भारतीय चित्रकलेतलं 'कथन'पर्व (मंगेश नारायणराव काळे)

Article in Saptaranga By Mangesh Kale
Article in Saptaranga By Mangesh Kale

भारतीय समाज हा काहीएक अर्थानं सश्रद्ध समाज आहे. उत्तराधुनिक काळात किंवा जागतिकीकरणाच्या पडझडीनंतर नवजाणिवेतून, विज्ञाननिष्ठतेतून भारतीय समाजाची ‘श्रद्ध’वृत्ती बऱ्यापैकी निमालेली असली, भारतीय समाजाच्या ‘नेणिवे’त श्रद्धा नि समर्पण या तत्त्वांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, ही एक गोष्ट स्वीकारावीच लागेल नि हे असं आहे ते यामुळंच, की भारतीय संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. अशा समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गोष्ट ‘रचणं,’ ‘सांगणं’ नि ‘ऐकणं.’ हजारो वर्षांच्या भारतीय समाजाच्या घडणीत ‘गोष्ट’ किंवा ‘कथन’ हे तत्त्व वारंवार दिसत आलं आहे. भारतीय समाजाची ती आंतरिक गरज राहिलेली आहे.

‘पुराणं’, ‘उपनिषदं’, ‘महाभारत’, ‘रामायण’ यांसारखी महाकाव्यात्मक ‘कथनं’ किंवा ‘पंचतंत्र, ‘कथासरित्सागर’ यांसारखी अस्सल भारतीय लोककथनं यांचा एक मोठा वारसा नि त्यांचा इथल्या जनमानसावर असलेला प्रभाव भारतीय साहित्य-कलांना नेहमीच बळ पुरवत आला आहे. भारतीय वाङ्‌मय, संगीत, नाटक, चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कलांच्या भारतीय ‘घडणी’त हा प्रभाव वारंवार दिसून येतो. उत्तराधुनिक काळात माणसाचं रूपांतर एका ‘कमॉडिटी’त होत असताना किंवा एक ‘व्हर्च्युअल’ जग समांतरपणे उभं राहत असताना तर या मिथकीय, जादूई ‘कथना’चं गारूड जास्त वेगानं पसरत आहे.

भारताच्या संदर्भातला विशेष म्हणजे, हे ‘गारूड’ जसं भारतीय कलांना रसद पुरवणारं राहिलं आहे, तसंच ते कलेशी काहीएक देणं-घेणं नसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरही आरूढ होणारं आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारतीय चित्रकलेतल्या ‘कथन’पर्वाचा धांडोळा घेता येऊ शकतो. आधुनिक कलेत जिला आज ‘नॅरेटिव्ह आर्ट’ असं संबोधलं जातं, त्या शैलीच्या, प्रवाहाच्या अंगानं जिची मीमांसा केली जाते, अशा ‘नॅरेटिव्ह आर्ट’चा (Art that tell’s a story) उत्तराधुनिक कलेतही मोठा सहभाग असल्याचं दिसून येतं. एकीकडं पाश्‍चिमात्य कलेतून भारतीय कलेत तिकडचे पंथ-प्रणाली-प्रवाह यांचं आयातीकरण सातत्यानं होत गेलेलं जसं आपण प्रत्येक वळणावर पाहतो, तसं ‘प्रभाव’अंगानं आधुनिक भारतीय ‘नॅरेटिव्ह आर्ट’च्या संदर्भात ठामपणे म्हणता येत नाही. इतका हा प्रवाह भारतीय संस्कृतीशी जोडला गेलेला, इथलीच उपज असलेला असा आहे. ‘चित्रातून गोष्ट सांगण्याची कला’ ही खास भारतीय मातीतली गोष्ट आहे.

आदिमानवानं रेखाटलेल्या, रंगवलेल्या गुहाचित्रांपासूनच ‘कथन’पर शैलीची सुरवात गृहीत धरता येते. अर्थात, भारतीय कलेच्या या पहिल्या आदिम अभिव्यक्तीत थेटपणे ‘गोष्ट’ दिसत नसली तरी ‘शिकार करणं,’ ‘धार्मिक विधी’सारख्या प्रसंगाचं चित्रण हे एका अर्थानं ‘गोष्टी’चं पूर्वरूप म्हणता येईल. भारतीय चित्रकलेतली यानंतरची ‘कथन’ अभिव्यक्ती दिसते ती थेट इसवीसनपूर्व १८५ ते २६ या कालखंडात निर्माण झालेल्या शृंगराजवटीतल्या ‘बरहुत’ शिल्पात. ‘बरहुत’ शिल्पातल्या ‘जातककथा’ हे आजच्या ‘नॅरेटिव्ह’ चित्रांचं पहिलं ठळक प्रकटीकरण म्हणता येईल. सव्वाशे वर्षांच्या शृंगराजवटीत भारतीय कला नि साहित्य खऱ्या अर्थानं ऊर्जितावस्थेस आलं, जे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतरच्या ४००-५०० वर्षांत झाकोळून गेलं होतं. बरहुत, सांची व बोधीगया इथले स्तूप ही या कालखंडाची कलात्मक निर्मिती म्हणता येईल.

यानंतरचा टप्पा आहे तो अजिंठ्याच्या भित्तिचित्रांचा. हा टप्पा केवळ भारतीय कलेची केवळ महत्ताच वाढवणारा आहे असं नाही, तर जगभरातल्या कलेसमोर ‘भारतीय कले’ला ताठ मानेनं उभं करणाराही आहे. अजिंठ्याची भित्तिचित्रं, शिल्पं ही जशी भारतीय कलेच्या एका अतिशय प्रगत रूपाची ग्वाही देणारी आहेत, तशीच ती भारतीय ‘नॅरेटिव्ह’चं सगळ्यात महत्त्वाचं नि ठळक उदाहरण म्हणूनही आहेत.

‘कथन’पर चित्रशैलीच्या अजिंठ्याच्या भित्तिचित्रांची (Fresco) निर्मिती झाली ती गुप्तकाळात. इसवीसन ३२० ते इसवीसन ६०० अशी जवळजवळ ३०० वर्षांची प्रदीर्घ राजवट लाभलेल्या गुप्त राजवटीत भारतीय वाङ्‌मयाला व कलांना मोठं प्रोत्साहन मिळालं. म्हणजे इसवीसन ३२० मध्ये जेव्हा पहिला चंद्रगुप्त हा सत्तेवर आला, तिथूनच भारतीय कलेच्या ‘सुवर्णयुगा’ला सुरवात झाली, असंही म्हणता येतं.

भिंतीवर चित्र रेखाटून ते रंगवण्याची शैली, अभिनव पद्धत (Fresco Technic) हे खास गुप्तकालीन चित्रकारांनी विकसित केलेलं तंत्र म्हणता येईल. या भित्तिचित्रांत गौतम बुद्धांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या प्रसंगाचं जसं वर्णन आहे, तसंच ‘जातककथां’च्या रूपानं बुद्धांच्या लीलांचं, ‘बुद्ध’ होत जाण्याचं निरुपणही आहे. बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी, गुप्त राजवटीच्या बौद्ध धर्मावर असलेल्या श्रद्धेपोटी नि तत्कालीन भारतीय चित्रकलेच्या अभिव्यक्तीसाठी ही भित्तिचित्रं नि अजिंठ्यातली शिल्पं घडवण्यात आलेली दिसतात. देव-देवता, पशू-पक्षी, स्त्रीची विविध रूपं, पानं-फुलं (विशेषत्वानं ‘हत्ती’ व ‘कमळ’ आदींची रंगीत, वैचित्र्यपूर्ण चित्रं नि नक्षीचित्रं हे या अजिंठा शैलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल).

भारतीय चित्रकलेत रंगांच्या बरोबरीनं रेषेलाही स्थान आहे. मनुष्याकृतीचं जोमदार रेखाटन हा या कलेचा विशेष आहे. म्हणजे धाडसानं असंही म्हणता येईल, की भारतीय चित्रकलेत ‘रेषा’ हा घटक रंगापेक्षाही जास्त प्रभावी राहिला आहे. ‘अजिंठ्या’च्या चित्रकलेचं किंवा आधुनिक भारतीय कलेतल्या सगळ्यात जुन्या ‘बंगाली स्कूल’चं अवलोकन करताना तर हे विशेषत्वानं जाणवतं.

भारतीय कलेचा धांडोळा घेताना वेदकाळ ते मोहेंजोदारो हा एक टप्पा नि मोहेंजोदारो ते गुप्त राजवट (इसवीसनपूर्व १९१० ते इसवीसन ६००) हा दुसरा टप्पा अशी कालखंडाची विभागणी करता येते. दुर्दैवानं हे दोन्ही कालखंड मानवी संस्कृतीच्या नि भारतीय कलेच्या संदर्भात आजही अनोळखी, अस्पर्श आहेत. या काळातले कोणतेच मानववंश व कलाविषयक पुरावे उपलब्ध नसल्यानं या काळाविषयी काहीएक विधान करता येत नाही. वेदकालीन ग्रंथांत किंवा ऋग्वेदात मात्र चित्रकलेचा उल्लेख सापडतो. वात्स्यायनाच्या ‘कामसूत्र’ या ग्रंथातही चित्रकलेच्या काही अंगांची चर्चा झाल्याचं दिसतं किंवा त्यानंतरचा ‘चित्रलक्षण’ हा ग्रंथ तर थेटपणे चित्रकलेची इत्थंभूत माहिती देणारा ग्रंथ म्हणता येईल.

चित्रकलेचा एक स्वतंत्र कला म्हणून विचार झालेला दिसतो तो प्रामुख्यानं गुप्तकाळातच किंवा या काळाच्या काही काळ अगोदरही. मात्र ‘प्रेरणा’ दिसते ती प्रामुख्यानं राजसत्तेची किंवा धर्मसत्तेची. गुप्तकालीन कलाही याला अपवाद नाही. त्या वेळी भारतात प्रस्थापित असलेल्या बौद्ध धर्मासाठी बौद्ध धर्मप्रचारकांनी राज-धर्मसत्तेच्या आश्रयातून तत्कालीन शिल्पकला, वास्तुकला नि चित्रकलेचा वापर थेट धर्मप्रसारासाठी करून घेतलेला दिसतो. सर्वसामान्यांना धर्माविषयी, बुद्ध व बुद्धांच्या शिकवणुकीविषयी सहजतेनं कळावं 

या हेतूनं ‘जातककथां’च्या चित्रणाच्या माध्यमातून नॅरेटिव्ह (कथन) तंत्राचा प्रभावी उपयोग इथं झालेला दिसतो. हाच उद्देश पुढच्या काळातल्या नॅरेटिव्ह चित्रकलेच्या निर्मितीमागंही दिसून येतो.

अजिंठा शैलीतल्या कथनतंत्राचा मोठा प्रभाव भारताबरोबरच जिथं जिथं बौद्ध धर्म पाझरत गेला, त्या त्या संस्कृतीपर्यंत झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ ः नेपाळ, तिबेट, इंडोनेशिया (जावा-सुमात्रा) चीन, जपान आदी देशांतल्या कलेपर्यंत हा प्रभाव पोचलेला पाहता येतो.

अजिंठाशैलीतल्या ‘कथन’तंत्राचा एक समकालीन आविष्कार म्हणून ‘बाघ’ गुहेतल्या भित्तिचित्राकडंही पाहता येईल. ग्वाल्हेरजवळ अजमेरा जिल्ह्यात ‘बाघ’ गावातल्या गुहेत सापडलेली भित्तिचित्रं आज बहुतांशी नष्ट झालेली असली, तरी जी काही निसर्गाच्या नि मानवाच्या प्रकोपातून बचावलेली आहेत, त्याआधारे या भित्तिचित्रांचं ‘अजिंठा’ शैलीशी असलेलं साधर्म्य शोधता येतं. लाल रंगाचा बहुलतेनं वापर हे या ‘बाघ’ भित्तिचित्रांचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

