‘पागल पान’ आणि सुगरणीचं घरटं (उत्तम कांबळे)

Article by Uttam Kamble in Saptranga
Article by Uttam Kamble in Saptranga

रात्रीचं जेवण संपायला जवळपास दहा-साडेदहा वाजून गेले होते. रात्रीच दीडला नांदेडहून नाशिकला जायचं होतं. रेल्वे पकडण्यासाठी जागंच राहावं लागणार होतं. जेवणानंतर हॉटेलवर जायचं म्हणून निघालोही आम्ही; पण श्रीपाद जोशी यांनी पानाचा विषय काढला. नागपूरकर एकवेळ वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला ठेवतील; पण पान नाही! वेगळ्या विदर्भाचा (अर्थात तो झाल्यावर) पहिला मुख्यमंत्री कोण असणार, पहिला राज्यपाल, पहिला शिक्षणमंत्री, पहिला अर्थमंत्री कोण असणार यावर कधीपासून चर्चा सुरू आहे. लग्नसराई नसतानाही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. असो. श्रीपाद जोशी बरोबर असले, की बरंच काही आठवायला लागतं. विशेष म्हणजे, या सगळ्यात त्यांना रस नसताना. आता एवढ्या रात्री पान कुठं मिळणार, असा विचार सुरू असतानाच नयन बारहातेनं ‘यू टर्न’ घेतला. ‘चला पान खायला,’ असं म्हणत तो वेगानं गाडी चालवू लागला. महाराष्ट्रातल्या मोजक्‍या चित्रकारांपैकी नयन हा एक आहे, हे सांगण्याची गरज आहे, असं वाटत नाही.

एका चौकात गाडी थांबली. पानाचं मोठं दुकान दिसलं. त्यावर मोठा फलक होता : ‘पागल पान भंडार’! नाव वाचताच मी चक्रावलोच, हे नयनच्या लक्षात आलं. मला अजून चक्रावून सोडायचं म्हणून की काय, तो म्हणाला : ‘‘सर, अगदी समोर याच बाजूला आणखी एक असंच दुकान आहे ‘पागल पान...’ ’’ मी नजर टाकली तर खरोखरच आणखी एक पागल पान शॉप होतं तिथं. विशेष म्हणजे, या दोन्ही दुकानांच्या अगदी मधोमध एक अर्धाकृती पुतळा होता. तो पाहून श्रीपाद जोशींनी आनंदोद्गार काढले : ‘अरे, हा तर नरहर कुरुंदकर यांचा पुतळा.’ लागलीच ते पुतळ्याकडं निघाले. नमस्कार करून परतले ते ‘पागल पान भंडार’समोर... मी दुकान न्याहाळू लागलो. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना दुकानाचे मालक पान देतानाचे फोटो होते. मी सहजच विचारलं : ‘विलासरावांनाही पान आवडायचं का तुमच्या दुकानातलं?’ यावर दुकानदार म्हणाला : ‘‘अहो, परवा शरदराव पवारांचा दौरा झाला. त्यांच्यासाठी पान घेऊन गेलो होतो.’’ दुकानाची माहितीही एका फ्रेममध्ये होती. ती फ्रेम मी वाचू लागलो. पानाचं माहात्म्य तीमध्ये होतं. गॅरंटी द्यावी, असं एक वाक्‍य लिहिलं होतं : ‘इथलं पान खाल्ल्यावर सिगारेटीचं व्यसन सुटतं...’ अजूनही बरंच काही होतं.

बऱ्याच वेळेला त्या त्या शहराची एक लिपी असते. त्याचे त्याचे म्हणून काही शब्द असतात. ते त्या शहराच्या, शहरवासियांच्या जगण्यातून, पर्यावरणातून जन्माला येत असतात. महाराष्ट्रात जिथं जिथं पोहण्याचे तलाव आहेत, तिथं तिथं त्या तलावाचं नाव समान म्हणजे ‘जलतरण तलाव’. काही ठिकाणी नुसतंच ‘तलाव’ किंवा ‘तरणतलाव’ असं लिहिलेलं असतं. बहुतेक तलावांना सावरकरांचं नाव असतं. ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणत त्यांनी समुद्रात टाकलेल्या महाउडीची आठवण यावी. ...तर नांदेडमध्ये ‘तरणिका’ असं लिहिलंय. हे असं का, यावर कुणी चर्चा करतं की नाही ठाऊक नाही. असाच आणखी एक शब्द आहे. मागच्या दौऱ्यात चहाच्या दुकानासमोर थांबून बिनसाखरेचा चहा मागितला; पण दुकानातला एक पोऱ्या अतिशय नम्रपणे ‘असा कोणताही चहा नाही; त्याऐवजी डेकाशन घेता का,’ असं विचारू लागला. आता डेकाशन म्हणजे काय? तर तो नांदेडमधला बिनसाखरेचा चहा. सोबत यशपाल होता. तो मराठीचा प्राध्यापक. मी त्याला म्हटलं : ‘‘बाबा, शोध या शब्दाची जन्मकथा.’’ नांदेडमधल्या बकाल रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले होते. या शहरानं दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिल्याच्या खुणा शहरात दिसत नव्हत्या.
‘पागल पान भंडारा’समोरून निघालो. ज्यांनी पान खाल्लं त्यांना चवीविषयी विचारू लागलो. श्रीपाद जोशी म्हणाले : ‘‘बहोत बढिया.’’ अर्थात, जे पान मिळेल त्याला ते बढियाच म्हणतात. भोरमध्ये असंच म्हणाले होते. मी कच्च्या सुपारीचा एक तुकडा चघळत होतो. सुपारीवरून पानाची चव कशी काय कळणार?

दुकानाभोवती ठिकठिकाणी पानाचे डाग न दिसल्यास नवल. खरंतर पान त्यासाठीच असतं; पण हे सगळं घडत असताना मला निकोलाय मनुची आठवला. ‘मुगल्स इन इंडिया’ पुस्तक लिहिणारा. छत्रपती शिवाजीमहाराजांचं चित्र काढणारा. इटलीतून पळून तो समुद्रमार्गे भारतात आला. मलबारमध्ये रस्त्यावरून फिरू लागला. ठिकठिकाणी त्याला तांबडे, खुनासारखे डाग दिसले. रस्त्यावरून जाणारे अनेक जण पिंक मारायचे आणि हे डाग तयार व्हायचे. ‘भारतातल्या लोकांना कोणता विकार तर नाही ना? वारंवार ते थुंकतात का आणि हे लालभडक काय पडतं,’ असं मनुचीनं विचारलं. यावर ‘साहेबा, हे पान खाणारे लोक आहेत. त्यामुळं पिंक आणि हे डाग... ’ असं उत्तर त्याला मिळालं. मनुचीला खूप आश्‍चर्य वाटलं, जसं ‘पागल’ शब्द वाचून मला वाटलं.
***
सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे नाशिकला पोचली. घराजवळ असलेल्या टपरीवर फक्कड चहा घ्यावा, असं वाटलं. (एका वाचकानं मला सल्ला दिलाय, की कधीतरी हॉटेलमध्ये जा! मी प्रयत्न करेन; पण चहाच्या दराचे आकडे रोज फुगतात. आतातर ‘जीएसटी’मुळं एकूण बाजारच बाळसेदार होईल. असो). चहाची ऑर्डर द्यावी लागत नाही. तो चहा बनवतो. समोरच एकजण सुगरणीचं सुंदर घरटं घेऊन उभा होता. सुगरणीचं घरटं असं कुणी तोडून नेऊ लागलं, की मला खूप वाईट वाटतं.  प्रचंड कष्ट उपसून, एकेक धागा विणून आणि बहिणाबाईंच्या कवितेचा विषय होऊन सुगरण घरटं विणत असते. एक घरटं विणायला किती तरी महिने लागतात. तिचं आर्किटेक्‍ट जगातल्या कोणत्याच माणसाला अद्याप कळलेलं नाही. घरटं तुटल्यावर ती आणि तिच्या पिलांचं काय होत असेल, असे नेहमीचेच प्रश्‍न तयार होतात. मी त्याला थोडं कटू शब्दांत विचारलं : ‘‘कशासाठी घरटं तोडलंस?’’

तो : ‘‘मी नाही, प्राचार्यबाईंच्या शिपायानं तोडलं.’’
मी : ‘‘कशासाठी?’’
तो : ‘‘नवा फ्लॅट घेतलाय त्यांनी. ‘हॉलमध्ये शोसाठी अडकवायचं आहे,’ असं त्यांनी आपल्या शाळेच्या शिपायाला सांगितलंय. खूप कष्टानं त्यानं घरटी तोडली आहेत.’’
मी : ‘‘पण तू कशासाठी घेतलंस?’’
तो : ‘‘मलाही हॉलमध्ये अडकवायचंय.’’
मी : ‘‘कल्पना कर, आपलं घर असं तोडून कुणी अडकवलं तर...? अर्थात शोसाठी.’’

थोडा वेळ स्तब्ध राहून तो म्हणाला : ‘‘खरंच, मी तोडायला सांगितलं नाही. त्याच्याकडं खूप होती. एक मला दिलं.’’ मी : ‘‘मला त्यात रस नाहीय; पण आपलं घर असं कुणी तोडलं तर...?’’

तो पुन्हा स्तब्ध. अपराधी भावनेनं तो म्हणाला : ‘‘हे घरटं त्याच्याकडं देऊन टाकतो.’’
मी म्हणालो : ‘‘काय उपयोग? घरटं तुटलं ते तुटलं. आणि हे बघ, अशी एक दंतकथा आहे की आपलं घरटं तोडणाऱ्याला सुगरण खूप शाप देते म्हणे...ओरडून, पाय मातीवर घासून अजून काही तरी काही तरी करून...’’

घरटं हातात धरलेल्याच्या चेहऱ्यावर किंचित चिंता. तो एकच वाक्‍य पुन:पुन्हा सांगत होता : ‘‘सर, प्राचार्यबाईंनी घरटं तोडायला सांगितलं होतं. मी नाही. मी तर आत्ताच्या आत्ता त्या शिपायाकडं जाऊन घरटं परत करणार...माझ्या हॉलमध्ये लावणार नाही. प्रॉमिस सर...’’

खरंतर ‘सुगरणीचं घरटं तोडणार नाही, निसर्गाचा विध्वंस करणार नाही,’ असं प्रॉमिस प्राचार्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांकडून घ्यायला हवं होतं. निसर्गावरचा धडा शिकवताना तरी हे करायलाच हवं होतं; पण शेवटी माणूस... त्याच्या सौंदर्याच्या कल्पना वेगळ्या. मुक्‍या पक्ष्यांचं घरटं तोडून ते आपल्या हॉलमध्ये टांगण्याची कल्पना त्यापैकी एक...सौंदर्यासाठी दुसऱ्याशी जीवघेणा खेळ करणारे फक्त नाशिकमध्ये आहेत, असं कुठंय...? निसर्गाचा तोल सावरण्यासाठीचे प्रयत्न एकीकडं आणि त्यालाच हॉलमध्ये लटकवण्याचे प्रयत्न दुसरीकडं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com