मुलांची मस्ती-मजा (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

आम्हाला तीन बांबू आणि ११ छोटी मडकी आणि दोऱ्या हव्या होत्या. हे सामान कुठं मिळेल ते काही आम्हाला माहीत नव्हतं. गावाबाहेरच्या एका दुकानाच्या बाहेर बांबू आणि मडकी टांगलेली होती म्हणून आम्ही त्या दुकानात गेलो. आम्ही तीन बांबू आणि ११ मडकी मागितल्यावर तो दुकानदार आमच्याकडं भूत बघितल्यासारखा घाबराघुबरा होऊन पाहू लागला. त्यानं भीतभीत विचारलं :  ‘‘११ मडकी? ‘ब...बाप रे! किती जण आहेत?’’
 

आज सगळे खुशीत होते. आज सगळी मुलं आणि त्यांचे पालक गावातल्या बागेत जमले होते. प्रत्येकानं थोडा थोडा खाऊ घरूनच करून आणला होता. अंगतपंगत करत सगळे मिळून गप्पा मारणार होते.

पार्थ, नेहा, शंतनू, वेदांगी, पालवी आणि अन्वय हे सगळे तयारीतच आले होते. ‘आनंदीआनंद बॅंके’तल्या गमतीजमती त्यांना सगळ्यांबरोबर शेअर करायच्या होत्या.

शंतनू म्हणाला : ‘‘गेल्या नऊ दिवसांत आम्ही ठरल्याप्रमाणे रोज तास ते दीड तास काम केलं; पण काही दिवशी सगळ्यांनी मिळून काम केलं, तर काही दिवस आम्ही गटांत काम केलं. आम्ही सोईनुसार आमचे दोन गट केले. आम्हाला मस्त मजा तर आलीच; पण खूप नवीन शिकायलाही मिळालं, याचा आम्हाला अधिक आनंद झाला.’’

वेदांगी म्हणाली : ‘‘मी, पार्थ आणि अन्वयनं रस्त्याच्या कडेला नुकत्याच लावलेल्या ११ झाडांच्या भोवती छोटंसं कुंपण करायचं ठरवलं होतं. आम्हाला झाडाभोवती लोखंडाची किंवा प्लास्टिकची जाळी लावायची नव्हती. लोखंडाची जाळी चुकून जरी गुरांच्या तोंडाला लागली किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांच्या पायाला लागली तरी इजा होऊ शकते आणि प्लास्टिक हे पर्यावरणनाशक आहे, त्यामुळं आम्ही हे वापरणं शक्‍यच नव्हतं. आम्हाला पर्यावरणपूरकच कुंपण करायचं होतं. आदल्या दिवशी दुपारी आम्ही अंदाज घेतला, की आपल्याला काय काय साधन-सामग्री लागेल? मग यादी केली. मग ती सामग्री खरेदी करून जय्यत तयारीला लागलो.’’

‘‘आम्हाला सांगा, तुम्ही पर्यावरणपूरक कुठलं सामान विकत घेतलंत?’’

‘‘ती तर एक ‘कमाल की धमाल’ गंमतच आहे. आम्हाला तीन बांबू आणि ११ छोटी मडकी आणि दोऱ्या हव्या होत्या. हे सामान कुठं मिळेल ते काही आम्हाला माहीत नव्हतं. गावाबाहेरच्या एका दुकानाच्या बाहेर बांबू आणि मडकी टांगलेली होती म्हणून आम्ही त्या दुकानात गेलो. आम्ही तीन बांबू आणि ११ मडकी मागितल्यावर तो दुकानदार आमच्याकडं भूत बघितल्यासारखा घाबराघुबरा होऊन पाहू लागला.’’

त्यानं भीतभीत विचारलं : ‘‘११मडकी? ‘ब...बापरे! कितीजण आहेत?’’

आम्हाला काही कळलंच नाही. आम्ही म्हणालो : ‘‘कितीजण म्हणजे ११ जण. छोटीशी मडकी हवीत, त्यांच्या बाजूला पुरायला.’’

तर तो आणखी घाबरून थरथरू लागला. त्यानं चाचरतच विचारलं : ‘‘ती...ती...तीन बांबू घेऊन काय करणार? आणखी नकोत?’’

आम्हाला कळेना, हा एवढा धडधाकट माणूस घाबरून थरथरतोय का?

अन्वय त्याला म्हणाला : ‘‘अहो काका, खरं म्हणजे आम्हाला बांबूच्या चार चार फुटांच्या पट्ट्या हव्या आहेत बाजूनं लावायला. तुम्ही बांबू कापून त्याच्या पट्ट्या करून द्याल ना आम्हाला?’’

‘‘हे ऐकल्यावर तो दुकानदार सैरभैरच झाला. डोळे फिरवत डोकं धरून खुर्चीत बसला. त्याला काय करावं तेच कळेना. आम्हाला समजलं, याचा काहीतरी सॉलिड गोंधळ झाला आहे. मग मी आणि पार्थनं त्याला आमचा प्लॅन सांगितला. आमचा प्लॅन ऐकताच तो हसून हसून खुर्चीतून खालीच पडला. त्यानं आपल्या बायकोला बोलावून सगळी गंमत सांगितली. त्याची बायको तोंडाला पदर लावून फॅफॅ फॅफॅ हसत होती.’’

शंतनूचे बाबा म्हणाले : ‘‘कळलं का तुम्हाला काय गोंधळ झाला होता तो?’’

‘‘हो तर. त्याची बायको आम्हाला म्हणाली : ‘‘आवो, या दुकानात कधीच बायका-मुलं येत नाहीत. फक्त पुरुषच येतात. आले की दोन बांबू आणि एक मडकं घेतात, बाकीचं सामान घेतात; पण तुम्ही म्हणालात की ‘११ जणं आहेत आणि तीन बांबू पाहिजेत’ हे ऐकताच  त्यांना भीतीनं लकवाच मारला की. तुम्ही पोरं लईच भारी.’’

सगळी मोठी माणसं ठसठसून खसाखस हसत जमिनीवर लोळू लागली. हसता हसता त्यांच्या डोळ्यांतून पाणीच आलं.

शर्टाच्या बाहीला डोळे पुसत बाबांनी विचारलं : ‘‘पुढं काय झालं?’’

‘‘ते दुकानदारकाका म्हणाले, ‘मीपण येतो तुमच्या मदतीला. चांगलं काम करताय तुम्ही. मी येताना ‘त्या ११ जणांसाठी’ सगळं सामान घेऊन येईन.’ दुसऱ्या दिवशी येताना बांबूच्या ९९ पट्ट्या, ११ मडकी आणि सुतळीची बंडल्स घेऊन ते आले. आम्ही विचारलं, ‘किती पैसे होतील?’ कारण, आम्हा तिघांकडं मिळून फक्त ११८ रुपयेच होते. आम्ही त्यांना तसं सांगितलंही, ते तर म्हणाले, ‘काळजी करू नका. यापेक्षा कमी पैसे होतील.’ ’’

दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वत: सगळं सामान घेऊन आमच्याबरोबर आले. झाडाला कुंपण कसं करतात, बाजूला पाण्यासाठी मडकं कसं पुरतात, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. मग त्यांनी झाडांबरोबर आणि स्वत:बरोबरही आमचे फोटो काढले आणि म्हणाले : ‘‘याचे पैसे किती, सांगू का?’’

आम्ही क्षणभर चाचरत त्यांना म्हणालो : ‘‘सांगा काका.’’

आम्हाला शाबासकी देत ते म्हणाले : ‘‘शून्य...शून्य. खूप दिवसांनी असं मस्त काम केलं. लई आनंद झाला.’’ आणि ते निघूनही गेले.

‘‘व्वा व्वा! आता एक खाऊब्रेक घेऊ या.’’

***

पालवी सांगू लागली : ‘‘एक दिवस आम्ही सगळेच नगर वाचनालयात गेलो होतो. ग्रंथपाल जोशींना मदत करायला. पुस्तकांवरची धूळ झटकायची होती. पुस्तकं व्यवस्थित लावायची होती. नवीन आलेली पुस्तकं नोंदवायची होती आणि त्यांची वर्गवारी करायची होती. वाचनालय संध्याकाळी चार वाजता उघडतं ते रात्री आठला बंद होतं. आम्ही सगळे सहा वाजता गेलो. एका पुस्तकाच्या ढिगाऱ्यासमोर बसलो. त्यांनी आम्हाला काम समजावून सांगितलं आणि जोशीकाका गेले आपल्या कामाला.’’

