काफिले (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

इतिहास हा जीवनाबद्दल असतो, मृतांबद्दल नव्हे, हे त्यांनी मला जाणवून दिलं. आपण कुठं जात होतो किंवा आपण कुठं जायला हवं होतं याचं ज्ञान इतिहास आपल्याला करून देत असतो. मला त्या वेळी जाणवलं नाही; पण त्या चर्चेचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला. इतिहासाकडं व्यापार, राजकारण, संरक्षण, सामाजिक अभिसरण यासंदर्भात वेगळ्या भूमिकेतून पाहण्याची दृष्टी त्या चर्चेनं मला दिली. त्या तीन तासांत त्यांनी मला असं काही दिलं होतं, की मी जे कधीच परत करू शकणार नाही.

‘‘माझ्या अतिशय आदरणीय आणि नामवंत इतिहास शिक्षकांना कोर्टात खेचण्याची संधी मला मिळाली तर मी जरूर खेचेन...! असं म्हणतोय म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ते अतिशय चांगले शिक्षक होते. त्यांचं ज्ञान वादातीत होतं आणि प्रामाणिकपणा संशयातीत होता. प्रश्न फक्त एवढाच होता, की ते इतिहासाकडं व्यक्ती आणि घटनांची एक लांबलचक आणि कंटाळवाणी साखळी म्हणून पाहत होते. त्यांचं शिकवणं म्हणजे इतिहासातल्या राजे आणि राण्या यांच्या आयुष्यांची केवळ उजळणी होती. त्यात केवळ लढाया आणि विविध क्रांती यांची जंत्री होती. त्या तुलनेत आज आपण इतिहासाकडं विस्तृत दृष्टिकोनातून पाहतो. मी आणि आमच्या सगळ्या वर्गानं तो विषय तसाच समजून घेतला. काही असो... इतिहास मला आवडतो. कारण, इतिहासावर माझं प्रेम आहे. खूप वर्षांनंतर भुवनेश्वर विमानतळावर माझ्या शेजारी पान चघळत बसलेल्या एका व्यापाऱ्यानं इतिहासातल्या सौंदर्याकडं पाहण्याची एक 
वेगळीच दृष्टी मला दिली. तीच ही कहाणी... 
*** 

खूप वर्षांपूर्वी दिल्लीला जाण्यासाठी माझ्या विमानाची वाट बघत मी भुवनेश्वर विमानतळावर एका अरुंद बाकावर बसलो होतो. विमानाच्या  उड्डाणाला उशीर झाला होता. तिथं गर्दी आणि गोंगाट होता आणि उकाडाही खूप होता. मी एक निःश्वास टाकला आणि माझ्याजवळचं ग्रॅंट डफ या प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकाराचं ‘अ हिस्टरी ऑफ द मराठाज्‌’ हे पुस्तक उघडलं. विसाव्या शतकाच्या सुरवातीला साम्राज्यवादी आणि पक्षपाती भूमिकेतून लिहिलेला आपल्या देशाचा तो इतिहास होता. 

माझं मन वाचनात थोडं गुंतत नाही तोच ‘चला, जागा तर मिळाली’ असे एका प्रवाशाचे शब्द माझ्या कानावर पडले. पुस्तकातून मान वर करून बघेपर्यंत एक गलेलठ्ठ आणि आणि तेलकट माणूस माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला. एका मोठ्या हातरुमालानं चेहऱ्यावरचा घाम पुसत माझ्याकडं पाहत त्यानं विचारलं ः ‘‘पान खायेंगे?’’ - मी नम्रपणे नकार दिला. 

थोड्या वेळानं त्यानं पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. 
‘‘काय वाचताय?’’ त्यानं विचारलं. त्याला तिरसटपणे काहीतरी उत्तर देण्यापेक्षा मी पुस्तकच त्याच्या हातात दिलं. 

‘‘फक्त प्राध्यापकच असली पुस्तकं वाचतात,’’ तो माझ्याकडं बघत म्हणाला. 

‘‘मी काही प्राध्यापक नाही’’ - मी खुलासा केला. 

