वैदिकांचा अंत:संघर्ष (सदानंद मोरे)

Article by Sadanand More in Saptaranga
Article by Sadanand More in Saptaranga

राजारामशास्त्री भागवत जेव्हा महाराष्ट्र आणि त्याअनुषंगानं भारताविषयी लिहीत होते, तोपर्यंत मानववंशशास्त्र (Anthropology) या नव्या शास्त्रानं भारतात मूळ धरलं नव्हतं. त्याचप्रमाणे रिस्ले याच्यासारख्या जनगणना अधिकाऱ्यानं शीर्षमापनपद्धतीच्या आधारे केलेली भारतीय वंशांची निश्‍चिती आणि वर्गीकरणही प्रचारात नव्हतं. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे किंवा भारताचार्य चिं. वि. वैद्य यांनी रिस्लेची केलेली खंडनेही उपलब्ध होण्याचा प्रश्‍नच नव्हता. शिलालेखांची व ताम्रलेखांची वाचनं होत होती; पण त्यांच्यातला पुरावा पुरेसा नसतो. भूमिगत प्राचीन अवशेष उत्खननाद्वारे उपलब्ध व्हायला अजून अवधी होता. अशा वेळी शास्त्रीबोवांची मदार व्युत्पत्ती आणि व्याकरण यांच्यावर, भाषाविकासशास्त्रावर असणं अगदीच साहजिक होतं.

‘यज्ञविद्येचे विशकलन’ करताना भागवत स्पष्टपणे सांगतात : ‘‘अतिप्राचीन काळचे लोक स्त्रीप्रधान होते, पुरुषप्रधान नव्हते. ‘सूर्या’ हा शब्द वेदांमध्ये स्त्रीलिंगी येतो. ‘सूर’ हे नाव सूर्यास, तो जगताची ‘आई’ आहे, अशी कल्पना करून दिलेले आहे. ‘अय्‌’ हा शब्द स्त्रीलिंगी आहे. इतकेच नव्हे तर, नित्य बहुवचनात्म आहे.’

शास्त्रीबोवांच्या या लिंगभावमीमांसेचा संबंध यज्ञीय धर्माशी पोचतो. त्यातून ते असं निष्पन्न करतात : ‘देवास बोलाविण्याचे काम पूर्वीच्या काळी स्त्रियांचे असावे, असे अनुमान निघते. ‘देवता’ शब्द संस्कृतात नित्य स्त्रीलिंगी आहे. पूर्वी देवतांचे वाचक जे शब्द होते, ते झाडून स्त्रीलिंगी होते. ‘सूर्य’ शब्द, ‘मित्रा’ शब्द व ‘द्यौ’ शब्द हे अतिजुनाट शब्द नित्य स्त्रीलिंगी होत. स्त्रियांचे आमंत्रण स्त्रियांनीच करणे योग्य दिसते.’

आता या अनुमानाची पुढची पायरी म्हणजे यज्ञक्रियेतला ‘होता’ या ऋत्विजाचं स्थान व कार्य. शास्त्रीबोवांचं असं म्हणणं आहे : ‘ऋत्विग्वाचक अतिप्राचीन काळचा शब्द ‘होत्रा’ हा असावा. ‘निघंटू’मध्ये (निघंटू = वेदांमधल्या शब्दांचा कोश)‘होत्रा’ शब्द वाणीवाचक सांगितला आहे, तेव्हा ‘होत्रा’ शब्द ‘होतृ’ शब्दाप्रमाणे ‘व्हेत्र’ बोलावणे या धातूपासून आलेला असावा.’

थोडक्‍यात, देवतांना आवाहन करण्याचं म्हणजेच होत्याचं काम स्त्रीकडं असावं, असा शास्त्रीबोवांचा कयास आहे.

यज्ञप्रक्रियेतून सामाजिक इतिहास उलगडणारे राजारामशास्त्री भागवत हे बहुधा एकमेव विद्वान असावेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण, इतिहासकाळात तर नंतर ‘होत्या’चं पद पुरुष बळकावून बसलेले दिसतात. याला एकप्रकारे ‘ ‘होत्या’चं नव्हतं होणं’ असं म्हणता येईल! एरवी शास्त्रीबोवांनीच म्हटल्यानुसार : ‘ ‘वाक्‌’ शब्द नित्य स्त्रीलिंगी समजणाऱ्या याज्ञिकांनीच ‘पूर्वी स्त्रीप्रधान असा एक काळ होता,’ हे निर्विवाद करून दाखविले आहे, असे आम्हास वाटते.’

