सूर राहू दे... (प्रवीण टोकेकर)

सूर राहू दे... (प्रवीण टोकेकर)

...So now it is vain for the singer to burst into clamour 
With the great black piano appassionato. The glamour 
Of childish days is upon me, my manhood is cast 
Down in the flood of remembrance, I weep like a child for the past.

- D. H. Lawrence, १९१८.

दिवाळीच्या रात्री आकाशात रंगीत ठिणग्यांचे मौन स्फोट होताना पाहून, किंवा दूरवर इमारतीच्या जिन्यात घुमलेल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकून उत्सवाचं भरतं येणं साहजिकच. काही दुर्दैवी जिवांच्या मनात मात्र तेव्हा कालवाकालव होते. असल्या आवाजांशी विकृत नातं सांगणाऱ्या इतिहासातल्या घटना आठवू लागतात. दिवाळीचे आवाज अणि उजेड पाहून युध्दाबिध्दाच्या आठवणी जागवणारा माणूस खरंच कमनशिबी. ‘यंदा दिवाळी ऑक्‍टोबरात आली,’ या वाक्‍याबरोबर एका श्‍वासात ‘याच सुमारास १९३९ मध्ये हिटलरच्या फौजांनी पोलंडवर हल्ला केला होता,’ हे वाक्‍य म्हणावं? नकोच. पण शेवटी ते सत्य तर आहेच. 

जवळपास ऐंशी वर्ष होतील या घटनेला. तेव्हाचे भोग भोगणारे कुणी उरलेले नाहीत. जे काही उरलेत, ते फारच तान्हे असतील! हॉलिवूडचा विख्यात दिग्दर्शक रोमान पोलान्स्की हा त्यांच्यापैकी एक. सध्या वय ८४ च्या पुढं; पण अजूनही बऱ्यापैकी कार्यरत. इतकं की गेली चाळीसेक वर्ष या सद्‌गृहस्थांवर लैंगिक छळाचे आरोप नित्य होत आहेत! पण तो काही आपला विषय नाही. पोलान्स्कीनं २००२ मध्ये एक चित्रपट केला. नाव होतं ः द पियानिस्ट. तो मात्र आपला विषय आहे. 

त्या अभिजात चित्रपटाचं गारुड असं की ऐन दिवाळीतही तो उगाचच आठवू शकतो. आणि तरीही त्यात अपराधी काही वाटत नाही.

पोलान्स्कीच्या चित्रपटांचा भोक्‍ता आणि भक्‍त असलेल्या स्टीव्हन स्पीलबर्गच्या हाती जेव्हा ‘शिंडलर्स लिस्ट’ची स्क्रिप्ट लागली, तेव्हा रोमान पोलान्स्कीच त्याला खरा न्याय देऊ शकतील, असं त्याला वाटलं होतं. त्यानं त्यांना तशी गळ घातलीही; पण संहिता वाचून पोलान्स्कीमहाशयांनी त्याला नकार कळवला. ‘या वयात इतका गडद चित्रपट आपल्याला झेपणार नाही; किंबहुना होलोकॉस्टचा मी स्वतःच एक बळी असल्यानं त्यावर मी एकही चित्रपट बनवणार नाही’ असं पोलान्स्कीकाकांनी त्याला सांगून टाकलं. ते खरंही होतं. रोमान पोलान्स्की यांचे वडील नाझींच्या यातनातळावरचा भयानक अनुभव घेऊन हातीपायी कसेबसे तगून राहिले होते; पण आऊसवित्झच्या यातनातळावरल्या गॅस चेंबरमध्ये पोलान्स्की यांची आई मात्र गेली. लहानपणीचं ते छिन्नभिन्न करणारं चित्र पोलान्स्कींना आयुष्यभर छळत राहिलं. त्यांनी नकार दिल्यावर स्पीलबर्गनं मग स्वत:च ‘शिंडलर्स लिस्ट’ ही अजरामर कलाकृती निर्माण केली.