‘‘व्वा! मग तुम्ही काय काय कामं केलीत? सगळी पुस्तकं व्यवस्थित लावलीत की फक्त धूळ झटकलीत?’’ पालवीच्या आईनं विचारलं.

पार्थचे बाबा म्हणाले : ‘‘नाही, म्हणजे तुम्ही जोशीकाकांना मदत केलीत की काकांनीच तुम्हाला मदत केली? खरं सांगा हं.’’

मुलांनी एकमेकांकडं बघितलं. आता कसं काय सांगावं? हे मुलांना कळेना.

डोकं खाजवत आणि चेहरा वाकडातिकडा करत शंतनू म्हणाला : ‘‘अं...मी सांगतो. आम्ही सहा वाजता गेलो. नवीन पुस्तकांच्या ढिगाऱ्यासमोर बसलो इथपर्यंत सगळं खरं आहे. आम्ही पुस्तकांची वर्गवारी करण्यासाठी एकेक पुस्तक चाळू लागलो. पुस्तकं चाळता चाळता वाचू लागलो. पुस्तकं वाचता वाचता वाचतच राहिलो. पुस्तकं वाचतच राहिलो म्हणून घड्याळ पाहायचं विसरूनच गेलो. घड्याळात पाहिलं नाही, त्यामुळं वेळ काही कळलीच नाही...’’

‘‘पण मग नंतर काय झालं?’’

वेदांगी सांगू लागली : ‘‘लायब्ररीचे काका नेहमीप्रमाणे आठ वाजता निघून गेले. शिपाई वाचनालय बंद करायला आला. त्याला आतल्या भागात लाईट दिसला. इतक्‍यात त्यानं पार्थचा जोरजोरात हसण्याचा आणि विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकला. त्याला कळेना की हे काय? त्याला वाटलं, भुताटकीबिताटकी आहे की काय?’’

शिपाई बाहेरून ओरडू लागला : ‘‘कोण आहे...? कोण आहे आतमध्ये? बाहेर या...बाहरे या...कोण माणसं आहेत का?’’

पार्थ जोरात ओरडत आणि हॅवॅमॅवॅ हॅवॅमॅवॅ हसत बाहेर पळाला. बाहेर बघतो तो, शिपाई हातात काठी घेऊनच उभा होता.

शिपायाला बघून पार्थ घाबरला आणि पार्थला बघून शिपाई ओरडू लागला. मग आम्ही त्या शिपाईकाकांना सगळं समजावून सांगितलं.

झालं काय, की पार्थ ‘प्रेमळ भूत’ नावाचं पुस्तक वाचता वाचता मध्येच विचित्र ओरडत आणि हसत गडाबडा लोळू लागला, त्यामुळं घोटाळा झाला...’’

‘‘अरे, घोटाळा नव्हे काही. त्यामुळंच तर तुम्ही सुटलात ना! नाहीतर रात्रभर आतमध्येच अडकून पडला असतात. त्या ‘प्रेमळ भुता’चे आणि पार्थचे आभार माना.’’ पार्थचे बाबा हसतच पुढं म्हणाले : ‘‘या तुमच्या मदतकार्यानंतर आणि तुमची वाचनालयातून सुटका झाल्यानंतर मला जोशीकाकांचा फोन आला होता.’’

मुलं म्हणाली : ‘‘जोशीकाकांना सांगा ना ‘सॉरी’. पुस्तकं वाचता वाचता आम्ही त्यांना मदत करायचं विसरूनच गेलो. आता आम्ही पुन्हा खरोखर मदत करायला जाऊ.’’

‘‘अरे, मी त्यांच्याशी बोललो आहे. तुम्ही पुस्तकप्रेमी असल्यानं थोडा घोटाळा झाला आणि समजा ‘प्रेमळ भूत’ वाचून जर पार्थनं त्या वेळी गोंधळ केला नसता तर आम्हाला रात्री हातात जेवणाचे डबे घेऊन वाचनालयातच मुक्कामाला यावं लागलं असतं.’’

