निवृत्तीनंतर ‘ज्ञानेश्वर’! (संदीप वासलेकर)

Article in Saptraga by Sundeep Waslekar
Article in Saptraga by Sundeep Waslekar

स्वित्झर्लंडचे परराष्ट्रमंत्री व सहराष्ट्राध्यक्ष दिदीर बुर्खाल्तर यांनी यशाच्या शिखरावर असतानाच अचानक पत्रकार परिषद घेतली व ‘येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत,’ अशी घोषणा जून महिन्यात केली.

स्वित्झर्लंडची राज्यघटना आगळीवेगळी आहे. तिथं सात जणांचं मंत्रिमंडळ असतं. प्रत्येकाकडं एक खातं असतं व प्रत्येक मंत्री क्रमाक्रमानं एका वर्षासाठी राष्ट्रप्रमुख बनतो. एका अर्थानं मंत्रिमंडळातला प्रत्येक सदस्य हा सहराष्ट्राध्यक्ष असतो.

बुर्खाल्तर हे गेली पाच वर्षं परराष्ट्रमंत्री आहेत. त्याआधी काही काळ ते गृहमंत्री होते. सन २०१४ मध्ये ते स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती होते. स्वित्झर्लंडचे युरोपीय समुदायाबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. भारत व चीन यांच्याबरोबर त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले. जागतिक ‘जलराजनीती’मध्ये स्वित्झर्लंडला मानाचं स्थान त्यांनी मिळवून दिलं. संसदेत सगळ्या पक्षांच्या सभासदांकडून मान व मान्यता मिळवली व सर्वार्थानं यशस्वी झाल्यावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

ऑक्‍टोबर महिन्यानंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचा आणि छंदांची जोपासना, ज्ञानाची उपासना करण्याचा त्यांचा मानस आहे.

बुर्खाल्तर यांच्याआधी मिशेलिन काल्मिरे या स्वित्झर्लंडच्या परराष्ट्रमंत्री व राष्ट्राध्यक्षा होत्या. त्यांनीही पाच वर्षांपूर्वी मंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिला व जीनिव्हा विद्यापीठात अध्यापनाचं काम सुरू केलं.

त्यांच्याआधी जोसेफ डाईस हे स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष होते. ते अर्थमंत्रीही होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वर्षभर काम पाहिलं होतं. त्यांनीही उत्कृष्ट मंत्री म्हणून कीर्ती मिळवल्यावर राजीनामा दिला. ते राजकारणातून निवृत्त झाले व आता फ्रीबर्ग विद्यापीठात अध्यापनाचं व संशोधनाचं काम करतात.

जगातल्या अनेक देशांत चांगले, यशस्वी व लोकप्रिय राजकीय नेते कीर्तीच्या शिखरावर असताना राजकारणातून निवृत्त होतात व ज्ञानाची आराधना करतात. ‘आपण एखाद्या विद्याभ्यासात ‘ज्ञानेश्वर’ म्हणून ओळखले गेलो पाहिजे,’ अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असते व हे ध्येय ते राष्ट्रपती अथवा पंतप्रधान होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मानतात.

मी हे सदर लिहायला बरोबर पाच वर्षांपूर्वी सुरवात केली. या पाच वर्षांच्या काळात राजकीय नेत्यांच्या निवृत्तीबद्दल मी हा तिसरा लेख लिहीत आहे. 

निवृत्त होऊन ज्ञानोपासना करणाऱ्या अरब देशातल्या काही राजपुत्रांची माहिती एका लेखात मी दिली होती. (‘निवृत्तीचं महत्त्व’, सप्तरंग, ता. २९ जुलै २०१२). राजकारणातून निवृत्त होऊन संशोधन-लेखनाकडं वळलेल्या मोठ्या ब्रिटिश नेत्यांबद्दल दुसऱ्या एका लेखात लिहिलं होतं. (‘सत्तेचा मोह नको रे बाबा’, सप्तरंग, ता. १७ ऑगस्ट २०१४). आता तिसऱ्यांदा या विषयावर पुन्हा एकदा भाष्य करत आहे. याचं कारण असं, की माझा रोज अनेक जागतिक नेत्यांशी संबंध येतो व राजकारणातून स्वेच्छेनं निर्माण होऊन ज्ञान, संशोधन, लेखन करण्याची त्यांची इच्छा असल्याचं मला वारंवार आढळून येतं. त्यामुळं निवृत्तीनंतर ‘ज्ञानेश्वर’ होण्याची त्या राजकीय नेत्यांची धडपड मला कायम दिसते.

-महत्त्वाचं म्हणजे, हे नेते त्यांच्या राष्ट्रप्रमुखपदाला अथवा मंत्रिपदाला कोणताही धोका नसताना स्वतःहून निवृत्ती पत्करतात. ते निवडणुकीत हरल्यामुळं अथवा शारीरिक स्थितीमुळं नाइलाज म्हणून राजकारण सोडत नाहीत. निवृत्त झाल्यावर त्यांचा उत्तराधिकारी जो मंत्री असेल, त्याच्या कारभारात ते लुडबूड करत नाहीत. विरोधी पक्षाचं राजकारण करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची वाट पाहत बसत नाहीत. स्वतःचं स्थान अतिशय जवळच्या अशा आपल्या नातलगांना देत नाहीत. अर्थात या प्रवृत्तीला अपवाद आहेत. मी २०१३- २०१४ च्या लेखात तुर्कस्तानचे नेते अर्दोगान याचं कौतुक केल्याचं वाचकांना आठवत असेल. ते पूर्वी आदर्श पंतप्रधान होते. त्यांनी अल्पकाळात तुर्कस्तानच्या ग्रामीण विभागाचा कायापालट केला. भ्रष्टाचार नाहीसा केला. सर्व शेजारीराष्ट्रांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले व तीन वेळा पंतप्रधानपद भूषवल्यावर निवृत्तीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा ते राष्ट्रपती बनले. त्याही पलीकडं जाऊन एकाधिकारशहा बनले. धर्माचा विघातक उपयोग करू लागले. सर्व शेजारीराष्ट्रांबरोबरचे संबंध त्यांनी बिघडवले. मानवी हक्कांवर गदा आणली व मध्यमवर्गीय वस्तीतलं साधं घर सोडून एक हजार खोल्यांच्या प्रासादात राहायला गेले. आता ते राजकारण सोडण्याची शक्‍यता नाही.

सिंगापूरचे जनक ली कुआन यु यांचंही मी पूर्वी कौतुक केलं होतं; ते त्यांच्या निधनापर्यंत साध्या घरात राहिले. मंत्रिमंडळातून निवृत्त झाले; पण नंतर त्यांनी राजकारणावर आपला प्रभाव राहील, याची काळजी घेतली. स्वतःच्या मुलाला त्यांनी पंतप्रधान केलं. आता त्यांच्या मुलांमध्ये भांडणं होत आहेत व तिथं आता घराणेशाही लादली जाण्यासंदर्भात प्रयत्न होतील, अशा स्वरूपाच्या बातम्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत आहेत.

आफ्रिकेतही काही नेत्यांचं सत्ता सोडण्याचं चिन्ह नाही. बहुसंख्य आफ्रिकी देशांमध्ये सत्तेवर राहण्यासंदर्भात १०-१२ वर्षांची मर्यादा आहे. प्रत्यक्षात मात्र काही नेते त्यांची राज्यघटना गुंडाळून ठेवतात. मात्र, याच आफ्रिका खंडात काही नेते वेगळ्या मार्गानं गेलेलेही आढळतात.

नायजेरियाचे राष्ट्रपती ओलुसेगून ओबासांजो व गिनीचे पंतप्रधान कबिने कोमारा हे कालमर्यादा संपल्यावर राजकारणातून निवृत्त झाले. ओबासांजो यांनी मार्च महिन्यात एका जिल्ह्याच्या ठिकाणी मोठं वाचनालय उघडलं. कोमारा यांनी पाण्याविषयी संशोधनात्मक लेखन सुरू केलं. ओबासांजो व कोमारा यांची आणि माझी भेट नेहमी होत असते. भेटल्यावर ओबासांजो त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तकांची मागणी माझ्याकडं करतात. ‘तुमच्या संस्थेतल्या संशोधकांकडून आम्हाला माहिती व विश्‍लेषण पुरवण्यात यावं,’ अशी विनंती कोमारा मला करतात.

स्वतःहून निवृत्त झालेले नेते अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटतात. वर्तमानपत्रात बातमी येणार नाही, याची काळजी घेतात व जागतिक राजकीय-आर्थिक-धार्मिक-तात्त्विक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा करतात. त्यांच्या काही बैठकांना ते मला व माझ्या सहकाऱ्यांना, तसंच ऑक्‍सफर्ड व हार्वर्ड इथल्या विद्यापीठांमधल्या वरिष्ठ प्राध्यापकांना बोलावतात.

मार्च महिन्यात आयर्लंडचे माजी पंतप्रधान बर्टी आहरेन यांनी १५ माजी राष्ट्रपतींची व पंतप्रधानांची बैठक डब्लिन इथं आयोजिली होती. तिथं कॅनडा, रशिया, न्यूझीलंड व इतर देशांचे माजी राष्ट्रपती व पंतप्रधान आलेले होते. अमेरिका व इंग्लंडचे माजी राष्ट्राध्यक्ष नव्हते; परंतु उच्च पदावरून स्वतःहून निवृत्त झालेले ज्येष्ठ नेते होते. दहशतवाद, आरोग्य, पाणी व तंत्रज्ञान यांवर आम्ही तीन दिवस त्या बैठकीत चर्चा केली. या निवृत्त नेत्यांनी माझ्याशिवाय माझ्या सहकारी इलियास फतेहअली, जॉर्डनचे एक शास्त्रज्ञ, चीनमधले वैद्यकीय क्षेत्रातले दोन तज्ज्ञ व इंग्लंड-अमेरिकेतल्या दोन-तीन अभ्यासकांना त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी बोलावलं होते. 

याशिवाय, एके दिवशी सकाळी दोन तासांसाठी आयर्लंडच्या विद्यालयातल्या चार-पाच हुशार विद्यार्थ्यांनाही संवादासाठी आमंत्रित केलं होतं.

जगातल्या अनेक राजकीय नेत्यांना ज्ञानाची उपासना करणाऱ्या संशोधकांबद्दल खूप आदर वाटतो. एकदा मी ओमानला गेलो असताना परराष्ट्रमंत्री हुसेन बिन अलावी यांनी मला चर्चेसाठी बोलावलं होतं. आमची चर्चा सुमारे दीड तास चालली. त्याच वेळी भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री नटवरसिंह दौऱ्यावर होते व मी तिथं जायच्या आधी त्या दोघांची अर्धा तास भेट झाली होती. ती अधिकृत भेट होती. अलावी यांनी मंत्र्यांबरोबर केवळ अर्धा तासच चर्चा करावी आणि एका अभ्यासकाबरोबर तब्बल दीड तास विचारांचं आदान-प्रदान करावं, हे आपल्या काही अधिकाऱ्यांना आवडलं नाही. इस्राईलचे तत्कालीन राष्ट्रपती सिमॉन पेरेस यांच्याशी भेट झाल्यावरही असाच काहीसा अनुभव आला होता. (आता सिमॉन पेरेस हयात नाहीत.)

केवळ राजकीय डावपेचात संपूर्ण आयुष्य खर्च करण्यापेक्षा देदीप्यमान कीर्ती मिळवल्यावर निवृत्त होऊन विद्याभ्यासात रमणं, त्यात पारंगत होणं जगातल्या अनेक राजकीय नेत्यांना महत्त्वाचं वाटतं. अशा नेत्यांचं राजकारण सहसा स्वच्छ असतं व त्यांनी ज्या देशांचं नेतृत्व केलेलं असतं ते देश समृद्ध होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com