पुढं पोलान्स्कींनी मात्र आपला शब्द फिरवला किंवा विचार बदलला असं म्हणा हवं तर...त्याला कारण त्यांच्या हाती लागलेलं पुस्तक. ‘द पियानिस्ट’ याच नावाचं. वादिस्ताफ श्‍पीलमन नावाच्या एका पोलिश पियानोवादकाचं ते छोटेखानी आत्मचरित्र होतं. पोलंडवरील जर्मनीच्या हल्ल्यानंतर या  पियानोवादकाला पाच-सहा वर्ष नरक भोगावा लागला. यहुदी वस्त्यांमधून निसटून दिवाभीतासारखे, भिकाऱ्यासारखे दिवस कंठावे लागले. एवढं भोगूनही त्याच्या हातातला इल्लम मात्र शाबूत राहिला. या चरित्रानं पोलान्स्कीला भुरळ घातली. आणि ‘द पियानिस्ट’ २००२ मध्ये पडद्यावर आला. हा चित्रपट माणसाला कलेचं महत्त्व समजावून सांगतोच; पण त्याहूनही अधिक उत्क्रांतीचं एक आदितत्त्व उलगडून सांगतो. कधीही चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
* * *

वॉर्साच्या रेडिओ स्टेशनवर वादिस्ताफ श्‍पीलमनला चिक्‍कार भाव होता. त्याचे आप्तेष्ट त्याला वादेक म्हणत. श्‍पीलमनच्या लांबसडक बोटात जादू होती. पियानोसमोरच्या चिमुकल्या स्टुलावर तो बसला की पियानो जणू त्याच्याशी बोलू लागे. त्याच्या बोटांच्या स्पर्शानं तो सुरांचा पेटारा शहारुन येई. भल्या पहाटे पश्‍चिमवाऱ्यानं जणू पारिजाताशी थोडं लगट करावं, आणि त्या अनावर वृक्षाचं उरलं सुरलं अवसान गळून शेंदरी देठांच्या शुभ्रफुलांची पखरण अंगणात व्हावी, तसं काहीतरी होई. 

पियानो हे वाद्यच कमालीचं आतुर असतं. हृदयात ताणलेल्या असंख्य तारांचा ताण सहन करत बिचारं जोडीदाराची वाट पाहात असतं. त्याचा स्पर्श झाला की झंकारांनी पियानो आंतर्बाह्य शहारतो. त्यातून श्‍पीलमनसारखा कसबी जोडीदार असला तर सोने पे सुहागाच. निळ्या-जांभळ्या, लाल-गुलाबी स्वरवर्तुळांची फुलं उमलत जातात. मिटत जातात. ऐकणारा डोळे मिटून तल्लीन होतो. शोपॅंच्या रचना श्‍पीलमनच्या बोटांवर राहायलाच आल्या होत्या. ‘शोपॅं होऊन जाऊ द्या,’ अशी फर्माईश हटकून यायचीच. फ्रेडरिक शोपॅं ही एक वल्ली होती. पियानोवादनातलं ब्रह्मच ते. आपल्या १८ वर्षांच्या सक्रिय कारकीर्दीत त्यानं फक्‍त ३० मैफली केल्या; पण प्रत्येक सुरावट शंभर हिश्‍शांनी ओरिजिनल. वयाच्या ३९ व्या वर्षी क्षयानं तो वारला. पण प्रचंड मोठा वारसा मागे ठेवून गेला. श्‍पीलमन हा त्यांचाच एकलव्यासारखा दूरस्थ शिष्य होता.

त्या दिवशी श्‍पीलमन अशीच एक शोपॅंची अवघड रचना मनापासून वाजवत असताना वॉर्सा रेडिओ केंद्रावर बॉम्ब पडला. पळापळ झाली. नाझी फौजांनी पोलंडचा घास घेतल्यात जमा आहे, हे उघड होतं. पळापळ झाली. माणसं अस्मानात उडाली. काही जखमी झाली. श्‍पीलमनलाही लागलं. पळत असताना जिन्यात त्याला एक तरुणी भेटली.

