शिवलेले ओठ (प्रवीण टोकेकर)

रविवार, 1 ऑक्टोबर 2017

वेगळा आवाज लावणाऱ्या विचारवंतांचे, पत्रकारांचे दिवसाढवळ्या खून पडताना आपण आजकाल पाहतो आहोत. सत्य केवळ कटूच नसतं, तर ते कधी कधी कमालीचं जहरीही असतं. आत्मघातकी तर असतंच. चोवीस तास बातम्यांचा मारा करणाऱ्या चित्रवाहिन्या, दैनिकं, सोशल मीडिया यांच्या गदारोळात आणि कुठल्याही विषयावर बेधडक आपलं मत नोंदविण्याच्या आजकालच्या जमान्यात ‘नथिंग बट द ट्रूथ’सारख्या चित्रपटांमधून उजेडाची बेटं दिसली तर जिवाला जरा बरं वाटतं.

वेगळा आवाज लावणाऱ्या विचारवंतांचे, पत्रकारांचे दिवसाढवळ्या खून पडताना आपण आजकाल पाहतो आहोत. सत्य केवळ कटूच नसतं, तर ते कधी कधी कमालीचं जहरीही असतं. आत्मघातकी तर असतंच. चोवीस तास बातम्यांचा मारा करणाऱ्या चित्रवाहिन्या, दैनिकं, सोशल मीडिया यांच्या गदारोळात आणि कुठल्याही विषयावर बेधडक आपलं मत नोंदविण्याच्या आजकालच्या जमान्यात ‘नथिंग बट द ट्रूथ’सारख्या चित्रपटांमधून उजेडाची बेटं दिसली तर जिवाला जरा बरं वाटतं.

सन २००३ मध्ये अमेरिका एका प्रकरणानं हादरून गेली होती. नायजर या देशाकडून इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यानं अण्वस्त्रांना लागणारी काही सामग्री विकत घेतल्याचा वास अमेरिकी गुप्तचर संस्थेला लागला आणि नाइन/इलेव्हननंतर आधीच हळवं आणि चिडचिडं झालेलं अमेरिकी प्रशासन आणखीच चक्रावून गेलं. सद्दामनं डोकेदुखी वाढवलेली होती. त्याच्या हाताला हे असलं काही तरी संहारक लागलं तर संपलंच सगळं. दुखावलेल्या गॉडझिलासारखी अमेरिका स्वत:च घातकी निर्णयांकडं झुकत चाललेली. दहशतवादाच्या विरोधातलं युद्ध तीव्र करण्याची ज्वालाग्राही भाषा एकीकडं मुखात होतीच, त्यात इराक रासायनिक अस्त्रांचंही गपचूप उत्पादन आणि साठा करतो आहे, अशा खबरांच्या लाटा येऊ लागलेल्या. संशय माणसाला पार रसातळाला नेतो. तसंच हे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ची पत्रकार ज्युडिथ मिलर असल्या बातम्यांच्या कायम मागं लागलेली. तिचे वृत्तान्त खळबळ उडवत होते. उत्तम पत्रकारितेसाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळवणारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची पत्रकारांची जी टीम होती, त्यात ज्युडिथ होतीच. भन्नाट आणि सनसनीखेज रिपोर्टिंगसाठी तिचा बोलबाला होता. त्याच सुमारास इराकच्या भानगडी उकरण्यासाठी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या पत्रकारांची एक टीमदेखील कामाला लागली होती. त्यातल्या रिचर्ड नोव्हाक नावाच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका पत्रकारानं त्याच्या स्तंभात सीआयएची हस्तक असलेल्या व्हॅलेरी प्लेम हिचं नाव फोडलं. त्याच्या आसपासच कधीतरी वेगळ्या ‘सोर्स’मधून बातम्या मिळवणाऱ्या ज्युडिथनंही या एकंदर प्रकाराचा ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून भंडाफोड केला. हे प्रकरण अमेरिकी माध्यमांमध्ये आता ‘प्लेमगेट’ म्हणून ओळखलं जातं. व्हॅलेरी अमेरिकी प्रशासनाच्या नोकरीत होती; पण ती सीआयएची हस्तक आहे, ही बाब अतिगोपनीय होती. जॉर्ज बुश आणि डिक चेनी यांच्या सरकारनं काहीतरी भलत्याच चुकीच्या कारवाया केल्या आहेत आणि अत्यंत चुकीच्या माहितीवर आधारित उद्योग करून नंतर ते दडपण्याचा सपाटा लावला आहे, हे ज्युडिथच्या वृत्तांमध्ये सविस्तर मांडलेलं होतं. ‘व्हाइट हाऊस’चे डोळेच पांढरे झाले. बुश-चेनी प्रशासन अडचणीत आलं. सीआयएच्या एजंटचं नाव असं पेपरात फोडतात? देशाच्या सुरक्षेची काही पर्वा आहे की नाही, अशी उलटसुलट टीका सुरू झाली. सीआयएच्या हस्तकाचं नाव फोडणं ही खरोखर एक राष्ट्रविरोधी बाब होती. कारण, शेवटी मामला देशाच्या सुरक्षेचा होता. 

ज्युडिथला कोर्टात खेचून विचारण्यात आलं ः ‘‘व्हॅलरी ही सीआयएची हस्तक आहे, ही माहिती तुला कुणी दिली?’’ ज्युडिथनं नाव सांगण्यास नकार दिला. ‘बातमीचा स्रोत सांगणार नाही’ हा तिचा बाणा कायम होता. ‘एरवी नागरी खटल्यांमध्ये हे तत्त्व ठीक आहे; पण देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही. अशा बातम्या फोडणारी माणसं प्रशासनात असतील, तर ते भयंकर धोकादायक आहे,’ असा युक्‍तिवाद कोर्टात अमेरिकी सरकारनं केला. अमेरिकी राज्यघटनेतली पहिली घटनादुरुस्ती नागरिकाच्या अनिर्बंध धार्मिक अथवा सामाजिक अभिव्यक्‍तीला संपूर्ण अभय देते. अभिव्यक्‍तीची, वृत्तपत्रांची, शांततापूर्ण जमावाची अथवा धर्मभावनांची गळचेपी होईल, असे कुठलेही कायदे करण्यास मनाई करते. १५ डिसेंबर १७९१ या दिवशी ही घटनादुरुस्ती अमेरिकेनं स्वीकारली आहे. या कलमांतर्गत पत्रकाराला आपला स्रोत न सांगण्याची मुभा आपापत: मिळते; पण देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असेल तर अशा पत्रकारावर कारवाई मात्र करता येते. न्यायमूर्तींनीही याच कारवाईचा बडगा दाखवून ज्युडिथला नाव सांगण्यास फर्मावलं. ‘कोर्टाचा अवमान केला म्हणून तुरुंगात जावं लागेल’, असा दम दिला. ज्युडिथ बधली नाही. ती ८५ दिवस तुरुंगात राहिली. तिनं शेवटपर्यंत आपला सोर्स सांगितला नाही. अर्थात पुढं ज्युडिथचे अनेक वृत्तान्तही खोटे ठरले. इराकमध्ये प्रत्यक्षात रासायनिक अस्त्रं कधी सापडलीच नाहीत. अण्वस्त्रांचाही ठावठिकाणा लागला नाही. अमेरिकेची व्हायची ती छी थू झालीच....

हे सगळं इथं सांगायचं कारण एवढंच, की या आठवड्यात आपण जो चित्रपट ‘वाचणार’ आहोत, तो याच सत्यकथेवर आधारित किंवा प्रेरित आहे. त्याचं नाव ः नथिंग बट द ट्रूथ.

