ऑनलाइन ‘समाजसेवक’

सॅबी परेरा
रविवार, 16 जुलै 2017

युनेस्कोने भारताच्या राष्ट्रगीताला सर्वोत्तम राष्ट्रगीताचा, मोदीजींना सर्वोत्तम पंतप्रधानांचा आणि दोन हजारच्या नोटेला सर्वोत्तम नोटेचा पुरस्कार मिळाल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ही आपल्या प्रमुख पाहुण्यांनीच दिली

बंधूभगिनींनो, आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे हे महान आणि थोरथोर ‘ट्‌वेंटीफोर बाय सेवन ऑनलाइन’ समाजसेवक आहेत.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसमुळे कोथिंबिरीमध्ये आढळणाऱ्या ‘पार्थिनिअम’ नावाच्या विषारी वनस्पतीपासून जे लाखो लोक मृत्युमुखी पडणार होते, त्यांचे प्राण वाचले आहेत.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर मेसेज फॉरवर्ड करून दिलेल्या प्रोत्साहनामुळेच नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, डॉ. विकास आमटे, अमिताभ बच्चन हे लोक इतके लिहिते झाले, की त्यांच्या मूळ व्यवसायासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला.

त्यांनी शेअर केलेल्या मेसेजमुळेच मौजे कौलार बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत मास्तरने पोरांना बदडल्याचा व्हिडिओ सव्वाशे कोटी भारतीयांपर्यंत आणि पंतप्रधान मोदीजींपर्यंत पोचला.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसमुळे आपल्याला हळद, कांदा, लसूण, आले, अतिथंड केलेल्या लिंबाचा रस अशा घरगुती वापराच्या वस्तू वापरून खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारावर मात करता आली.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसमुळेच जिवंतपणीच फोटोला हार आणि आत्म्याला शांती हे भाग्य अनेक सेलिब्रिटींना लाभले.

त्यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे रोजच्या रोज कुठल्यातरी रेल्वे स्टेशनवर एखादे मूल रोज हरवून सापडत असते.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर फॉरवर्ड केलेले देवाधर्माचे मेसेज पुढे दहा-दहा लोकांना फॉरवर्ड केल्यामुळेच आपण सर्वजण आजचा हा दिवस पाहण्यासाठी जिवंत राहिलो. ज्यांनी ते पुढे फॉरवर्ड केले नाहीत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो!

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर केलेल्या आवाहनामुळेच आज भारतातील जनता रोज प्रत्येकी दहा रूपयांचा ऊसाचा रस / फळांचा रस/ नारळपाणी पिऊ लागली आहे. 

भारत महासत्ता व्हावा, या कळकळीने बिल गेट्‌सने दिलेला संदेश त्यांनीच व्हॉट्‌सॲपद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवला.

उकडलेली अंडी आणि केळी एकत्र खाल्याने पोटात होणाऱ्या रासायनिक क्रियेमुळे स्फोट होऊन माणूस जागच्या जागी मरतो या त्यांच्या मौलिक संशोधनाची दखल आज ना उद्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला घ्यावीच लागेल, अशी मला खात्री आहे.

त्यांनी व्हॉट्‌सॲपवर पाठविलेल्या मुंग्या किंवा उंदीर पुढे तीन ग्रुपला पाठविल्यामुळे आपल्याला फुकटात जादू पाहायला मिळाली.

त्यांनी फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे मायक्रोसॉफ्टने कित्येक रूग्णांना प्रत्येक फॉरवर्डपाठी एकेक रूपया अशी कोट्यवधींची मदत केली, कित्येकांच्या मोबाईलची बॅटरी चार्ज झाली, कित्येकांचा बॅलन्स रिचार्ज झाला.

त्यांनी फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळेच आपल्याला फ्रूटीमध्ये मिसळलेल्या एड्‌सबाधित रक्ताची बातमी कळाली. त्यांच्या मेसेजमुळेच इबोलाची साथ रोखण्यात मोदीजींना यश आले.

आपल्या प्रमुख पाहुण्यांनीच वरून पुल्यानी या माणसाला व्हॉट्‌सॲपचा डायरेक्‍टर नेमून त्याच्याकरवी व्हॉट्‌सॲप कंपनी फेसबुकवाल्या झुकेरबर्गला विकली.

युनेस्कोने भारताच्या राष्ट्रगीताला सर्वोत्तम राष्ट्रगीताचा, मोदीजींना सर्वोत्तम पंतप्रधानांचा आणि दोन हजारच्या नोटेला सर्वोत्तम नोटेचा पुरस्कार मिळाल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ही आपल्या प्रमुख पाहुण्यांनीच दिली.

तेव्हा अशा या महान आणि थोरथोर समाजसेवक साहेबांस माझी विनंती आहे, की त्यांनी आपल्या डोक्‍याला जशी कायमस्वरूपी विश्रांती दिली आहे, तशीच अल्पकालीन विश्रांती, मेसेज फॉरवर्डणाऱ्या आपल्या हाताच्या अंगठ्याला देऊन आमच्याशी दोन शब्द शेअर करावेत, ही विनंती.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा