साक्षात्कार? (डॉ. यशवंत थोरात)

साक्षात्कार? (डॉ. यशवंत थोरात)

मूर्ती तयार झाली, तेव्हा मला पुन्हा बोलावण्यात आलं. त्या वस्तू दिल्यावर ‘‘आता या खोलीत मला एकट्याला राहू द्या, तुम्ही बाहेर थांबा,’’ असं स्वामी म्हणाले. आम्ही बाहेर थांबलो. आम्ही त्यांना पाहू शकत नव्हतो; पण त्यांचं अभिषेकाच्या वेळचं त्या मूर्तीबरोबरचं संभाषण आम्हाला ऐकू येत होतं. माझ्यासारख्या लाखो भाविकांसाठी ते सगळ्या भावभावनांच्या आणि आसक्तीच्या पलीकडं गेलेल्या भक्तीचे प्रतीक होते. ते निर्मितीच्या आदिशक्तीशी तादात्म्य पावले होते. खोलीतून मंत्रांचा आवाज येत नव्हता. आम्ही ऐकत होतो तो मुलाचा आईशी होणारा निरागस संवाद.

मी  थकलो होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. शिवाय त्यानंतर चेन्नई ते कांचीपुरम असा हाडं मोडणारा प्रवास मला करावा लागला होता. सायंकाळी  वाजता आम्ही कांची कामकोटी मठाचे स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या दर्शनासाठी लांबलचक रांगेत उभे होतो.

आम्ही दोघं होतो. मी आणि माझा मित्र नटराजन. धोतर आणि उपरणं अशा वेशात तो होता. त्यानं कपाळावर भस्माचे ठसठशीत पट्टे ओढले होते. तमीळ चालीरितींशी माझा फारसा परिचय नव्हता. मी आपला नेहमीच्या पोषाखात, म्हणजे शर्ट-पॅंटमध्ये होतो. हाताचा दुखरा अंगठा जसा अन्य बोटांमधून वेगळा दिसतो, तसा मी त्या रांगेत ठसठसून वेगळा दिसत होतो. 

मी तिथं गेलो होतो- कारण मला अनेक दिवस छळणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं. माझ्या मनाचं समाधान करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात मी होतो. सर्वसाधारण माणूस त्याच्या आयुष्यात म्हणजे ‘याचि देही, याचि डोळा’ परमेश्वराची अनुभूती घेऊ शकतो का, असा माझा प्रश्न होता. म्हणजे कुठं वाचलेला, किंवा चर्चेत अथवा संभाषणात ऐकलेला, श्रद्धेनं स्वीकारलेला, धर्मानं सांगितलं म्हणून मान्य केलेला, जाहिरातींतून माथी मारलेला असा अनुभव मला नको होता. ‘देव कुणी प्रत्यक्ष अनुभवलाय का,’ असा माझा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी खूप शोध घेतला, खूप प्रवास केला. आपण परमेश्वर पाहिला आहे, असा दावा करणाऱ्या अनेकांना भेटलो; पण प्रत्येकवेळी माझी निराशा झाली. माझं समाधान करू शकेल, असं कुणीही मला भेटलं नाही. 

या स्वामींकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं मला सांगितल्यामुळं मी त्या दिवशी तिथं रांगेत उभा होतो. 

स्वामी एका कानडी ब्राह्मण कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील जिल्हा शिक्षणाधिकारी होते आणि तिंडीवनममधल्या एका अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्यावेळी त्यांच्या वडिलांचं पोस्टिंगही तिथंच होतं. स्वामींची बुद्धी तीक्ष्ण होती आणि अनेक विषयांत त्यांनी नैपुण्य सिद्ध केलं होतं. बायबलच्या पाठांतरात त्यांना बक्षीसही मिळालं होतं. वयाच्या अकराव्या वर्षी आईवडिलांनी त्यांची मुंज केली. त्यामुळं एका विद्वान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकू शकले. नटराजननं मला सांगितलं, की स्वामी लहान असतांना त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली होती. त्यावेळी ‘एक दिवस सगळं जग याच्या पायावर लोळण घेईल,’ असे उद्‌गार  त्या ज्योतिषानं काढले होते. कथा आणि दंतकथांना अशा माणसाच्या भोवती गुंफलं जाण्याची सवयच असते. त्यांचं व्यक्तिमत्व अधिक गूढ बनवण्यासाठी त्यांचा उपयोगही होत असतो. मी मात्र त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही.

त्यावेळच्या आचार्यांच्या अनपेक्षित निधनामुळं या स्वामींची कांची कामकोटी पीठाचे ६८वे आचार्य म्हणून वयाच्या तेराव्या वर्षी निवड करण्यात आली. परंपरेनुसार त्यांना संन्यासाची दीक्षा देण्यात आली आणि त्यांचं मूळ नाव बदलून ‘चंद्रशेखरेंद्र सरस्वती’ असं ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांचं बहुतांश आयुष्य विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्यात आणि विविध अनुष्ठानं करण्यात व्यतित झालं. त्यांनी अत्यंत निष्ठेनं आणि गांभीर्यानं आद्य शंकराचार्यांच्या शिकवणुकीचं आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं. त्यामुळंच ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. लाखो भाविकांच्यासाठी ते पेरियावल म्हणजे ‘Parmeshwar.’ 

रांग गोगलगायीच्या गतीनं पुढं सरकत होती. पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशासारखी माझी अवस्था झाली होती. ‘हा रुढीवादी तमीळ ब्राह्मणांचा गड आहे. तिथं मी, दख्खनचा एक मराठा, नखशिखांत अब्राह्मण नेमकं काय करतोय?’...मी मनाशी पुटपुटलो. मी माझ्या भावना नटराजनकडं व्यक्त केल्या. ‘‘मित्रा, ही जागा म्हणजे परंपरागत रुढी आणि चालीरिती यांचं केंद्र आहे. तिथं माझ्यासारखा देवाच्या अस्तित्वाबाबत शंका घेणारा माणूस पचनी पडणं कठीण आहे. मी इथं आलो, ही कदाचित चूक झाली असं मला वाटतंय. चल, दर्शन आटोपू आणि परत जाऊ,’’ मी म्हणालो. नटराजननं माझ्याकडं दुर्लक्ष केलं; पण माझ्या मनातला संशय काही केल्या जाईना. 

तिथं जमलेले शेकडो भाविक स्वामींना अर्पण करण्यासाठी फुलं, फळं, अन्य भेटवस्तू असं काही ना काही घेऊन आले होते. त्यांच्या मनातली श्रद्धा आणि विश्वास ही त्यांच्यातली समान गोष्ट होती. दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या सश्रद्ध समूहात माझ्यासारखा ‘संशयात्मा’ उभा होता. इंग्रजीत ज्याला ‘डाउटिंग थॉमस’ म्हणतात तसा. संशयखोर. अनेक ‘पवित्र साधूं’ना मी भेटलो होतो आणि ते कसे आहेत, हे मला ‘चांगलंच’ माहीत होतं. ते त्यांच्या अनुयायांकरवी ‘पावित्र्य आणि नैतिकतेचा’ कसा पाठपुरावा करतात, हेही मला चांगलंच माहीत होतं. माझं मन त्या काळी जसं घडलं होतं, त्यानुसार या कथित साधू-संतांपुढं खाली मान घालून आणि ते खरे कसे आहेत ते जाणून न घेता त्यांना शरण जाणाऱ्यांपेक्षा आणि साध्या माणुसकीपेक्षा मंत्र-तंत्रांवर अधिक विश्वास ठेवणाऱ्यांपेक्षा माझी विचारधाराच मला अधिक बरोबर वाटत होती. त्यांच्या दृष्टीनं ती डागाळलेली असली तरी. आश्‍चर्य म्हणजे मला माहीत होतं, की माझी बौद्धिक नास्तिकता हासुद्धा एक देखावा आहे. मला माहीत होतं, की या धार्मिक रुढींच्या मागंही एक अर्थ आहे. फक्त कुणीतरी तो आपल्याला दाखवायला पाहिजे. या विश्वाला नियंत्रित करणारी एक दैवी शक्ती आहे, हे कुणी क्षणभर तरी दाखवायला पाहिजे.

