मदत आणि मैत्री (राजीव तांबे)

मदत आणि मैत्री (राजीव तांबे)

आ  ज दिवाळीच्या सुटीचा पहिला दिवस. मुलांचा वेदांगीच्या घरी नुसता कल्ला सुरू होता. शंतनू, नेहा, अन्वय, पालवी आणि पार्थ एकदम फॉर्मात आले होते. ‘आज काहीतरी वेगळं करायचं,’ असं त्यांनी ठरवलंच होतं; पण नेहमीप्रमाणं वेगळं काय करायचं, हे मात्र ठरत नव्हतं.

प्रत्येकाला वेगवेगळी आयडिया सुचत होती आणि त्यामुळं आपल्याप्रमाणंच इतरांनी करावं, असं प्रत्येकाला वाटत होतं.
शंतनू म्हणाला : ‘‘मला वाटतं आपण सगळे मिळून मोठा आकाशकंदील करू या.’’

नेहा म्हणाली : ‘‘त्यापेक्षा आपण सगळे मिळून दिवाळीची भेटकार्डं तयार करू या. एकदम एक सो एक भन्नाट कार्डं करू या.’’
पालवी म्हणाली : ‘‘मला वाटतं आपण पणत्या रंगवू या. आपल्यासाठी आणि आपल्या शेजाऱ्यांसाठीही.’’

पार्थ म्हणाला : ‘‘हे काय? पणत्या कशाला? दिवाळी म्हणजे किल्ले. आपण सगळे मिळून खऱ्या किल्ल्यांपेक्षा मोठा किल्ला बांधू या आणि दिवाळी तिकडंच साजरी करू या.’’ हे ऐकताच सगळे ठसफसून हसले.

अन्वय आणि वेदांगी आपापसांत काहीतरी कुजबुजत होते. शंतनू डोकं खाजवत त्यांना म्हणाला : ‘‘आज काहीतरी चमचमीत चटकदार आणि चुरचुरीत काय खायला करावं, याबाबत तर तुम्ही रसदार चर्चा करत नाहीये ना?’’

पालवी हसत म्हणाली : ‘‘याला सदानकदा खाण्याचेच वेध...’’

वेदांगी म्हणाली : ‘‘मला एक वेगळीच कल्पना सुचते आहे. शाळा सुरू असताना आपण खूप बिझी असतो. म्हणजे दिवसभराची शाळा, मग शाळेचा अभ्यास, नंतर शाळेचेच इतर उपक्रम, उरलेल्या वेळात आपले छंद आणि अवांतर वाचन यात हे शाळेचे दिवस कधी संपून जातात ते कळत नाही; पण आता आपल्याला दिवाळीची सुटी आहे, तर आपण राहून गेलेल्या गोष्टी या सुटीत करू.’’ वेदांगीला थांबवत नेहा म्हणाली : ‘‘अगं हो...पण नेमकं काय करायचं तेच तर कळत नाहीये ना..’’

‘‘अहो, आम्हा सगळ्यांनाच कळतंय की काय करावं ते; पण सगळ्यांचं एकमत होत नाहीये, हा खरा प्रश्‍न आहे. तो कसा सोडवायचा?’’ असं शंतनूनं म्हणताच पार्थ कुरकुरला : ‘‘ओके. आपण सहा जण सहा दिशांना तोंडं करून सहा मिनिटं बसू. मग आपण नव्यानं शोधलेल्या आयडियांवर सहा मिनिटं गप्पा मारू आणि काय ते फायनल करू. ओके..?’’

त्या क्षणी सहाही जण सहा दिशांना तोंडं करून बसले. मग सहा मिनिटांनी घमासान गप्पागप्पी केली आणि सर्वांनी एकमतानं ठरवलं, की या सुटीची थीम असणार आहे- ‘मैत्री’; पण... मदत नव्हे!

पार्थनं विचारलं : ‘‘या मैत्री आणि मदत यांमधला फरक कसा काय ओळखायचा?’’
अन्वय म्हणाला : ‘‘अरे, आत्ताच नाही का आपण बोललो, की मैत्रीमध्ये दोघं सारखेच असतात; पण मदत करताना मात्र ‘मदत करणारा’ आणि ‘मदत घेणारा’ हे सारखे असतीलच असं नाही. मैत्री म्हणजे दोस्ती आहे आणि दोस्तीत देण्या-घेण्याचा हिशेब नसतोच मुळी. मदतीत प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही.’’

‘‘मला वाटतं आपण सहा जणांनी वेगवेगळ्या जणांशी मैत्री करण्याचा प्लॅन स्वतंत्रपणे किंवा मिळून तरी मांडू या आणि नंतर आपापल्या मैत्रीचे अनुभव शेअर करूया.’’
‘‘वॉव ही मस्त आयडिया आहे.’’

