कैसे करूँ मै बयाँ...? (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 30 जुलै 2017

जाझ हे अमेरिकेत विकसित झालेलं संगीत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकी गुलामांना त्यांचं मूळ संगीत वाजवू दिलं गेलं नाही; त्यामुळं त्यांना पर्याय म्हणून वेगळं संगीत तयार करण्याची आवश्‍यकता भासली. असं संगीत तयार होत असताना त्यात युरोपमधली वाद्यंही समाविष्ट झाली. 

‘एक लडकी भीगी भागीसी’ हे ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमातलं सदाबहार गाणं लक्षपूर्वक ऐकल्यावर समजतं की त्या गाण्यात गिटार वाजतेय. ‘झिंग चॅक-झिंग चॅक-झिंग चॅकची झिंग’ यासारखा आवाज येतो. Sixteen Tons हे कोळशाच्या खाणकामगारांच्या जीवनावर आधारित असलेलं गाणं एकेकाळी खूप गाजलं. ते गाणं एल्विस प्रिस्ले, टेनेसी एर्नी फोर्डपासून बऱ्याच कलाकारांनी गायलं. ती धून किशोरकुमारला खूप आवडली व याच धूनवर आधारित गाणं संगीतबद्ध करण्याचा आग्रह त्यानं संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडं धरला, असं म्हटलं जातं. सिनेमाच्या प्रसंगाचा विचार करून एक अप्रतिम गाणं तयार झालं. त्याला गॅरेजमधल्या दुरुस्तीच्या अवजारांच्या मिळत्या-जुळत्या आवाजाचा रिदम दिला गेल्यानं या गाण्याची खुमारी आणखी वाढली. तर असं हे गाणं जाझ संगीतावर आधारित आहे. जाझ हा शब्द उच्चारला की आपल्याला अगदी परकं वाटतं! ‘हे त्यांच्याकडचं पाश्‍चिमात्य संगीत’ असं वाटतं; पण जी बरीच गाणी आपल्या आवडीची आहेत, ती जाझवर आधारित आहेत हे सांगितलं तर? मला पूर्वी वाटायचं, की पाश्‍चिमात्य संगीत म्हणजे वाद्यांचा गोंधळ, कर्णकर्कश आवाज आणि जाझ म्हणजेही असलाच काहीसा प्रकार असावा. मात्र, नंतर या संगीताचे प्रकार समजले. पॉप, रॉक, कंट्री, ब्लूज्‌ आणि जाझ...

हेमंतकुमार यांनी गायलेलं ‘ये रात, ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दासताँ’ (सिनेमा : जाल, गीतकार : साहिर लुधियानवी) हे गाणं जाझवर आधारित आहे, हे समजलं तेव्हा तर आश्‍चर्याचा धक्काच बसला. हे गाणं ऐकता ऐकता नायिका गीता बाली अस्वस्थ होते आणि तिला बघून प्रेक्षकांचीही तशीच अवस्था होते. सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात देव आनंद कधी गिटार वाजवतो, तर कधी ती नुसतीच हातात धरतो; पण पूर्ण गाण्याला गिटारचा रिदम आहे. ...तर जाझ म्हणजे काय? जाझ हे पाश्‍चात्य क्‍लासिक संगीताप्रमाणे दुसऱ्यानं लिहून दिलेलं किंवा कर्नाटक शास्त्रीय संगीताप्रमाणे पूर्णपणे ठरलेलं वाजवलं जात नाही, तसंच ते भारतीय शास्त्रीय संगीताप्रमाणे पूर्णपणे स्टेजवर सादर करता करता इम्प्रोवाइज केलं जातं, असंही नाही. या दोहोंचा सुरेल संगम म्हणजे जाझ. किती संगीत ठरलेलं वाजवायचं, किती उपज अंगानं म्हणजे इम्प्रोवाइज करून वाजवायचं हे जाझमध्ये ठरलेलं नसतं.
***

‘आईये मेहेरबाँ’ हे ‘हावडा ब्रिज’ या सिनेमातलं (१९५८) गाणं सुरू होतं गिटारनं. नंतर एक वादक उभा राहतो आणि क्‍लॅरोनेट वाजवतो. यानंतर एक वादक व्हायोला आणि दुसरा व्हायोलिन वाजवतो. त्या वेळी सिनेमातल्या दृश्‍यानुसार, के. एन. सिंगला घेऊन येताना धुमाळ दिसतो आणि अशोककुमार पांढरा कोट घालून दमदार एंट्री घेतो. एवढ्यात मधुबाला (आशा भोसले यांच्या आवाजात) हमिंग करत गाते ः ‘आईये मेहेरबाँ, बैठिये जाने जाँ...’ संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी चायनीज्‌ ब्लॉकच्या तालावर संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकही ताल धरून ऐकतात. हे गाणं म्हणजे जाझचा भारतीय अवतार आहे. ‘आईये’मधल्या ‘ये s s s s ’च्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायच्या की ऐकायच्या हा ‘इश्‍क का इम्तिहान’ आहे! कैसे करूँ मै बयाँ, दिल की नही है जुबाँ...!
***

असं हे फ्यूजन आपल्याकडं अलीकडंच्या काळातच आलेलं नाही. हिंदी सिनेसंगीतात फार पूर्वीपासून म्हणजे १९५०-६० पासून ते चालत आलेलं आहे...आपण ते ऐकत आलेलो आहोत आणि ते आपल्याला आवडलेलंही आहे. गोव्यातले संगीततज्ञ फ्रॅंक फर्नांड, सेबॅस्टियन डिसूझा, अँथनी गोन्साल्विस यांनी भारतीय संगीतावर आधारित गाण्यांचं पाश्‍चात्य पद्धतीनं संगीतसंयोजन करून सुरेल संगम घडवून आणला आणि आपल्याला जाझ संगीत ऐकण्याची सवय लागली. हिंदी सिनेसंगीतात विविध वाद्यं लीलया वाजवणारे कावस लॉर्ड यांनी ‘चिक चॉकलेट’ या जाझ संगीतकाराबरोबर ड्रमर म्हणून काम केलं. संगीतकार नौशाद, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन अशा अनेक संगीतकारांनी हिंदी सिनेसंगीतात जाझ संगीताचा चपखल उपयोग केला आहे. ‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा सॅंभलना’ हे गीता दत्त यांनी गायलेलं गाणं (सिनेमा ः आरपार, संगीतकार ः ओ. पी. नय्यर) जाझ संगीतावर आधारित आहे. या गाण्यात गीता दत्त यांच्याबरोबरीची कामगिरी गुडी सिरवाई यांच्या ॲकॉर्डियनवादनाची आहे. ॲकॉर्डियनच्या उजव्या बाजूला बटणं असतात. त्यातून रिदमचा आवाज आणि त्याच वेळी डाव्या बाजूच्या की-बोर्डवर गाणं वाजवलं गेलं आहे. शकीला आणि गुरुदत्त यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचे रचनाकार आहेत मजरूह सुलतानपुरी. जाझचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे, गीता दत्त यांनीच गायलेलं आणि संगीतकार ओ. पी. नय्यर यांचंच ‘मेरा नाम चीन चीन चू, रात चाँदनी मै और तू.’ ‘हावडा ब्रिज’ सिनेमातलं हे गाणं गिटार, मेंडोलिन, क्‍लॅरोनेट, ब्रास सेक्‍शनमधल्या वाद्यांनी सुरू होतं आणि टाळ्यांच्या रिदमनं प्रेक्षकाला ताल धरायला लावतं. लाजवाब नृत्यकौशल्याबद्दल हेलनला पुन्हा एकदा सलाम.

***

जाझ हे अमेरिकेत विकसित झालेलं संगीत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकी गुलामांना त्यांचं मूळ संगीत वाजवू दिलं गेलं नाही; त्यामुळं त्यांना पर्याय म्हणून वेगळं संगीत तयार करण्याची आवश्‍यकता भासली. असं संगीत तयार होत असताना त्यात युरोपमधली वाद्यंही समाविष्ट झाली. ती वाद्यं म्हणजे व्हायोलिन, हॉर्न, ओबो. याशिवाय अमेरिकेतले आफ्रिकी लोक हातात मिळतील ती वाद्यं वाजवू लागले. ब्लॅक आणि व्हाईटचा, आफ्रिका आणि युरोपचा, लोकसंगीत आणि पॉप्युलर संगीताचा सुरेख संगम होऊन जाझ हा संगीतप्रकार तयार झाला. आफ्रिकी बेंजो, गिटार, ड्रम, तालवाद्यं याला जोड मिळाली ती युरोपीय ट्रम्पेट, ट्रोम्बोन, सॅक्‍सोफोन, स्ट्रिंग बास, पियानो यांची. कालांतरानं हे संगीत अधिकाधिक सोपं करण्याचे प्रयत्न झाले. आफ्रिकी गुलामांनी काही गाणी काम करता करता म्हणता येतील अशीही तयार केली. हा प्रयोग तर सगळीकडंच होत असतो. सतराव्या शतकापासून सुरवात होऊन विकसित होत गेलेल्या या जाझ संगीतामध्ये विसाव्या शतकात मेलडीचा अंतर्भाव झाला.

***

... तर हे जाझ म्हणजे आहे तरी काय? यावर अमेरिकी गायक-रचनाकार लुईस आर्मस्ट्राँग यांचं एक प्रसिद्ध वाक्‍य आहे ः ‘जाझ म्हणजे काय, हे जर तुम्ही नुसतंच विचारत बसलात तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही!’ तर असा हा जाझ संगीतप्रकार आपण १९५० च्या ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (सिनेमा ः समाधी, संगीतकार ः सी. रामचंद्र), १९५१ च्या ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके’ (सिनेमा ः अलबेला, संगीतकार ः सी. रामचंद्र), १९५९ च्या ‘दिल दे के देखो’पासून (उषा खन्ना) ते अगदी २००९ च्या ‘वेक अप सिद’ या सिनेमांतल्या गाण्यांमधून ऐकत आलो आहोत. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातलं (संगीतकार ः शंकर-एहसान-लॉय) ‘ख्वाबो के परिंदे’ हे हळुवार जाझसंगीत अलिसा मेंडोसा, मोहित चौहान यांनी गायलं आहे. ‘परिणिता’ (२००५) या सिनेमातलं (संगीतकार ः शंतनू मोइत्रा) ‘कैसी पहेली है ये जिंदगानी’ हे सुरेल आणि श्रवणीय गाणं सुनिधी चौहाननं जाझच्या वेगळ्या ढंगानं गायलं आहे. गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या या गाण्यावर रेखानं नृत्य केलं आहे. कोणती वाद्यं कशी वाजतात, याची प्रचीती येण्यासाठी हे गाणं बघावं. मधुबाला, रेखा, हेलन यांच्याकडं बघता बघता वाद्यांकडं दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेतली की गाण्याचा कान तयार होतो!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा