सारायेव्होचा सारांश (संदीप वासलेकर)

सारायेव्होचा सारांश (संदीप वासलेकर)

बोस्निया-हर्झेगोविना या देशाची सारायेव्हो ही राजधानी. याच ठिकाणी पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि इथंच काही वर्षांपूर्वी सर्ब राष्ट्रीयत्वाच्या अतिरेकातून बोसन्याक लोकांवर हल्ले करण्यात आले. अनेक वेदना भोगलेल्या या शहरानं आता कात टाकली आहे. इथल्या लोकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा सूड न बाळगता ख्रिस्ती, मुस्लिम आणि ज्यू हे सर्व लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतील, अशी समाजव्यवस्था निर्माण केली आहे. बोसन्याक लोकांनी मोठ्या मनानं सर्ब लोकांबरोबर स्नेह निर्माण केला आणि अतिरेकी राष्ट्रीयत्वापेक्षा सहिष्णुता व सामंजस्य हेच जास्त महत्त्वाचं आहे हे सिद्ध केलं. सारायेवोनं दिलेल्या या धड्याविषयी...

यु  रोपच्या आग्नेय विभागात बोस्निया-हर्झेगोविना नावाचा देश आहे. त्या देशाचं नाव खूप लोकांनी ऐकलं नसेल. सारायेव्हो ही त्या देशाची राजधानी आहे. या शहराचं नावही फारसे कोणी ऐकलं नसेल. सारायेवोत मध्यवर्ती भागात लॅटिन ब्रिज नावाचा छोटा पूल आहे. या पुलाचं नाही तुम्ही ऐकलं नसेल. त्या पुलाच्या समोर एक गल्ली आहे. जर देशाचं, शहराचं, पुलाचं नाव ऐकिवात नाही, तर त्या गल्लीचं महत्त्व काय?

१०३ वर्षांपूर्वी त्या गल्लीच्या तोंडाशी घडलेला एक प्रसंग ‘सप्तरंग’च्या प्रत्येक वाचकाला माहीत आहे. इतकंच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला तो प्रसंग माहीत आहे. तो प्रसंग म्हणजे पहिल्या महायुद्धाची सुरवात. २८ जून १९१४ला बोस्निया-हर्झेगोविना हा स्वतंत्र देश नव्हता. तिथं ऑस्ट्रियन साम्राज्याचं आधिपत्य होतं. त्या दिवशी ऑस्ट्रियाचं राजपुत्र फ्रांझ फर्डिनांड आणि त्यांची गरोदर पत्नी सोफिया हे सारायेवोच्या भेटीस गेले. ते उघड्या गाडीतून फिरत होते. त्यांची गाडी सिटी हॉलहून आली आणि लॅटिन ब्रिजसमोर उजव्या बाजूस वळली. तिथं कोपऱ्यावर एका दहशतवाद्यानं राजपुत्र फ्रांझ फर्डिनांड आणि सोफिया यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्या दहशतवाद्यास सर्बिया या शेजारच्या देशाकडून शस्त्रसामग्री पुरवण्यात आली होती. सर्बियाला रशियाचा पाठिंबा होता, म्हणून ऑस्ट्रियाचा मित्रदेश जर्मनीनं रशियावर हल्ला करण्याचा घाट घातला. पहिलं महायुद्ध झाले. त्याचा निकाल असा काही होता, की वीस वर्षांनी दुसरं महायुद्ध अटळ होतं. दोन्ही महायुद्धांत मिळून दहा कोटी लोक मृत्युमुखी पडले. त्याशिवाय कोट्यवधी लोक लुळेपांगळे झाले. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाले. रोगराईसदेखील बळी पडले. सर्बियापुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानं साऱ्या जगात मृत्यूचं तांडव झालं.

दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल टिटो यानं सर्बिया, बोस्निया-हर्झेगोविना आणि क्रोशिया; तसंच इतर जवळपासचे प्रांत एकत्र करून युगोस्लाव्हिया हा देश निर्माण केला. भारताच्या नागरिकांना भारतीय म्हणतात किंवा चीनमधल्या लोकांना चिनी म्हणतात, त्याप्रमाणं सर्बियाच्या लोकांना ‘सर्ब’ म्हणतात. ते ऑर्थोडॉक्‍स या ख्रिस्ती पंथाचे आहेत. क्रोएशियाच्या लोकांना ‘क्रोयॅट’ म्हणतात. ते कॅथलिक या ख्रिस्ती पंथाचे आहेत. बोस्निया-हर्झेगोविनाच्या लोकांना ‘बोसन्याक’ म्हणतात. ते बहुतांश मुस्लिम व काही ज्यू आहेत. सारायेवोत सर्वत्र मशिदी आणि सिनोगॉग आजूबाजूला उभी आहेत. स्लोवेनियाच्या लोकांना ‘स्लोवेनियन’ म्हणतात. ते प्रामुख्यानं कॅथलिक या ख्रिस्ती पंथाचे आहेत. मार्शल टिटो यां काळात सर्वत्र आनंदीआनंद होता, असं ज्येष्ठ नागरिक म्हणतात. प्रत्येकाला शिक्षण, वैद्यकीय सेवा, घर, पाणी, वीज फुकट मिळत असे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्म-पंथांच्या लोकांत सलोखा होता. सहिष्णुता होती. परिणामी सुरक्षेचं वातावरण होतं.

टिटो यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी सर्ब राष्ट्रवाद उफाळून आला. ज्या सर्ब दहशतवादामुळं पहिल्या महायुद्धाची ठिणगी उडाली होती, त्या सर्ब दहशतवादानं आता अतिरेकी सर्ब राष्ट्रवादाचं रूप धारण केले. आपण महान आहोत व हे सर्वधर्म सामंजस्य हा खुळपटपणा आहे, असं मानून त्यांनी सर्ब प्रभुत्वाचं धोरण रेटण्यास सुरवात केली. परिणामी स्लोवेनिया आणि क्रोएशिया विभक्त झाले. त्यांनी स्वतंत्र देश निर्माण केले. महत्त्वाकांक्षी सर्ब सैन्यानं त्यांच्यावर हल्ले केले; पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे पाहून बोस्निया-हर्झेगोविनामध्ये सार्वमत घेण्यात आलं. ६६ टक्के लोकांनी स्वतंत्र देश स्थापन करण्याच्या बाजूनं मत दिलं; पण तिथं उर्वरित ३४ टक्के लोक सर्ब होते. त्यांची ‘विस्तृत सर्बिया राज्य’ या कल्पनेवर श्रद्धा होती. इतिहासात काही शेकडो वर्षांपूर्वी तुर्कस्तानच्या सैन्याकडून पराभव झाला होता. त्याचं उट्टं काढायचं होतं. त्यांनी सर्ब राष्ट्रीयत्व विरुद्ध माणुसकी असा कलह सुरू केला.

बोस्निया-हर्झेगोविनामधल्या सर्ब प्रांताचे मुख्यमंत्री राडोवान काराडीच होते. त्यांना सर्बियाचे तत्कालीन अध्यक्ष स्वोबोडान मिलोशिविच यांचा पाठिंबा होता. १९९२मध्ये अचानक काराडीच यांनी सर्ब लोकांना शस्त्र घेऊन सारायेवोला घेराव घालण्याचा आदेश दिला. सारायेवो हे शहर दरीत आहे. भोवती टेकड्या आहेत. सर्ब लोकांनी बोसन्याक लोकांवर चारी बाजूंनी गोळीबार सुरू केला. मग तोफांचा भडीमार सुरू केला, त्यानंतर बाँब टाकायला सुरवात केली. पहिला बाँब वीजनिर्मिती केंद्रावर टाकण्यात आला. सारोयेवोत अंधार झाला. मग माध्यमांसंबंधी ज्या इमारती होत्या, त्यांच्यावर बाँबफेक करण्यात आली. सारायेवोत एक वाचनालय होतं. तिथं वीस लाख पुस्तकं होती. बोसन्याक संस्कृतीचा सर्वनाश करण्यासाठी त्या वाचनालयावर बाँबहल्ला करण्यात आला आणि ही वीस लाख पुस्तकं नष्ट करण्यात आली. टेकड्यांवरून काही इमारती आणि रस्ते सहज लक्ष्य होत. कोणी एखादी महिला बाल्कनीत कपडे सुकवण्यास गेली, की ती गोळीनं टिपली जाई आणि मृत्युमुखी पडे. कोणी शाळकरी मुलगा घराबाहेर पडला, तर त्याच्यावर तोफगोळा पडे. सारायेवोची अशी कोंडी १९९६पर्यंत म्हणजे १,४२५ दिवस करण्यात आली.

