देवा रे देवा (डाॅ. यशवंत थोरात)

Article in Saptraga by Yashwant Thorat
Article in Saptraga by Yashwant Thorat

अगदी लहानपणापासूनच माझ्या मनानं एक गोष्ट पक्की ठरवली होती. देव हा फक्त मोठ्यांचाच असतो. त्याला कारणंही तशीच होती. माझा गृहपाठ करण्याची, वर्गात माझा पहिला नंबर आणण्याची किंवा आईनं मला थोडं कमी रागवावं, यासाठी मी त्याला अनेक वेळा प्रार्थना केली होती; पण ती जणू त्याच्या बंद कानांवरच पडत होती. माझ्या प्रार्थनेचा त्याच्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. शेवटी मी त्याचा नाद सोडला. मी अधिकाधिक बेशिस्त आणि अप्रामाणिक बनत राहिलो...मी खूप चैन केली आणि त्या चैनीचे परिणामही भोगत राहिलो.

काळ जात राहिला. मी महाविद्यालयात गेलो. तत्त्वज्ञान हा मुख्य विषय म्हणून निवडला. देवाला आणखी एक संधी देण्याचं मी ठरवलं. काही गोष्टी समजून घेण्यासाठी मी खूप वाचन केलं; पण कसलाच प्रकाश पडला नाही.

मला एवढंच कळलं, की देव शोधण्याचा तत्त्वज्ञानात सांगितलेला मार्ग म्हणजे एक बौद्धिक कोडं आहे. त्यात काही फारसा अर्थ नाही. आपल्याया काय मिळू शकतं किंवा काय दिसू शकतं, याचा तर्क आपण करू शकतो; पण कल्पनेनं किंवा तर्कानं देवाचा शोध घेता येत नाही; त्यामुळं तो सिद्धही करता येत नाही.

आमच्याकडं रोज पूजा करायला येणाऱ्या गुरुजींना मी हे सांगितलं. जर देव सिद्ध करता येत नसेल किंवा त्याबाबत युक्तिवाद करता येत नसेल, तर तो आहे यावर विश्वास कसा ठेवायचा आणि असा विश्वास ठेवणं हे वास्तववादी कसं असेल, असं मी त्यांना विचारलं. त्यावर ‘देव दाखवता येत नाही; पण तो मनात अनुभवला पाहिजे,’ असं ते म्हणाले. त्यांनी मला धर्मग्रंथ वाचायला सांगितले. मला त्याबद्दलही संशय होता.

‘‘वेद हे तर्क आणि बुद्धी यांवर आधारित आहेत का?’’ असं मी त्यांना विचारलं.

‘‘ती पुस्तकंच आहेत; पण त्यातल्या ऋचा ऋषींना ध्यानाच्या परमावस्थेत स्फुरल्या आहेत. त्यामुळं त्या बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडच्या आहेत,’’ असं ते म्हणाले. मला त्यांचा युक्तिवाद पटला.

‘‘पण मग ख्रिश्‍चन किंवा इस्लाम या अन्य धर्मांचं काय?’’ मी विचारलं. ‘‘तू फार प्रश्न विचारतोस,’’ असं म्हणत ते आपल्या कामाकडं वळले; पण मी मात्र त्यांनी सांगितलेलं ऐकलं. हिंदू आणि अन्य धर्मांचे मिळतील तेवढे ग्रंथ मी वाचून काढले. माझं मन काहीतरी विचित्र आहे, हे मला पुन्हा एकदा जाणवलं. शेवटी मी एका निष्कर्षाला पोचलो. बहुतेक धर्म नीतीविषयक आहेत, असं मला जाणवलं. म्हणजे त्यांची भूमिका, तत्त्वज्ञान आणि आचार-विचार हे ‘जीवन चांगलं कसं जगावं’ हेच शिकवणारे आहेत, असं मला वाटलं. आता चांगलं म्हणजे काय, हे ठरवणं तसं खूपच कठीण आहे. त्यामुळं या धार्मिक तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून त्यांचं अनुसरण करायचं की आपल्या मतानुसार धर्माची तत्त्वं निवडायची आणि त्यांचा अंगीकार करायचा, ते मला ठरवता येत नव्हतं. वैदिक ऋचांच्या उदात्ततेबद्दल शंका नव्हती; पण केवळ ध्यानमग्न अवस्थेत त्या स्फुरल्या म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का, हा प्रश्न होताच. माझे प्रश्न शेवटपर्यंत प्रश्नच राहिले. त्यांना उत्तरं सापडत नव्हती. त्यामुळं मी दुसऱ्यांदा देवाचा नाद सोडला. विश्वासापेक्षा केवळ एक कौटुंबिक रिवाज म्हणून मी या परंपरा पाळायला लागलो.

त्या वेळी, म्हणजे १९७९ मध्ये आमचं ईशान्य भारतात पोस्टिंग झालं होतं. त्या काळात गुवाहाटी शहर खूप दूरचं, कल्पनेच्याही पलीकडचं मानलं जात होतं; पण आम्ही तरुण आणि धाडसी होतो; त्यामुळं आम्ही उत्साहानं तिथं गेलो. तिथं जाण्याचा आपल्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम होणार आहे, याची त्या वेळी आम्हाला कल्पना नव्हती. तीन दिवस प्रवास करून आम्ही गुवाहाटीत पोचलो आणि कामावर रुजू झालो. आम्ही तिथं भाड्यानं एक घर घेतलं. तिथले लोक आतिथ्यशील आणि सहकार्य करणारे होते. शहर छोटंसंच होतं. छोट्या गल्ल्यांमधल्या रस्त्यांवर दुतर्फा झाडं होती. ठिकठिकाणी तलाव होते. बांबूची आणि विटांची घरं होती. आम्ही तिथं थोडे स्थिरस्थावर होत होतो, एवढ्यात घरमालकानं आम्हाला घर सोडायला सांगितलं. त्याचा मुलगा तिथं राहायला येणार होता. त्यामुळं त्याला ते घर हवं होतं. आमच्यापुढं मोठाच प्रश्न उभा राहिला. आम्ही दोघंही रिझर्व्ह बॅंकेत होतो. त्यामुळं नवं घर शोधण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. आमच्या मुली लहान होत्या. आमच्याकडं प्रचंड सामान होतं. काय करावं ते सुचत नव्हतं. त्या वेळी मला अचानक आठवलं, की मुंबई सोडताना आमच्या एका टायपिस्टनं मला एका कागदावर एका व्यक्तीचं नाव लिहून दिलं होतं. ‘गुवाहाटीत काही अडचण आल्यास हा माणूस मदत करील,’ असं त्या टायपिस्टनं विश्वासानं सांगितलं होतं. सुदैवानं तो कागद मी जपून ठेवला होता.

मी त्या माणसाचा पत्ता शोधला. वेळ ठरवली आणि त्याला भेटायला गेलो. ते एक निवृत्त सरकारी कर्मचारी होते. मी त्यांना माझी अडचण सांगितली. नशीब त्या वेळी माझ्या बाजूनं होतं. त्यांनी नुकताच एक बंगला बांधला होता. तेही भाडेकरूच्या शोधातच होते. दोघांच्याही गरजा एकमेकांना पूरक होत्या. त्यामुळं दोघांनाही फायद्याची ठरेल अशी तडजोड झाली. त्यांचे आभार मानून मी जाण्यासाठी उठलो. एवढ्यात त्यांनी मला थांबवलं. ‘चहा घेतल्याशिवाय जायचं नाही,’ असं ते म्हणाले. त्यांचा आग्रह मोडणं मला शक्‍यच नव्हतं. गप्पा मारताना मी त्यांना सहज विचारलं ः ‘‘आता निवृत्तीनंतर तुम्ही काय करता?’’

‘‘मी ध्यानधारणा करतो’’ ते म्हणाले.

‘‘तुम्ही या मार्गात कसे काय आलात?’’ मी विचारलं.

ते म्हणाले ः ‘‘काही वर्षांपूर्वी माझी उत्तर आसाममध्ये आयुक्तपदी नेमणूक झाली. एके दिवशी संध्याकाळी एका साधूनं माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानं माझ्याकडं त्या रात्रीपुरता आसरा मागितला. मी तो दिला. दुसऱ्या दिवशी जाण्यापूर्वी त्यानं मला समोर बसायला सांगितलं आणि काही योगविषयक क्रिया शिकवल्या. मी तिथं एकटाच राहत होतो आणि माझ्याकडं वेळही भरपूर होता. त्यामुळं मी रोज त्या क्रिया करायला लागलो. मला त्यात गोडी निर्माण झाली. हळूहळू माझ्या जीवनशैलीत नकळत बदल व्हायला लागला. आता निवृत्तीनंतर मला खूपच वेळ मिळतो; त्यामुळं मी दीर्घ काळ ध्यानधारणा करतो.’’

‘‘म्हणजे काय करता?’’, मी कुतूहलानं विचारलं.

‘‘मी माझ्यातल्या शांततेचा शोध घेतो’’ ते म्हणाले.
आता ही बाब माझ्या अनुभवाच्या पलीकडची होती. ‘‘तरीपण तुम्ही ध्यान करताना नेमकं काय होतं?’’ मी विचारलं.

बराच वेळ ते खाली मान घालून स्तब्ध राहिले. त्यांनी वर पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ‘‘त्या आनंदाचं वर्णन मी करू शकत नाही,’’ ते म्हणाले.

मी पुरता गोंधळलो. एका बाजूला ते सत्य सांगत होते, हे मी नाकारू शकत नव्हतो. दुसऱ्या बाजूला ध्यानधारणेच्या चमत्कारावर मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. माझं कुतूहल आणखी वाढलं.

काही दिवसांनी ते कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी माझ्या कार्यालयात आले. मला ध्यानधारणा शिकवण्याची विनंती मी त्यांना केली. ‘मी सध्या गडबडीत आहे,’ असं त्यांनी मला त्या वेळी सांगितलं. ते वरवरचं कारण होतं, हे माझ्या लक्षात आलं; मग मीही त्या वेळी आग्रह धरला नाही. काही दिवसांनी ते मला बाजारात भेटले. मी त्यांना पुन्हा विनंती केली. या वेळी त्यांनी वेगळंच कारण सांगितलं. 

‘ध्यानधारणा करण्याचं तुमचं वय नाही,’ असं ते मला म्हणाले. हेही एक असंच खोटं कारण होतं, हे माझ्या लक्षात आलं. तरीही मी त्यांचा पिच्छा सोडत नव्हतो. ते मला टाळायला लागले, तेव्हा त्यांच्या मनात काय आहे, याचा मला अंदाज आला. त्यामुळेच ते एके दिवशी थेट आमच्या घरी आल्याचं पाहून मला आश्‍चर्य वाटलं.  

‘‘तुम्हाला शिकवण्याची परवानगी मला माझ्या गुरूंकडून मिळाली आहे. आता तुम्हाला शिकण्यात रस आहे का?’’ त्यांनी मला विचारलं.

मी तयार होतो. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून काही क्रिया करून घेतल्या आणि सुमारे २० मिनिटांनी ते परत गेले.

त्यांनी शिकवलेल्या काही क्रियांचा दुसऱ्या दिवशी अभ्यास करायचा, असं मी ठरवलं. त्यांनी सांगितलेल्या आसनात मी बसलो. सुरवातीला काहीच झालं नाही; पण अचानक आपण अवर्णनीय आनंदाच्या समुद्रात तरंगत आहोत, असं मला वाटायला लागलं. सुख आणि दुःखाच्या लाटांवर मी तरंगत होतो. एवढ्यात दुरून कुठूनतरी मला माझी पत्नी उषा हिचा आवाज ऐकू आला. 

‘लवकर आवरा, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय,’ असं ती म्हणत होती.