‘‘मी तुम्हाला भेटायला आले होते...’’ ती म्हणाली.

‘‘ओह...हलो!,’’ श्‍पीलमन म्हणाला.

‘‘तुम्ही किती छान वाजवता पियानो..,’’ ती म्हणाली.

‘‘ तुम्ही कोण?’’ श्‍पीलमन.

‘‘मी डोरोटा. युरेकची बहीण...तुम्हाला लागलंय खूप हो!’’ ती कळवळून म्हणाली.
डोरोटा गोडच होती. श्‍पीलमनवर आकृष्ट होती. पण ही भेटण्याची वेळ कुठे होती? श्‍पीलमन कसाबसा निसटून घरी आला.

घरी आवराआवर चाललेली. जमेल तितकं सामान घेऊन पोलंडमधून निसटायची चर्चा भावंडांमध्ये चालली होती. पैसे कुठं ठेवावेत? जवाहिराचं काय करावं? असले सगळे सवाल होते. हे लौकरच घडणार याची अटकळ होतीच; पण स्वत:चं घर असं भसकन सोडून जाणं कुणाला जमतं?

‘‘हे काय चाललंय?’’ वादेकनं विचारलं.

‘‘ आपण घर सोडतोय. आटपा लौकर...’’ वादेकची आई म्हणाली.

‘‘ तुला काहीच माहीत नाही, वादेक? पेपर तरी वाचलास का आजचा?’’ बहीण म्हणाली.

‘‘न...न...नाही. कुठाय पेपर?’’वादेक म्हणाला.

‘‘मी घेतला तो पॅकिंगला. कामाला लागा!’’ त्याच्या आईनं जाहीर केलं.
त्याच रात्री बीबीसीच्या बातम्या ऐकताना त्यांना कळलं की ब्रिटन आणि फ्रान्सही रणमैदानात उतरतंय. चला, म्हणजे लौकरच हे युध्द संपणार. ही धावपळ तात्कालिकच म्हणायची.

पण तसं नव्हतं. काही दिवसातच श्‍पीलमन कुटुंबीयांना फर्मान आलं की यहुद्यांसाठी असलेल्या छावणीत राहायला या..नाहीतर मरा.
एका भयानक दु:स्वप्नाची ही सुरवात होती.
* * *

श्‍पीलमन कुटुंबानं सारं काही सोडून छावणीकडे धाव घेतली. दिवसेंदिवस तिथलं वातावरण घाणेरडं होत गेलं. चाकाच्या खुर्चीत बसलेल्या अपंग वृध्दाला नाझी सैनिकाला बघून उभं राहता येत नाही? घाला गोळी. यहुदी असल्याचं लेबल सदऱ्यावर लावायला नकार दिला? घाला गोळी. म्हातारी कुरकुर करतेय? घाला गोळी...हा असला मामला. श्‍पीलमन हादरुन गेला होता. इथून आपल्याला लौकरच हलवलं जाणार अशी बातमी फुटली. निम्म्या लोकांना त्रेब्लिंका छळछावणीकडे धाडण्यात आलं. उरलेल्यांना उमश्‍खालप्लाट्‌झला पाठवण्यात आलं. तिथं त्यांना घ्यायला रेल्वेगाडी येणार होती. श्‍पीलमनला आपलं कुटुंब इथं शेवटचं दिसलं. ती ताटातूट कायमची होणार आहे, ह्याचीही कल्पना आली होती. हे भयंकरच होतं. इतर शेकडो दुर्दैवी यहुद्यांच्या जत्थ्यातून श्‍पीलमनही रेल्वेस्टेशनाकडे निघाला. तेवढ्यात त्या रांगेतून त्याला कुणीतरी ओढलं. तो यिट्‌झॅक हेलर होता. अर्धामुर्धा यहुदीच असलेला हेलर सध्या नाझींच्या स्थानिक सुरक्षारक्षकांमध्ये भरती झाला होता. 