‘होता’, ‘अध्वर्यू’, ‘उद्गाता ’ आणि ‘ब्रह्मा’ या चार ऋत्विजांमध्ये यज्ञकर्माचं केंद्रस्थान अध्वर्यू हेच असे. भागवत सांगतात : ‘ ‘अध्वर्यु’ हा शब्द अनेक वेळा श्रुतीत ‘अध्वर्यू’ असास अर्थात द्विवचनात्म येतो.’ याचा अर्थ पूर्वी दोन अध्वर्यू हेच ऋत्विज होते, असा घ्यायचा का? ‘अगदी मूळचा ऋत्विज्‌ ‘अध्वर्यु’ एकटाच असून, पुढं खटपट वाढत गेल्यामुळं ‘अध्वर्यु’स एक बगलबच्चा मिळाला,’ असं त्यांचं निरीक्षण आहे. असंही शक्‍य आहे, की सुरवातीला या दोघांच्या खटपटींची अथवा कामांची काटेकोर विभागणी झालेली नसल्यानं दोघांनाही ‘अध्वर्यु’ असंच म्हणत व तो शब्द तेवढ्यापुरता द्विवचनात्म वापरला जाई. पुढं या दुसऱ्या अध्वर्यूस, भागवत म्हणतात त्याप्रमाणे, ‘प्रतिप्रस्थाता’ असं अन्वर्थक नाव मिळालं. पूर्वी सगळी यज्ञविद्या एकच होती. त्या काळी तिचा अभिधायक शब्द ‘ब्रह्म’ होता, हे भागवतांचं आणखी एक निरीक्षण. ‘ब्रह्म’ हा शब्द वेदांसाठीही वापरण्यात येतो. त्यातूनच शब्दब्रह्माची कल्पना निघाली असावी; पण तो वेगळा मुद्दा. भागवत सांगतात : ‘जेव्हा या ब्रह्म ऊर्फ यज्ञविद्येची निरनिराळी अंगे कल्पिण्यात आली, तेव्हा ‘श्रुति’ शब्द प्रयोगात येऊ लागला व वृत्तबद्ध भागास ‘छंदस्‌’ नाव मिळून सुट्या याज्ञिक वाक्‍यास ‘सामन्‌’ व ‘आभिचारिक’ वगैरे वाक्‍य होती, त्यास ‘अर्थवन्‌’ म्हणू लागले. पुढे काही काळाने ‘ऋक्‌’ शब्दाची प्रवृत्ति झाली व त्याच्या पश्‍चात, म्हणजे उपनिषदांचा संग्रह करीत चालले, अशा काळी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे शब्द अस्तित्वात आले. या प्रक्रियेत मूळची ‘होत्रा’ असलेली स्त्री-ऋत्विक लुप्त होऊन ‘होतृ’ हा पुरुष अस्तित्वात आला.’

व्याकरणाच्या वाटेनं जाणारे भागवत इथंच थांबत नाहीत. ‘अग्नि’ हा शब्दसुद्धा अतिप्राचीन काळी स्त्रीलिंगी असावा, हा त्यांचा कयास आहे.
तपशिलात जायची गरज नाही; परंतु, ‘अध्वर्यू’ दोघे व ‘होता’ मिळून तीन ‘ऋत्विज’ ही संख्या यज्ञ जसा गुंतागुंतीचा होत गेला त्याप्रमाणे सोळा झाली.
भागवत म्हणतात : ‘स्त्रियांच्या परिस्थितीच्या संदर्भातला विचार पुढं न्यायचा झाल्यास ‘वैदिकांचे दोन मोठे विभाग स्त्रियांच्या हक्कांच्या संबंधानं करिता येतात. ‘कर्मठ’ वैदिक व ‘औपनिषदिक’ वैदिक. माता पूर्णरूप म्हणून स्त्रीचा मान अधिक ठेवणारे ‘औपनिषदिक’ होत; ‘कर्मठ’ नव्हत. ‘कर्मठां’मध्येही दोन फळ्या पडलेल्या होत्या. पहिली फळी ‘ऐतिशायना’ची व दुसरी फळी ‘बादरायणा’ची. या फळ्यांस अनुक्रमे ‘ऐतिशायनी’ व ‘बादरायणी’ म्हणू. ऐतिशायनी फळी ‘स्त्रीस बिलकूल स्वातंत्र्य नाही’, असे म्हणे. बादरायणी फळी ‘स्त्रियांस सर्व अधिकार आहेत,’ असे म्हणत नसे; पण यज्ञाचा अधिकार व स्वतंत्रपणे जिंदगीचा अधिकार स्त्रियांस या फळीच्या मताने उघड होता. स्त्रियांस पुरुषांप्रमाणे सर्व प्रकारची मोकळीक असून, दोहोंमध्ये बरोबर अर्धार्धाची कल्पना ‘औपनिषदिक’ फळीस मात्र मान्य होती.’
यातून आणखी एक गोष्ट निष्पन्न होते व ती म्हणजे, ‘ऋचां’ना बायका व ‘सामां’ना पुरुष समजून त्यांच्या उत्कृष्ट-निकृष्टाचा भेद करायचा हे काम ऐतिशायनी फळीचं समजावं.

