‘चले जाव’...नव्या संदर्भात! (जयदेव डोळे)

Article in Saptraga by Jaydev Dole on Quit India Movement
Article in Saptraga by Jaydev Dole on Quit India Movement

मुंबईत ७५ वर्षांपूर्वी काँग्रेस महासमितीचं अधिवेशन सुरू झालं तो दिवस होता सात ऑगस्टचा. कार्यकारी समितीनं ‘भारत छोडो’चा ठराव तयारच केलेला होता. आठ ऑगस्टला तो अध्यक्ष मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. सरदार पटेल यांनी त्याला अनुमोदन दिलं. ‘क्विट इंडिया रिझोल्युशन’ नावानं ब्रिटिशांना देश सोडून जायला सांगण्यात आलं. देशोदेशीचे पत्रकार जमले होते. हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही जमले होते. ‘ब्रिटिश सरकारनं यापुढं भारतात राहणं भारताला मानहानीकारक आणि दुर्बल करणारं आहे. जागतिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्दिष्टांसाठी स्वतःचं रक्षण भारताला अशक्‍य झालं आहे,’ अशी सुरवात करून अत्यंत परखडपणे आणि ठामपणे भारतानं ब्रिटिशांना बजावलं ः ‘जा येथून! सोडा भारत! नको आहात तुम्ही आम्हाला. गुलाम करता काय आम्हाला?...’ मग गांधीजींची हिंदी आणि इंग्रजीत भाषणं झाली. अध्यक्षीय समारोप मौलाना आझाद यांनी केला आणि रात्री दहा वाजता काँग्रेसचं हे ऐतिहासिक अधिवेश संपलं... पुढं ‘डू ऑर डाय’ अर्थात ‘करो या मरो’ चळवळ सुरू झाली. नेत्यांची धरपकड होऊ लागली. जनता रस्त्यावर येऊ लागली. लोक तुरुंगांत जाऊ लागले. ब्रिटिश आणखी चेव येऊन जुलूम करू लागले. पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणू लागले ः ‘ब्रिटिश साम्राज्याचा समारोप करणारा मी फर्स्ट मिनिस्टर नाही. बघतोच हे भारतीय काय करतात ते!’ 

‘मेरे देश की धरती सोना उगले...’ असं किसानगीत गाणारा ‘भारतकुमार’ इतका हताश अन्‌ करुण कसा काय होतो? सोडून द्यायला पटवलं पाहिजे अडचणीतल्या साऱ्या शेतकऱ्यांना.

...पाहतापाहता पाऊणशे वर्षं झाली देशाच्या त्या ठाम दरडावणीला. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागानं भारत स्वतंत्र झाला. ‘छोडो भारत’ ते ‘स्वतंत्र भारत’ फक्त पाच वर्षं लागली; पण केवढा उत्पात झाला जगभर. ब्रिटिश, डच, फ्रेंच, जपानी यांची साम्राज्यं मग भराभर नष्ट होऊ लागली. गुलामी आटोपली. माणूस स्वतंत्र झाला. अवघा देश एका ध्येयानं पेटला, की काय परिवर्तन होऊ शकतं, याचा प्रत्यय मानवतेनं घेतला. ‘इंडिया दॅट इज भारत’ सर्वांच्या प्रेरणास्थानी बसला. एक ‘गरीब, अशिक्षित, जातीबद्ध, अंधश्रद्ध आणि खेडवळ’ देश असा कसा एकवटून स्वातंत्र्य मिळवू शकतो? जगातले अनेक लेखक, पत्रकार, संशोधक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते भारताचा अभ्यास करू लागले. आजवर गेल्या साठ-सत्तर वर्षांत हजारो पुस्तकं भारतावर लिहिली गेली आहेत. चर्चिल यांनी तर शापवाणी उच्चारली होती - ‘संपून जाल तुम्ही, सरकार अन्‌ देश कसा चालवायचा याची अक्कल नाही तुम्हाला!’ 

भारत हसला. त्याला काहीही झालं नाही. एक प्रयत्न झाला आणीबाणीचा इंदिरा गांधी यांच्याकडून; पण २१ महिन्यांनी तो आटोपला. आताही देश त्याच वाटेनं जाऊ लागला आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. भारत हसतो आहे. आटोपतील, हेही आटोपतील...

निर्धार हवा
...पण नुसतं हसून अन्‌ पुटपुटून चालणार नाही. तो १९४२चा निर्धार करायला हवा. एक खणखणीत, दणदणीत निर्धार. ‘छोडो भारत’ असं आपण इंग्रजांना बजावलं. आता आपल्याला इतर अनेक गोष्टींसाठी दरडावायला हवं. त्यांना म्हणायला हवं- सोड भारता... ‘छोड दो.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जातमुक्त भारताचं स्वप्न आपण पूर्ण करूयात.
 