‘‘तुम्ही नक्कीच मराठा असणार; अन्यथा तुम्ही असलं जाड पुस्तक कशासाठी वाचाल? पण तुम्ही मराठा आहात, असं काही दिसत तर नाही,’’ तो म्हणाला. माझा संताप वाढतच होता. त्याचं नशीब, की मी त्या वेळी निःशस्त्र होतो. 

‘‘मी मराठाच आहे,’’ - मी कडवटपणे म्हणालो. 

‘‘क्‍या बात है, शिवाजी के वंशज!’’ तो उद्गारला ः ‘‘पण मी काही तुम्हाला आवडत नाही, होय ना?’’ 

‘‘हे पाहा, आपण पहिल्यांदाच भेटतोय. आपली काहीच ओळख नाही; त्यामुळं तुम्ही आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’ मी म्हणालो. 

‘‘मग ओळख करून घेऊ या...मी नरेश कक्कड,’’ ती व्यक्ती म्हणाली. 

मी हे आडनाव पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. तसे भाव माझ्या चेहऱ्यावर उमटले असावेत. ‘‘आम्ही पंजाबमधले, म्हणजे खरं सांगायचं तर, आम्ही फाळणीपूर्वीच्या भारतातल्या मुलतानमधले खत्री आहोत,’’ कक्कड म्हणाले. 

मी नुसतीच मान हलवली आणि पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. थोड्या वेळानं ते म्हणाले ः ‘‘तुम्हाला माहितंय? भारताच्या इतिहासात खूपच काटछाट करण्यात आलेली आहे. आमचंच पाहा, आम्हां खत्रींची कहाणी कुणीच लिहिली नाही. खरंतर हा खूप मोठा इतिहास आहे. तुमच्या इतिहासासारखाच साहसी आणि नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेला’’ मी अविश्वासदर्शक स्मित केलं. 

‘‘तुमचा विश्वास नाही बसत?’’ त्यांनी आश्‍चर्यानं विचारलं. त्यांच्या चिकाटीला मी शरण गेलो. पुस्तक बंद केलं आणि त्यांना म्हणालो ः ‘‘हं, सांगा.’’

त्यांनी सांगायला सुरवात केली ः ‘‘मी एका आधुनिक हिंदू व्यापारी कुटुंबातला आहे. माझे पूर्वज मुलतानमध्ये चिनाब नदीच्या काठावर राहत असत. गेली चार शतकं आम्ही इतर हिंदू व्यापाऱ्यांबरोबर हिमालय ओलांडून मध्य आशियात काफिल्यानं व्यापारासाठी जात असू. लहानपणापासून आम्हाला व्यापाराचं शिक्षण मिळालं होतं; युद्धाचं नव्हे. आम्ही व्यापाराला जाताना कुठलीही शस्त्र बरोबर नेत नसू किंवा कुठल्याही चकमकीत सहभागी होत नसू; पण आम्ही तुमच्या इतकेच धाडसी, शूर आणि हिंमतवान होतो.’’ 

‘‘काहीतरीच सांगू नका. सिंधू नदीच्या पलीकडं अटकेपार भगवा फडकवणं ही एक गोष्ट आहे आणि रुळलेल्या मार्गानं जाऊन व्यापार करणं ही वेगळी गोष्ट आहे,’’ मी ठामपणे म्हणालो. 

‘‘शक्‍य आहे; पण तुम्ही धाडस कशाला मानता, त्यावर ते अवलंबून आहे.’’ 
‘लढाईत जे धाडस दाखवलं जातं तेच शौर्य’ असं तुम्ही मानता. बरोबर?’’ त्यांनी विचारलं. 

‘‘होय...पण शौर्य म्हणजे वेगळं काय असतं?’’ मी विचारलं. 
‘‘तुम्ही कधी असा विचार केलाय का, की ज्याला भय म्हणजे काय ते माहीत नाही, तो धैर्यवान असू शकत नाही. धैर्य म्हणजे भयाचा अभाव असं म्हणणं बरोबर नाही. उलट, भय म्हणजे काय ते माहीत असणं, ते समजून घेणं आणि मग त्याच्याशी सामना करून त्यावर विजय प्राप्त करणं म्हणजे खरं धैर्य नाही का?’’

