पप्पा सांगा कुणाचे? (प्रवीण टोकेकर)

पप्पा सांगा कुणाचे? (प्रवीण टोकेकर)

खू  प वर्षांपूर्वी साठीच्या दशकात एक इंग्रजी गाणं गाजायचं...‘पाप्पा, ही लव्हज माम्मा...माम्मा, शी लव्हज पापा’...अशा छान ओळी होत्या. मूळ गाणं वेल्श गायक डॉनल्ड पिअर्सचं आणि गीतकार पॅडी रॉबट्‌स. ती पाश्‍चात्य धून घेऊन सी. रामचंद्र यांनी तिचं अस्सल मराठमोळं लेणं केलं. शांता शेळके यांनी त्यावर चपखल ‘पप्पा सांगा कुणाचे?’ हे अप्रतिम गीत लिहिलं. चित्रपट होता ‘घरकुल.’ हे गाणं आठवलं, की अरुण सरनाईक यांचा ‘बाप’ चेहरा डोळ्यांसमोर उभा राहातो. पाठोपाठ त्यांचं खळखळून हसणं आठवतं. मन एकदम चिमुकलं होऊन जातं. 

त्या गाण्यात मान वर करून मोठ्या डोळ्यांनी मोठ्यांच्या जगाकडं बघणाऱ्या गुडघ्याएवढ्या पोराची निरागसता आहे. एवढुलीशी पोरं...पण करिअरच्या नादात वाहावत गेलेली मोठी माणसं किती निर्दयतेनं वागतात कधीकधी! आपल्या वागण्यानं ते मान वर करून न्याहाळणारे कोवळे डोळे भरून आलेत, हेही कळत नाही अनेकदा. असल्या चित्रचौकटी बघणंही कित्येकदा नको वाटतं. हॉरर पिक्‍चर आपण हसत हसत पाहू; पण हे बघणं नकोच वाटतं. खूप वर्षांपूर्वी, म्हणजे आता चाळीसेक वर्ष होतील. एक चित्रपट आला होता- ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर.’ या चित्रपटानं डोळे नुसते भरून आले नाहीत, टक्‍क उघडले. सत्तरीचं दशक संपत आलेलं. नव्या युगाच्या उंबरठ्यावर होतं जग. विज्ञानानं भराऱ्या घेतल्या होत्या. एकंदरीत उत्थानाचाच काळ होता. करिअर, नोकरी, कर्तृत्व असल्या शब्दांना डॉलर्सचा भाव आलेला. अमेरिका तर भराभरा बदलत चालली होती. मूल्यं बदलत होती. ‘प्लेबॉय’वाला ह्यू हेफनर असो, किंवा ‘हसलर’ मासिकांचा राजा लॅरी फ्लिंट...व्यक्‍तिस्वातंत्र्याच्या लढ्याचा उदोउदो चाललेला. लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार हा जन्मसिद्ध हक्‍क आहे, ही भावना समाजात भिनू लागलेली. हेफनर हा कित्येकांचा हिरो ठरला, तो त्यामुळंच; पण त्यामुळं एक गोष्ट अटळपणे घडत होती. कुटुंब नावाची एक ‘वस्तू’ काहीशी दुय्यम ठरायला लागली. कुटुंबव्यवस्थेच्या त्या पडझडीच्या काळात ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’नं जाणत्यांच्या जगाला हादरा दिला, हे महत्त्वाचं. 

वास्तविक चित्रपटाची गोष्ट तशी नाट्यपूर्ण नाही. किंबहुना त्याला ठराविक असा आकारच नाही. सगळ्याच व्यक्‍तिरेखा सभ्य आणि चांगल्या आहेत. खलनायकाला कथानकात स्थानच नाही. इथं मुळात भांडणच स्वत:चं स्वत:शी मांडलेलं. खलनायक असलाच, तर तो पालकांचा अप्पलपोटेपणाच. कथाही तशी एखाद्या दिवाळी अंकात शोभेल अशी आणि एवढीच; पण तरीही या चित्रपटाला चार-पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले. तगडी स्टारकास्ट होती. शिवाय गल्लाही चिक्‍कार जमला. तिकिटासाठी थेटराबाहेर सिगारेट ओढणारी बेदरकार रांग असे. परतताना मात्र हरेकाच्या डोळ्यांत घराची ओढ दिसे. आपण काय ‘मिस’ करतो आहोत, याचं भान आणून देणारा हा चित्रपट होता. चित्रपटात खूप रडारड वगैरे नाही. उगीचच ताणलेलं अतिनाट्य नाही. एक संयत मध्यमवर्गीय संस्कृतीचा प्रवाह मात्र आहे. तो संवेग बघणाऱ्या रसिकाच्या मनात अचूक उतरतो. लहानग्या पोराच्या कस्टडीची कोर्टातली भांडणं आपल्याकडंही फार नवी नव्हती; पण ‘क्रॅमर...’ नं त्यात विवेकाचा रंग भरला. या चित्रपटातलं सादरीकरण हाच त्याचा आत्मा आहे. कहाणीपेक्षा कहाणीचं निरुपण अधिक रंगतदार आहे. हा चित्रपट अजूनही खूप रिलेव्हंट आहे, हे बघताना जाणवतं. बघाच.

* * *

खरं सांगायचं, तर टेड क्रॅमरची अवस्था ‘पांचो उंगलियां घी में, और सर कडाई में’ अशी आहे. गडी जोमात आहे. एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत मस्त पगाराची नोकरी. जॉबही क्रिएटिव्ह. बॉसपासून सगळे प्रेमात...कारण टेड हा खरंच हुशार माणूस आहे. त्याच्या कल्पक आयडिया कंपनीचं नाव रोशन करताहेत. शिवाय टेड आकंठ कामात बुडालेला. कधीही पाहावं, तेव्हा गृहस्थ घोड्यावर असतो. टेडला एक गोडगिट्‌ट बायको आहे. घर सांभाळणारी जोआना आपल्या बिझी नवऱ्याचं हवं नको बघण्यात बिझी असते. सात-आठ वर्षांचा बिली नावाचा  छोकरा आहे. गुंड्या नुसता. मनात आणील, तर सदोदित पाठीमागं पळणाऱ्या मम्माला पळता भुई थोडी करेल; पण गोडही तितकाच. पोरं अश्‍शीच असतात. हट्‌टीपणानं थयथयाट करायचा. वाट्‌टेल तसं बोलायचं. बापाकडून ऐकलेल्या, अर्थही न समजणाऱ्या शिव्याही द्यायच्या. मम्माच्या डोळ्यात पाणी आणायचं...आणि थोड्या वेळानं आपले चिमुकले हात गळ्यात घालून ओलीओली पप्पी घेत ‘सॉरी’ असं म्हणायचं. बात खतम. काय होणार मग अशानं मोठ्या माणसांचं? विरघळणारच ना! मोठी माणसं अशीच येडी असतात. जवळ गेलं, की फिस्कन्‌ हसतात. नो मोअर झगडा. जोआना तशीच टिपिकल मम्मा आहे. बिलीसाठी तिनं चांगल्या पदाची नोकरी सोडली. टेडचं करिअर जोरात सुरू होतं. शिवाय तो कर्ता पुरुष. तिला दुय्यम स्थान स्वीकारणं भाग होतं. बिलीला तयार करणं, शाळेत सोडणं-आणणं, स्वयंपाकपाणी, घरगृहस्थी यांत जोआना अडकली होती; पण तिचं मन मात्र कुचंबत होतं. एकदोनदा तिनं टेडशी बोलायचा प्रयत्न केला; पण त्यानं फार फार दुर्लक्ष केलं. त्याला पर्वाच नव्हती. या त्रिकोणातून आपली सुटका नाहीच का कधी? टेड आणि बिली यांच्यापासून आपली मिनिटभराचीही सुटका नाही? असा विचारही मनात येऊ द्यायचा नाही? का? हेच...हेच आपल्याला हवं होतं का? नाही, हे नको होतं...

दुर्दैव असं, की आपली बायको मनातल्या मनात कुढतेय, हेसुद्धा टेडला माहीत नव्हतं. तो बिनधास्त होता. कंपनीनं नवीन मोठं अकाऊंट त्याच्या ताब्यात दिलं होतं. त्याच्यावर काम सुरू करायचं होतं. मोठ्या खुशीतच टेड घरी आला. आल्याआल्या जोआनानं बॉम्बच टाकला ः ‘‘मी जातेय टेड.’’

जातेय म्हणजे?.. कुठं?

‘‘मला इथं राहायचं नाही. मला माझी वाट शोधायचीये. ती इथं नाही. तू आणि बिली राहा. बाय.’’

‘नॉनसेन्स, हा काय प्रकार आहे? या बाईचं डोकं आत्ताच का फिरलं? कालपर्यंत तर बरी होती, आता काय झालं?’ वस्तुस्थिती अशी होती, की जोआना कधीच ‘बरी’ नव्हती. आपल्या भावनांची इंचभरही कदर न करणाऱ्या नवऱ्यासोबत आणखी किती वर्ष घालवायची, याला काही मर्यादा आहेत किंवा होत्या. करिअर काही फक्‍त पुरुषांचं नसतं. स्त्रीलाही असतं. स्वत:चं वेगळं जग निर्माण करण्याचा हक्‍क तिलाही असतोच. टेड आणि बिलीच्या सान्निध्यात आपण दु:खीच अधिक आहोत, ही भावना हल्ली तिला डाचू लागली होती. शेजारच्या मार्गारेटनंही तिला आडून तोच सल्ला दिला होता : ‘‘इतक्‍या बेपर्वा माणसाबरोबर राहणं अशक्‍य होत असेल, तर तू तुझा मार्ग शोधायला हवास जोआना...’’

जोआनानं मनावर दगड ठेवून मार्ग शोधला. टेड आणि बिलीचा निरोप घेऊन ती बॅग घेऊन निघून गेली. अभी एक बाप : टेड आणि एक बच्चा : बिली. दोघांचा संसार. 

* * *

टेडसुद्धा काही कच्चा नव्हता. जोआनानं मध्येच साथ सोडली; पण पठ्ठ्या चिवट होता. ‘बिलीला असं वाढवून दाखवीन, की लेकाचा मम्माला विसरेल,’ अशी जिद्द त्याच्या मनानं घेतली. गेल्या सात वर्षांत त्यानं केली नव्हती, अशी कामं त्याला करायला लागली. सकाळी उठून बिलीचा आणि त्याचा ब्रेकफास्ट. आम्लेट तळा. फ्रेंच टोस्ट बनवा. दूध, कॉफी...भराभरा त्याला तयार करून शाळेत सोडा. छानसा मुका घेऊन त्याला शाळेच्या आत पाठवा आणि मग...छाती फुटेस्तोवर ऑफिसच्या दिशेनं धावत सुटा. शाळेनंतर काही काळ बिली वरच्या मजल्यावरच्या मार्गारेटकडे राहायचा. बेबीसीटरची आयडियाही वाइट नव्हती; पण शेवटी त्यालाही वेळेची मर्यादा असतेच. हातातलं काम थांबवून टेड घरी पळायचा. मग बिलीचा मूड सांभाळत रात्रीचं जेवण. मग एखादी गोष्ट वाचून दाखवणं. दिवसातला फक्‍त एकच तास टीव्ही बघायला मिळेल, असा दंडक त्यानंच घालून दिलेला. अर्थात बिली कुठलं त्याचं ऐकायला बसलाय? बापलेकांचे खटके उडणं स्वाभाविक होतं.

रात्रीसाठी टेड बहुतेकदा बाहेरून तयार जेवण घेऊन यायचा. ते महाबोअरिंग असायचं. एके रात्री बिलीनं जाहीर केलं : ‘‘आज जेवणाला सुट्‌टी. मी डायरेक्‍ट डेझर्ट घेतो!’’

‘‘अजिबात चालणार नाही. ताटलीतलं सगळं संपव आधी!’’ टेड ऊर्फ बाप गुरगुरला.

‘‘नोप! आइस्क्रीम पायजेच!’’ ‘बिली द बच्चा’ची सटकली. तो टेबलावरून उठलाच.

‘‘फ्रीजकडं जाऊ नकोस, बिली. ताटलीतलं संपव...मग आइस्क्रीम. ओके?’’ टेड.

त्याच्याकडं रोखून पाहात बिली फ्रीजकडं वळला. स्टूल ओढून त्यावर चढून वरच्या फ्रिझरमधला आइस्क्रीमचा डबा त्यानं काढलाच.  ‘‘बिली, आगाऊपणा नकोय मला. आइस्क्रीमचा डबा फोडलास तर...वाईट होईल. सांगून ठेवतोय,’’ टेडनं दम भरला. उत्तरादाखल बिलीनं डबा फोडला.

‘‘चमचा ठेव खाली..’’ टेड. बिलीनं शांतपणे चमचा आइस्क्रीममध्ये खुपसला.

‘‘बिली, एक चमचा जरी आइस्क्रीम खाल्लंस तर...यू आर इन व्हेरी बिग ट्रबल!’’ संतापलेल्या टेडनं निर्वाणीचा इशारा दिला; पण बिलीनं त्याला शिंगावरच घेतलं! त्यानं बचकाभर आइस्क्रीम उचलून तोंडात कोंबलंच.

भडकलेल्या टेडनं त्याक्षणी त्याचं मुटकुळं उचललं आणि शिवीगाळ करत त्याला त्याच्या बेडरूममध्ये टाकलं. ‘‘ऐकत नाहीस! झोप आता तसाच.’’

‘‘मला मम्मा हवीय. आय हेट यू,’’ असं रडत-ओरडत बिलीनं थैमान घातलं.

‘‘मीच उरलोय तुला आता. गप्प बस. आय हेट यू टू...’’ टेडनं ओरडून दार लावून घेतलं.

छे, सगळाच चिवडा झालाय...

पोराला दुखावल्याचं टेडला मनात खाऊ लागलं. त्याला झोप लागली नाही. शेवटी येरझारा घालत थोड्या वेळानं तो परत पोराच्या बेडरूममध्ये गेला. अंधार होता. झोपलंय शांतपणे बहुतेक. बनियन-चड्डीवर पोटावर पडलेल्या बिलीला बघून त्याला भडभडून आलं. दार लावणार इतक्‍यात बिलीनं त्याला हाक मारली ः ‘‘डॅडी, आयेम सॉरी!’’

टेडनं त्याला आवेगानं जवळ घेतलं. तोही सॉरी म्हणाला. हाच...हाच गेम असतो लहान मुलांचा. टेड पार विरघळून गेला. त्यानं ठरवलं. बिलीकडे अधिक जाणीवपूर्वक बघायचं. त्याची वाढ खुंटता कामा नये. जोआनाचं जाणं त्यानं पचवलं पाहिजे.

टेडनं मग जोआनाची भूमिका स्वीकारली. त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी क्रिएटिव्ह जॉब होता, आता ती जागा बिलीनं घेतली. त्याचं सगळं अस्तित्त्व बिलीभोवती गोलगोल फिरायला लागलं. परिणाम व्हायचा तो झालाच. कामावर जायला उशीर होणं. महत्त्वाच्या मीटिंगांना दांड्या माराव्या लागणं. डेडलाइन्सचा बट्ट्याबोळ. कामात ढिसाळपणा. ज्या-ज्या गोष्टींसाठी टेड आपल्या महिला सहकाऱ्यांना टोमणे हाणत होता, त्या सगळ्या गोष्टी तोच करायला लागला. पालकत्व आणि करिअर ही दुहेरी कसरत बायकांना जमते. पुरुषांना का नाही? पुढंपुढं तर कहर झाला. बिलीच्या गमतीजमती टेड मित्रांना दारू पिताना सांगायला लागला. ‘‘हे कमॉन, आपण बाई होत चाललोय का?’’