हसत हसत सगळे म्हणाले : ‘‘आता जरा काहीतरी कुडूमकुडूम हवंच बघा चावायला.’’

कुडूमकुडूम आणि कटाककुटूक खाऊन झाल्यावर मदतीची तिसरी फेरी ऐकायला सगळे उत्सुक झाले.

***

‘‘अं...ही तिसरी बातमी फारशी चांगली नाही. कारण, त्यामुळं मला घरी बोलणी खावी लागली. जागरण करावं लागलं आणि शिक्षकसुद्धा थोडेसे आमच्यावर नाराजच झाले,’’ पार्थला थांबवत नेहाची आई म्हणाली : ‘‘अरे सांगा लवकर..’’

पार्थ कसंनुसं तोंड करत म्हणाला : ‘‘मी मुलांना सायकल शिकवायचं ठरवलं होतं. म्हणून मी माझ्या एका मित्राला विचारलं. त्यानं त्याच्या इथं राहणाऱ्या त्याच्या एका मित्राला विचारलं आणि तो आला सायकल शिकायला. त्याचा मला खूप त्रास झाला.’’

‘‘आँ..? तुला कसा काय त्रास झाला? ज्याला सायकल येत नाही त्याला त्रास होतो. पहिल्यांदा भीती वाटते. पडायला होतं. मग गुडघे फुटतात. पाय लचकतात. लोकांच्या अंगावर सायकल गेली तर मग त्यांची बोलणी किंवा टपल्या खाव्या लागतात. आता यातलं तुला काय झालं?’’ शंतनूला थांबवत वेदांगीनं विचारलं : ‘‘पार्थू, तुला सायकल येते ना? मग प्रॉब्लेम काय झाला?’’

कसं सांगावं असा विचार करत पार्थ हळूहळू सांगू लागला : ‘‘मी ज्या मित्राच्या मित्राला सायकल शिकवायला लागलो, त्याला दोन मिनिटांतच सायकल येऊ लागली...एकदम फास्ट चालवता येऊ लागली...’’

सगळेच आश्‍चर्यानं जोरात ओरडले : ‘‘अशक्‍य... अशक्‍य! हे कसं शक्‍य आहे?’’

पार्थ आणखी हळू आवाजात म्हणाला : ‘‘शक्‍य आहे! कारण त्याला आधीपासूनच सायकल चालवता येत होती...’’

हे ऐकताच सगळे हसता हसता गडबडू लागले.

पार्थ चिरक्‍या आवाजात म्हणाला : ‘‘हसू नका. मला भीती वाटली, की हा मुलगा ही सायकल घेऊन पळून गेला तर...? त्या फास्ट सायकलच्या मागं पळून पळून आणि ओरडून ओरडून माझ्या पायात गोळे आले, घसा सुकला. कसबसं मी त्याला पकडलं आणि सायकल ताब्यात घेतली. मी इतका दमलो की घरी येऊन झोपलोच. आईला कळेना, मी का झोपलो ते; पण हे मी कुणाला आत्तापर्यंत सांगितलंच नव्हतं.’’

‘‘तो मुलगा भेटला का मग पुन्हा तुला?’’

‘‘हो. दुसऱ्या दिवशी तो मला भेटायला आला होता. मला म्हणाला : ‘‘सॉरी. मी काल तुला खूप त्रास दिला. आत्तापर्यंत मी एवढा वेळ कधीच सायकल चालवली नव्हती. मला खूप आनंद झाला. चल, आपण आइस्क्रीम खायला जाऊ या. आता तो माझा चांगला मित्र झाला आहे.’’

‘‘ही वेळ आइस्क्रीम खाऊन सेलिब्रेट करण्याचीच आहे. चला उठा...’’ असं शंतनूनं म्हणताच सगळी मुलं टुणकन्‌ उठली आणि...

आता पुढं काही सांगायलाच नको.

आज पालकांसाठी खरोखरंच काही गृहपाठ नाही. ‘मोठ्या मनाचे पालकच मुलांच्या चुका समजून घेत त्यांच्याबरोबर मस्ती-मजा करत असतात,’ ही चिनी म्हण मात्र लक्षात ठेवा!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा