पायल आणि लाकूड खाणारं सिमेंट (उत्तम कांबळे)

रविवार, 30 जुलै 2017

‘बदललात तरच टिकाल’ हे सूत्र मोठमोठ्या कंपन्यांपासून ते व्यक्तिगत पातळीवर छोटासा व्यवसाय करणाऱ्यालाही एकसारखंच लागू पडतं. काळ बदलतो आणि नव्या काळातला माणूसही स्वत:त बदल घडवून आणतो. जुन्या वस्तू पडद्याआड जातात आणि नव्या वस्तू जगण्याच्या पडद्यावर अवतरतात. आधीच्या जागेवरून पुढच्या ठिकाणाच्या दिशेनं मुक्काम हलवला तरच जगणं सुरू ठेवता येतं. स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर हे असं सगळं सतत सुरू असतं. या संघर्षात नव्या काळ्याला शिव्या देऊन भागत नाही. त्याचं स्वागतच करावं लागतं. बदल आहे म्हणूनच जग टिकलं आहे. प्रश्‍न आहे तो हा बदल समजून घेण्याचा.
 

‘‘पप्पा, माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्या पप्पा-मम्मीचं बोट धरून शाळेत यायच्या...आणि मी! मी माझंच बोट दुसऱ्या हातानं पकडून ठेवायची...खूप वाटायचं की माझंही इवलं बोट तुमच्या हातात असावं; पण तसं घडलं नाही. वक्तृत्व स्पर्धेत माझा नंबर आला ना तेव्हा बक्षीसवितरणाच्या वेळी सभागृहात फक्त दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या...त्या माझ्या मम्मी-पप्पांसाठी राखून ठेवलेल्या होत्या; पण ते कुठं होते? खरं सांगू पप्पा, अनेकदा मला वाटायचं, की आपण पप्पांच्या कुशीत शिरून त्यांना चिकटावं. मुसमुसून रडावं...पण पण...जाऊ द्या, बरंच काही वाटत आलंय...’’

कुठल्या तरी नाटकातला हा एक दीर्घ संवाद भावनांचे पंख लावून तिनं म्हणायला सुरवात केली आणि समोरचे सगळे प्रेक्षकच मुसमुसायला लागले...स्टेजवरच्या खोट्या खोट्या बापाशी बोलून तिनं सगळे संवाद खऱ्याखुऱ्या संवेदनांमध्ये बुडवले आणि ती स्वत:ही रडू लागली...बहुतेकांना वाटलं, की प्रेक्षकांचं रडू खरं आणि हिचं नाटकी असंल...पण घडलं उलटंच. ती आणि प्रेक्षक खरंखरंच रडत होते...आपलेही डोळे कसे पाणावले, हे मला आणि गौतम पाटीललाही कळलं नाही...त्याच्या संस्थेतून म्हणजे ‘नवभारत’च्या ‘शांतिनिकेतन’मधून शिकत पुढं आलेल्या आणि दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश मिळवलेल्या पायल पांडेचा कौतुकसोहळा गौतमनं आयोजित केला होता...खरंतर असे सोहळे त्याच्या संस्थेत नेहमीच होतात. ‘शांतिनिकेतन’मध्ये बहुतेक सगळ्या कला-क्रीडा स्पर्धेतली पोरं पहिला-दुसरा नंबर हमखास आणतात. सायंकाळी सहा वाजता इथं नुसतं फिरलं की एक लोभस चित्र दिसतं... कुणी घोडेस्वारी करत असतो...कुणी पोहत असतो...कुणी तांबड्या मातीत कुस्तीत रंगलेला असतो...कुणी मल्लखांब, कुणी लेझीम, तर कुणी नाटकात रंगलेला असतो. मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्याच्या प्रयत्नांना ‘शिक्षण’ असं नाव गौतमनं ठेवलंय...गौतम पाटील (मो. ९८२२५५५३३३) आपले वडील प्राचार्य पी. बी. पाटील यांची परंपरा पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय...पश्‍चिम महाराष्ट्रातून दिल्लीच्या ड्रामा स्कूलपर्यंत पोचलेली पायल अपवाद असावी...आख्ख्या सांगलीला तिचा स्वाभिमान वाटत होता...

‘शांतिनिकेतन’ सोडायलाच एक वाजला. जयसिंगपूर गाठायचं होतं. ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार वितरणा’ला हजर राहायचं होतं. सांगलीपासून जयसिंगपूर १०-१५ किलोमीटरवर. चेहऱ्याला तांबूस रंग लावून कृष्णामाई मस्तपैकी धावत होती. गाण्यात जरी ती संथ असली तरी ती धावत होती. अंगावर उन्हाचं वस्त्र लेऊन चकाकत होती. ब्यूटी काँटेस्टमध्ये निघालेल्या युवतीसारखी वाटत होती... दोन-तीन दिवसांपासून बरसणाऱ्या मेघराजामुळं तिची गती वाढली होती...निदान सेकंड गिअरमध्ये तरी ती पोचली होती...डाव्या बाजूला असलेलं अंकली ओलांडून पुढं गेलो आणि ड्रायव्हर वसंत महालेला सांगितलं : ‘थांबव गाडी...’ गाडी थांबली आणि पाच-पन्नास पावलं चालत मी डाव्या बाजूलाच असलेल्या लाकडी खेळणी विकणाऱ्या एका दुकानासमोर गेलो. खरंतर गेली काही वर्षं मी हे दुकानं बघत होतो...हे छोटंसं गाव खेळण्यांसाठी कसं प्रसिद्ध झालं...? एकेकाळी हा परिसर कलापथकांसाठी प्रसिद्ध होता...रस्त्यावर मोठमोठे फलक लागलेले असायचे...‘भरदिवसा अंधार कसा?’, ‘सून माझी लक्ष्मी...’, ‘रक्तात न्हाली कुऱ्हाड’ अशी काहीतरी नावं असायची...

दुकानासमोर उभा राहिलो. खेळणी पाहू लागलो. अन्य काहीजणही खेळणी खरेदी करत होते...एका ग्राहकानं मोठा घोडा खरेदी केला. कुणी ट्रॅक्‍टर, तर कुणी जिराफ...खेळणी पाहताच मी विक्रेत्याला विचारलं : ‘‘कुठून आणता खेळणी?’’ तो म्हणाला : ‘‘आम्हीच तयार करतो. प्युअर लाकडाची असतात.’’

अलीकडं प्युअर शब्द खूपच शायनिंग मारतोय. उदाहरणार्थ : प्युअर शाकाहारी, प्युअर शुद्ध तेल, प्युअर दूध-तूप आणि आता याचं हे प्युअर लाकूड...जी गोष्ट दुर्मिळ होते तिच्यामागं प्युअर हा शब्द हमखास येतोच...तर त्यानं आपल्या पप्पाला बोलावलं.

अंगानं सडपातळ आणि सत्तरीत घुसू पाहणाऱ्या या पप्पाला मी विचारलं : ‘‘नाव काय तुमचं...?’’

उजव्या हातानं खुणावत ते म्हणाले  : ‘‘ते काय तिथं बोर्डावर लिहिलंय...तर बोर्डावर होतं, ‘हनुमान दर्जेदार लाकडी खेळण्यांचे केंद्र, प्रोप्रा. पी. एल. सुतार, फोन : ९८५०७६०९६२, अंकली, ता. मिरज, जि. सांगली...’ कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांच्या बरोबर सीमेवरचं हे गाव.

मी सुतारांना प्रश्‍न विचारला : ‘‘ही सगळी खेळणी तुम्ही तयार करता?’’

ते : ‘‘तर! ह्या ह्या हातांनी तयार करतो.’’

मी : ‘‘कसं काय सुचलं तुम्हाला?’’

यावर ते म्हणाले : ‘‘बसा इथं पायरीवर... बोलू या.’’

मग त्यांनी आपली खोलवर नजर, कॉलबेलवर बोट ठेवावं, तशी इतिहासावर रोखली... इतिहासाची पानं हलायला लागली...४० वर्षं मागं गेली आणि सुताराचा एक पोरगा दिसायला लागला...गावाचे दरवाजे, खिडक्‍या, चौकटी असं काय काय बनवणारा...अलुतेदार की बलुतेदार म्हणून जगणारा...तसं जगणं मस्त चाललं होतं; पण पुढं लक्षात आलं, की बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटची वेगवेगळी रूपं पुढं येऊ लागली आहेत...त्यात जोडीला प्लास्टिक... फायबर वगैरे होतंच. सिमेंटचे दरवाजे, चौकटी आणि खिडक्‍या आल्या... सुतारकामावर पहिला दणका बसला...लाकडी दरवाजे मागणाऱ्यांची संख्या कमी होत गेली...

सिमेंटनं लाकडाची जागा घेणं म्हणजे एक उत्क्रांती, एक बदल होता...जीवनाच्या सगळ्याच आघाड्यांवर तो होत असतो. कॉटनच्या जागी टेरिकॉट आलं होतं...प्युअरची जागा हायब्रीडनं घेतली होती...नऊवारीची जागा सहावारी आणि सहावारीची जागा पंजाबी ड्रेस घेत होता... सर्कस खलास...भाकरीच्या जागी तंदूर रोटी उगवायला लागली होती... अंकलीतल्या, बुधगावातल्या कलापथकांना-तमाशांना सिनेमा धक्का देत होता...सिनेमाला धक्का देण्यासाठी टीव्ही दबा धरून बसला होता...प्युअर लाकूड, प्युअर तूप गरिबांच्या हातातून सटकलं होतं 

आणि त्या ठिकाणी नवीन काहीतरी आलं होतं...व्यवस्थेत एक गोष्ट भारी असते व ती म्हणजे, जे काही नवं येतं ते जुन्याची जागा घेण्यासाठी आणि त्याला थोबाडीत मारून हुसकावण्यासाठीच. नवीन पॉवरबाज असतं. त्याच्याशी मैत्रीच करावी लागते. नाहीतर ते आपल्याला गुहेत ढकलतं. ...तर पी. एल. सुतार म्हणाले : ‘‘सिमेंटनं बघता बघता लाकूड खाऊन टाकलं. आता काय करायचं? सुतारशाळा बंद पडली. रंधा बिनकामाचा झाला. जयसिंगपूर, सांगली, इचलकरंजी इथं मजुरी करायला गेलो. रोज दीड-दोन रुपयांच्या मजुरीवर रंधा चालवायचं काम कुठं कुठं मिळायचं; पण तेवढ्यावर चूल काही पेटायची नाही. पदरात दोन लेकरं होती. बायको होती. दुसरीकडंही लाकडाच्या वस्तूंना मागणी नव्हती. सगळीकडं सिमेंटच पसरलं होतं. शेवटी विचार केला, जगण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. सुचत नव्हतं. शेवटी निर्णय घेतला, की लाकडाच्या चौकटी चालत नसतील तर लाकडाची खेळणी तरी करावीत; पण आपण गरीब! हातात कला आहे; पण ती व्यक्त करण्यासाठी लाकूड कुठं आहे? ते तर खूप महाग झालेलं. आटोक्‍याबाहेर गेलेलं. आमच्या गल्लीत एक काकू लाकूड चुलीत घालून स्वयंपाक करायच्या. काकूंच्या घरी गेलो. त्या स्वयंपाक करत होत्या. बाजूला छोटी-मोठी लाकडं होती. मी त्यांना विनंती केली : ‘काकू, मला दोन-तीन छोटी लाकडं द्या. त्यांचं खेळण्यातलं विमान करतो. सांगलीत नेऊन विकतो. सिमेंट काही सुचू देत नाही. कामधंदा नाही. नवं काहीतरी बनवून जगतो.’ काकूंनी कसलीही कुरकुर न करता ‘पाहिजे तेवढी लाकडं घे,’ असं सांगितलं. मी दोन-तीन उचलली. चार-आठ दिवस खपून खेळण्यातलं मस्तपैकी विमान तयार केलं. ते खांद्यावर घेऊन चालतच सांगलीत गेलो. वेगवेगळ्या चौकांमध्ये बसलो. १६ रुपये मिळाले तरच विमान विकणं परवडणार होतं; पण १०च्या पुढं कुणी रेट केला नाही. विमान घेऊन परत घरी आलो. घरासमोर ते विक्रीसाठी ठेवलं. घर रस्त्यावरचं...कुणीतरी यायचं, रेट जास्त म्हणून निघून जायचं. शहरात प्लास्टिकची खेळणी आली होती आणि ती लाकडी खेळण्यांचं नाक-तोंड दाबत होती. पूर्वी पोरांसाठी बाबागाडी, डुलणारा घोडा आम्ही तयार करायचो. आता त्यातही प्लास्टिक घुसलं होतं. काही कळत नव्हतं; पण शेवटी १०-१५ रुपयांना विमान विकलं. मग लाकडाचं मोठं सांबार तयार केलं. बैलगाडी, ट्रॅक्‍टर, मोटार काय काय बनवायला लागलो. गिऱ्हाईक मिळायला लागलं. १०-१२ वर्षांत दुकानाची जागा हलवून दारात आणली. दुकान सेट झालं. पोरांना दहावी-बारावीपर्यंत शिकवून याच कामात आणलं. नाहीतरी शिकून करायचं तरी काय? पाच-पाच लाख देऊनही कुठं नोकरी मिळतेय? सुधीर आणि कुबेर दुकान सांभाळतात. ट्रॅक्‍टर, रेल्वे, बैलगाडी, जिराफ आणि घोड्याला मागणी जास्त आहे. काळ बदलला म्हणून हाताची घडी करून कसं चालंल...? चालत तर राहायलाच पाहिजे...!’’

पी. एल. सुतार बराच वेळ बोलले. पोलिसाचं सोंग घेतलेला एक बहुरूपी भीक मागायला आला. त्याच्या हातात त्यांनी १० रुपयांची नोट टेकवली. ‘खोटा पोलिस नित्यनियमानं हप्त्यासाठी येतो का?’ असं विचारल्यावर सगळेच हसले. नव्या-जुन्याचा संघर्ष सतत चालत असतो. नवा काळ, नवा माणूस, नवा विचार, नव्या वस्तू येतात. सतत घासाघीस सुरू असते. स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर सर्वत्र ती सुरू आहे. या संघर्षात नव्या काळाला शिव्या देऊन भागत नाही. त्याचं स्वागतच करावं लागतं. या जगात बदल नित्य आहे. बदल आहे म्हणूनच जग टिकलं आहे. प्रश्‍न आहे तो समजून घेण्याचा आणि त्यासाठी पी. एल. सुतार यांच्याप्रमाणं लाकडी चौकटीकडून विमानापर्यंत यावं लागतं. सुतारांनी स्वत:मध्ये बदल घडवला आणि पायलनं करिअरसाठी नवं क्षेत्र निवडलं. दुसऱ्या दिवशी दुपारी भास्कर शिंदे (मो. ९८६०१४५५६६) यानं केवळ प्रयोगासाठी, निसर्गासाठी म्हणून घेतलेल्या एकरभर शेतावर नितीश सावंतबरोबर जेवणासाठी गेलो. छोट्याशा जागेत त्यानं ५६ प्रयोग केलेत. त्याची पत्नी सुगंधा डबल बीए, एमए, बीएड, संगणक डिप्लोमा, टायपिंग एवढं सगळं लग्नानंतर शिकली; पण नोकरी काही लागेना. शेवटी ती सात वर्षांपूर्वी जयसिंगपूरमध्ये कंडक्‍टर झाली. महिला कंडक्‍टरची पहिलीच बॅच होती. तिनंही बदल स्वीकारला होता. नव्या अनुभवानं तिचं जग भरून गेलंय...

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Uttam Kamble