मी स्वामींना भेटलो, तेव्हा साधारणत: आठ वाजले होते. एक कृश, वृद्ध व्यक्ती. एका हातात एक भिंग, तर दुसऱ्या हातात टॉर्च. त्यांच्या पुढ्यातल्या पोथीची पानं ते वाचत होते. त्यांच्यापुढं नतमस्तक होणाऱ्या समोरच्या गर्दीचं आणि अर्पण केल्या जात असलेल्या विविध गोष्टींचं त्यांना भानही नव्हतं. खरं सांगायचं, तर त्यांची निरपेक्ष, तटस्थ वृत्ती बघून मला राग आला. एवढे लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, तर त्यांनी किमान त्यांचे नमस्कार स्वीकारून त्यांना प्रति-अभिवादन केलं पाहिजे, असं मला वाटलं. ‘तुम्ही जर एक साधूपुरुष आहात, तर हे तुमचं काम नाही का,’ असा विचार माझ्या मनात आला. मी त्यांच्या समोरून गेलो तेव्हा ते क्षणभर तरी वर मान करून आपल्याकडं पाहतील, असं मला वाटलं; पण त्यांनी माझ्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही. ‘जाऊ दे. आपल्याला काय त्याचं,’ असं मनातल्या मनात म्हणत मी पुढं सरकलो.  
आम्ही बाहेर पडलो, तेव्हा मी निराश आणि रागावलोही होतो. मला भूक लागली होती आणि कधी एकदा घरी पोचतोय असं मला झालं होतं. मी काहीतरी समजून घेण्यासाठी आलो होतो; पण तो मार्गच बंद झाल्यासारखं मला वाटलं. मी नटराजनला तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवलं. ‘‘आपण इथं आलोच आहोत, तर आजची रात्र इथंच मुक्काम करू. तू उद्या त्यांना तुझ्या शंका विचार,’’ असा आग्रह त्यानं धरला. थोड्या नाखुषीनंच आणि मनातला विरोध स्पष्ट करत मी कसाबसा तयार झालो. आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये थांबलो. मी भरपेट वडा-सांबार आणि शिरा खाल्ला आणि खास दक्षिणी कॉफी प्यायलो. त्या दाक्षिणात्य जेवणामुळं काय गडबड झाली, मला माहीत नाही. मी रात्र अस्वस्थपणे घालवली. पहाटे जागा झालो, किंवा जागा झालो असं मला स्वप्नातच वाटलं. पाहतो तर माझ्या अंथरुणाजवळ ‘ते’ उभे होते. खरं तर मला आश्‍चर्य वाटायला हवं होतं; पण तसं काही वाटलं नाही. ते माझ्याकडं रोखून बघत होते. त्यांनी अत्यंत शुद्ध इंग्लिशमध्ये मला विचारलं ः ‘‘तू एवढा अस्वस्थ का आहेस?’’ 
काय उत्तर द्यावं, ते मला सुचत नव्हतं. मग अतिशय शांत आवाजात तेच म्हणाले ः ‘‘काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल.’’ त्यावेळी सर्वाधिक जाणवली ती त्यांची अतिशय शांत, आश्वासक नजर. मी पुन्हा झोपलो. सकाळी उठल्यावर मला हे सगळं आठवलं. मी मनाशीच हसलो. मात्र, नटराजनला मी हे सांगितलं नाही. कारण माझ्या मानसिक अस्वस्थतेवर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं मला जगजाहीर करायचं नव्हतं. 
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्याच सोपस्कारातून गेलो. तशीच गर्दी, तशीच रांग. तेच श्रद्धाळू भाविक आणि त्यांच्यात पूर्णपणे वेगळा भासणारा मी. फक्त यावेळी मी नटराजननं मला दिलेलं धोतर मी लुंगीसारखं नेसलं होतं. मात्र, आदल्या दिवशीपेक्षा तिथलं वातावरण मला अधिक परिचित वाटत होतं. यावेळी ‘ते’ एक भगवं वस्त्र गुंडाळून बसले होते. ते भक्तांनी अर्पण केलेल्या गोष्टी निरपेक्षपणे स्वीकारत होते. 
‘‘ते एवढे शांत का आहेत?’’ मी नटराजनला दबक्‍या आवाजात विचारलं. ‘‘त्यांचं मौन आहे,’’ त्यानंही तशाच आवाजात सांगितलं. ‘‘व्वा! म्हणजे आपल्या प्रश्नांना उत्तर मिळायची आता अपेक्षाच ठेवायला नको,’’ मी मनातल्या मनात पुटपुटलो. अखेर मी त्यांच्या आसनासमोर आलो. मी साधा नमस्कार केला. मागं वळणार एवढ्यात त्यांनी हातातल्या कमंडलूतल्या पाण्यात बोट बुडवून शेजारी उभ्या असलेल्या शिष्याचं लक्ष वेधत त्या पाण्यानं जमिनीवर काही लिहिलं.  