सारायेवोच्या संरक्षणासाठी युनोचे शांतिसैनिक गेले होते; पण सर्बियाच्या राक्षसी सैन्यापुढं ते कमकुवत पडले. नंतर ‘नाटो’ या पाश्‍चिमात्त्य देशांच्या लष्करी संघटनेनं सर्ब राष्ट्रीयत्वानं वेड्या झालेल्या फौजांवर हल्ला केला आणि सारायेवोचा वेढा संपुष्टात आणला. हा प्रकार काही खूप ऐतिहासिक, जुन्या काळात झाला नाही. हा प्रकार आपल्या समकालीन काळातच झाला. आज जे युवक २५ वर्षांचे आहेत, त्यांनीसुद्धा हा सगळा प्रकार अनुभवला. या प्रकारात हजारो लोक मारले गेले. अनेक कुटुंबं विभक्त झाली. शेवटी बिल क्‍लिंटन यांनी एक आंतरराष्ट्रीय शांतता करार लादून संघर्षाची इतिश्री केली. मात्र, सर्ब लोकांना राष्ट्रप्रेमाचं खूप वेड. त्यातही जे धर्मिष्ठ सर्ब लोक होते, त्यांना ‘चेतनिक सर्ब’ म्हमतात. त्यांना ‘विस्तृत सर्बिया’ हे सर्वांत महत्त्वाचं स्वप्न वाटते. सारायेवोचं हत्याकांड करून जागतिक महायुद्धाची सुरुवात करून त्यांचं समाधान झालं नाही. जेमतेम दोन-तीन वर्षांनी त्यांनी कोसोवो या सर्बियातून फुटून निघालेल्या देशावर हल्ला केला. आता मात्र युनोचा राग अनावर झाला. ‘यूनो’नं नाटोला सर्बियावरच हल्ला करण्याची परवानगी दिली. नाटोच्या विमानांनी सर्बियावर बाँब टाकले आणि शरणागती पत्करण्यास भाग पाडलं.

इतकंच नव्हे, तर सर्बियाचे तत्कालीन अध्यक्ष स्वोबोडॉन निलोशिविच आणि बोस्निया-हर्झेगोविनातल्या सर्ब प्रांताचे मुख्यमंत्री राडोबान काराडीच यांच्या मुसक्‍या बांधून त्यांना हेग इथं नेण्यात आलं. तिथं आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. निलोशिविच यांचा सजा ऐकण्यापूर्वी हेगमध्ये मृत्यू झाला. काराडीच यांना चाळीस वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्याचबरोबर एखाद्या राजकीय नेत्यानं आपल्या देशातल्या लोकांवरच राष्ट्रीयत्व अथवा धर्माच्या नावानं अत्याचार केला, तर त्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपराधी म्हणून पकडून नेता येतं, असा नवीन सिद्धांत आंतरराष्ट्रीय कायद्यात आणण्यात आला.

दरम्यान, सारायेवोच्या लोकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल सूड न बाळगता ख्रिस्ती, मुस्लिम आणि ज्यू हे सर्व लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतील, अशी समाजव्यवस्था निर्माण केली. राष्ट्रीयत्वाचा अतिरेक करणाऱ्या सर्ब लोकांना सध्या जग ‘परिहा’ म्हणून पाहतं; पण बोसन्याक लोकांनी मात्र मोठ्या मनानं सर्ब लोकांबरोबर मैत्री आणि स्नेह निर्माण केला आणि अतिरेकी राष्ट्रीयत्वापेक्षा सहिष्णुता व सामंजस्य हेच जास्त महत्त्वाचं आहे हे सिद्ध केलं.

सारायेवो हे आता जगातल्या सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. उद्‌ध्वस्त झालेल्या इमारतींची पुनर्बांधणी झाली आहे. ज्या वाचनालयावर बाँबहल्ला झाला होता, त्या इमारतीत एक सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. मशिदी, सिनेगॉग, चर्च एकमेकांच्या बाजूला उभी आहेत. सर्ब युवक आणि बोसन्याक युवती हळूहळू प्रेमाच्या आणाभाका मागू लागल्या आहेत. सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे आणि महास्वार्थी राजकारणापेक्षा, क्रूर राष्ट्रीयत्वापेक्षा, ‘यह धरती, ये नदीयाँ और तुम’ हेच महत्त्वाचं आहे, हा सारांश सारायेवोनं जगापुढं मांडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com