चालुक्‍य राजवटीतल्या (इसवीसनपूर्व ५५० ते ६५०) बदामी इथली गुहाशिल्पं किंवा वैकुंठगुहेतली भित्तिचित्रं हे अजिंठाचित्रांचं एक वेगळं ‘व्हर्जन’ म्हणता येईल; परंतु काही अभ्यासकांनी या चित्रांनाही अजिंठ्याच्या ‘समकालीन’ म्हटलेलं दिसतं. भारतीय कलेच्या संदर्भात गुप्त राजवटीच्या अस्तानंतर जवळजवळ एक हजार वर्षं भारतीय चित्रकलेतल्या नव्या प्रवाहांची उपस्थिती जाणवत नाही किंवा अजूनही या काळातली काही कलारूपं आपल्यापासून ‘अज्ञात’ राहिलेली असू शकतात. एका अर्थानं हा भारतीय कलेसाठीचा उतरणीचा कालखंड होता, असंही म्हणता येईल.

पूर्व मध्ययुगात (इसवीसन ५५० ते ९९०) किंवा त्याही अगोदरच्या काळात अजिंठ्यासारखी मोठमोठ्या आकाराची भित्तिचित्रं रंगवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर दिसते. उत्तर-मध्ययुगात (११ वं ते १३ वं शतक) मात्र ही प्रवृत्ती मागं पडून, लहान लहान चित्रं चितारून, रंगवून हस्तलिखितं (पोथी) सजवणारी नवी शैली निर्माण झाली. सुरवातीच्या काळात ताडपत्रावर, रेशमी कापडावर व त्यानंतर कागदावर, ग्रंथाच्या लाकडी वेष्टनावर अशी चित्रं काढलेली दिसून येतात.

या हस्तलिखिताचे आकार हे भित्तिचित्राच्या तुलनेत अतिशय लहान असल्यानं पोथीच्या आकारमानाप्रमाणे ही चित्रं त्या मर्यादित अवकाशात निर्मिली जाऊ लागली. त्यामुळं भित्तिचित्रातून व्यक्त होणाऱ्या ‘कथन’तंत्राचा या चित्रांमधून जरी संकोच झालेला नसला, तरी भित्तिचित्रातल्या प्रतिमासृष्टीचा मात्र आकारभयानं संकोच झालेला दिसतो. म्हणजे ‘पर्शियन’ प्रभावातून आलेल्या मिनिएचर रूपाशी ही अगदी लहान आकाराची चित्रं साधर्म्य सांगताना दिसतात. ही रूपांतरणाची क्रिया (Transformation) व्हाया ‘पालशैली,’ ‘जैनशैली’मार्गे ‘मोगलशैली,’ ‘राजपूतशैली’ यांसारख्या भारतीय मिनिएचर रूपांपर्यंत झिरपलेली दिसते किंवा त्याही पुढं जाऊन ‘राजस्थानी कला’ नि ‘पहाडी कला’ अशा दोन वेगवेगळ्या वाटांनीही समृद्ध होत गेलेली दिसते किंवा ‘कांग्रा’शैलीसारख्या खास भारतीय रूपाची निर्मितीही भारतीय मिनिएचर, मोगलशैली व राजपूतशैलीच्या संकरातून झालेली दिसते.

या सगळ्याच मिनिएचर (लघुशैली) प्रकारात ‘कथन’तंत्राला एक विशेष स्थान आहे, म्हणजे मोगल ‘मिनिएचर’मध्ये जसं युद्धभूमीवरच्या घटनांचं चित्रण (नि कथन) आलेलं दिसतं, तसंच मोगल राजवटीच्या ऐहिक सुखलोलुपतेतून आलेलं ऐंद्रिय संवेदनही दिसतं. दोहोंमध्ये अर्थातच काहीएक ‘कथन’ रचण्याकडं चित्रकारांचा कल आहे. ‘राजपूतशैली’त धार्मिकतेला, आध्यात्मिकतेला महत्त्व दिलेलं आहे. ‘कृष्ण-गोपी, रासलीला’ यांसारख्या पौराणिक मिथकाची वारंवार केली जाणारी पुनरावृत्तीही आहे. चौदाव्या शतकात भारतात आलेल्या ‘पर्शियन’ कलेनं कलाकुसरीचं एक समृद्ध दालन भारतीय कलेसाठी खुलं केलं. बाबर, हुमायून या कलाप्रेमी मोगल बादशहांच्या पदरी असलेल्या इराणी व पर्शियन कलावंतांचा भारतीय कलेच्या या नव्या घडणीत महत्त्वाचा वाटा होता. इराणी, पर्शियन व भारतीय चित्रकारांच्या कलातंत्राचा, वैशिष्ट्यांचा संकर घडून ‘मोगलशैली’ निर्माण झाली. सोळावं ते अठरावं शतक असा जवळजवळ २०० वर्षांचा कालखंड हा भारतीय ‘मोगलशैली’च्या घडणीचा, उत्कर्षाचा कालखंड म्हणता येईल. वेगवेगळ्या प्रवाहातून, प्रभावातून पुढं मोगलशैलीतही ‘सिराजशैली’ (मोगल+पर्शियन), ‘तुर्कस्तानशैली’ (मोगल+तुर्क) यांसारख्या नव्या शैली अस्तित्वात आल्या. मोगलशैलीचा जन्म, विस्तार नि विकास हा राजाश्रयानं झालेला असल्यानं नि राजाज्ञेबरहुकूमच तिची निर्मिती होत गेल्यानं या काळातली चित्रनिर्मिती ही एका विशिष्ट मर्यादित विषयापर्यंतच झालेली दिसते. शिवाय, राजाच्या आवडीनिवडीचाही काहीएक परिणाम या चित्रातल्या ‘विषयवस्तू’वर झालेला दिसतो. उदाहरणार्थ ः जहाँगीरच्या कारकीर्दीत रेखाटनाच्या शैलीचा झालेला विकास. पशू, पक्षी, फुलं, फळं या त्याच्या छंदामुळं या प्रतिमासृष्टीचं प्राबल्य मोगल मिनिएचरमध्ये वाढलं. मोगलांची वृत्ती ही युद्धखोर नि ऐहिक सुखपोभोगी असल्यानं मोगलशैलीतल्या चित्रांमध्ये युद्धप्रसंगांचं चित्रण; राजाच्या प्रतिमेचं उदात्तीकरण, शिकारीचं चित्रण, वर्णन नि प्रसंगी शृंगारिक प्रेमप्रसंगांचं ‘चित्रण’ (कथन) करण्यात मोगल मिनिएचर्स गढलेली दिसतात. राजपूतकलेत बहुलतेनं असलेलं धार्मिक, आध्यात्मिक विषयांचं ‘चित्रण’ (कथन) यात अभावानंही आलेलं दिसत नाही. घटनेच्या वा प्रसंगांच्या तपशीलवार ‘वर्णना’चं (कथनाचं) ‘चित्ररूप’ याचं श्रेय अर्थातच ‘पर्शियन’ प्रभावातून आलेलं नाजूक रेखांकन, पातळ व फिक्‍या रंगांचा वापर या वैशिष्ट्याकडं जातं.

