स्वच्छ भारताची सुरवात माझ्यापासून (आश्विनी देशपांडे)

स्वच्छ भारताची सुरवात माझ्यापासून (आश्विनी देशपांडे)

दैनंदिन घडामोडींत कामकाज, जेवण-खाण आणि झोप यांच्याचबरोबर एक गोष्ट आपण निश्‍चित करत असतो, ती म्हणजे कचरा! कळत-नकळत प्रत्येक व्यक्ती घरी-दारी, कामाच्या ठिकाणी, शाळा- कॉलेजात, करमणुकीच्या जागी, प्रवासात काही ना काही कचरा तयार करत असते, टाकत असते. या कचऱ्याचं पुढं काय होतं, हा विचार बहुतांशी लोकांच्या मनात कधीच येत नाही.

महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून कचरा उचलला गेला नाही तर ठिकठिकाणी ढीग साठून दुर्गंध आणि घाण पसरते तेव्हा नाक मुरडणारे पुष्कळ; पण सक्रियपणे तक्रार नोंदवणारे फार थोडे. कचऱ्याचे ट्रक कचरा उचलून पुढं कुठं जातात, त्या कचऱ्याचं वर्गीकरण होतं का किंवा त्याची पुढं कशा तऱ्हेनं आणि कुठं विल्हेवाट लावली जाते, याच्याशी सामान्य माणसाचा संबंध येतच नाही आणि त्यामुळंच ‘कचरा ही एक मोठी समस्या आहे,’ असा विचार केला जात नाही.

दररोज हजारो टन कचरा निरुपयोगी जमिनींवर टाकून दिला जातो; पण हा कचरा नाहीसा होत नाही. प्लास्टिक आणि त्यात असलेली हानिकारक रसायनं जमिनी, नद्या, समुद्र दूषित करतात. मानवी आणि अन्य प्राणिजीवनाला या प्रदूषणामुळं गंभीर धोका पोचतो. याचे दुष्परिणाम आज आपल्यासमोर इतके ठळकपणे उभे आहेत, की ते समजावून सांगण्याचीही गरज नाही.

विजेची आणि इंधनांची बचत, सौर अथवा पवनऊर्जा यांसारखे पर्यायी स्रोत, बायोडिग्रेडेबल प्लास्टिकवर संशोधन, प्लास्टिक वापरण्यावर निर्बंध असे अनेक उपाय जरी योजले जात असले, तरी ते यशस्वी होण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. शिवाय, या सगळ्या उपायांना मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान, संशोधनासाठी वेळ, भांडवल आणि सातत्यानं प्रयत्नांची गरज आहे. हे प्रयास सरकारी आणि धोरणात्मक पातळीवर सुरू राहतीलच; पण एक सामान्य व्यक्ती आपल्या परीनं, आपल्या कुवतीनुसार कचऱ्यासारख्या वाढत्या समस्येवर काय उपाय करणार? पंतप्रधानांना ‘स्वच्छ भारत’ हवा आहे. तुम्हा-आम्हालाही हवाच आहे; पण कचऱ्याची पिशवी घरासमोर येणाऱ्या गाडीत टाकण्यापलीकडं काहीच करण्याची इच्छा आणि तयारी नसेल तर कसा होणार भारत स्वच्छ? आपली समजूत असते की एक पिशवीभर कचऱ्यानं काय होतंय? खरं तर दुकानं, हॉटेल्स, कारखाने, रुग्णालयं हेच जास्त कचरा टाकत असणार. घरगुती कचरा त्यांच्या तुलनेत कमीच असणार; पण ही मोठी गैरसमजूत आहे. एका घरातून सरासरी २५ किलो कचरा दर महिन्यात बाहेर फेकला जातो. शहरी कचऱ्यातला ६० टक्के  कचरा हा घरगुती कचरा असतो. त्यातही विशेष म्हणजे त्यातला ४० टक्के कचरा हा ओला कचरा असतो. गेल्या काही वर्षांत ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकावा असं आवाहन जरी असलं तरी ते अंशतःच पाळलं जातं. शिवाय, वेगळा केला तरी तो कचरा दूरवर वाहून न्यावा लागतो आणि या टनावारी कचऱ्याची विल्हेवाटही सोपी नाही. ही समस्या जेवढी उकलावी तेवढी गुंतागुंत वाढतच गेलेली दिसेल, तर अशा किचकट समस्या डिझायनर्स विशिष्ट विचारसरणी वापरून सोडवू शकतात का?