आपल्या राज्यघटनेत फेरफार करायचा विचार सोडून दे भारता- ‘छोड दो भारत!’ दुरुस्त्या करत राहा; पण अवघी राज्यघटना बदलायचा किंवा त्यामधली तत्त्वं, मूल्यं वगळायचा विचार तू त्यागावा देशा. राज्यघटना समितीत बसलेल्या सर्व प्रकारच्या, विचारांच्या सदस्यांनी ही राज्यघटना घडवली आहे. ती यथायोग्य प्रातिनिधिक आहे. ही राज्यघटना सर्वांना न्याय, स्वातंत्र्य, समानता देणारी आहे. त्यात नव्यानं लुडबूड म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळात ‘पुनर्विलोकना’च्या नावाखाली सुरू होताहोता राहिली. तशी नको आहे. सोडून दे तो विचार. भारताचा आत्मघातच होईल तो!

प्राणत्यागाचा विचार सोडून दे भूनायका
सध्या आत्मघात, आत्महत्या म्हणजे शेतकरी भारत असं समीकरण तयार झालं आहे. पहिल्या हरितक्रांतीच्या आसपास आलेल्या ‘उपकार’मध्ये ‘मेरे देश की धरती सोना...’ असं किसानगीत, खांद्यावर नांगर पेलत गाणारा ‘भारतकुमार’ इतका हताश अन्‌ करुण कसा काय होतो? सोडून द्यायला पटवलं पाहिजे अडचणीतल्या साऱ्या शेतकऱ्यांना. आमच्या पोशिंद्या, आमच्या भूनायका, प्राणत्यागाचा विचार सोडून दे.
मुलींनो, बायांनो, आयांनो इतकं घाबरलात तुम्ही पुरुषांना? पुरुषांचंच नाव मिरवणारा हा देश बऱ्याचदा स्वतःपुढं माताही लावून घेतो, जणू ज्ञानेश्‍वर माऊलीच! ‘माता’ म्हणवून घ्यायचं अन्‌ मारकुट्या, रागीट, बेभान पित्यासारखं वागायचं? बायांनो, किती हे तुमचं सहनशील वर्तन?... छेडछाड, सतावणूक, बलात्कार, हत्या...वाढतच चाललंय प्रमाण सर्वांचं. एकीकडं खांद्याला खांदा लावायला सांगणारे त्या खांद्याच्या खाली घाणेरडी नजर खिळवत राहतात. बरं वाटतं का असं? सोड बाई, तोड हा पुरुषी विकार अन्‌ विखार. तूही मोकळी, निर्धोक जग! सोड ते भय. ‘निर्भय बनो!’ 

असहिष्णुता आली कुठून?
भारत हा किती तरी धर्मांचा, जन्मदाता आणि आश्रमदाता. प्रेषित, पैगंबर, तथागत, वर्धमान अशा कैक संस्थापकांचे अनुयायी भारताचे रहिवासी. हिंदूबहुल भारताचे रहिवासी; पण ही असहिष्णुता कुठून आणली गड्या तू भारता? ती तर ‘इंपोर्टेड’ नाही. अगदी छान ‘होमग्रोन’ आहे. सोडून दे ती. त्रास होतो सर्वांना तिचा. ठेचणं, तिंबणं, चेचणं हे हे शब्द सभ्य आणि सुसंस्कृत समाजातून नाहीसे होत असतात, असं ऐकलं होतं. त्यांचा पुनर्जन्म कसा काय केलास बाबा? पुनर्जन्मावरचा विश्‍वासही कमी होत असताना कसं काय माणूस तुडवून मारणं ‘उगवलं’ कळत नाही. सोडायला पाहिजे. अरे, लगेच जगभर बातम्या पोचतात त्याच्या. भारत पुन्हा रानटी अन्‌ जंगली बनत चालला की काय अशी शंका वाटू लागलेत काही इंग्रज. आता त्या इंग्रजांनी ‘छोडो भारत, ऐसी राक्षसी हरकते छोड दो’ असं सांगावं काय? लाज काढलीस रे बाळा लाज.

आपल्या राज्यघटनेत फेरफार करायचा विचार सोडून दे भारता! दुरुस्त्या करत राहा; पण अवघी राज्यघटना बदलायचा किंवा त्यामधली तत्त्वं, मूल्यं वगळायचा विचार तू त्यागावा देशा.