‘‘तुम्हाला काय हवंय ते परमाचार्यांना जाणून घ्यायचंय,’’ तो शिष्य मला म्हणाला. त्याचं तमीळ वाक्‍य नटराजननं भाषांतर करून मला सांगितलं. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडं रोखल्या गेल्याचं मला जाणवलं. आपल्याकडं लोकांचं लक्ष वेधलं गेलेलं मला आवडलं नाही. 

‘‘मला काहीच नकोय,’’ मी थंडपणे म्हणालो आणि जाण्यासाठी वळलो; पण त्या शिष्यानं मला पुन्हा थांबवलं. ते कमंडलूतल्या पाण्यात बोट बुडवून जमिनीवर पुन्हा काहीतरी लिहित होते. पुन्हा तोच प्रश्न होता ः ‘तुला काय हवंय?’
ते फक्त मलाच पुन्हा विचारत असल्यामुळं आजूबाजूला कुजबूज सुरु झाली. त्यामुळं मी अधिकच अस्वस्थ झालो. त्याच अस्वस्थतेत मी म्हणालो ः ‘‘अनुग्रह. तुमचे आशीर्वाद!’’

‘तू कामाक्षी मंदिर पाहिलंयस का?’ असं त्यांनी पुन्हा जमिनीवर लिहिलं.

‘‘होय,’’ मी म्हणालो.

‘त्यांना ते पुन्हा दाखवा आणि त्याना परत इकडं घेऊन या,’ स्वामींनी  लिहिलं. 
रांग रोखून धरण्यात आली. कुणीतरी मला मंदिरात नेलं. ‘मला या सगळ्यातून सोडव,’ अशी मी देवीला त्यावेळी मनोमन प्रार्थना करत होतो. आम्ही परत आलो.
त्यानंतर स्वामींनी अत्यंत शांतपणे पुन्हा लिहिलं ः ‘त्याला देवीचं मंदिर बांधायला सांग.’

बाकी एक शब्दही नाही. फक्त ती कमालीची शांत, सजल नजर.

माझ्या खिशात त्यावेळी अवघे चाळीस रुपये होते. ते निश्‍चल नजरेनं माझ्याकडं बघतच होते. मी होकारार्थी मान हलवली, हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालो. 

काही दिवसांनी मी ब्रिटनमध्ये गेलो. तिथं बरेच दिवस राहून मी परतलो. स्वामींची पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी असं मला वाटलं. मी त्यांना त्या दिवशी भेटलो, तेव्हा तिथं हजारो लोक होते. स्वामींचं वय त्यावेळी ८६ वर्षांचं होतं. मी त्यांच्यापासून इतका दूर उभा होतो, की त्यांनी मला नीट पाहिलं असण्याची शक्‍यता अगदीच कमी होती. म्हणून मी त्यांना पुन्हा भेटायला गेलो. ‘आज खरं-खोटं सिद्ध होईलच,’ असं मनात म्हणत मी दर्शन रांगेत उभा राहिलो. त्यांच्या आसनासमोरून पुढं जाताना मी हात जोडून त्यांना नमस्कार केला. क्षणार्धात ‘‘मंदिराचं काय झालं?’’ असं त्यांनी मला विचारलं. 
त्यानंतर मी अनेकवेळा त्यांना भेटलो. दरवेळी त्यांचा तोच प्रश्न कायम होता ः ‘‘मंदिराचं काय झालं?’’

माझ्यापुढं दोन प्रश्न होते. एक म्हणजे जो मंदिर बांधतो तो भाविक असायला हवा. जे या श्रद्धेबद्दलच शंका घेतात, ते कसं मंदिर बांधतील? दुसरं म्हणजे ज्याला मंदिर बांधायचंय त्याच्यात पावित्र्य किंवा तत्सम गुण थोडेतरी असले पाहिजेत, असं मला वाटत होतं. माझ्यात या दोन्ही गोष्टी नव्हत्या. मी त्या दिवशी त्यांच्यासमोर होकारार्थी मान हलवली होती हे खरंय; पण ती वेळच अशी होती, की त्यांनी मला अगदी ताजमहाल बांधायला सांगितलं असतं, तरी मी त्यांना होकार दिला असता. अगदी आपल्या खिशात अवघे चाळीस रुपये आहेत हे माहीत असतानासुद्धा. त्यांच्या त्याच त्या प्रश्नाला उत्तर न देणं पुढं अशक्‍य व्हायला लागलं. ती गोष्ट माझ्या अगदी डोक्‍यात गेली. शेवटी एकदा त्यांच्या प्रश्नावर माझ्या मनातल्या शंका अगदी आपोआप बाहेर पडल्या. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की ‘मी ब्राह्मण नाही.’ त्यावर कुठलेच भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसले नाहीत.  

‘‘मी मांसाहारी आहे.’’ - पुन्हा तोच निर्विकार चेहरा.
‘‘मी धूम्रपान करतो आणि कधीकधी त्याही पुढं....’’
‘‘‘मला माहीतंय,’’ स्वामी  म्हणाले. मी चक्रावून गेलो.

‘‘स्वामीजी, आपण थोडा वास्तववादी विचार करू या. तुमचे अतिशय पवित्र, निष्ठावान , श्रीमंत असे हजारो शिष्य आहेत. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यापैकी अनेकजण प्रसंगी अगदी जीवही देतील. त्यांच्यापैकी कुणाला तरी हे काम सांगा. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. देव प्रत्यक्ष अनुभवता येतो का एवढीच शंका मनात होती. त्याचसाठी मी इथं आलो होतो. मंदिर बांधण्यासाठी नाही. तसंही मंदिर बांधणं ही सोपी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी पैसे कुठून येतील?’’ मी विचारलं.

‘‘पैसे येतील,’’ ते शांतपणे म्हणाले. 

मी चाट पडलो. ते मला जाणवलंही.

‘‘ठीक आहे. मंदिर बांधण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल?’’ मी विचारलं.
‘‘निश्‍चित!’’ स्वामी ठामपणं म्हणाले. 

‘‘सुरवात कशी करायची हे मला माहीत नाही,’’ मी खरंखरं सांगितलं. 

स्वामींनी कुणाला तरी बोलवायला सांगितलं. तो आला. त्यांचं नाव गणपती स्थापिती असल्यांचं मला सांगण्यात आलं. त्याची माझ्याशी ओळख करून देण्यात आली. तो मंदिरांचा मुख्य मूर्तिकार आणि स्थापत्यकार होता. ‘‘हा तुम्हाला मूर्ती बनवून देईल. मूर्ती तयार झाल्यावर तू ये,’’ असं स्वामींनी मला सांगितलं. 

मूर्ती तयार झाली, तेव्हा मला पुन्हा बोलावण्यात आलं. देवीच्या अभिषेकासाठी दूध, दही, मध, हळद-कुंकू, चंदन, गुलाबपाणी, नारळाचं पाणी आणण्यास  त्यांनी सांगितलं. त्या वस्तू दिल्यावर ‘‘आता या खोलीत मला एकट्याला राहू द्या, तुम्ही बाहेर थांबा,’’ असं ते म्हणाले. आम्ही बाहेर थांबलो. आम्ही त्यांना पाहू शकत नव्हतो; पण त्यांचं अभिषेकाच्या वेळचं त्या मूर्तीबरोबरचं संभाषण आम्हाला ऐकू येत होतं.

माझ्यासारख्या लाखो भाविकांसाठी ते सगळ्या भावभावनांच्या आणि आसक्तीच्या पलीकडं गेलेल्या भक्तीचे प्रतीक होते. ते निर्मितीच्या आदिशक्तीशी तादात्म्य पावले होते. खोलीतून मंत्रांचा आवाज येत नव्हता. आम्ही ऐकत होतो तो मुलाचा आईशी होणारा निरागस संवाद. त्यावेळी ऐकलेले ते ‘‘ताई...अम्मा’’ हे शब्द अगदी अखेरपर्यत माझ्या कानात गुंजत राहतील. माधुर्यानं हृदयाला भिडणारे असे ते शब्द. निर्मितीच्या मुळातून उमटलेले. 

‘‘बापरे, ते प्रत्यक्ष देवीशी बोलताहेत!’’ असे उद्‌गार माझ्या तोंडून बाहेर पडले. 
आम्हाला परत आत बोलावण्यात आलं, तेव्हा ते डोळे मिटून एखाद्या पाषाणासारखे निश्‍चल बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक नितांतसुंदर प्रभा विलसत होती. जणू काही देवीचं तेजच त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. त्यावेळी ते त्या देवतेशी एकरूप झाले होते, यात कुठलीही शंका नव्हती. त्या एका क्षणात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आम्ही तिथं बसलो. काही क्षण गेले आणि मग त्यांनी अत्यंत अनिच्छेनं, वेदना झाल्यासारखा दीर्घ श्वास सोडत डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातून अनिर्बंध अश्रू ओघळत होते. मूर्ती माझ्या हातात देत ‘‘हिची काळजी घे,’’ असं ते म्हणाले.

बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. मी स्वामींना साष्टांग प्रणिपात केला. आम्ही उठलो आणि बाहेर पडणार, तोच त्यांनी पुन्हा बोलावलं.

‘‘तुझ्याकडं तिची काळजी घेण्याइतके पुरेसे पैसे आहेत का,’’ त्यांनी आस्थेनं विचारलं.  
त्याक्षणी मला जाणवलं, की त्या घटकेपर्यत त्यांना मी कोण आहे, काय करतो, कुठून आलो किंवा कुठं जाणार आहे, याविषयी काही म्हणजे काही माहीत नव्हतं. किंवा कदाचित माहीत असावंही. एकदा नटराजनशी बोलताना ते म्हणाले होते ः ‘‘शास्त्रानुसार योगभ्रष्ट माणसाला त्याच्या पूर्वजन्मात जे काही राहून गेलं असेल ते भरावं लागतं.’’ त्यानं मला ते सांगितलं; पण मी लगेचच त्याचं म्हणणं फेटाळलं. 
तर अशी ही साधी कहाणी. देव अनुभवता येतो का, हे पाहण्यासाठी मी तिथं गेलो होतो; पण आयुष्यानं माझ्यापुढं एक ‘गुगली’ टाकला होता. ही त्या स्वामींची जादू होती, की त्या देवीचा चमत्कार होता, हे मला माहीत नाही; पण तेव्हापासून ती मूर्ती आमच्या घरात वर्षानुवर्षं आहे. वर्षानुवर्षं तिला आमचं घर जणू आपलंच घर वाटत आहे. एक दिवस ती आमच्याच घराच्या परिसरात तयार केलेल्या एका लहानशा मंदिरात आपल्या घरी गेली. या काळात अनेक घटना अशा घडल्या, की माझ्याकडून देवीची उपासना सुरू झाली. तीन दशकं लोटली आणि एक दिवस झाडाचं पिकलं पान गळून पडावं तशी ही औपचारिक उपासना माझ्यापासून अलगदपणे गळून पडली. 
आता भटजी रोज घरी येतात आणि तिची शास्त्रशुद्ध पूजा करतात. माझ्या मनात येईल, तेव्हा मी तिथं जातो. बसतो. कधीकधी कुणी नसताना बोलतो. 

गेल्या आठवड्यात विजयादशमी होती. पूर्वी आम्ही होमहवन स्वत: करायचो; पण आता नाही. आता आम्ही शास्त्रापुरत्या चार आहुती टाकतो आणि आमच्या घरी काम करणारे हवन आणि पूजा करतात.

विजयादशमीला मी मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर बसलो, तेव्हा मला स्वामींची आठवण आली. मानव आणि निर्मितीच्या एकरूपतेची पूजा म्हणजेच देवाची खरी पूजा. ही एकरूपता ओळखणं म्हणजे ‘सगळे एक आहेत आणि तूच सर्वस्व आहेस,’ या अंतिम सत्याची थोडीशी जाणीव झाली. 

....त्याचवेळी मला जाणवलं की माझं म्हणणं कदाचित अर्धसत्य असेल, कारण त्या दिवशी स्वामींनी जेव्हा पूजा केली होती तेव्हा ती तिथंच होती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com