भागवतांनी न मांडलेला; पण त्यांच्या विवेचनातून निष्पन्न होणारा एक मुद्दा म्हणजे, ज्यांना आपण बादरायण महर्षींनी रचली म्हणून ‘बादरायण सूत्रं’ म्हणतो ती ब्रह्मसूत्रं किंवा शारीरक सूत्रं म्हणतो ती भागवत समजतात, त्या बादरायणी परंपरेतली असतील तर - आणि ती उपनिषदांचं सूत्ररूप सार असल्यानं ‘औपनिषदिक’ वैदिक असतील - तर पुरोगामीच असायला हवीत; पण त्यांचा शंकराचार्यादी भाष्यकारांनी लावलेला अर्थ पाहता ती पुरोगामी न वाटता कर्मठच वाटतात. उदाहरणार्थ : अपशूद्रादी अधिकरण; ज्यात शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारला गेला आहे; पण याच भाष्यकारांनी नमूद केलेले पुरोगामी पूर्वपक्ष हे काल्पनिक नसून, तसा दृष्टिकोन मांडणारे पूर्वभाष्यकार होऊन गेले असावेत, हे मान्य करण्यास प्रत्यवाय नसावा! मात्र, याचा असाही अर्थ होतो, की काळाच्या ओघात अनेक बाबींत कर्मठ आणि औपनिषदिक फळ्यांमधला फरक कमी होत गेला. औपनिषदकांनी कर्मठांच्या कर्मकांडाला व ते ज्यावर आधारित होते, त्या भेदांना मागच्या दारातून प्रवेश दिला. संन्यासाश्रम ग्रहण केल्यानंतर मागं वळून परत गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याला, म्हणजे ‘आरूढपतना’ला कर्मठ महापाप समजत. तसं समजण्याची गरज औपनिषदांना नव्हती; पण बादरायणी ब्रह्मसूत्रांवर भाष्य करणारे आचार्य कर्मठांच्याच सुरात सूर मिळवताना दिसतात, तेव्हा भागवतांच्या मर्मदृष्टीला दाद द्यावीशी वाटते. ज्ञानेश्‍वरादी चार भावंडांचा जन्म अशाच ‘आरूढपतित’ संन्याशाच्या पोटी झाला होता. त्यांना त्रास देण्यासाठी महाराष्ट्रातल्या उपरोक्त दोन्ही फळ्या एकत्र आल्या, हे आपण जाणतोच! स्वत: भागवत यांना ज्ञानेश्‍वर व त्यांच्या परंपरेविषयी विलक्षण आदर होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानेश्‍वरांच्या औपनिषदिक परंपरेलाच भागवत ‘महाराष्ट्रधर्म’ समजतात.