मार्गारेटची त्याला साथ मिळत होती. मार्गारेट ही सिंगल पेरेंट होती. प्रेमळ. नवऱ्याविना राहणारी. टेडची आणि तिची गट्‌टी जमली. पार्कमध्ये दोघं पोरांना खेळायला घेऊन जायला लागली. गप्पा व्हायला लागल्या. एक दिवस पार्कातल्या ‘जंगल जिम’च्या झोक्‍यावर खेळताना बिली दाणकन पडला. कपाळाला खोक पडली. रक्‍त वाहू लागलं. बिलीला दोन्ही हातांवर उचलून टेड छाती फुटेस्तोवर हॉस्पिटलकडं धावला. टाके घालेपर्यंत शेजारी बसला. हे सारं मार्गारेट पाहत राहिली. एका पोरापायी बिली किती अंतर्बाह्य बदलला होता! बापलेकाचे संबंध सुधारले होते. दोघांमध्येही एक मस्त नातं आकार घेऊ लागलं. बाप फ्रेंच टोस्ट तळू लागला, तर बिली त्याला स्वयंपाकाच्या ओट्यावर चढून मदत वगैरे करू लागला. पुस्तकं वाचू लागला. बापाला कमी त्रास व्हावा, म्हणून पोरंही बरंच जुळवून घेत असतात. त्यातलाच हा भाग होता. तेवढ्यात एक दिवस त्याला जोआनाचा फोन आला ः ‘‘मी न्यूयॉर्कमध्ये आलेय...भेटू या?’’

* * *

‘‘भलतीच गोड दिसतेयस आता,’’ रेस्तराँमध्ये शिरताशिरता टेड म्हणाला. जोआना हसली. 

‘‘कुठं होतीस?’’ 

‘‘कॅलिफोर्निया. एका आर्किटेक्‍चर फर्ममध्ये चांगली नोकरी होती. आता इथं आलेय...इथंही बरा पगार आहे,’’ जोआना म्हणाली. ‘‘अचानक का ही भेट?’’

‘‘बिलीला खूप मिस करतेय, टेड. मी घर सोडलं तेव्हा मी खूप निराश होते.

आत्मसन्मानाचा चक्‍काचूर झाला होता. अशा मनस्थितीत मी बिलीला सांभाळू शकणार नाही, तो तुझ्यापाशीच बरा आहे असं मला वाटलं होतं...’’ जोआनानं विषय काढला.

‘‘मग?’’

‘‘पण आता मी त्याला सांभाळू शकेन. मला तर वाटतं, की त्यानं त्याच्या आईकडंच राहावं. तुलाही सोयीचं जाईल. बिलीला त्याच्या आईची गरज आहे, असं तुला नाही वाटत?’’ जोआना म्हणाली. टेडचं टाळकं सटकलं. काय पोरखेळ आहे? घर सोडलंस तू. पोरगं टाकून गेलीस तू. आता उपरती झाली काय? फूट!! ‘‘हे बघ, स्वखुशीनं ताबा सोडलायस त्याचा. आता मध्येच येऊन शहाणपणा शिकवू नकोस. फिरकूसुद्धा नकोस त्याच्याजवळ. मी समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला. गो टू हेल!’’ टेबलावरचा ग्लास भिंतीवर फोडून टेड तिथून निघालाच. पण हे इतक्‍यावर थांबणार नव्हतंच. बिलीच्या कस्टडीसाठी एक कोर्टातलं युद्ध सुरू झालं.
* * *

बिलीचं कामावर उशिरा येणं, दांड्या मारणं या प्रकारांमुळे डेडलाइन उलटून गेली. क्‍लाएंटनं वैतागून त्यांच्या जाहिरात कंपनीचं कामच काढून घेतलं. हा गंभीर प्रकार होता. शेवटी टेडच्या बॉसनं त्याला एकदा जेवायला नेलं आणि नोकरीवरून कमी करत असल्याचं जमेल तितक्‍या शांतपणानं सांगितलं.  नोकरी गेली! त्यात पोराच्या ताब्याची केस. जनरली न्यायाधीश मंडळी पोराची काळजी आईच नीट घेऊ शकते या गृहीतकावर निकाल देतात, हे सत्य टेडच्या वकिलानं स्पष्ट सांगितलं. नोकरी नसलेला बाप म्हणजे तर कोर्ट काही ऐकणारसुद्धा नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य होतं. टेडनं जिद्दीनं चोवीस तासांत कमी पगाराची; पण दुसरी नोकरी मिळवली. खटला उभा राहिला. जोआनाच्या वकिलांनी टेडचं डामाडोल करिअर बाहेर काढलं. त्याचा आत्मकेंद्रित स्वभाव काढला. मम्मा हीच खरी केअरटेकर असते, हेही पटवून दिलं.

जोआना मम्मा म्हणून ग्रेटच होती, हे खुद्द टेडच्या तोंडून वदवून घेतलं. कामातल्या कुचराईला बऱ्याच अंशी जबाबदार बिलीचं संगोपनच होतं, हेही कोर्टाच्या नजरेला आलं. मार्गारेटची साक्ष निघाली.  दुसऱ्या बाजूला जोआनाची वृत्ती, तिचा शहाजोगपणा याबद्दलही धुणी धुतली गेली. ती गेल्यानंतर टेडमध्ये खूपच चांगले बदल झालेत, हेही तिनं कबूल केलं. वकील मंडळी इतक्‍या टोकाला जाऊन भांडतात, हे दोघांनाही माहीत नव्हतं. परस्परांची इतकी चिरफाड व्हावी, हे दोघांनाही मान्य नव्हतं. किंबहुना, दूर झाल्यानंतर उभयतांमधला परस्पर आदर नाही म्हटलं तरी दुणावलाच होता. 

मात्र, न्यायालयानं ठराविक निकाल दिला. बिलीचा ताबा जोआनाकडेच गेला. टेड अपील करण्याच्या विचारात होता; पण ‘‘अपीलाच्या केसमध्ये पोराला कोर्टात साक्ष द्यावी लागेल. चालेल?’’ असं वकिलानं विचारलं. इथं टेड खचला. नाही, नाही, त्या कोवळ्या पोराला ह्या यातना देण्यात काहीही पॉइंट नाही. त्यानं नकार दिला. 
...बिलीचं खरं तर डॅडशी किती छान जमलं होतं. दृष्ट लागावी असं नातं तयार झालं होतं. आता त्यात पुन्हा दरी तयार होणार. जड मनानं बिलीच्या बॅग्ज खेळण्यांनी वगैरे भरून टेड तयार झाला. मम्मा गेली तेव्हा बिलीला मम्मा हवी होती, आणि आता डॅड नसणार म्हणून बिली रडत होता. दोघांच्या भांडणात त्या बिचाऱ्या छोट्या जीवाची मात्र फरपट. आजचा दोघांचा शेवटचा एकत्र दिवस. टेडनं फ्रेंच टोस्ट तळायला घेतले. बिली त्याला मदत करत होता. तेवढ्यात इंटरकॉमचा फोन वाजला. जोआना इमारतीच्या लॉबीतून बोलत होती. ‘‘जरा खाली ये, बोलायचंय,’’ म्हणाली.

‘‘टेड मी खूप विचार केला. बिलीची बेडरूमसुध्दा मी सजवली. मी त्याला घरी न्यायला आलेय; पण आता वाटायला लागलंय, की तो सध्याही स्वत:च्याच घरी आहे की...मी त्याला नेणार नाहीये. त्याच्या घरातून त्यालाच काढून नेण्यात काहीही अर्थ नाही...’’ बोलता बोलता जोआनाचा बांध फुटला. टेड सुन्न होऊन बघत राहिला. ‘‘चल, वरती जाऊन बिलीला हे सांगू या,’’ कसेबसे डोळे पुसत जोआना म्हणाली. लिफ्टमध्ये शिरली.
‘‘जोआना, तूच जा वरती आणि बिलीला सांग. मी इथंच थांबतो...’’ टेडसुद्धा खूप इमोशनल झाला होता. काहीही न बोलता तिनं मान डोलावली. डोळे खसाखसा पुसले. केस सारखे केले...