नेहा म्हणाली : ‘‘आमच्या जवळच एक बाग आहे. मला वाटतं मी त्या बागेशी दोस्ती करावी.’’

शंतनूनं डोकं खाजवत विचारलं : ‘‘बागेशी दोस्ती.. म्हणजे काय? अं...म्हणजे बागेच्या बाहेर मिळणारी भेळ, पाणीपुरी आणि रगडा पॅटीस खाऊन दोस्ती करायची का? तर मग मस्तच!’’

‘‘हो बागेशी दोस्ती; पण खाण्याशी दोस्ती नव्हे रे शंतनू. ही बाग स्वच्छ ठेवण्यासाठी मला बागेशी दोस्ती करावीच लागेल.’’

‘‘पण तू एकटी कशी काय सगळी बाग स्वच्छ ठेवणार?’’

‘‘मी एकटी नाहीच आहे. बागेत जी माणसं सकाळ-संध्याकाळ चालायला येतात, जी मुलं खेळायला येतात, जे आजी-आजोबा गप्पा मारायला येतात, किंवा जे लोक नुसतेच फिरायला येतात, त्यांच्याशी मी आधी दोस्ती करीन.’’

अन्वय टाळी देत म्हणाला : ‘‘ही सॉलिड आयडिया आहे.’’

‘‘पण तू त्या सगळ्यांशी दोस्ती कशी करणार?’’

‘‘अं.. ती तशी सोपी आयडिया आहे. सर्वांत आधी मीच बाग स्वच्छ करायला सुरवात करणार. जे कचरा करत असतील, त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करणार. मला खात्री आहे, की माझं काम पाहून मला मदत करायला काही जण पुढं येतील. अशा माझ्या ‘मदत-मित्रांना’ मी तयार केलेली छोटीछोटी ‘आभार शुभेच्छापत्रं’ देणार.’’
नेहाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच नेहाला टाळी देत पालवी म्हणाली : ‘‘मी पण येणार तुझ्याबरोबर. काम करे मिलके मिलके, तो अपनी बाग चमके चमके.’’

अन्वय म्हणाला : ‘‘मी जरा वेगळा विचार करतोय. म्हणजे नेहाच्या बोलण्यातूनच मला ही आयडिया सुचली आहे. म्हणजे तशी माझी खूपच दिवसांची इच्छा होती; पण आता तिचं मैत्रीत रूपांतर करता येईल..’’

वेदांगी म्हणाली : ‘‘अरे अन्वया.. उगाच मांजा गुंडाळू नकोस. काय ते नीट सांग ना. का तुलाच अजून नीट कळलेलं नाहीये?’’

कसबसं हसत अन्वय म्हणाला : ‘‘तसं नाही. माझ्या बाबांची बाइक आहे आणि ती मला चालवायला शिकायची आहे. बाबा मला म्हणाले : ‘अरे आधी बाइकशी दोस्ती कर आणि मग चालवायला शिक.’ तेव्हा मला कळेना बाइकशी दोस्ती कशी करायची? पण आता कळलं..’’

‘‘अरे, लवकर बटण दाब आणि सांग कसं कळलं ते..?’’
‘‘या सुटीत मी गॅरेजमध्ये जाणार आणि बाइकच्या पोटात शिरणार..’’
‘‘म्हणजे? आता हे काय नवीनच?’’

‘‘म्हणजे स्पार्क प्लग कसं काम करतो, पंक्‍चर कसं काढायचं, चाकं कशी बदलायची, इंजिनमध्ये कायकाय अडचणी येऊ शकतात, ते कसं ओळखायचं आणि ते दुरुस्त कसं करायचं, हे मी माहीत करून घेणार. मला गिअर बॉक्‍स पण उघडून पाहायचा आहे. खरं म्हणजे मला गाडीच्या प्रत्येक पार्टशीच दोस्ती करायची आहे. मी १८ वर्षं पूर्ण झाल्यावर गाडी चालवायला शिकीनच; पण त्याआधी माझी गाडीशी पक्की दोस्ती असेल आणि यासाठी मला..’’

शंतनू उड्या मारत म्हणाला : ‘‘अर्थातच मी आहे तुझ्यासोबत. मला पण गाडीशी दोस्ती आणि कुस्ती करायची आहे.’’ मान डोलवत पार्थ म्हणाला : ‘‘मला पण एक नवीन आयडिया सुचते आहे आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांचीच मदत लागणार आहे.’’
‘‘अरे, पण आधी सांग तर त्याशिवाय आम्हाला कळणार कसं?’’ ‘‘मागं आपलं ठरल्याप्रमाणं मी आणि वेदांगीनं आमच्या बाजूलाच राहणारी प्रिया आणि सौमित्र यांना ‘अभ्यासदत्तक’ घेतलं आहे. प्रिया आहे इयत्ता पाचवीत, तर सौमित्र आहे तिसरीत. आठवड्यातून दोनदा आम्ही मिळून अभ्यास करतो आणि दर शनिवारी संध्याकाळी आम्ही ‘अभ्यासगप्पा’ मारतो. खूप मजा येते. या दोघांकडून खूपच नवीन गोष्टी शिकायला मिळतात..’’

