शतक रशियन राज्यक्रांतीचं (श्रुती भातखंडे)

शतक रशियन राज्यक्रांतीचं (श्रुती भातखंडे)

जागतिक इतिहासात अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन राज्यक्रांती यांचं अनन्यसाधारण स्थान आहे. प्रत्येक क्रांतीनं काही नवीन मूल्यं जगाला दिली. जगाच्या इतिहासाला नवं वळण दिलं. या सर्व घटना मानवी जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या होत्या. यातल्या रशियन राज्यक्रांतीला नुकतीच शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत. रशियन राज्यक्रांतीतले विचार आता कालबाह्य आणि शब्दशः ‘इतिहासजमा’ झाले असले, तरी त्याकाळी साम्यवादी जगतात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या रशियाच्या या इतिहासाचा घेतलेला हा परामर्श.


यु  रोप आणि अाशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या रशियाचा विस्तार अवाढव्य आहे. त्या देशाला ‘युरेशिया’ असंही म्हटलं जात असे. जगातला सर्वांत मोठा देश असलेल्या रशियाचा पूर्व भाग युरोपशी आणि दक्षिण भाग अशियाशी जोडलेला आहे. रशियाचं पूर्वेकडचं टोक ब्लादीवास्तोक इथं जेव्हा पहाट असते, तेव्हा लेनिनग्राड या पश्‍चिम टोकाला संध्याकाळ असते. रशियाची सरहद्द चौदा देशांना भिडलेली आहे. रशियात अकरा टाइम झोन आहेत. या विस्तीर्ण देशात अनेक नद्या, डोंगर, जंगलं; लाडोगा, ओनेगा ही सरोवरं, चोवीसशे मैलांची ‘व्होल्गा’ नदी, बर्फाळ वाळवंटी प्रदेश, शून्यापेक्षाही खाली जाणारं तापमान, सोनं, लोखंड, तांबे, कोळसा, लॅटिनम, तेलाच्या खाणी आहेत. दक्षिणेकडच्या माळरान प्रदेशामुळं अशिया आणि युरोपमधून आक्रमक टोळ्यांची आक्रमणं रशियावर झाली. रशियात ख्रिस्ती, स्लाव्ह, कोझॅक, काझर स्किथियन, गोथ, ऑर्थोडॉक्‍स आणि कॅथॉलिक ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू, पोलिश, जर्मन तातार, मंगोल अशा अनेक सुमारे १८० वंशांच्या लोकांची रसमिसळ असलेली प्रजा होती. स्लाव्ह लोक अधिक होते. नवव्या शतकाच्या मध्यास किएव राज्य स्थापन झालं ते स्कॅन्डेव्हियन म्हणजे नॉर्स किंवा नॉर्मन लोकांनी केलं. नॉर्मन लोकांना फिनी लोक ‘रस’ म्हणत. ते स्थलांतर करून पूर्व स्लाव्ह लोकांच्या प्रदेशात गेले. या सर्वांच्या मिळून असलेल्या प्रदेशाला ‘रशिया’ म्हटलं जाऊ लागलं. किएव राज्यानंतर तातार (चंगेझखानाचे वंशज) यांनी रशियावर अडीचशे वर्षं राज्य केलं. त्यांच्या अन्याय आणि अत्याचारातून मुक्त झाल्यावर रशियनांनी बायइंटईन (ख्रिस्ती ऑर्थोडॉक्‍स) यांच्याकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारून मॉस्को शहर ख्रिस्ती धर्माचं धर्मपीठ असल्याचं जाहीर करून टाकलं. १५९८ मध्ये रुरिक घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि रोमनॉव्ह घराण्याची सत्ता सुरू झाली.

झार निकोलसची एकतंत्री राजवट
१२ फेब्रुवारी १६१३पासून रोमनॉव्ह घराण्यातल्या मायकेलपासून ते झार निकोलस दुसरा (१६३१ ते १९१७) अशी प्रदीर्घ एकतंत्री, अनियंत्रित, जुलमी राजवट रशियावर होती. पीटर द ग्रेट हा पहिला झार. यानं (रशियन राजांना ‘झार’ म्हणत) रशियाचा भौतिक इतिहास बदलला. रशियाचं आधुनिकीकरण केलं. नव्या योजना कठोरपणे आणि शिस्तीत राबवल्या. १७६२मध्ये कॅथरिन द ग्रेट ही सम्राज्ञी (झरिना) होती, तिच्या काळास ‘रशियन कुलीन वर्गाचं’ सुवर्णयुग मानलं जातं. अलेक्‍झांडर पहिला या राज्यकर्त्याला नेपोलियन बोनापार्टच्या (फ्रान्स) स्वारीला तोंड द्यावं लागलं. नंतर त्यानं व्हिएन्ना परिषदेत सहभाग घेऊन रशिया, ऑस्ट्रिया व प्रशिया या तीन देशांचा पवित्र संघ स्थापन केला. १८२५मध्ये झार निकोलस पहिला राज्यकर्ता झाला. याला ‘आयर्न झार’ म्हटलं जातं. एकनिष्ठ नोकरवर्ग, सैनिकी राजतंत्र हेरगिरी, सशस्त्र पोलिस दल आणि आक्रमक परराष्ट्र धोरणानं आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रशियाचा प्रभाव वाढला. अलेक्‍झांडर दुसरा हा मानवतावादी होता. दासप्रथा रद्द करून शैक्षणिक, लष्कर आणि आर्थिक सुधारणा केल्या. त्याला सुधारणावादी मुक्तिदाता झार म्हटलं जातं. १८८१मध्ये झार अलेक्‍झांडरनं निरंकुश सत्ता स्थापन करून, मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केलं. ‘एक राष्ट्र, एक धर्म, एक झार’ ही त्रिसूत्री अमलात आणली. त्याला ‘झार ऑफ पीस’ म्हटलं जातं; पण ही शांतता दिशाभूल करणारी ठरली. रशिया-जपान संबंध त्याच्या काळात ताणले गेले. १८९४ ते १९१७ या काळात झार निकोलस दुसरा हा गादीवर बसला. १९०५ची क्रांती, १९१७ची रशियन राज्यक्रांती, पहिल्या महायुद्धातली रशियाची माघार या महत्त्वपूर्ण घटना त्याच्या कारकिर्दीत घडल्या. राष्ट्रीयत्व आणि एकाधिकारशाही ही त्याची श्रद्धास्थानं होती. 

असंतोषाची ठिणगी
रशियात औद्योगीकरण झाल्यानं कामगार वर्गाचाही उदय झाला होता. रशियाचं १८९४मध्ये जपानशी युद्ध झालं आणि रशियाचा पराभव झाल्यानं जागतिक क्षेत्रात रशियाची पत कमी झाली. या काळात रशियात बुद्धिजीवी मध्यमवर्गाचा उदय होऊ लागला. राजकीय शून्यवादाचं (Nihilism) वर्चस्व वाढू लागलं. रशियात अमीर-उमराव, जमीनदार, श्रीमंत वर्ग आणि दुसरा कामगार, श्रमिक, शेतकरी वर्ग असे दोन वर्ग. हा वर्ग अत्यंत दरिद्री होता. विषमता होती. १९०४मध्ये सेंट पिट्‌सबर्गच्या कामगार वर्गानं  फादर गॅपोनच्या नेतृत्त्वाखाली राजवाड्यावर मोर्चा नेला आणि मूलभूत स्वातंत्र्याची मागणी केली. झारनं सुधारणा करण्यास नकार देऊन जमावावर सशस्त्र घोडेस्वार पाठवून कत्तली केल्या. ही घटना ‘रक्तरंजित रविवार’ (Bloody Sunday)  म्हणून ओळखली जाते. या घटनेनंतर जनतेतला असंतोष वाढतच गेला. मार्क्‍सवादाचे विचार रशियात प्रसारित झाले. श्रमिक-भांडवलदार, ‘आहे रे’- ‘नाही रे’ गटातला संघर्ष, समता आणि सहकार्यावर आधारित कामगारांची हुकूमशाही, भांडवलदार नष्ट करणं असे विचार समाजावर प्रभाव पाडू लागले. दुर्बल झार, त्याच्यावर असलेलं झरिनाचं वर्चस्व आणि त्यांचा सल्लागार असलेला रासपुतिन (पवित्र सैतान) यांच्याबद्दल असंतोष वाढला. अंधश्रद्धा, अज्ञान, धर्मभोळेपणा, व्यसनीपणा यांच्या विळख्यात सापडलेला रशिया मागासलेला राहिला. ८ मार्च १९१७ रोजी पेट्रोग्राडमधल्या कामगारांनी संप पुकारला. संपावर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले, ते लष्करानं धुडकावले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं १५ मार्च १९१७ रोजी झार निकोलस दुसरा यानं राजत्याग केला. हंगामी लोकसभा (ड्युमा) स्थापन झाली. पॉलमिल्युकॉव्ह हे परराष्ट्रमंत्री बनले. राजकुमार जॉर्ज एलव्हॉव यानं हंगामी सरकारचं नेतृत्व केलं. देशासमोरचे प्रश्‍न सोडवण्याचा त्यानं प्रयत्न केला; पण जनतेनं रशियानं युद्धातून माघार घ्यावी अशी सातत्यानं मागणी केली होती. एलव्हॉवनंतर केरॅन्स्कीकडं शासनाची सूत्रं आली. त्यानं परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला; पण रशियाच्या महायुद्धात होणाऱ्या पराभवामुळं जनतेचा सरकारवरचा विश्‍वास उडाला आणि केरेन्स्कीचं मवाळ मेन्शेविक सरकार कोसळलं.

बोल्शेविक क्रांती
७ नोव्हेंबर १९१७ रोजी रशियात बोल्शेविक (जहाल) क्रांती घडून आली. केरेन्स्कीच्या काळातल्या रशियाच्या राजकीय वातावरणाचा फायदा व्लादिमिर इरिच लेनिन यांनी घेतला. बोल्शेव्हिक पक्षाचा कार्यक्रम जाहीर करून झंझावाती प्रचार सुरू केला. ‘भूहीनांना जमीन, भुकेलेल्यांना भाकरी आणि रशियासाठी शांतता’ (शेतकऱ्यांना जमिनी, उपाशी लोकांना अन्न आणि सर्वांना शांतता) असं जाहीर करून क्रांतिकारी मार्गानं रशियात कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित करणं हे ध्येय ठरवलं. सरकारी कार्यालयं, बॅंका, रेल्वे, पोस्ट आणि राज्य कारभाराची केंद्रं ताब्यात घेतली व जर्मनीशी बोलणी करून ब्रेश्‍टलिटोव्हस्कचा तह केला. युद्धातून माघार घेतली आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता बोल्शेविक क्रांती यशस्वी करून रशियावर वर्चस्व मिळवलं. सत्तेचं केंद्रीकरण, गुप्तहेर संघटना (चेका), इस्क्रा (ठिणगी) हे वृत्तपत्र, कामगारांच्या नियंत्रणाचा वटहुकूम यांद्वारे त्यांनी आपली सत्ता मजबूत केली. युद्धपातळीवरचा साम्यवाद रशियात आणला. नवआर्थिक धोरण (NEP) जाहीर करून रशियाला प्रगतीपथावर नेलं. पुढं १९२१मध्ये मूळ साम्यवादी धोरणाचा त्याग करून शास्त्रीय समाजवाद, शासकीय समाजवाद आणि खासगी भांडवलशाही यांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांचं १९२५मध्ये निधन झालं.

क्रांतीनंतरचे पडसाद
स्टॅलिन यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवलं. लेनिन यांच्या मृत्यूनंतर ट्रॉटस्की, कामनेव्ह यांच्याबरोबर सत्तेसाठी झालेल्या संघर्षात ते यशस्वी झाले. त्यांनी रशियात शिक्षणाचा प्रसार वाढवला. कम्युनिस्ट पक्षाची सत्ता मजबूत केली. संरक्षणव्यवस्था, शेतीचं आधुनिकीकरण, राज्यघटनेत बदल, श्रमाचं महत्त्व रशियन जनतेला पटवून देणं यात त्यांचा ठसा दिसतो. परराष्ट्रधोरणात त्यांनी रशियाचा प्रभाव वाढविला. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांत रशियाची विलक्षण प्रगती केली. अर्थात ही रशियाची चौफेर प्रगती हुकूमशाही पद्धतीनं, व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी देऊन झाली.
स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर आलेले क्रुश्‍चेव्ह, ब्रेझनेव्ह, आंद्रेपॉव्ह यांनी अंतर्गत साम्यवादी धोरण तेच ठेवलं. शीतयुद्धात रशियानं साम्यवादी गटाचं नेतृत्व वॉसी पॅक्‍टद्वारे करून जगात आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवलं. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या धोरणांना विरोध केल्यानं आणि राष्ट्रीयीकरण, साम्यवादी धोरणांचा अवलंब केल्यानं काही वर्षांनी जनतेतला असंतोष वाढू लागला. रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू लागले. परिणामी मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सत्तेवर आल्यावर पेरेस्त्रोईका (पुनर्रचना), ग्लासनोस्त (खुली अर्थव्यवस्था) जाहीर करून साम्यवादी राजवटीची अखेर घडवून आणली. बोरिस येल्त्सिन यांनी कम्युनिस्ट पक्ष बेकायदा ठरवला आणि रशियाची साम्यवादी वर्चस्वातून मुक्तता केली.

विचारवंताची कामगिरी 
रशियन राज्यक्रांती होण्यापूर्वी क्रांतीसाठी समाजाची मानसिकता तयार करण्याचं काम रशियन साहित्यिक आणि विचारवंतांनी केलं. पीटर द ग्रेटच्या कारकिर्दीपासून रशियन साहित्यविश्‍व बहरू लागलं. पीटरच्या काळात ॲकॅडमी ऑफ सायन्स, लोमोनोसोव्ह हा रसायनशास्त्रज्ञ, कामाराज्जीन हा इतिहासकार आदी प्रसिद्धीस आले.

अलेक्‍झांडर पुश्‍कीन हे रशियाचे राष्ट्रीय कवी, नावाजलेले साहित्यिक ‘एवगेनी,’ ‘ओनेजिन’ ही खंडकाव्यं आणि ‘ब्राँझ हॉर्समन’ हे काव्य, पीटरचं चरित्रकाव्य ‘पीटर द ग्रेटस्‌ निग्रो’ -ज्यात राजवाडा बांधताना लाखो कामगार आणि कारागीरांचे झालेले हाल याचं वर्णन आहे- या गोष्टी त्याच काळातल्या. करमजिन यांनी जे नियतकालिक सुरू केलं, त्याचं नाव ‘युरोपचा संदेशवाहक’ असं होतं. त्यांन धार्मिक दृष्टिकोनातून रशियाचा इतिहास लिहिला (बारा खंड). गोगोल यांनी ‘इन्स्पेक्‍टर जनरल’ हे नाटक लिहिलं. ‘डेड सोल्स’ (मृतात्मे) ही त्यांची कादंबरी गुलामगिरी आणि वेठबिगारीवर आधारित अशी अत्यंत वास्तव वर्णनात्मक होती. १८१८नंतर इव्हान तुर्जेनिव्ह यांनी वेठबिगारांच्या आयुष्यावर आधारित ‘स्पोर्टस्‌मन स्केचेस’ ही इंग्लिशमधली कादंबरी व ‘फादर्स अँड सन्स’ ही दोन पिढ्यांमधला संघर्ष दाखवणारी कादंबरी लिहिली. युरोपचं अनुकरण करावं, असं त्यांना वाटत होतं आणि घटनात्मक राजसत्ता असावी, असं त्यांचं मत होतं. तुर्जेनेव्हला ‘रशियन साहित्यातला हॅम्लेट’ म्हटलं जातं. वेठबिगारी त्यांना मान्य नव्हती. व्यक्तिचरित्रात्मक कथा त्यांनी लिहिल्या. हर्झन या विचारवंतानं रशियात राजकीय परिवर्तन झाले पाहिजे, वैचारिक बदल झाले पाहिजेत, असं प्रतिपादन केलं. ‘माय पास्ट अँड माय थॉट्‌स’ हे त्याचं आत्मवृत्त तत्त्वज्ञानात्मक आणि विद्वत्ताप्रचूर असल्याचा प्रत्यय मिळतो. कोलोकोल (घंटा) हे रशियन नियतकालिक सुरू करून त्यानं माणूस वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र झाला पाहिजे, असा आग्रह धरला. निकोलाय चर्नीशेव्हस्की यांचा झारच्या निरंकुश सत्तेस विरोध होता. त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास होता. ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वं’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘व्हॉट इज टू बी डन’ या कादंबरीनं रशियाच्या जीवनास वेगळं वळण लाभलं. १८२१मधले थिओडोर डोस्टोव्हस्की गूढवादी, सामाजिक प्रश्‍नात रस घेणारे होते. ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या ग्रंथाचे ते लेखक; ‘ब्रदर्स कारमॉझॉव’ आणि ‘रायटर्स डायरी’ हे त्यांचं लेखन गाजलं. त्याची काही मतं मात्र प्रतिगामी होती. रशियात स्लाव्ह लोकांचं संघराज्य असावं, असं त्यांचं मत होतं. १८२८ ते १९१० काळातले टॉलस्टॉय हे ‘वॉर अँड पीस’ या कादंबरीचे लेखक. जगातल्या सत्याचा शोध घेणं हे त्यांचं ध्येय होतं.

रशियातल्या दुष्काळग्रस्ताना त्यांनी मदत केली. रशियातलं दुःख-दारिद्रय पाहिल्यावर ‘अन्टू द लास्ट’ हे पुस्तक लिहिलं. ‘निरंकुश सत्ता चालेल; पण झार चांगला असावा लागतो. निरंकुश सत्तेत दडपशाहीनं राज्य करता येईल; पण लोकांवर मन जिंकून राज्य करता येणार नाही,’ हे त्यांचं मत. ‘ॲना कॅरोनिना’, ‘काऊल्झर सोनाटो’, ‘रेसरेक्‍शन’ या साहित्यकृतींमुळं ते जगप्रसिद्ध लेखक झाले. मॅक्‍झिम गॉर्की यांनी पेशकॉव्ह हे आडनाव बदलून गॉर्की (म्हणजे कडवट) हे आडनाव धारण केलं. गरिबीचे चटके त्यांनी सोसले. रशियन राज्यक्रांतीपूर्वी कामगार वस्त्यांचं वर्णन, हालाखीचं जीवन, व्यसनाधीनता यांचं वर्णन त्यांनी ‘आई’ या कादंबरीत केलं. ॲटन चेकॉव्ह हे व्यवसायानं डॉक्‍टर. राजकीय परिवर्तन व्हावं या मताचे. कैद्यांची सेवा, त्यांचं आरोग्य, राहण्याची व्यवस्था यांचं कमीत कमी शब्दांत आणि विचारांना वाव देणारं लेखन त्यांनी केलं.

‘प्रावदा’चा हातभार
‘प्रावदा’ म्हणजे सत्य. १९१२मध्ये सुरू झालेलं हे वृत्तपत्र. कम्युनिस्ट क्रांतीचं ते मुखपत्र बनलं. रशियाचे ११ कोटी लोक त्याचे वाचक होते. ५ मे १९१२मध्ये प्रामुख्यानं साहित्य, विचार आणि चर्चा यांच्यासाठी ‘प्रावदा’ सुरू झालं. एक श्रीमंत इंजिनिअर असलेले व्ही. ए. कोशेविनकोव्ह हे याचे संपादक. लेनिन यांनी बोल्शेविकांना मार्गदर्शन करण्यासाठी, क्रांतीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यासाठी ‘प्रावदा’ या माध्यमाचा वापर केला. या काळातलं स्टुवेचं ‘ओसबोझोदेनी’ (स्वातंत्र) हे वृत्तपत्रही रशियन जनतेत लोकप्रिय झालं होतं.

थोडक्‍यात, रशियन विचारवंताच्या साहित्यानं प्रेरित झालेल्या जनतेनं रशियात क्रांती करून आमूलाग्र बदल केले. झारशाहीचा अंत झाला, त्याचं श्रेय साहित्यिक, विचारवंतांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com