अकबराच्या काळापर्यंत हस्तलिखित ग्रंथांच्या सजावटीसाठी चित्रं काढण्याची परंपराही तोवर बऱ्यापैकी रूढ झालेली दिसते. मात्र, पूर्वसुरींच्या ‘जैन’ग्रंथांप्रमाणे इथं (मजकुरापेक्षा) चित्रांना दुय्यमत्व नाही. ‘अकबरनामा’, ‘बाबरनामा’, ‘शहानामा’ यांसारख्या ग्रंथातली चित्रं जशी आशयाला उठाव देणारी आहेत, तशीच ती मिनिएचर प्रकारातलं एक ‘कलारूप’ म्हणूनही महत्त्वाची आहेत. मोगल राजवटीचा विचार करता, औरंगजेबाची कारकीर्द ही ‘मोगलकले’ला उतरती कळा आणणारी ठरली. औरंगजेबाचा कलाविषयक दृष्टिकोन काहीसा संकुचित असल्यानं अनेक चित्रकारांचा राजाश्रय सुटला. स्वतःच्या आवडीनुसार किंवा तत्कालीन धनिकांच्या मागणीनुसार या कालखंडातली ‘मोगलशैली’ घडत गेली. एकेकाळी कलेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली चित्रकलेसारखी कला, तिचं तंत्र, दर्जा नि ‘कथन’तंत्र यांचाही पुढच्या काळात संकोच होत गेला. भारतात मोगलकला उत्कर्षाच्या स्थितीत असतानाच दक्षिण भारतात विजापूर, गोवळकोंडा, हैदराबाद आदी ठिकाणी नव्या ‘दक्षिणशैली’ची निर्मिती होत होती. तत्कालीन स्थानिक कला नि पर्शियन कलातंत्राच्या संकरातून नि मोगलशैलीच्या प्रभावातून ही शैली आकारास आली. ‘रागमाला’चित्रं हा या शैलीतला महत्त्वाचा कलात्मक दस्तऐवज म्हणता येईल.

मोगल शैलीच्या काळातच राजपुतान्यात (राजस्थान नि पहाडी प्रदेशात) राजपूतशैलीही आकार घेत होती. ही मिनिएचर्स रंगवणारे, रेखाटणारे चित्रकार हे तत्कालीन समाजातल्या सामान्य कारागीरांमधून आलेले स्थानिक चित्रकार असल्यानं साहजिकच त्यांच्या निर्मितीत समाजातल्या चाली-रीती, लोकजीवनाचं ‘कथन’ नि कृष्णभक्ती हे विषय आढळतात. यातून ही शैली घडत गेलेली दिसते. राजपूत चित्रकलेतूनच पुढं ‘राजस्थानी’ शैली नि ‘पहाडी’ शैली असे दोन समांतर व काहीसे भिन्न कलाप्रवाह भारतीय लघुशैलीच्या परंपरेत विस्तारत गेलेले दिसतात. राजस्थानशैलीत बुंदीकलम, किशनगढ कलम, बिकानेर कलम, मेवाड कलम आदी स्थानिक लोकप्रभावाचं आणि ‘राजस्थानी’ नि ‘पहाडी’ शैलीतल्या मिनिएचरमध्ये शृंगाराचं, रासलीलांचं, कृष्ण-राधा रतिभावाच्या प्रसंगांचं ‘चित्रण,’ ‘कथन’ होत गेलेलं दिसतं.

‘अजिंठा’ चित्रशैलीपासून ठळक होत गेलेल्या ‘नॅरेटिव्ह’ परंपरेचा विस्तार प्रामुख्यानं झालेला दिसतो तो भारतीय ‘मिनिएचर्स’मध्ये. हा ‘नॅरेटिव्ह’पट जसा भारतीय चित्रकलेला एक समृद्ध दालन उघडून देणारा ठरला, तसाच तो पुढच्या काळातल्या ‘आधुनिक’ भारतीय कलेला, नव्या कलारूपांना रसद पुरवणारा, प्रेरणा देणारा ठरला. अमृता शेरगिल यांच्यापासून ते गुलाम महंमद शेख, मनजितबावा यांच्यासारख्या अनेक महत्त्वाच्या भारतीय चित्रकारांनी ‘अजिंठा,’ ‘मोगल,’ ‘राजपूत’कलेतून ‘नॅरेटिव्ह’चं तंत्र आत्मसात करून भारतीय कलेच्या इतिहासात, परंपरेत चित्रकलेतले हे ‘कथन’पर्व विस्तारत नेलं. भारतीय दृश्‍यकलेसाठी ही एक महत्त्वाची घटना म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com