इंग्रजांमुळं आपण क्रिकेट शिकलो. तो ‘लगान’ आठवणीत आहे सर्वांच्या. त्यात भारत तरबेज होऊन जगज्जेता (म्हणजे क्रिकेटवाल्या दीड डझन देशांपुरता) झालासुद्धा. आता त्यात भारतीय महिलांचा संघही उतरला अन्‌ उपजेता बनला. लगेच बक्षीसं, कौतुकं, नोकऱ्या यांचा वर्षाव सुरू. केवढा हा ढोंगीपणा! अगदी प्रासंगिक गौरवगायनाचा बेसूर प्रयोगच. साहजिक आहे म्हणा. ३३ टक्के, ५० टक्के प्रतिनिधित्व द्यायलाच जिथं खळखळ, तिथं हक्क, जबाबदाऱ्या, निर्णयाधिकार या गोष्टी महिलांना मिळतील कशा? भारता, सोड आता हा ‘नैमित्तिक करार.’ महिलांचा सदासर्वदा सन्मान होत राहील, असं मन बनवायला हवं तुझं. म्हणजे आपलं! एखाद-दुसरं मोठं पद देण्याचा अन्‌ त्यातून महिलांचा मान राखण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न सोड, हुशार मुली देश सोडत आहेत. परदेशी स्थानिक होत आहेत. हा नाही वाटतं ‘ब्रेन ड्रेन?’ त्या परताव्यात असं वाटत असेल, तर हुंड्याची, दुय्यम दर्जाची, मरेस्तोवर राबवण्याची पुरुषी मनोवृत्ती संपून त्यांना स्वागतशील वातावरण मिळवून द्यावंस. पुरुषी अहंकार कायमचा सोड भारता.

‘छोडो जाती’
आता एक अवघड त्याग करायला हवा. सर्वांना नाही जमला, तरी एकेकानं करायला हवा. तो म्हणजे जातत्याग; छोडो जाती. जयप्रकाश नारायण यांनी जानवं तोडण्याचं आवाहन केलं होतं. खूप जणांनी देशभर ते नेलं, पाळलं. आता देश जात्यात अडकल्यासारखा जातीत अडकला आहे. नवे राज्यकर्ते निवडणुकांचे इतके तज्ज्ञ आहेत, की त्यांनी वेगवेगळ्या जातींना बाळसं आणवलं आहे. अगदी मनसोक्त तुष्टीकरण, बळकटीकरण करतात ते. बूथपासून मतदारांच्या वस्त्यांप्रमाणं पदवाटप अन्‌ सत्तावाटप चालू आहे. वर कसे म्हणतात, की यांना आधीच्यांनी बाजूला ठेवलं होतं! हो, आधीचे वस्ताद निघाले. तुम्ही ‘महावस्ताद’ कशाला होताय? सोड दोस्ता हे जातपात प्रकरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जातमुक्त भारताचं स्वप्न आपण पूर्ण करूयात.

सोड बाई, तोड हा पुरुषी विकार अन्‌ विखार. तूही मोकळी, निर्धोक जग! सोड ते भय. ‘निर्भय बनो!’
 

तरुण भारता, सेल्फीचा सोस सोड
हे तरुण भारता, तुझा सेल्फीचा सोस तुझ्याच अंगलट येत चाललाय बाळा. सोडून दे तो. मोबाईलच्या साह्यानं खरेदी करा, विका, चित्रपट बघा, गाणी ऐका, बातम्या वाचा, फोटो काढा वगैरे बाबतींत फार पटाईत झालाय तरुण भारत. सारखा आपलं डोकं खुपसून बसलेला त्या आयताकृती आविष्कारात. जरा आजूबाजूला बघ की! लोकपाल अन्‌ भ्रष्टाचाराविरोध विसरलास की काय? परीक्षांचा गोंधळ, निकालांचा घोळ, शिक्षकांचं दुर्लक्ष, न होणारे तास, जुनाट अभ्यासक्रम, संस्थाचालकांची लूटमार, पालकांची बेसुमार दडपणं... हे सर्व मोबाईलमधून सुटणारं नाही. प्रत्यक्ष चार हात करावे लागतील, रस्त्यावर यावं लागेल, राज्यकर्त्यांशी भांडावं लागेल. त्या बेरोजगारीचं काय करणार तुम्ही लोक? की हाताला मोबाईलचं काम मिळालंच आहे, असं समजताय तुम्ही? सोड बाबा, त्या सेलफोनचा सोस सोड.

अजून केवढे तरी प्रश्‍न आहेत भारता. देशाला शत्रू होतेच; पण त्यात भर का पडत राहावी नव्यांची? कोण निर्माण करत चाललंय हे शत्रू जरा समजून घे. कोणाची ही खुमखुमी आणि कोणाचा हा माजोरीपणा जरा ध्यानात घे. आधी विकासाकडं लक्ष द्या म्हणावं, मारामारी कुठं करत बसता?...म्हणून मौन सोड देशा. जे चाललंय ते बरं नाही, असं बजावायला पाहिजेस तू भारता! ‘छोडो भारत’ म्हणजे सत्ता सोड, असा रीतसर ठराव करून आपण ब्रिटिशांना सांगितलं, हे कधी विसरू नयेस. आळस सोड, आराम हराम है.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com