‘‘***, तुझा जीव मी वाचवलाय, हे कळतंय का मूर्खा...जा इथून!...जा म्हटलं...पळू नकोस!,’’ हेलर त्याच्या कानात कुजबुजला. श्‍पीलमनच्या आयुष्यातला तो वळणबिंदू ठरला.
* * *

आता श्‍पीलमन एकटाच होता. एकट्या तरुण माणसाला तगून राहाणं तुलनेनं सोईचं जातं. त्यातून पियानोवादक म्हणून त्याचं थोडंफार नावही झालं होतं. जवळच्याच एका बारमध्ये तो पियानो वाजवत असे. तिथं काही दिवस लपून काढले. छावणीत काही तरुण यहुदीही होते. त्यांना बांधकाम मजुरांची कामं करावी लागत. तिथं श्‍पीलमन घुसून राहिला. तिथंच त्याच्या लक्षात आलं की यहुद्यांनी बंडखोरी करायचे बेत रचले आहेत. मायोरेक नावाचा त्याचा मित्र ह्यात गुंतलेला होता.  

हळूहळू श्‍पीलमननं या उठावाच्या तयारीत सहभाग घ्यायला सुरवात केली. पोलिश बंडखोरांचं एक छुपं नियतकालिक निघत असे. अर्थात शहरात गपचूप. ते छावणीत आणलं जायचं. यहुद्यांच्या स्वच्छतागृहात ठेवलेलं असे. नाझी सैनिक त्या स्वच्छतागृहांकडे अजिबात फिरकत नसत. इथली स्वच्छता त्यांना मानवत नाही, असं श्‍पीलमनचे सोबती म्हणायचे. त्या नियतकालिकात बंडखोरांच्या आणि महायुध्दाच्या खबरा असत.


शस्त्रांस्त्रांची आयातही सुरू झाली. बांधकामाच्या ठिकाणी दूरवर जाणाऱ्यांनी रेशनच्या पिशव्यांमध्ये पिस्तुलं आणण्याची जबाबदारी पत्करली होती. श्‍पीलमन हे काम हिकमतीनं करी. एकदा तर जवळ जवळ तो पकडला गेला. त्यानंतर मात्र त्यानं हाय खाल्ली. तो तिथून निसटून बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागला. त्यातही मायोरेकनं त्याला मदत केली. श्‍पीलमन कसाबसा निसटला.
* * *

गेब्झिन्स्की नावाच्या एका बंडखोरांच्या सहानुभूतीदारानं त्याला रात्रभर ठेवून घेतलं. मग यहुदी छावणीला लागूनच असलेल्या एका रिकाम्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये हलवलं. आसपास थोड्या जर्मन अधिकाऱ्यांची घरं होती. म्हणजे जे काही भोगायचं, ते आवाज न करता भोगायचं होतं. एप्रिल १९४३ पर्यंत श्‍पीलमन तिथं तसाच राहिला. त्याच सुमारास त्यानं शेजारच्या छावणीतलं यहुदी बंड पाहिलं. खुनाखुनी, गोळागोळी पाहिली. आपल्या साथीदारांचं बंड चिरडलं जाताना डोळ्यांदेखत पाहावं लागलं. त्याची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली.

हे घर सोडावं लागणार होतं. कारण जर्मन सैनिकांना कुणकूण लागली होती. तरीही अशक्‍त श्‍पीलमन तिथंच राहिला. ‘नाझी आले तर त्यांच्या हातात जिवंत लागू नकोस. खिडकीतून उडी मार’ अशी सूचना देऊन त्याचा बंडखोर मित्र पसार झाला. जाताना त्यानं त्याला एक पत्ता दिला. अगदीच...अगदीच टोकाची वेळ आली तर ह्या पत्त्यावर पोहोच’ असंही सांगितलं.

