कशास कीर्तन असे धुराचे? (प्रवीण टोकेकर)

Article in Saptraga by Pravin Tokekar
Article in Saptraga by Pravin Tokekar

‘‘दोस्तों, ये दुनिया...ये दुनिया एक सर्कस है...’’ ‘मेरा नाम जोकर’मधल्या राज कपूरचा हा आवाज कानात जसा अनेक वर्षं घुमत राहतो, तसा आहे ‘लाइफ इज  ब्यूटिफूल.’ हसीं-मजाकमध्ये जीवनाचं सगळ्यात, सगळ्यात मोठं गुह्य सांगून जातो ‘लाइफ इज ब्यूटिफूल.’ आपली सामान्य, वळचणीची दु:खं किती किरकोळ आहेत, याची मोठ्ठी जाणीव करून देतो ‘लाइफ इज  ब्यूटिफूल’. खरंतर याला चित्रपट म्हणणं बरं वाटत नाही. तो आहे एक छान, सुंदरसा दृष्टिकोन. दुनियेच्या या रंगतदार खेळात सहभागी व्हायचं असतं. इरेला पडून उत्कटतेनं जगायचं असतं, असं आडपडद्यानं नव्हे, तर खुल्या मनानं सांगणारा दृष्टिकोन. 

दुसऱ्या महायुद्धातल्या यहुद्यांच्या छळछावण्या आणि हिटलर नावाच्या हैवानाचे कारनामे हा विषय काळाकुट्टच. भयभीत आणि करुण करणारा. होता होईतो त्याचा उल्लेखही करू नये. मानवतेच्या इतिहासातला सगळ्यात शर्मनाक कालखंड तो. आठवलं तरी माणूस म्हणून शरमेनं मान खाली जाते; पण इटलीच्या रोबेर्तो बेनिनीनं त्याचा धम्माल विनोदी चित्रपट करून टाकला. काम अवघड होतं. होलोकॉस्ट या विषयावर विनोद करणं बहुतेकांना आवडत नाही. ख्यातनाम लेखक पी. जी. वुडहाऊस यांनी ‘रेडिओ टॉक्‍स’च्या माध्यमातून (कुख्यात ‘बर्लिन ब्रॉडकास्ट्‌स’) तसलं काहीतरी करून पाहिलं, तर त्यांना उभं-आडवं धारेवर धरलं होतं लोकांनी; पण बेनिनीनं त्याच्यावर कडी केली. त्याचा ‘लाइफ इज ब्यूटिफूल’ बघायला वुडहाऊससाहेब हयात नव्हते. नाहीतर त्यांनी नक्‍की त्याची पाठ थोपटली असती. 

अर्थात प्रेक्षकांनीही बेनिनीची पाठ थोपटलीच. त्याला ऑस्कर मिळालं. गल्लाही चांगला जमला. त्याचा चित्रपट इतका कालातीत आणि अभिजात ठरला, की त्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या. यापुढंही निघतील. हा सिनेमा चुकवणं म्हणजे आपल्या ‘जाणिवांच्या समृद्धी-मार्गा’त धोंड आणून ठेवणं!

* * *

सुमारे १९३० च्या दशकात, इटलीमधल्या अरेझ्झा नावाच्या चिमुकल्या गावात ग्विडो ओरिफिचे नावाचा गमत्या यहुदी माणूस राहत होता. त्याचं पुस्तकांचं दुकान होतं; पण उद्योग लोकांना उगीचच हसवण्याचा. डोरा नावाची एक तरुण शिक्षिका त्यानं नाना खटपटी करून पटवली. पटवली...आणि पळवलीसुद्धा. अगदी लग्नाच्या मांडवातून हिरव्या घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन. आता हिरवा घोडा म्हटल्यावर तुमच्या भुवया जांभळ्या होणार! पण ती एक करुण गंमत आहे. ग्विडोचा काका एलिशियो याच्या घरातच तो आणि डोरा राहू लागले. यथावकाश त्यांना जोशुआ नावाचं पिल्लू झालं. ग्विडो हा बाप म्हंजे खराच बाप होता. पोरापेक्षाही अधिक पोरकटपणा करून पोराला भंडावून सोडणारा. काही मुलं कशी कायम ‘प्ले मोड’मध्ये असतात, तसा. पोराचं निरागसपण टिकवून धरणं हे त्याचं ब्रीद आहे जणू. जोशुआला जगातला सगळ्यात बेष्ट बाप भेटला बघा. 

...पण सगळं काही दृष्ट लागण्याजोगं सुरू असताना अचानक नाझी आणि सत्ताधीश मुसोलिनीच्या फॅसिस्ट फौजांची धाड गावावर आली. यहुदी लोकांना वेचून काढलं गेलं. रेल्वेच्या डब्यात नेसत्या वस्त्रानिशी कोंबलं गेलं. ओरिफिचे बाप-लेकरूसुद्धा याला अपवाद नव्हते; पण त्यांची आई डोरा ही कुठं ज्यू होती? तिनं ‘मलाही त्या रेल्वेगाडीतून जायचंय. जिथं माझं कुटुंब, तिथं मी’ असा हट्ट धरल्यानं नाझी अधिकाऱ्यांनीही खांदे उडवून तिला ‘मग मर आपल्या मौतीनं’ असं सांगत कोंबलंच.

‘‘आपण कुठं चाललोय, बाबा?’’ जोशुआनं विचारलं.

‘‘दूर मस्त गावाला. हा एक मोठ्ठा खेळ आहे, हे माहितीये का तुला? लपाछपीचा. आपण जिंकलो ना, तर एक प्रचंड मोठा रणगाडा बक्षीस!!’’ ग्विडोनं टकळी सुरू केली. आता याला थाप मारणं म्हणत नाहीत हं!

‘‘त्याला तोफ असेल?’’

‘‘ही ऽ ऽ लांबलचक...हो, पण त्यासाठी एक हजार पॉइंट्‌स जमवायला लागतील. जरा जरी चूक झाली की औट! औट झालेल्याच्या पाठीवर ‘गाढव’ असं लिहून पाठवतात मग...’’ ग्विडोनं डोळे मोठ्ठे करत खेळाची माहिती दिली.

‘‘काय करायला लागतं त्याच्यासाठी?’’

‘‘ते युनिफॉर्मवाले आहेत ना, ते खेळाचे मॉडरेटर आहेत. काही विशिष्ट कामगिऱ्या पार पाडायच्या. आपण ट्रेझर हंट खेळतो ना तसंच; पण खेळताना एकमेकांशी बोलायचं नाही. कुणाला दिसायचंही नाही. सारखं ‘आई कुठाय, आई कुठाय? करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हंजे ‘भूक लागलीये’ हे शब्दच ओठांवर येता कामा नयेत! ओके? बघ...रणगाडा मिळेल तुला’’ ग्विडोनं तिढा टाकला. रणगाडा! तोही तोफवाला!! कोण नाय म्हणेल?

...आणि एक भयानक खेळ सुरू झाला. क्षणाक्षणाला तो हसवतोय. हसता हसता डोळ्यांतून पाणी येतंय...त्यासोबत घशात आवंढाही.

* * *

एक पाच वर्षांचं पोरगं लपवून छळछावणीत राहणं सोपं नव्हतं; पण ग्विडोच्या हजरजबाबी आणि प्रसंगावधानी मनानं तो चमत्कार घडवून आणला. हेर लेस्सिंग या जर्मन अधिकाऱ्याशी जुनी ओळख निघाल्यानं काम थोडं सोपं झालं होतं इतकंच. एकीकडं पोराला सांभाळायचं. दुसरीकडं प्रिय डोराला हुडकायचं. तिला जोशुआ सुरक्षित असल्याचा निरोप पोचवायचा. तिसरीकडं स्वत:चा जीव सांभाळायचा. अशा तिहेरी युद्धात एकटा ग्विडो ओरिफिचे जिवाच्या आकांतानं लढत राहिला. त्याच्या हातात हत्यार एकच होतं ः विनोदबुद्धी.कारखान्यात हमालकामं करत असतानाच पोरगं कुठून तरी शोधत आलं.

‘‘बाबा, मी आंघोळ करणार नाही. ते आंघोळीला जा म्हणतायत!’’

‘‘चांगली आयडिया आहे की. माणसानं आंघोळ करावीच.’’

‘‘आंघोळीच्या नावाखाली ते लोक आपल्याला चुलीत (ओव्हनमध्ये) टाकतात, असं कुणीतरी सांगत होतं.’’

‘‘चुलीत? हाहा!! तू काय कोंबडा आहेस चुलीत टाकायला?’’

‘‘चुलीत टाकून ते आपली बटणं आणि साबण करतात म्हणे.’’

‘‘काहीत्तरीच! तुला कुणीतरी गंडवलंय...आता माझ्या शर्टाचं सगळ्यात वरचं बटण एलिशियो अंकलसारखं दिसतंय तरी का? तसं असतं तर, ‘मी बार्थोलोम्यूनं कपडे खसाखसा धुतले आणि फेरुचिओ लावून शर्ट घातला,’ असं म्हणायला लागतील ना लोक!’’

‘‘पण मी नाही जाणार आंघोळीला!’’

‘‘नकोच जाऊस. चुलीत बटणं, साबण नाही होत, जोशुआ. तिथं भाजतं आपल्याला...पण बाकी खेळ सुरू ठेवायचा हं का!’’

...आंघोळीसाठीची रांग पुढं सरकत राहिली. म्हातारेकोतारे आणि लहान मुलं न्हाणीघराच्या दाराकडं बघत पावलं उचलत राहिली. न्हाणीघराच्या छतावरची चिमणी अहोरात्र धूर ओकत होती.

* * *

हे फार काळ चालणार नव्हतं. नाना हिकमती लढवत ग्विडो जगत राहिला. त्यानं शेवटी एका जंक्‍शन बॉक्‍समध्ये जोशुआला लपवलं. ‘थंडी वाजली तरी इथून बाहेर पडायचं नाही,’ असं बजावलं. स्वत: डोराच्या शोधात निघाला. 

अंधाऱ्या रात्री डोरा त्याला नाहीच भेटली; पण कुठल्या तरी घाईत आलेल्या नाझी पहारेकऱ्यांना मात्र तो सापडला. जंक्‍शन बॉक्‍समध्ये बसलेल्या जोशुआला हे दिसत होतं. पहारेकऱ्याच्या बंदुकीच्या टोकावर चालत निघालेल्या ग्विडोनं त्या जंक्‍शन बॉक्‍सकडं बघितलं. त्याला फटीतून त्याच्याकडं पाहणारे जोशुआचे डोळे दिसले. ग्विडोनं मस्तपैकी डोळा मारला. गेम इज स्टिल ऑन, बडी.

...खूप काळ गेल्यानंतर सामसुमीच्या चाहुलीनं जोशुआ जंक्‍शन बॉक्‍सच्या बाहेर आला. छावणीत कुणीही नव्हतं. तेवढ्यात घरघराट ऐकू आला आणि पाठोपाठ दोस्तफौजांचा एक भलामोठा रणगाडा.

‘‘हे बडी, इथं कुणी नाही का?’’ रणगाड्यातून एक सैनिक विचारत होता. जोशुआनं मान हलवली. सैनिकानं त्याला खाली उतरून उचलून घेतलं. रणगाड्यावर बसवून स्वत:चं हेल्मेट त्याच्या डोईवर चढवलं. जोशुआला खरंच रणगाडा बक्षीस मिळाला होता.

* * *

‘लाइफ इज ब्यूटिफूल’ची नेमकी कथावस्तू आणि क्‍लायमॅक्‍स या गोष्टींची रसभरीत वर्णनं करणं म्हणजे श्रीखंडात मसाला घालण्यासारखं आहे. तो चौकटीचौकटीतून डोळे भरून पाहावा. डोळे भरून म्हणजे अक्षरश: डोळे भरून...! ग्विडोच्या माकडचेष्टा, त्याचे चटकदार संवाद हे अनुभवण्याजोगे आहेत. छोट्या छोट्या संवादांत खूप अर्थ भरलेला आहे, हे जाणवत राहतं. तोकड्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट. रॉबेर्तो बेनिनीच्या घरचाच मामला. स्टोरी त्याचीच. पटकथा त्याचीच. इतकंच नव्हे तर नायिकाही त्याचीच. त्याची बायको निकोलेटा ब्राशीनंच डोराचा रोल केला आहे. जोशुआ साकारणारा जॉर्जिओ कारांतिनी त्याच्या डोळ्यांनीच आपल्याला जिंकतो. कसलं टेरिफिक पोरगं आहे! अर्थात तद्दन इटालियन देशी चित्रपट असल्यानं यामध्ये त्रुटीदेखील खूप आहेत. काही चौकटींमध्ये तर मायक्रोफोनसुद्धा दिसतो. ग्विडो आणि अन्य पात्रं कायम तारस्वरात बोलतात; पण या गोष्टींकडं लक्ष जाणार नाही, असं विश्वाचं आर्त या चित्रचौकटींमध्ये ठासून भरलेलं आहे.

हा चित्रपट येऊन उणीपुरी वीसेक वर्षं झाली. १९९७ मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचं ऑस्कर बहाल करण्यात आलं, तेव्हा भर सभागृहात खुर्च्यांच्या पाठींवरून तडातडा उड्या मारत रॉबेर्तो बेनिनीनं स्टेज गाठलं होतं. त्याच्या या खोडकर ‘अंदाजा’नं टाळ्यांच्या कडकडाटात दुपटीनं वाढ झाली. ‘कुठं रडताय राव! जिंदगी किती सुहानी आहे, बघा!’ हे त्याचं साधं-सोप्पं सांगणं. चित्रपटाच्या सुरवातीलाच आपल्याला शब्द ऐकू येतात : ‘ही एक साधीसुधी गोष्ट आहे; पण सांगायला अवघड!’ ब्रूक्‍स या आघाडीच्या अभिनेत्याला मात्र हा चित्रपट बिलकूल आवडला नाही. ‘ ‘होलोकॉस्ट’ असले हलके विनोद करायला लाज वाट पाहिजे,’ असं तो म्हणाला. ‘लाइफ इज ब्यूटिफूल’च्या विरोधातला हा सूरदेखील आपण समजून घ्यायला हवा, हे खरं.

लिआँ ट्रॉट्‌स्की हा रशियन नेता मेक्‍सिकोतल्या विजनवासात होता. स्टॅलिननं पाठवलेले मारेकरी एक दिवस आपल्याला गाठणार, याची त्याला खात्री होती. तेव्हा बायकोला बगिच्यात काम करताना पाहून त्यानं आपल्या डायरीत लिहिलं होतं ः ‘हे सगळं (असं) असूनसुद्धा जीवन किती सुंदर आहे!’ बेनिनीनं तेच चित्रपटाचं शीर्षक म्हणून उचललं. बेनिनीनं हेदेखील सांगून टाकलं, की रुबिनो रोमिओ साल्मोनी या इटालियन लेखकाच्या ‘इन द एंड, आय बीट हिटलर’ या पुस्तकामुळं मला ‘लाइफ इज ब्यूटिफूल’ सुचला. हे लेखक साल्मोनी आऊसविट्‌झ यातनातळावरच्या यातना भोगून आले होते. होलोकॉस्टच्या अनुभवांवर शेकडो पुस्तकं आली, हे त्यांपैकी एक. पुस्तकातलं अखेरचं वाक्‍य तर अफाट आहे : आऊसविट्‌झ कॅम्पमधून मी हाती-पायी धड जिवंत परतलो. माझं एक छान कुटुंब आहे. नुकताच आमच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. डझनभर नातवंडं आहेत मला! मला वाटतं, मी हिटलरचा बेत संपूर्णपणे हाणून पाडला आहे!!’

रॉबेर्तो बेनिनीचेही वडील दोन वर्षं छळछावणीत राहून आलेलेच होते. त्यांचाही या चित्रकथेवर प्रभाव आहे, असं बेनिनी सांगतो. काहीही असेल. चित्रपट पाहून झाला तरी मनात ठाण मांडून बसतो. जाम हटत नाही. हात टाळ्या वाजवत असतात आणि डोळ्यात पाणी असतं. घशात काहीतरी दाटून येतं नि ओठांवर हसू असतं.

‘अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला? 

स्वप्नांचे नवगेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला

...जखमा घ्याव्या, जखमा द्याव्या, कशास रामायण पण त्याचे? 

अटळ मुलाखत जर अग्नीशी, कशाच कीर्तन असे धुराचे?’

...ही कुसुमाग्रजांची कविता हटकून आठवते. 

वर म्हटल्याप्रमाणे ‘लाइफ इज ब्यूटिफूल’ हा चित्रपट नाहीच. ते एका कल्पतरूचं बीज आहे. घरी न्यावं आणि कुंडीत लावावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com