भारताचा धर्मेतिहास लिहिणाऱ्यांचा कल सहसा वैदिक आणि अवैदिक या द्वंद्वाच्या चौकटीत लिहिण्याकडं असतो. त्यानुसार बौद्ध, जैन, चार्वाक, प्रसंगी आजीवक या विविध परंपरांना ‘वैदिक’ या एका परंपरेच्या विरोधात उभं केलं जातं. यात एकीकडं वैदिक परंपरा म्हणजे एक एकसंध एकक (Unit) असल्याचं मानलं जातं व दुसरीकडं ‘अवैदिक परंपरांमधला वेदविरोध’ या एकाच समान गोष्टीवर भर देऊन त्यांच्यातल्या अंतर्गत मतभेदांकडं दुर्लक्ष केलं जातं. उदाहरणच सांगायचं झालं, तर चार्वाकांचा जडवाद बौद्धांना व जैनांना मान्य नसतो व ते याबाबतीत चार्वाकांना प्रतिपक्षी ठरवून त्यांच्यावर टीका करतात. भागवत यांचं महत्त्व एवढ्यासाठी आहे, की त्यांनी वैदिक परंपरेतल्या अंतर्गत संघर्षाकडं लक्ष देऊन इतिहासाच्या सुलभीकरणाचा दोष टाळला.
वैदिक हिंदू धर्माचं जे वर्तमानस्वरूप महाराष्ट्रधर्माच्या रूपानं भागवतांपुढं होतं, ते घडण्यात बौद्ध-जैनादी बाह्य प्रतिस्पर्ध्यांच्या दडपणाचा जसा वाटा होता, तसाच अंत:प्रवाहामधल्या संघर्षाचाही होताच. हा संघर्ष कर्मठ सनातनी व औपनिषदक सुधारणावादी यांच्यातला होता. कर्मठ सुधारणावाद्यांमध्येही विविध छटा होत्या व त्यांच्यातही वाद झाले. हा सगळा तपशील केवळ भागवतांच्याच लेखनात आढळून येतो.

याज्ञिकांच्या कर्मठ फळीतसुद्धा ‘माणसाला दोन पायांचा पशू मानून पुरुषमेध किंवा नरमेध मान्य असणारे’ व तो चुकीचा समजून ‘फक्त पशुमेधाचा पुरस्कार करणारे’ असे दोन गट होते.

वैदिक अभ्यासकांचा मुख्य प्रकार विश्‍वामित्र ऋषींची प्रतिमा ‘ब्राह्मणांशी स्पर्धा व वसिष्ठांशी बरोबरी करणारा तामसी गृहस्थ’ अशी उभी करतो, तर ब्राह्मणेतर अभ्यासक विश्‍वामित्राकडं, ‘ज्यामुळं ब्राह्मणांना द्विजत्व प्राप्त होतं, त्या गायत्री मंत्राचा निर्माता’ म्हणून पाहतात. यासंदर्भात भागवत एका वेगळ्याच गोष्टीकडं लक्ष वेधतात. ‘विश्‍वामित्र हा नरमेधाचा म्हणजेच मनुष्यबळीचा विरोधक’ ही ती गोष्ट होय.
विश्‍वामित्राचं गोत्र कौशिक व परशुरामाचं भार्गव. भागवत सांगतात : ‘कौशिकांबरोबर जो भार्गव वगैरे याज्ञिकांचा कलह लागला, त्याचे कारण जातिव्यवस्था व मनुष्यास पशू समजण्याचा आग्रह. ‘जो मंत्र करी व शिकवी तो ब्राह्मण’, हे कौशिकांचे म्हणणे व भार्गव व याज्ञिक म्हणत, की ‘ज्याचे पूर्वज ब्राह्मण तोच ब्राह्मण.’ जातिभेदाचा एकांतिकपणा याज्ञिकांस इष्ट होता, तो कौशिकांस इष्ट नव्हता; कारण कौशिक हे होते क्षत्रियांचे वंशज.’

भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘पुन: भार्गव वगैरे याज्ञिक म्हणत, की जसे चार पायांचे पशू, तसा मनुष्य हा दोन पायांचा पशू. जसा पशूचा यज्ञ होतो, तसा मनुष्याचाही यज्ञ झाला पाहिजे. मनुष्याच्या यज्ञास यजुर्वेदात ‘पुरुषमेध’ शब्द लाविलेला आहे. हा ‘पुरुषमेध’ कौशिकांनी कुरुक्षेत्रात बंद केलेला दिसतो. कौशिकांनी माहात्म्य वाढविले, ते अग्निहोत्राचे म्हणजे अग्नियागाचे व सोमाचे. सोम मिळाला कौशिकांस पहिल्याने अंगीरसांपासून; कारण ज्या शुन:शेपास अभय देऊन विश्‍वामित्राने पुरुषमेधापासून बचविले, तो अंगीरस असून, त्याने सोमाचा मार्ग कौशिकांस दाखवला.’
अर्थात पुढं पशुयाग व अग्नियाग या दोन मूळच्या निरनिराळ्या लोकांच्या स्वतंत्र कर्मकांडमय धर्मांचा म्हणजे यागांचा संगम झाला, हा भाग वेगळा. या संगमामुळं कुरुक्षेत्रातली यज्ञविद्या जोरात वाढू लागली.