एक दिवस श्‍पीलमनच्या हातून बश्‍यांची चळत खाली पडून आवाज झाला, आणि सारं संपलं.  नाझींचा ससेमिरा चुकवत तो कसाबसा पळाला, आणि मित्रानं दिलेल्या पत्त्यावर पोचला. अगदीच टोकाची वेळ खरंच आली होती. दाराची बेल त्यानं वाजवली. दार एका गर्भार स्त्रीनं उघडलं. ती डोरोटा होती.   
* * *
डोरोटा आणि तिच्या नवऱ्यानं त्याची चांगली काळजी घेतली. त्याला दुसऱ्या एका घरात हलवलं. त्याची काळजी घेण्यासाठी शालास नावाचा एक ‘कार्यकर्ता’ सोबत ठेवला. पण हा शालास अत्यंत ढिसाळ आणि दारुडा होता. दिवसेंदिवस तो यायचाच नाही. उरलेल्या नासक्‍या अन्नावर, साठलेल्या पाण्यावर श्‍पीलमनला गुजराण करावी लागायची. परिणाम व्हायचा तोच झाला. त्याला मरणाची कावीळ झाली. शालास पळूनच गेला.

पोलिश प्रतिकार वाढत होता. रशियन लष्कर आपल्या मदतीला येईल, या आशेवर पोलिश बंडखोर जिवाच्या करारानं लढत राहिले. पण तसं घडलं नाही. नाझी फौजांनी वॉर्सावर अखेरचा वरवंटा फिरवलाच. त्यात श्‍पीलमन राहात असलेल्या इमारतीचीही वाताहत झाली. 

तिथून निसटून त्यानं एका बेवारस, रिकाम्या इस्पितळाचा आसरा घेतला. त्याचा सदोदित शोध चालू असे तो अन्नाचा. भूक. भूक. भूक...पण तिथंही नाझी सैनिक पोचले. संपूर्ण वॉर्सा बेचिराख करण्याची कामगिरी त्यांनी हातात घेतली होती. तिथूनही निसटून श्‍पीलमन पुन्हा यहुदी छावणीच्या जागी आला. तिथं तरी काय होतं. पडक्‍या, ओसाड इमारती. माणसाची चाहूल नाही.

तिथल्या एका इमारतीच्या पोटमाळ्यावर तो राहू लागला. त्याही इमारतीच्या तळमजल्यावरच्या दालनात एक पियानो होता. पण तो खाता येत नाही, त्याला काय करणार? त्याच्या हाताला एक पॅकबंद डबा लागला. आत अन्न असणार. पण तो फोडणार कसा? जिवापाड तो डबा जपत तो एखादा स्क्रू ड्रायवर वगैरे मिळतो का, ते पाहात हिंडत होता. तेवढ्यात त्याच्यावर नखशिखान्त जर्मन लष्करी गणवेषातली सावली पडली. सगळंच संपलं बहुधा.
* * *
‘‘कोण आहेस तू?’’ त्यानं विचारलं. श्‍पीलमन काही बोलला नाही. इथं काय करतोयस? त्यानं विचारलं. श्‍पीलमन पुन्हा काही बोलला नाही. त्यानं पोलिशमध्ये पुन्हा प्रश्‍न विचारले.

‘‘काय करतोस तू?’’ त्यानं विचारलं.

‘’पियानो वाजवतो...वॉर्सा रेडिओवर,’’ श्‍पीलमन चाचरत म्हणाला.

नाझी अधिकाऱ्यानं त्याला खालच्या मजल्यावर पियानोपाशी नेलं. ‘वाजव’ अशी आज्ञा केली. भुकेकंगाल श्‍पीलमनची बोटं पियानोच्या पट्ट्यांवर अशी काही फिरू लागली की त्या राखेच्या साम्राज्याचं क्षणार्धात शरदाच्या चांदण्यात रुपांतर झालं. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आसमंत पुन्हा तरारून गेला जणू. 