ऑफिसला जायला उशीर? ते कसं शक्‍य आहे? असं मला वाटलं. कारण, मी तर अवघ्या पाच मिनिटांपूर्वीच ध्यानाला बसलो होतो. थोडा अनिच्छेनंच भानावर आलो. घड्याळ पाहिलं तर सकाळचे १० वाजले होते. हे शक्‍य वाटत नव्हतं; पण ते खरं होतं. काय झालं ते मला कळत नव्हतं. माझे तीन तास कुठं गेले, हा माझ्यापुढं प्रश्न निर्माण झाला होता.

मी त्या दिवशी थोड्या भारलेल्या अवस्थेतच ऑफिसला गेलो. मी काय करतोय आणि ती गोष्ट का करतोय, ते मला कळत नव्हतं. माझ्या डोक्‍यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी संध्याकाळी फिरायला गेलो. जे घडलं ते खरं होतं की तो केवळ भास होता? तो माझ्या कल्पनेचा खेळ तर नव्हता? हे काय घडलं होतं? कां घडलं होतं? माझ्याच बाबतीत का घडलं होतं? या अनुभवानं माझ्यात काय बदल झाला? कदाचित मी या गोष्टीचा फार खोलवर विचार करत नव्हतो ना? कदाचित मला झोप लागली असावी आणि मी त्याची तुलना आध्यात्मिक समाधीशी तर करत नव्हतो ना? तो अनुभव खरा होता की खोटा होता? 

प्रश्नांची मालिका माझ्या डोक्‍यात घोंघावत होती. मी जे अनुभवलं ते तर मी नाकारू शकत नव्हतो. हे जर खरं असेल तर मग मी आजवर ज्याच्या मागं धावलो ते सगळं म्हणजे पैसा, सत्ता, पद या सगळ्या गोष्टी झूट होत्या. निव्वळ सावल्या होत्या. सोनं नव्हे तर कथील होत्या. मला शिकवलेल्या आसनात दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बसलो. कालचाच अनुभव पुन्हा येईल, या अपेक्षेनं मी थोडा वेळ वाट पाहिली; पण काहीच घडलं नाही. मी पुन्हा प्रयत्न केला; पण तोही व्यर्थ ठरला. दिवसांमागून दिवस मी पुनःपन्हा प्रयत्न करत होतो. शेवटी मी निराश झालो आणि ‘तो सगळा भास होता’ या निष्कर्षाला आलो. मी स्वतःलाच मूर्ख बनवत होतो, हे मला कळत होतं. काळ जात होता; पण त्या अनुभवाची आठवण थोडीही पुसट होत नव्हती. संगीताच्या मैफलीत तानपुऱ्याचा अनाहत नाद जसा सतत घुमत राहतो, तसा तो प्रसंग कायम माझ्या मनात घोळत राहिला. गालिबनं एके ठिकाणी म्हटलं आहेः

- कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर-ए-नीमकश को
वो खालिश कहाँ से होती, जो जिगर के पार होता
(तू मारलेला बाण माझ्या हृदयात घुसला असता तर मला आनंदच झाला असता.
पण, हाय रे दुर्दैवा, तो तिथं घुसलाच नाही, तर त्यानं तिथं फक्त आघात केला. आता मी जगू शकत नाही आणि मरूही शकत नाही).
मग मी ही गोष्ट कशी नाकारू शकेन ?  
***

काही दिवसांनी आमची चेन्नईला बदली झाली. काय करावं ते मला सुचत नव्हतं. मी अनेक गुरूंच्या आणि बाबांच्या दर्शनाला जायला लागलो. त्यातले काही प्रसिद्ध होते, तर काही स्वयंघोषित होते. त्या प्रत्येकानं माझं म्हणणं ऐकून घेतलं. ‘देवानंच तुमची निवड केली आहे,’ असं अनेकजण म्हणाले. देवाला नारळ अर्पण करण्याचा किंवा विशिष्ट पूजा करण्याचा किंवा देवापुढं बळी देण्याचा सल्ला अनेकांनी मला दिला. काहींनी उपास आणि व्रत-वैकल्यं सुचवली. काहींनी विविध तीर्थस्थळांना भेट देण्याविषयी सांगितलं, तर काहींनी जप, ध्यान किंवा कुंडलिनी-जागृतीसारखे प्रयोग करायला सांगितलं. काहींनी मला ‘गाद्यांवर उड्या मारून आपण हवेत तरंगत आहोत,’ अशी कल्पना करायला सांगितलं.

एकदा मी दिल्लीला एका अधिकृत दौऱ्यासाठी गेलो होतो. विमानतळावर मी कवितांचं एक पुस्तक विकत घेतलं. त्यात सोळाव्या शतकातल्या एका स्पॅनिश कवितेचा (Dark Night of the Soul) हा इंग्लिश अनुवाद होता ः कधी कधी एखाद्या आध्यात्मिक पेचामुळं एखाद्या व्यक्तीचा अंधारातून प्रकाशाकडं प्रवास होऊ शकतो. या कवितेच्या तळटिपेत लिहिलं होतं ः ‘कलकत्ता इथल्या सेंट तेरेसा १९४८ पासून त्यांच्या आत्म्याच्या काळ्या रात्रीशी झगडत आहेत. फक्त मध्ये अल्प काळासाठी त्यांना विरंगुळा मिळत असतो. हे वाचताना आपलीही स्थिती थोडी अशीच आहे, असं मला वाटलं; पण मी एक असा अनुभव घेतला होता, की जो मी विसरू शकत नव्हतो आणि तो मला पुन्हा घेता आला नव्हता. दुसऱ्या बाजूला मदर तेरेसा या तर एका अर्थानं देवदूतच होत्या. त्या आपल्याला काही मदत करतील का, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. कल्पना जरा वेगळी होती. मी माझ्या संपूर्ण अनुभवाचं वर्णन करणारं एक पत्र त्यांना पाठवलं. खूप दिवस काहीच घडलं नाही; पण मग अचानक एक दिवस एक आंतर्देशीय पत्र मला मिळालं. 

त्यात लिहिलं होतं :

‘‘प्रिय यशवंत थोरात,
आपल्या १५ मार्च १९८६ च्या पत्राबद्दल आभार. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, त्यांच्यावर सतत प्रेम करत राहण्याची संधी मिळत राहणं, ही आपल्या आयुष्यात एक गरज असते. ईश्वरावरचं प्रेम म्हणजे केवळ भावना नव्हे, तर त्याच्या इच्छेनुसार केलेली काही तरी कृती होय. परमेश्वराला भेटण्याची इच्छा होणं आणि त्याचा शोध घेणं ही तो आपल्याजवळ आधीच असल्याची खूण आहे. परमेश्वराविषयी असलेलं आपलं हे प्रेम तपासून पाहण्याची अंधाराला मुभा आहे. आपण परमेश्वराला शरण जातो म्हणजे तो जे देईल ते स्वीकारतो आणि तो आपल्याकडून जे घेईल, ते त्याला आनंदानं देत असतो. परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो.’’
- एम. तेरेसा.

पत्र वाचून मी क्षणभर सुन्न झालो. मदर तेरेसा या ख्यातनाम संत होत्या. त्यांना रोज शेकडो पत्रं येत असतील. त्यातून माझ्या पत्राला उत्तर देण्यासाठी त्यांनी वेळ काढला होता. मी त्यांना पुन्हा पत्र लिहिलं आणि हा सिलसिला वाढतच गेला. त्यांच्या प्रत्येक पत्रात त्या मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देत असत. १३ सप्टेंबर १९८५ च्या एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं ः ‘...तर या कूटप्रश्नांच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवत आहे. केव्हा ना केव्हा आपल्यापैकी प्रत्येकावर अशी वेळ येतेच ...’  आणखी एका पत्रात त्यांनी म्हटलं होतं ः ‘तुम्ही कुणाची प्रार्थना करता याला महत्त्व नाही. तुम्ही कशी प्रार्थना करता, हे महत्त्वाचं आहे.’ त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९८८ मध्ये त्यांनी लिहिलं होतं ः ‘‘तुम्ही कुठेही जा, काहीही करा; पण देवाला त्याच्या कार्यात एक साधन म्हणून तुमचा उपयोग करू द्यावा, असं मला वाटतं. आणि लक्षात ठेवा, दीन-दुबळ्या, एकाकी, अनाथ, गरीब आणि वेदना झेलणाऱ्या व्यक्तींमध्येच तुम्हाला देव सापडेल.’

मदर आज हयात नाहीत आणि स्वामी विवेकानंदांच्या शब्दात म्हणायचं तर ‘माझीही अटळ मृत्यूकडं वाटचाल सुरू आहे.’

मागं वळून पाहताना मला तीव्रतेनं जाणवतं, की नैराश्‍याच्या अंधकारात त्यांनी मला मार्गदर्शन केलं. हरवलेल्या आणि पोरकेपणाच्या क्षणी ज्या ममतेनं त्यांनी मला सावरलं, ते मी कधीच विसरू शकणार नाही.

***

शेवटी, आयुष्य ही सुख-दुःखांनी भरलेली पेटी आहे. विशेष गोष्ट म्हणजे, एक दिवस प्रार्थना आणि ध्यान करताना मला माझ्या मनात एक प्रचंड आग दिसली. त्या दिवशी म्हणजे आठ जानेवारी १९८९ ला माझ्या दैनंदिनीत नोंद आहे ः ‘माझ्या मनात आग खदखदत आहे. कधी कधी ती मला दिसते. कधी कधी मी स्वतःला या आगीशी, प्रकाशाशी जोडू शकतो. 

मग हाच तर देव नसेल?’

यातली अपूर्ण राहिलेली गोष्ट म्हणजे, त्या दैनंदिनीतल्या नोंदीनंतर मदर काय म्हणत होत्या, ते समजायला मला दोन दशकं लागली ः ‘शरण जा, प्रवाही राहा.’ 

येशू ख्रिस्तानं क्रुसावर जाताना असंच म्हटलं होतं ः ‘हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणेच सगळं घडू दे’.

उषा उद्या विमानानं इंग्लंडला जात आहे. माझी मुलगी तिथं रुग्णालयात आहे. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा निर्णय डॉक्‍टर उद्या घेणार आहेत. ते म्हणतात की, ही एक साधी शस्त्रक्रिया आहे; पण आम्हा दोन म्हाताऱ्या माणसांसाठी तर तो जगाचा अंतच आहे. 

‘‘तुम्ही पंडितजींना तिच्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगाल का?’’ उषानं दोन दिवसांपूर्वी मला विचारलं. 

मी नुसती मान हलवली. मी तसं केलंय की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी तिनं नुकताच फोन केला होता. मी ते केलं नव्हतं.

‘‘कां सांगितलं नाहीत?’’ तिनं विचारलं.

विधिलिखित बदलण्याच्या माणसाच्या शक्तीवर माझा विश्वास नाही आणि यापलीकडं माझ्याकडं दुसरं उत्तर नव्हतं.

‘‘मग आता काय करायचं?’’ तिनं अधीरतेनं विचारलं.

मी म्हणालो ः ‘‘परमेश्वराची इच्छा असेल तसं होईल.’’

‘‘तुम्ही खूप बदलला आहात,’’ ती म्हणाली.

मी खूप हळवा झालोय हे तिला माहीत होतं. ती असहाय बनलीय, हे मला माहीत होतं; पण बहुधा तिला समजलं असावं की

चाहे आंसू मिलें, चाहे मोती मिलें
मुस्कुराते हुए अपना दामन बढा
तेरी जानिब से शिकवा अगर हो गया 
देनेवाले की तौहीन हो जाएगी 

अश्रू किंवा आनंद यापैकी तुमच्या वाट्याला जे काही येईल त्याचा मनापासून स्वीकार करा.

कारण जर तुम्ही त्याबाबत तक्रार केलीत, तर तो देणाऱ्याचा अपमान ठरेल अन्‌ त्यानं तो व्यथित होईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com