हा चित्रपट अमेरिकेतही धडपणे प्रदर्शित झाला नाही. इटली आणि युरोपच्या काही भागांत दाखवला गेला. त्याला जाणकारांची दाददेखील मिळाली; पण ब्लॉकबस्टर चित्रपटाचं नशीब त्याच्या वाट्याला काही आलं नाही. कारण, त्याच सुमारास ‘यारी ब्रदर्स’ या निर्मात्या कंपनीनं दिवाळखोरीचा अर्ज दफ्तरदाखल केला होता. डीव्हीडीवर मात्र हा चित्रपट चिक्‍कार पाहिला गेला. काटछाट केलेल्या विदीर्ण अवस्थेत तो टीव्ही चॅनलवरही अधूनमधून लागतो. एरवी घरगुती खरेदीसाठी मंडईत जाऊन मुळा-मेथी विकत घेऊन पिशवी हलवत घरी येणाऱ्या पत्रकाराला प्रसंगी किती असामान्य पातळीवर लढावं लागतं, याचं मनोज्ञ चित्रण या चित्रपटात दिसतं. एरवी, पत्रकार जगतो ते जीवन फार सामान्य असतं. बहुतेकदा अगदीच सामान्य; पण त्याचा पेशा त्याला अशा वर्तुळात वावरत ठेवतो की ‘हे खरं की ते खरं’ असा संभ्रम जितेजागतेपणी पडावा. मंडईत मटार घेत असताना एखादा पत्रकार मुख्यमंत्र्याशी अघळपघळ बोलत असतो. एखाद्या कोट्यधीश उद्योजकाशी हंसी-मजाक करत असतो. एखादी सिनेपत्रकार पोराला शाळेत सोडायला रिक्षातून जात असताना फोनवर थेट ऋतिक रोशनशीच गप्पा मारत असते. ऊठ-बस तर या वर्तुळात होतच असते...दोन टोकं असतात आयुष्याची आणि मधल्या दोरीला लोंबकळत असतो पत्रकार. 
‘नथिंग बट द ट्रूथ’मधली नायिका रॅचेल आर्मस्ट्राँग याच कॅटेगरीत मोडणारी. आपल्या सात वर्षांच्या टिम्मीला धावत-पळत तयार करून शाळेत पाठवायचं. भराभरा स्वत:चा, नवऱ्याचा ब्रेकफास्ट जमवायचा आणि दुसरीकडं सद्दामच्या माणसांचं काय चाललंय आणि ‘व्हाइट हाऊस’मध्ये काय शिजतंय यावरही लक्ष ठेवायचं. 
* * * 

रॅचेलचं आयुष्य असंच चाकोरीबाहेरची आणखी एक चाकोरी सांभाळत चाललेलं. ‘कॅपिटॉल सन टाइम्स’ नावाच्या वॉशिंग्टन डीसीमधल्याच एका बऱ्या दैनिकातली नोकरी. दैनिकातली नोकरी धकाधकीची. त्यात रेचल हाडाची रिपोर्टर होती. दैनिकात वेगवेगळे विभाग असतात. प्रादेशिक बातम्या, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या...प्रतिनिधीनं बातम्या फाइल करायच्या. मुख्य प्रतिनिधीनं त्या पारखून वृत्तसंपादकाकडं पाठवायच्या. संपादकांशी धोरणात्मक समन्वय साधून वृत्तसंपादकानं त्या तेव्हा ड्यूटीवर असलेल्या न्यूजडेस्ककडं पाठवायच्या. तिथं त्या बातमीचं आणखी संपादन होणार. मग ती पानात लागणार. दुसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या कडीला अडकलेल्या वर्तमानपत्रात ती बातमी असणार. अर्थात हे झालं महत्त्वाच्या बातम्यांबद्दल. छोट्या बातम्या तशाच धडाधड सिस्टिममध्ये पडत असतात. पानांवर लागत असतात. 

गेली कित्येक महिने एका बातमीच्या मागावर रॅचेल आहे. ती कन्फर्म झाली तर यंदाचं पुलित्झर ॲवॉर्ड तिच्यासाठी राखीव समजावं, अशी ही बातमी आहे.

...काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा एक कट सीआयएनं उधळला होता. हा कट व्हेनेझुएलातल्या काही कटवाल्यांनी रचला होता, असा संशय होता. या कटाची पाळंमुळं खणण्यासाठी सीआयएनं पराकाष्ठा केली. अमेरिकी सरकारनं व्हेनेझुएलात बॉम्बफेक करण्यासाठी विमानांचा ताफा रवाना करण्याची फर्मानं काढली. व्हेनेझुएलात तेव्हा अमेरिकेचे राजदूत ऑस्कर व्हॉन डोरेन हे काम पाहत होते आणि त्यांची पत्नी एरिका व्हॉन डोरेन ही त्याच दूतावासात डेस्क ऑफिसर होती; पण ती डेस्क ऑफिसर वगैरे काहीही नसून सीआयएची हस्तक आहे आणि राष्ट्राध्यक्षांच्या कथित हत्याकटाचा व व्हेनेझुएलातल्या लोकांचा काहीच संबंध नाही, असा निर्वाळा तिनं तिच्या रिपोर्टात दिला आहे, अशी बातमी रॅचेलला मिळाली. ही बातमी छापून आल्यावर ‘व्हाइट हाऊस’ मुळासकट हादरलं असतं. युद्धखोरीचा आरोप अमेरिकेवर आला असता. आंदोलनं, मोर्चे, निषेध सगळ्याला ऊत आला असता...पण नुसती बातमी मिळून उपयोग नसतो. ती खरी असावी लागते! 

...रॅचेल जवळजवळ रोज छोट्या टिम्मीला शाळेत सोडायला जायची. कधी स्कूलबसपर्यंत. कधी स्कूलबसमधून थेट शहरात. पोराटोरांशी गप्पा मारत. तेवढीच गंमत. शाळेच्या दारात सकाळी चिमुकली मुलं आणि त्यांचे पालक यांची तुंबळ गर्दी असते. एक दिवस रॅचेलच्या लक्षात आलं, की एरिका डोरेनसुद्धा तिच्या मुलीला सोडायला शाळेशी येतेच; किंबहुना तिच्या मुलीची आणि टिम्मीची गट्टीच आहे. मात्र, एरिका आणि रॅचेल यांच्यात ‘हाय-हलो’ पलीकडं जान-पहचान नव्हती; पण ही बातमी मिळाल्यावर रॅचेलनं एक दिवस थेट एरिकालाच शाळेशी गाठलं. ‘तू सीआयएशी संबधित होतीस किंवा आहेस, हे मला माहीत आहे’ असं सांगून बातमी ‘कन्फर्म’ करण्याचा प्रयत्न केला. एरिकानं तिला अर्थातच उडवून लावलं. ‘तू स्वत:हून खड्ड्यात जाणार आहेस’ असा इशाराही दिला. करडा नकारसुद्धा एक प्रकारचं कन्फर्मेशनच असतं. रॅचेलनं तोच निष्कर्ष काढला. बातमी प्रसिद्ध झाली. अमेरिकी प्रशासनाची बोबडी वळली. चौकश्‍या, अटकांचं सत्र सुरू झालं. ‘कॅपिटॉल सन टाइम्स’चा संपादक आणि एकूणच व्यवस्थापन रॅचेलच्या मागं ठामपणे उभं राहिलं. सीआयएच्या एजंटचं नाव तुम्हाला कुणी सांगितलं? अशी आधी आडून, मग दरडावून विचारणा सुरू झाली. कुणीच बधत नाही, हे पाहून अखेर कोर्टकज्जे सुरू झाले. सरकारनं खटला भरला. ‘रॅचेल आर्मस्ट्राँगला न्यायासनासमोर बोलावून या बातम्या लीक करणाऱ्या ‘सूर्याजी पिसाळा’चं नाव फोडायला भाग पाडा’ असा सूर उमटू लागला. तसंच घडलं. ‘कॅपिटॉल सन टाइम्स’नं वॉशिंग्टनचा ॲलन बर्नसाइड नावाचा महागडा वकील नेमून टाकला.‘फर्स्ट अमेंडमेंटच्या आधारे आपण अर्ध्या तासात कोर्टातून बाहेर पडू’, असा निर्वाळा वकिलसाहेबांनीही दिला. सरकारी वकील डुबॉइस मात्र हट्टाला पेटला होता. ‘इंटेलिजन्स प्रोटेक्‍शन ॲक्‍ट’अंतर्गत तुला नक्‍की जेल होईल’ असं त्यानं बजावलं. 

...घडलं तसंच. न्यायमूर्तींनी रॅचेलला ‘नाव सांगितलं नाहीस तर तुला तुरुंगवास होईल...तेसुद्धा नाव सांगेपर्यंत’ असं बजावलं. रॅचेल तरीही ‘नाही’ म्हणाली. 
...आणि मग सुरू झाला एक ‘कायदा विरुद्ध सत्य’ असा टेरिफिक लढा.
* * *

रॅचेल सत्यासाठी भांडते आहे, हे तिच्या पतीला - रेला कळत होतं. छोट्या टिम्मीची देखभाल करताना त्याची तारांबळ उडत होती. एकीकडं बायकोच्या सत्त्वशील असण्याचा त्याला अभिमान वाटत होता, दुसरीकडं आख्खं जग जर हिला ‘नाव सांगून टाक आणि मोकळी हो’ असं सांगतंय तर ही इतकी का अडून बसली आहे, हे त्याला कळत नव्हतं. बातमी लीक करणारा देशद्रोही आहे हे तर खरंच. आपल्याच गुप्तचराचं नाव उघड करणं, हे राष्ट्रद्रोही नाहीतर काय मानायचं? पण रॅचेलनं त्याची बाजू का घ्यावी? आपल्या सूत्राचं नाव तिनं उघड केलं असतं, तर ती देशाची हीरो ठरली असतीच, शिवाय तुरुंगवास आणि अन्य पडझड तरी रोखली गेली असती; पण रॅचेलनं अवघड मार्ग निवडला. कोण असेल हा तिचा स्रोत?

तुरुंगात तिला भेटायला गेलेल्या रेनं तिला अखेर न राहवून छेडलंच. ‘‘हनी, डोंट टेक इट अदरवाइज; पण तुझा सोर्स तू सांगून टाकलास तर कोण तुला फासावर देणारेय?’’ तो म्हणाला.

‘‘प्लीज अंडरस्टॅंड स्वीटहार्ट, निदान तू तरी...’’ तिच्या तोंडून शब्द फुटेना. टिम्मीच्या आठवणीनं ती आधीच व्याकुळ झालेली.

‘‘ निदान मला तरी सांगून टाक ना...’’

‘‘ सॉरी रे, पुन्हा असं म्हणूसुद्धा नकोस. आणि हो, टिम्मीला आणू नकोस इथं. मी लवकरच सुटेन, सगळं ठीक होईल!’’ असं म्हणून रॅचेलनं भेट आटोपती घेतली.
* * *

पण रॅचेल सुटली नाही. आठवडा गेला. महिना गेला. कित्येक महिने उलटले. तुरुंगातलं भयानक आयुष्य कसंबसं ती कंठत राहिली. रेचंही मन उडत चाललं. टिम्मी मनानं दूर होत गेली. ‘कॅपिटॉल सन टाइम्स’मधले सहकारी पाठिंबा देत होते; पण त्यांचाही उत्साह मावळत चालला. खुद्द वकील बर्नसाइड म्हणायला लागला ः ‘सरकारशी डील करू या. आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करू या. तू मोकळी, सरकार मोकळं. विषय संपला... एका लीकसाठी इतकं कशाला भोगायचं? नॉट वर्थ इट.’
रॅचेल अढळ होती.

‘‘हे बघ रॅचेल, मी तुझं वकीलपत्र घेतलेलं आहे, सच्चाईचं नाही. वास्तवाचं भान ठेव. माणसं तत्त्वासाठी झगडतात, भांडतात...दानधर्म वगैरे करतात. महान होतात. महान झाल्यानंतर मरण पावतात...पण त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी किती जमते, हे हवामानावर ठरत असतं, हे विसरू नकोस!!’’ वकिलाचा सल्ला फार चुकीचा नव्हता; पण तिनं मानला नाही. 

दरम्यान, सीआयएची हस्तक एरिका डोरेनसुद्धा नको त्या प्रकाशझोतात आलेली. तिनं आताशा नोकरी सोडली होती; पण रॅचेलच्या सत्यनिष्ठेबद्दल तिचा आदर दुणावला. प्राण गेला तरी ती नाव सांगणार नाही, हे सगळ्यात आधी तिला कळलं होतं. ‘‘मला तुझा सोर्स नकोच सांगूस. गुप्तता कशी पाळायची हे माहितीये मला...,’’असं ती रॅचेलला म्हणाली होती. कदाचित तिला तिचा सोर्स माहीतही असावा. एके सकाळी घराच्या बागेशी एरिका काही काम करत असताना कुणीतरी ‘मि. स्टेन कुठं राहतात?’ असं विचारत आला. तिनं स्टेन यांचं घर दाखवण्याच्या आतच ती रक्‍ताच्या थारोळ्यात पडली होती.
* * *

एरिकाचा असा खात्मा झाल्यावर सगळं चित्रच बदललं. खुद्द वादाचं मूळच नाहीसं झालं होतं. आता तरी रॅचेलनं नाव सांगायला हवं; पण नाही. ती बधली नाही ती नाहीच. ती कुणाला वाचवते आहे? माध्यमांमध्ये प्रचंड चर्वितचर्वण सुरू होतं.

रॅचेलच्या वकिलानं सगळं कौशल्य पणाला लावून पार सुप्रीम कोर्टात कैफियत मांडली. फर्स्ट अमेंडमेंटचा इतिहास, अभिव्यक्‍ती-स्वातंत्र्य, एका आईचं मोडून पडणं, हरेक मुद्द्याचा परामर्श घेणारा प्रभावी युक्‍तिवाद केला. ते म्हणाले ः ‘‘जसजसा काळ निघून जातो, तसतशी सत्ता माजोरी होत जाते. मिसेस आर्मस्ट्राँग सरकारी दबावाला बळी पडूही शकल्या असत्या. गोपनीयतेचं तत्त्व त्यांनी पायदळी तुडवलंही असतं. सूत्राचं नाव सांगून त्या सुखानं घरी, आपल्या गोड-गोजिऱ्या कुटुंबात जाऊ शकल्या असत्या; पण तसं घडलं असतं तर यापुढं कुठलाही सोर्स त्यांच्याकडं किंवा कुठल्याच दैनिकाकडं विश्‍वासानं आला नसता. येणारही नाही. का यावं? असंच घडत राहिलं तर संपूर्ण पत्रकारिताच अर्थहीन होऊन राहील. फर्स्ट अमेंडमेंटलाही काही अर्थ उरणार नाही; मग प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षांनी काही गुन्हा केला तर ते लोकांना कसं समजेल? एखाद्या लष्करी अधिकाऱ्यानं छळाचा अवलंब केला, तर त्याला वाचा कुणी फोडायची? राज्यकर्त्यांची बांधिलकी लोकांशी असते. त्याच लोकांवर ते राज्य करत असतात; पण बांधिलकी आणि जबाबदारीचं कुठलंही ओझं नसलेलं सरकार कुठल्या प्रकारचं असेल? पत्रकारांना तुरुंगात डांबणं ही कल्पनाच लोकशाहीसाठी असह्य आहे. ज्या देशांमध्ये नागरिकांचं भय राज्यकर्त्यांना वाटतं, तिथंच हे घडू शकतं; पण आपण नागरिकांचं संरक्षण करणारं, त्यांचा यथोचित सन्मान ठेवणारं प्रगल्भ राष्ट्र आहोत. काही काळापूर्वी मी स्वत: वकील या नात्यानं मिसेस रॅचेल यांना सांगितलं होतं, की मी तुमचा बचाव करायला उभा आहे, तुमच्या तत्त्वाचा नाही; पण हल्ली मला असं वाटू लागलं आहे, की महान व्यक्‍तींचं जीवन आणि तत्त्व यांत फरक करता येत नाही...’’

अत्यंत प्रभावी युक्‍तिवादानंतरही पाच विरुद्ध चार मतांनी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं रॅचेलला मोकळं सोडण्यास नकार दिला. अर्थात ज्या जिल्हा न्यायालयानं रॅचेलला तुरुंगात डांबलं आहे, ते न्यायालय यासंदर्भात निर्णय घ्यायला मोकळं आहे, हेही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. जिल्हा न्यायाधीशांनी अखेर तिला मुक्‍त करण्याचा निर्णय घेतला. ‘रॅचेलला तुरुंगात ठेवून काहीही निष्पन्न होणार नाही, ती नाव उघड करणार नाही, हे आता स्पष्ट झालंय’, असं मत नोंदवून न्यायाधीशांनी तिला सोडलं; पण सरकारी वकील डुबॉइस हेका सोडायला तयार नव्हते. कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा आणल्याखातर तिला दोन वर्षांसाठी पुन्हा डांबण्यात आलं.
रॅचेलनं तीही शिक्षा भोगली. घराची पडझड होताना बघितली. नातीगोती विस्कटताना पाहणं तिच्या प्राक्‍तनातच होतं; पण तरीही तिनं आपला सोर्स कधीही उघड केला नाही. ती कुणाला वाचवत होती? आणि का? कोण होता तिचा सोर्स?

चित्रपटाच्या शेवटच्या काही चौकटींत तिचा सोर्स प्रेक्षकांना कळतो, तेव्हा सुन्न व्हायला होतं. रॅचेल आर्मस्ट्राँगसाठी आपलं मन टाळ्या वाजवत असतंच; पण शेवट बघितल्यावर तेच टाळ्या वाजवणारे हात सलामासाठी झुकतात.
* * *

हा चित्रपट सन २००८ मध्ये आला. छोट्या बजेटचा होता. स्टार कास्टही तशी बरी होती. नामवंत व्हेरा फार्मिगानं एरिका व्हॉन डोरेनची भूमिका केली आहे. ती लक्षात राहते कायम. पत्रकार रॅचेल आर्मस्ट्राँगच्या भूमिकेत केट बेकिन्सेलनं कमाल केली आहे. आई, पत्नी, पत्रकार, कैदी, अशा अनेक छटा तिनं अफलातून रीतीनं दाखवल्या आहेत. हा चित्रपट लिहिला रॉड ल्युरी यांनी. दिग्दर्शनही त्यांचंच. त्यांना खरं तर ज्युडिथ मिलरच्या केसवरच चित्रपट करायचा होता; पण दरम्यान घटनाच अशा घडल्या, की ज्युडिथच्या बातम्या विश्‍वासार्ह नसल्याचं निष्पन्न होत गेलं. 

परिणामी, तिचं नाव बरंच बद्दू झालं. सोर्स लपवण्यासाठी ती धीरानं लढली हे खरं होतं; पण त्या सगळ्या खटल्याचा हेतू तिच्या विरोधात गेल्यानं सगळं मुसळ केरात गेलं. अखेर त्या प्रकरणापासून प्रेरणा घेऊन ल्युरी यांनी नवीन कथानक तयार केलं, तो हा चित्रपट ः नथिंग बट द ट्रूथ. मात्र, २०१० मध्ये व्हॅलरी प्लेमचं बायोपिक म्हणता येईल असा ‘फेअर गेम’ हा चित्रपट आलाच. तोही गाजला. त्यात नओमी वॅट्‌सचा रोल भन्नाट आहे.

वास्तवातली ज्युडिथ किंवा चित्रपटातली रॅचेल यांनी आपला ‘खात्रीलायक सूत्रां’ची ओळख जिवापाड दडपली. त्यासाठी शिक्षा भोगली. त्यानं देशाचं नुकसान झालं की सत्याचा विजय, हे आपलं आपण ठरवायचं; पण एक गोष्ट खरी आहे, की एका विशिष्ट मर्यादेनंतर माणूस आणि तत्त्व यांच्यात फारकत करता येत नाही. कसोटीची वेळ आली की त्या माणसाला सदेह एक तत्त्व म्हणूनच जगावं लागतं. त्याची जबर किंमत मोजावी लागते. मंडईत मुळा-मेथी-मटार घेणारा सामान्य जीवनातला पत्रकार असाच सदेह तत्त्व बनला की आभाळाएवढा मोठा वाटू लागतो. नव्हे, तसा तो होतोच. 

वेगळा आवाज लावणाऱ्या विचारवंतांचे, पत्रकारांचे दिवसाढवळ्या खून पडताना आपण आजकाल पाहतो आहोत. सत्य कटू नसतं, ते कधी कधी कमालीचं जहरी असतं. आत्मघातकी तर असतंच. चोवीस तास बातम्यांचा मारा करणाऱ्या चित्रवाहिन्या, दैनिकं, सोशल मीडिया यांच्या गदारोळात, कुठल्याही विषयावर बेधडक आपलं मत नोंदवण्याच्या आजकालच्या जमान्यात अशी उजेडाची बेटं चित्रपटात दिसली तरी जरा जिवाला बरं वाटतं, इतकंच. या चित्रपटाचं प्रयोजन बहुधा तेवढंच.