‘‘बरा दिसतोय नं माझा अवतार?’’ लिफ्टमधूनच तिनं अधीरतेनं विचारलं.
‘‘टेरिफिक दिसतेयस,’’ टेड म्हणाला. लिफ्टचं दार बंद झालं.
* * * 

डस्टिन हॉफमन या अजोड अभिनेत्यानं साकारलेला टेड, मेरील स्ट्रिपची जोआना आणि बिलीच्या भूमिकेतल्या चिटुकल्या जस्टिन हेन्‍रीची कमाल ह्याचा अफलातून मिलाफ म्हणजे ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर.’ असले भन्नाट परफॉर्मन्सेस फार क्‍वचित बघायला मिळतात. त्या पोराची व्यक्‍तिरेखा तर सिक्‍सर! कुठंही मेलोड्रामा नाही. करुण संगीताचा भडिमार नाही, की काही नाही. एका हळुवार कथेचं हळुवार चित्रण आहे फक्‍त. ॲव्हेरी कोरमन नावाच्या एका लेखकानं ही लघुकादंबरी लिहिली होती. त्याचा रॉबर्ट बेंटन या संवेदनशील दिग्दर्शकानं चित्रपट केला. कादंबरीत थोडे बदल केले आहेत; पण चित्रपट रूपांतरासाठी ते आवश्‍यकच होते. विशेष म्हणजे याची पटकथा-संवाद बेंटन यांनीच लिहिले. लिहिले याला काही तसा अर्थ नाही, कारण निम्म्याहून अधिक भाग हॉफमन आणि मेरील स्ट्रीपनं स्वत:च लिहून काढला होता. कारण दोघंही त्या काळात असल्याच मानसिक अवस्थेतून जात होते. डस्टिन हॉफमनचा घटस्फोटाचा खटला तर गाजत होता, आणि मेरील स्ट्रिपचा सहचर जॉन कॅझालेचं नुकतंच निधन झालं होतं. जॉन कॅझाले हा तसा नावाजलेला अभिनेता. कपोलाच्या ‘गॉडफादर’मध्ये त्याची लक्षणीय भूमिका होती. शेक्‍सपिरिअन थिएटरच्या निमित्तानं मेरील आणि तो एकत्र आले; पण जॉन अल्पायुषी ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत मेरील स्ट्रिप त्याच्या बाजूला उभी राहिली. हे सगळं ताजंच होतं. त्यामुळं त्या दोघांनीही आपापले संवाद लिहिल्यानं त्याला प्रवाहीपण आलं. दिग्दर्शक बेंटन यांनीही हा इगोचा इश्‍यू न करता खुल्या मनानं त्यांचा सहभाग स्वीकारला. त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावर दिसतो. या चित्रपटासाठी मेरील स्ट्रिपला १९८०मध्ये ऑस्कर मिळालं. ते स्वीकारल्यानंतर ती रडत बाथरूमकडे पळाली आणि ती बाहुली तिथंच ठेवून आली. तो एक किस्साच झाला. ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’च्या पडद्यामागच्या गोष्टीही अशा खूप रंजक आहेत; पण त्या पुन्हा केव्हातरी. आजही हा चित्रपट खूप ‘रिलेव्हंट’ आहे. एक शांतसुंदर अनुभव म्हणून तो पाहावाच. ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ बघणाऱ्याच्या मनात घर करतोच; पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे घरात मन ओढून आणतो. मन शांताबाईंचेच शब्द गुणगुणायला लागतं ः ‘आभाळ पेलते पंखावरी, पप्पांना घरटे प्रिय भारी, चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लाचा हळूच पापा घ्यावा...पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे...’

आपलंच मन डिट्टो अरुण सरनाईकांच्या आवाजात खळखळून हसतं. आईशप्पथ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com