वैदिक धर्मांतर्गत संघर्षसमन्वयाच्या इतिहासातला पुढचा टप्पा म्हणजे ‘पुढे वाजसनेयी झाले. हे यज्ञविद्येचे शत्रूच. त्यांच्यामुळे यजुर्वेदात दोन तट होऊन, नवीन तटास शुक्‍ल यजुर्वेद व जुन्या तटास कृष्ण यजुर्वेद अशी नावे मिळाली.’

इथं काश्‍यप नावाच्या पश्‍चिमेकडून आलेल्या समूहाचा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरतो आणि व्यक्तिगत पातळीवर याज्ञवल्क्‍य व त्याच्या शिष्यांचं कार्यही निर्णायक ठरतं. भागवत म्हणतात, ‘काश्‍यपांनी यज्ञविद्येस मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला. या यत्नांमुळेच याज्ञवल्क्‍याच्या शिष्यांस याज्ञिकांमध्ये जागा मिळून, शुक्‍ल यजुर्वेद नाव अस्तित्वात आले, असे आम्ही समजतो.’

अर्थात असं असलं तरी भागवत म्हणतात, ‘हा जो काश्‍यपांनी यत्न केला तो वेदांबरोबर विरोध करणाऱ्या बौद्धांच्या व वेदांबरोबर विरोध न करीत इष्टसिद्धी करून घेणाऱ्या औपनिषदांच्या खटपटीमुळे फारसा फलद्रूप झाला नाही.’

या काश्‍यपांची आणखी एक कामगिरी होती. भागवत म्हणतात, ‘जे काश्‍यप या वेळी पश्‍चिमेकडून येऊन कुरुक्षेत्रात किंवा त्याच्या आसपास वसाहत करून राहिले ते किंवा त्यांचे पूर्वज असुरांपासून पराभव पावलेले असल्यामुळे जिकडे तिकडे असुरांस पाहू लागले. त्यामुळे या कालापासून देव व असुर या दोहोंचा विरोध शाश्‍वतिकांप्रमाणे समजण्याचा संप्रदाय पडला.’

या प्रकारचा इतिहास प्रत्यक्षात का मांडला गेला नाही, याचं उत्तरही भागवतांकडं आहेच. ते लिहितात : ‘कर्मठ ब्राह्मणांचा व त्यांच्या धर्माचा इतिहासाकडेस व तसल्या शास्त्रांकडेस कल नाही.(बहून्‌ नानुध्यायाद्‌ शब्दान्‌ वाचो विग्लापनं हि तत्‌) हा त्यांचा व त्यांच्या बंधूचा महासिद्धान्त.’

इथं याज्ञवल्क्‍य ऋषींचा संबंध कसा येतो, हे पाहणं अधिक स्वारस्यपूर्ण आहे. भागवतांच्या मते, याज्ञवल्क्‍य हा एक मोठा बंडखोर होता!

ते म्हणतात, ‘ज्या काळी याज्ञवल्क्‍याचा उदय झाला, तो काळ मोठा कर्मठांचा. याज्ञवल्क्‍य स्वत: मूळचा मोठा कर्मठ. या काळापर्यंत ब्राह्मणांस व आर्यांस एक कर्मकांड माहीत होते. भक्तीचे व ज्ञानाचे रहस्य या काळापर्यंत ब्राह्मणांस व आर्यांस बिलकूल समजलेले नव्हते. ब्राह्मणांची व आर्यांची प्रधानदेवता इंद्र किंवा अग्नी. इंद्र हा देवांचा राजा व अग्नी हा होमांतले पदार्थ देवांस पोचवणारा. सूर्याची विशेष उपासना करणारे असुर व द्रविड. असल्या एक सूर्याच्या उपासकाजवळ कर्मकांडाचा वीट आल्यामुळे याज्ञवल्क्‍य गेला...पुढे जी पुरुषविद्या मिळाली, ती त्याने आपल्या कर्मठ बंधूंस कळविली व त्यांस आत्मज्ञानाचा लाभ करून दिला. पुढे कालांतराने याज्ञिकांनी या साध्या गोष्टीचे ‘याज्ञवल्क्‍य सूर्यास शरण गेला’ वगैरे आलंकारिक रीतीने निरुपण करून ठेविले.’

भागवतांच्या या अभिनव इतिहासदृष्टीकडं कुणीच लक्ष दिलेलं दिसत नाही. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भागवतांचं अंतिम लक्ष्य आहे महाराष्ट्राचा इतिहास.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com