‘‘नाव काय तुझं?’’ 

‘‘श्‍पीलमन!’’ 

‘‘हं...पियानोवादकाचं नाव श्‍पीलमन...चांगलं आहे. शोभतं तुला,’’ तो म्हणाला. जर्मन भाषेत स्पीलमन म्हणजे वाजंत्रीवाला. एवढं म्हणून तो निघूनच गेला. दुसऱ्या दिवशी येऊन त्यानं त्याला बरंच खायला आणून दिलं. डबा उघडायला हत्यार दिलं. आणि स्वत:चा कोटही दिला. 

त्या जर्मन अधिकाऱ्याचं नाव विल्म होसेनबर्ग असं होतं.

त्यानंतर काही दिवसांनी जर्मन फौजांना पोलंडमधून खदेडण्यात आलं. पारडं फिरलं. पोलिश लष्करानं श्‍पीलमनला शोधलं. विल्म होसेनबर्ग युद्धकैदी झाला.

शोपॅंच्या रचना पुन्हा एकदा वॉर्सा रेडिओवर ऐकू येऊ लागल्या.
* * *

ॲड्रियन ब्रॉडी या तरुण नटानं श्‍पीलमनची भूमिका इतकी समरसून केली की त्याला २००२ मधले होते नव्हते तेवढे सगळे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. रोमान पोलान्स्कीचंही तेच झालं. या चित्रपटाला त्यावर्षीची तीन ऑस्कर होती. ब्रॉडीनं ह्या भूमिकेसाठी तब्बल पंधरा किलो वजन चार महिन्यात घटवलं होतं. ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता, त्या श्‍पीलमन ह्यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांना चित्रपट बघताच आला नाही. हे अनुभव घेतल्यानंतर पन्नास वर्षांनी त्यांनी ते लिहून काढले होते. असं का? हा प्रश्‍न अनुत्तरितच राहिला. पण पोलान्स्कींनी शूटिंगसाठी क्रॅकोव हे ठिकाण निवडलं होतं. तिथे श्‍पीलमन यांना ओळखणारे कितीतरी जण भेटले. त्यांनी कथेत आणखी रंग भरले.

विल्म होसेनबर्ग हा दैत्याच्या पोशाखातला देवदूत ठरला. त्याला शोधण्याचे श्‍पीलमन ह्यांनी खूप प्रयत्न केले. पण रशियन युद्धकैदी म्हणून १९५२मध्ये होसेनबर्ग अखेर मरण पावला, असं त्यांना अधिकृतरित्या कळवण्यात आलं. पुढे होसेनबर्ग ह्यांचा मरणोत्तर सन्मान इस्राईल सरकारनं करावा अशी विनंती श्‍पीलमन ह्यांनी केली. आज होसेनबर्गच्या नावाची पाटी कृतज्ञतापूर्वक इस्रायलमध्ये लावण्यात आली आहे.
श्‍पीलमन ८८ वर्षं जगले. उर्वरित आयुष्यात त्यांनी पियानोच्या सुंदर रचना रचल्या. पण होलोकॉस्ट काळातली एकही रचना त्यांनी पुन्हा वाजवली नाही. आजही त्यांच्या रचना जगभरचे पियानोवादक वाजवत असतात. ‘द पियानिस्ट’मध्ये मात्र त्यांच्या लाडक्‍या शोपॅंच्याच अफलातून रचना पार्श्‍वसंगीत म्हणून वापरल्या आहेत. 
चित्रपट संपताना मनात रुंजी घालतात त्या पियानोच्या सुरावटीच. कधी वादळासारख्या येणाऱ्या. बर्फफुलांसारख्या भुरभुरणाऱ्या. कधी उमलून, एकमेकांत मिसळून पुन्हा नवा आकृतिबंध दाखवणाऱ्या. कधी अल्लड. कधी गंभीर....सगळंच अवर्णनीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com