‘‘अरे पार्था, काय ते लवकर सांग ना. उगाच ढील देत बसू नकोस.’’

‘‘हं. हं. ‘अभ्यासगप्पां’मध्ये ही दोघं आम्हाला असले काही भन्नाट प्रश्‍न विचारतात, की आमच्या डोक्‍याचा चिवडा होतो. या प्रश्‍नांची उत्तर शोधण्यासाठी मला तुमची मदतच मिळाली, तर मी त्या छोट्या मित्रांना...’’

‘‘वॉव! कुठले प्रश्‍न आहेत ते..?’’

‘‘अं.. प्रश्‍न तसे सोपे आणि गमतीचे वाटतात; पण त्याची उत्तरं शोधायला लागलो, तर डोक्‍यात भुंगे फिरू लागतात. उदाहरण द्यायचं, तर प्रियानं एकदा विचारलं : ‘आपली पृथ्वी एका बाजूला २३.५ अंश झुकली आहे, हे पृथ्वीवर राहूनच कसं कळलं? आणि हे २३.५ अंश मोजायला त्यांनी कुठला कोनमापक वापरला?’ यावर सौमित्र म्हणाला : ‘मला वाटतं पृथ्वी ज्या बाजूला झुकली आहे त्या बाजूला मोठमोठे डोंगर असणार. त्यामुळं तिकडचा भाग जड झाला असणार आणि बिचारी पृथ्वी त्या साइडला झुकली असणार’ आता हा प्रश्‍न आणि त्याचे ‘सौमित्र स्पेशल उत्तर’ ऐकून आमचीच डोकी जड झाली. आता आपण चालताना २३.५ अंश झुकणार की काय, असं वाटू लागलं..’’
‘‘त्यांनी एकच प्रश्‍न विचारला का?’’

वेदांगी सांगू लागली : ‘‘अगं त्यांचं प्रश्‍नांचं फायरींग सुरूच असतं गं. मध्यंतरी सौमित्रनं मला विचारलं : ‘पृथ्वी गोल असते ना?’ मी हो-हो म्हणत मान डोलावली. तेव्हा तो म्हणाला : ‘मला नं एकदा पृथ्वीच्या टोकावर जाऊन खाली डोकावून पाहायचं आहे. येशील का तू माझ्या बरोबर? तू घाबरणार नाहीस ना?’ खरं सांगते- हे ऐकून मलाच चक्कर येऊ लागली. या भन्नाट प्रश्‍नांची उत्तरं शोधायला आम्हाला मदत कराच तुम्ही.’’

‘‘व्वा! मस्त कल्पना आहे. म्हणजे तुम्हाला आमची मदत हवी आहे, कारण आपण सारे मित्र आहोत...आणि आपल्या मदतीनं तुमच्या मित्रांचे प्रश्‍न सुटणार आहेत. आणि या मदतीच्या मदतीनं आम्ही तुमच्या मित्रांचे मित्र होणार आहोत. म्हणजे हीच खरी दोस्ती,’’ अन्वयनं असं म्हणताच एकमेकांचे हात धरून सगळे ओरडले : ‘‘ओके बोके पक्के आणि काम शंभर टक्के.’’

पालकांसाठी गृहपाठ :

  •   ‘सुटीत मुलांनी काय करावं,’ याचा अंतिम निर्णय तुम्ही घेऊच नका. या प्रश्‍नाचं उत्तर मुलांवर सोपवा. त्यांच्यासोबत गप्पा मारा. त्यांनी मदत मागितली तरच करा.
  •   मुलं जेव्हा एखाद्या प्रश्‍नाचं उत्तर मिळण्यासाठी झगडत असतात, कुठं ना कुठं शोधत असतात, अशा वेळी तुम्ही शांत आणि तटस्थ राहणंच अपेक्षित आहे. तुम्हाला मुलांच्या प्रश्‍नाचं उत्तर माहीत असलं, तरी ते त्याचं त्यालाच शोधू दे. मुलांना सक्षम करण्याचा हाही एक भाग आहे.
  •   मुलांना त्यांच्या प्रश्‍नांची रेडिमेड उत्तरं कधीच देऊ नका. मुलांना शोधण्यासाठी आणि शोधलेली गोष्ट आपल्या भाषेत मांडण्यासाठी प्रवृत्त करा.
  •   ‘जे शोधतात तेच शिकतात,’ ही ‘नॅनो चिनी म्हण’ सदैव लक्षात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com