूण दोन लाखांवर नव्या जातींचा शोध लागला असला, तरी या काळात झालेल्या संशोधनात आणखी एक गोष्ट दिसून येत आहे, की ज्या प्रमाणात, किंवा ज्या दरानं नव्या जाती सापडत आहेत, त्याच्या कितीतरी अधिक पटीनं अनेक जाती आता नामशेष होताना दिसत आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कित्येक प्रजातींचा एक खास अधिवास असतो. म्हणजे त्यांची राहण्याची एक विशेष ठराविक जागा असते. अशा ठिकाणी माणसाच्या ‘विकासाच्या’ अतिक्रमणानं, मग ते रस्ते बांधणं, घरं बांधणं, अगदी शेतीसाठी जंगलाच्या जमिनीचं अधिग्रहण असो, की धरणाच्या पाण्याखाली जाणारी जमीन असो, तिथल्या प्रजाती नामशेष होत आहेत. काही जाती निव्वळ वायूप्रदूषणामुळं नष्ट होताना दिसत आहेत. तापमानात होणारा फरक, अवेळी होणारा आणि आम्लयुक्त पाऊसही या प्रजातींच्या नामशेष होण्यास कारणीभूत आहे. हे मी सांगत नाहीये, तर या जागतिक प्रजातींच्या संशोधन केंद्राचे संस्थापक-संचालक, क्वेंटीन व्हीलर २०१६मधल्या यादीच्या प्रसिद्धीच्या वेळी झालेल्या भाषणात हेच बोलत होते. नव्या जातींच्या शोध-दरापेक्षा कोणत्या जाती नष्ट झाल्या त्याचा दर अनेकपटींनी मोठा आहे, ही खंत त्यांनी व्यक्त केली. असो.

गेल्या वर्षातल्या नव्यानं सापडलेल्या प्रजाती कोणत्या, त्या कुठं सापडल्या, त्या दिसतात कशा ते आता पाहू. इथं साऱ्याच देता येणार नाहीत, पण जे खास दहा नमुने प्रसिद्ध झाले, त्यातल्या निदान पाच प्रजातींची माहिती आणि छायाचित्रं बघुयात.

टोमॅटोची साल गुळगुळीत असते की काटेरी? त्याचा आकार जर एक रुपयाच्या नाण्याएवढा असेल, तर या नव्यानं सापडलेल्या टोमॅटोला काय म्हणाल?... या नव्यानं सापडलेल्या जातीला नाव दिलं आहे ‘सोलॅनम ऑस्सीक्रुएंटम टोमॅटो.’ याची साल लांब-लांब काट्यांनी भरलेली असते. हिरव्या रंगाची. या टोकदार काट्यांच्या सालीमुळं केसाळ, लोकरी असणाऱ्या मेंढ्या-बकऱ्यांच्या केसांना अडकून ही फळं आसपास विखुरली जातात. ती कोरडी होताना फुटून त्यांच्या बियांमधून मग नवी रोपं रुजतात. हे फळ फोडल्यावर आतून पांढरट पिवळे-पोपटीसर दिसतं; पण त्याकडं पाहत राहिलात, तर पाच मिनिटांत तुमच्यावर किंचाळी फोडण्याची वेळ येते... कारण ते रक्तासारखं लालभडक होत जातं आणि त्यातला रस भळभळा वाहू लागतो. एवढंच नव्हे, तर आणखी काही मिनिटांत ते रक्त साकळल्यासारखं काळंही पडू लागतं- अगदी गाठी झाल्यासारखं, मग काळवंडतं आणि थिजतंही! एका संशोधकानं धाडस करून ते चाटून पाहिलं, तर त्याची चव खारटसर लागली, असं त्यानं नमूद केलं आहे. मात्र, ते खाण्याचं धाडस अजून कोणी, अगदी जनावरांनीसुद्धा केल्याचं माहीत नाही. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातल्या एका जंगलात आणि त्याच्या आसपासच्या माळरानावर उगवणारं हे छोटंसं झुडुप आहे. याच्या बिया जाड सफेद पिवळसर आणि हाडांसारख्या वाटतात. फक्त ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी जमातीचे ‘वालमाजारी’ लोक यांचा गर पूर्वी खायचे, असं म्हणतात. म्हणून तर ‘ब्लीडिंग टोमॅटो’ असं नाव त्याला दिलं गेलं.

बोर्निओमध्ये (मलेशिया) मोठ्या आकाराचे ‘टारांटुला’ कोळी आणि लहान आकाराचे साप शोधण्याच्या मोहिमेवर निघालेल्या संशोधकपथकाला जंगलातल्या झुडुपांवर हिरव्यागार पानांमध्ये अचानक काही गुलाबी लालभडक पानं दिसली. झुडुपांत ही अचानक मध्येच लाल पानं कशी हे पाहण्यासाठी ते गेले असता, ते पान नाही तर एक कीटक आहे, असं लक्षात आलं. ‘ग्रासहॉपर’ म्हणजे आपण ज्याला गवत्या किंवा नाकतोडा म्हणतो तसा हा कीटक आहे, हे लक्षात आलं. २०१३मध्ये त्याची छायाचित्रं एका संशोधकानं ब्रिटनच्या जैवसंग्रहालयाकडं पाठवली; पण फक्त छायाचित्रावरून ही कोणती प्रजाती ते नक्की ठरवता येत नसल्यानं, प्रत्यक्ष नमुन्यांचं अधिक संशोधन करण्याची मोहीम ठरली. या नाकतोड्यांमधले सारे नर हिरव्या पानांसारखे होते, तर माद्या मात्र गुलाबी पानांसारख्या आहेत, हे दिसून आलं. विशेष म्हणजे याच्या पंखांचे आकार नुसते पानांच्या आकारासारखे नाहीत, तर पानांच्या शिरांच्या रचनाही त्यात तंतोतंत मिळणाऱ्या आहेत. याचे मागचे दोन्ही पायही छोट्या पानांसारखे आहेत, एवढंच नाही, तर पानाच्या देठाशी असणाऱ्या गाठीसारख्या रचनाही आहेत. ‘छद्मावरणा’चं (कॅमोफ्लाज) हे एक उत्तम उदाहरण ठरावं. कारण इतर पानांमध्ये हे कीटक बेमालूम मिसळून जाणारे आहेत. हे ‘युलोफिलिअम किरकी’ या नावानं आता ओळखले जाणार आहेत, जे ‘कॅटिडिड’ गटात येतात; पण हे ज्या भागात सापडले, ते रानही आकारानं छोटं आहे, तसंच त्यावर नारळी पोफळीच्या बागायतीकरणाचं अतिक्रमण होत आहे. या किटकांचा अधिवासच हरवत चालला आहे, ही एक चिंतेची बाब आहे. 

जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (राजमुकुटाचा खेळ) या गाजलेल्या पुस्तकावरून घेतलेल्या आणि एचबीओ चॅनेलवरून प्रसिद्धीस आलेल्या या टीव्ही मालिकेत दाखवलेल्या ‘ब्लॅक ड्रॅगन’ या कार्टूनशी साधर्म्य असणारा एक प्राणी म्हणून एका छोट्या मुंगीला ‘ड्रॅगन अँट’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुंगीचा कणा या कार्टूनमधल्या ड्रॅगनसारखा आहे. या मुंगीचा कणा वेडावाकडा आहे, असं जाणवल्यानं अधिक निरीक्षण करण्यासाठी चक्क क्ष-किरणांच्या प्रारणांचा वापर करून ‘सीटी स्कॅन’चं तंत्र वापरून तिचं संगणकावर त्रिमित चित्र तयार करण्यात आलं. एखाद्या सूक्ष्म किटकाचं वर्गीकरण करण्यासाठी अशा ‘मायक्रो टोमोग्राफी’ तंत्राचा हा पहिलाच वापर होता. हॉस्पिटलमध्ये मेंदूचं, शरीराचं काम कसं चालतं ते पाहण्यासाठी हे सीटी-स्कॅन तंत्र वापरतात. पापुआ न्यू गिनिआच्या जंगलात सापडणाऱ्या या मुंगीचं आता त्रिमित निरीक्षण संगणकावर उपलब्ध आहे, अगदी तिचा प्रत्येक भाग त्यात वर्धित करून पाहता येतो, एवढंच नव्हे तर हव्या त्या ठिकाणी छेदही घेऊन आत काय रचना आहे, हे पाहता येतं. प्रत्यक्षात छेद न घेता- क्ष-किरणांच्या माध्यमातून!