पूनम बीर कस्तुरी या बंगळूरस्थित इंडस्ट्रिअल डिझायनरनं आपलं संपूर्ण ज्ञान, प्रयत्न आणि अनुभव कचऱ्याची समस्या सुटसुटीत उपायांनी, लोकसहभागानं सोडवण्यासाठी पणाला लावलेले आहेत. आज ही समस्या बहुचर्चित आहे. मात्र, पूनमनं या विषयावर १९८० मध्ये विद्यार्थिदशेत असतानाच काम सुरू केलं होतं. काही वर्षं व्यावसायिक सल्लागार आणि त्यानंतर अध्यापन अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत सुमारे १५ वर्षांपूर्वी पूनमनं परत एकदा कचऱ्याच्या समस्येवर संशोधनास सुरवात केली. जेव्हा कचऱ्याबाबतची वेगवेगळी आकडेवारी तिच्या पाहणीत आली तेव्हा घरगुती कचऱ्याची समस्या कमी केल्यानं मोठा सकारात्मक बदल होण्याची शक्‍यता तिच्या समोर आली. यातूनच प्रेरणा घेऊन दैनंदिन टाकाऊ कचऱ्यापासून कम्पोस्ट किंवा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी उपाय शोधणारी ‘डेली डम्प’ ही संस्था पूनमनं सुरू केली. ओल्या कचऱ्यातून घरच्या घरी कम्पोस्ट तयार करण्याची प्रक्रिया अवघड नाही; पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सहज वापरता येतील अशा साधनांची उणीव होती. ‘डेली डम्प टीम’नं यावर संशोधन सुरू केलं. कित्येक प्रकारांची आणि आकारांची स्टील, प्लास्टिक आणि मातीची भांडी, कचरा मिसळण्यासाठी लागणारी अवजारं, मिश्रणं, माशा किंवा किडे दूर राहावेत म्हणून करावं लागणारे उपाय, कचऱ्याचं प्रमाण आणि कम्पोस्ट तयार व्हायला लागणारा वेळ अशा अनेक पैलूंवर संशोधन आणि प्रयोग करून २००५-६ मध्ये ‘डेली डम्प’नं काही व्यवहार्य उपाय सादर केले. अशा प्रकारचं उल्लेखनीय काम करणारी ही संस्था २००७ मध्ये ‘इंडेक्‍स’ या जागतिक संस्थेद्वारे नावाजली गेली; पण पूनमला प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यात जास्त रस असल्यामुळं तिच्या टीमनं कुटुंबांच्या गरजेनुसार आणि घरांच्या आकारानुसार फ्लॅट, बंगला किंवा गच्चीवर सहज वापरता येतील, असे संच तयार करून बंगळूरमध्ये त्यांचा प्रचार करण्यास सुरवात केली. मोठा सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर बंगळूरमध्ये मर्यादित राहून चालणार नाही, हे पूनमच्या मनात स्पष्ट होतं. मात्र ‘डेली डम्प’ ही सामाजिक बांधिलकीवर उभारलेली संस्था असल्यामुळं गावोगावी केंद्र उघडून त्यांचं व्यवस्थापन करणं शक्‍य नव्हतं. यावर तोडगा म्हणून ‘डेली डम्प’चं संपूर्ण संशोधन, उपकरणांची माहिती आणि ती तयार करण्यासाठी आवश्‍यक तो तपशील पूनमनं खुल्या मनानं वाटायचं ठरवलं. तिच्या मते प्रत्येक शहरात ‘डेली डम्प’चा कित्ता गिरवणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या तरच मोठा बदल घडू शकतो. म्हणूनच कोणतीही व्यावसायिक गुप्तता न राखता या विषयावरचं ज्ञान आणि उपाय - ज्यांना या विषयावर काम करण्याची इच्छा आहे त्यांना उपलब्ध करून दिलं गेलेले आहेत. बदल घडवण्यात सर्वात मोठा आणि सक्षम घटक म्हणजे ज्यांच्याकडून वागणुकीत, सवयीत बदल अपेक्षित आहे त्या व्यक्ती. या उपक्रमाची सुरवात डिझाईन विचारसरणीच्या मूल्यांवर आधारित होती. त्यानुसार या व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून काही महत्त्वाचे निर्णय पूनमनं घेतले.

  1. समस्या सोडवण्याची शक्ती प्रत्येक घरातच उपलब्ध करून द्यायची.
  2. कचरा दूरवर वाहून नेण्याचे कष्ट आणि इंधन वाचवायचं.
  3. सरसकट सगळा कचरा हाताळण्याऐवजी केवळ ओल्या कचऱ्यावर लक्ष केंद्रित करायचं.
  4. कचऱ्याकडं ‘टाकाऊ’ म्हणून न बघता त्यातून काही निर्मितीचा प्रयत्न करायचा.
  5. ‘दृष्टिआड सृष्टी’ हा विचार बदलून कचऱ्याची समस्या डोळसपणे सोडवण्यास प्रत्येकाला प्रवृत्त करायचं.
  6. ‘हे माझं काम नाही’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझाही साहभाग’ असा बदल विचारसरणीत आणायचा.
  7. ‘कचऱ्यापासून कम्पोस्ट’ ही प्रक्रिया मोठ्या तंत्रज्ञानावर किंवा गुंतागुंतीच्या सूचनांच्या जंजाळात न अडकवता सोप्यात सोपी करून जास्तीत जास्त सहभाग मिळवायचा.

अशा प्रकारचे निर्णय घेऊन तयार झालेली उपकरणं सहज आणि सुटसुटीत तर आहेतच; पण ती दृश्‍य जागी ठेवली जातील म्हणून सुबक आणि सुशोभितही बनवली गेली आहेत. आकारांच्या गरजेनुसार काही संचांत मातीची भांडीही वापरण्यात आली आहेत. यामुळं ती उपकरणं मातीची भांडी बनवणाऱ्या काही व्यावसायिकांना उपजीविका देतात आणि सुंदरही दिसतात. येत्या नवीन वर्षात तुम्ही काही नवे संकल्प करणार असाल तर ओल्या कचऱ्याचं कम्पोस्टिंग करायला सुरवात करा. हे सोपंही आहे आणि उपयुक्तही. 

www.dailydump.org हे एक डिझाईन विचारसरणी वापरून, लोकसहभागातून मोठा सामाजिक बदल घडवू इच्छिणारं उत्तम उदाहरण आहे. अशाच प्रकारची उपकरणं आपल्या शहरात, परिसरात काही पुरस्कर्ते तयार करत असतील, तेव्हा त्यांनाही प्रोत्साहन द्या आणि नवीन वर्षात आपला भारत स्वच्छ करायला जास्त हातभार लावा!

(‘एलिफंट डिझाईन’ ही लेखिकेची संस्था ‘ओला कचरामुक्त’ आहे.) 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com