यादीतला चौथा मनोवेधक प्राणी आहे, मला अत्यंत प्रिय असणारा दहा पायांचा कोळी. ज्याचा संबंध जादुई जगाशी जोडण्यात आला आहे. ‘इरिओक्विझिया ग्रीफिंडोरी’ म्हणजे ‘ग्रीफिंडोरीची जादुई टोपी’ असं त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. हा एक झुडपांवर राहणारा छोटासा कोळी आहे. जे. के. रोलिंगच्या जगप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’च्या कादंबरीवरून जे चित्रपट तयार झाले, त्यातल्या जादुई टोपीचा पहिला मालक आहे ‘गॉड्रिक ग्रिफिंडोर.’ त्याच्या नावावरूनच या कोळ्याला हे नाव दिलं आहे, कारण हा अगदी त्या टोपीसारखाच दिसतो. टोपीसारखा दिसणारा हा त्याचा आकार एखाद्या पीळ पडलेल्या आणि वाकड्या झालेल्या वाळक्‍या पानाप्रमाणं दिसत असल्यानं तो झुडपात पटकन दिसून येत नाही. याच्या टोपीचं टोक म्हणजे खरं तर त्याचा वर उचलल्यासारखा पार्श्वभाग असतो. गंमत म्हणजे हा सापडलाय भारतात, तेही सह्याद्रीच्या खालच्या टोकाकडं असलेल्या कर्नाटकच्या जंगलात. झुडपात जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर हा राहतो. मलमली केस अंगावर असणारा, करड्या रंगाचा हा कोळी. मात्र त्याचं वैशिष्ट्य असं, की याच्या जननेंद्रियाची रचना इतर कोळ्यांपेक्षा अगदीच वेगळी आहे- त्यामुळंही त्याच्या वेगळेपणाची खात्री होते. सह्याद्रीच्या जैववैविध्याचं हे आणखी एक उदाहरण म्हणायला हवं.

‘सैतानी फूल’ - ‘टेलिपोगॉन डायबोलिकस’ हे ऑर्किड म्हणजे इतर झाडांवर बांडगुळाप्रमाणं वाढणाऱ्या छोट्या वनस्पतीचं नाव आहे. ऑर्किडची फुलं मुळातच मोठी मजेशीर असतात. कधी मांजर, माकड किंवा चक्क माणसाच्या चेहऱ्याचा आकार असणारी ऑर्किडची फुलं पुष्पप्रदर्शनांत हमखास दिसून येतात. या सैतानी म्हटल्या गेलेल्या फुलाला तीन पाकळ्या असतात, पांढऱ्या गुलाबी पट्टे असणाऱ्या. पण हो! या पाकळ्यांनाही नखांसारखे काटे असणारे पंजे असतात. मात्र, ते अगदी छोटेखानी असतात. पाकळ्या बदामाच्या आकाराच्या असतात, मोहक दिसतात. पण यांच्या मध्यात जे फुलाचं जननेंद्रियांचं ठिकाण असतं, त्याचा आकार चक्क सैतानाच्या चेहऱ्याचा आहे. मानेखाली एक काळा बदाम, वर वासलेलं भयाण हास्य करत असलेलं तोंड. फताडं नाक, पिवळे डोळे- त्यात लालबुंद बाहुल्या, टोकदार उंच कान आणि कपाळावर शिंगंही. डोक्‍यावर उभे राहिलेले केस. गुलाबी नाजूक पाकळ्यांच्या पार्श्वभागावर हा काळा सैतान अगदी उठून दिसतो. दक्षिण कोलंबियात पुटुमाया-नारिनोच्या मध्ये असणाऱ्या जंगलाच्या एका छोट्या पट्ट्यात ही ऑर्किडची फुलं दिसून आली. तिथं याची जेमतेम पन्नासएक रोपं असावीत. शिवाय या जंगलातूनच आता मोठ्या हमरस्त्याचं काम योजलं जात आहे, त्यामुळं या वनस्पतीला जागतिक स्तरावर आत्ताच ‘दुर्मिळ’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे! 

‘पोलका डॉट’ म्हणजे चॉकलेटी रंगावर पिवळे ठिपके असणारा आणि गोड्या पाण्यात राहणारा एक ‘स्टिंग रे’ जातीचा मासा, शाकाहार आणि मांसाहार दोन्ही समानतेनं करणारा; पण त्यातल्या त्यात झाडाची मुळं प्रामुख्यानं आणि सतत खाणारा एक चिचुंद्रीपेक्षा छोटा उंदीर, एक घोणीसारखा दिसणारा सरपटणारा बहुपाद, तर एक पांढरा नाजूक आणि लांब नाडीसारखा सहस्त्रपाद, तर एक मऊ पेस्ट्रीसारखा दिसणारा, समुद्राच्या तळाशी पडून राहणारा  समुद्रजीव हे त्या खास दहांपैकी इतर पाच. हे इतके सुंदर प्रकार आहेत, तरीही आपण पर्यावरणरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष का करतो, हा प्रश्न मला नेहमीच पडतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com