ते काहीतरी निराळंच सांगत आहेत, असं जाणवून मी त्या नजरेनं त्यांच्याकडं पाहत राहिलो. त्यांचं म्हणणं गंभीरपणे ऐकून घेतलं. या माणसामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं होतं. 

ते म्हणाले ः ‘‘लढाऊ माणसांनी इतिहासात फक्त खर्चच केलाय; पण आम्ही व्यापारी असे आहोत, की ज्यांनी संपत्ती निर्माण केली. एक लक्षात घ्या की आम्ही जी संपत्ती निर्माण केली, तिच्या आधारावरच सैन्यदलं उभी राहिली, लढाया लढल्या गेल्या आणि आजही लढल्या जात आहेत.’’ त्यांचा हा मुद्दा नवा होता. मी त्याबाबत विचार करत असतानाच ‘‘चाय के सिवाय कुछ मजा नही आता’’ असं म्हणत ते उठले आणि दोन चहा आणि समोसे घेऊन आले. त्यांनी मला समोसा देऊ केला; पण मी नम्रपणे तो नाकारला. 

‘‘मी फक्त चहा घेईन,’’ मी म्हणालो. 
‘‘कोई बात नही,’’ असं म्हणत त्यांनी ते दोन्ही तेलकट समोसे खाल्ले. बराच वेळ शांततेत गेला. 

त्यांनी विचारलं ः ‘‘दिल्लीत तुम्ही कुठं राहता?’’
‘‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’’ मी म्हणालो. 

‘‘अमीरों की बस्ती मे... क्‍या बात है!’’ ते म्हणाले ः ‘‘चला, तिथूनच सुरवात करू या. हमारी कहानी हम आप ही के घर से शुरू करते है. तुम्ही इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या बाहेर पडल्यावर उजवीकडं वळलात की तुम्हाला लोधी गार्डन दिसेल. एकेकाळी दिल्लीत राज्य करणाऱ्या लोधींनी वसवलेली ही बाग आता जमिनीखाली गाडली गेली आहे. राजे बनण्यापूर्वी हे लोधी घोड्यांचा व्यापार करत असत आणि भारतातून मध्य आशियाकडं निघालेल्या मार्गावरून जाणाऱ्या काफिल्यांना संरक्षण देत असत. त्यांना माझ्या पूर्वजांनी अर्थपुरवठा केला होता.’’

‘‘स्वत: घरी बसून इतरांना पैसे देऊन इतरांना संकटांचा सामना करायला लावण्यात काय विशेष आहे?’’ - मी म्हणालो. 

‘‘नाही, तुम्ही चुकता आहात,’’ मला थांबवत ते म्हणाले ः ‘‘ज्यांच्याकडं संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नाही, त्या काफिल्यांबरोबर आम्ही स्वत: मध्य आशियापर्यंत जात असू. हा मार्ग, खरं म्हणजे ही वाट, म्हणजे त्या काळातल्या व्यापाराच्या वहिवाटीचा मार्ग होता. तो मुलतानपासून सुरू होत होता आणि मध्य आशियापर्यंतच नव्हे, तर त्याही पुढं रशिया आणि चीनपर्यंत जात होता. जर त्या काळात एखाद्या सकाळी तुम्ही खैबर खिंडीत उभे राहिला असतात तर तुम्हाला शेकडो उंटांचे तांडे कापड, मसाल्याचे पदार्थ, साखर, तांदूळ आणि अन्य अनेक मौल्यवान पदार्थ घेऊन जाताना दिसले असते. त्या काळात त्या काफिल्यांबरोबर हजारो गुलामसुद्धा बुखारा, ताश्‍कंद, इस्फाहन, व्होल्गाच्या मुखावरचं अस्ट्राखान आणि मॉस्को इथल्या बाजारांत विकण्यासाठी नेले जात. भारतीय व्यापारी तिथं ‘किताए गोराड’ इथं मुक्कामाला असत. सर्वच देशांमधले व्यापारी तिथं थांबत असत. तिथून परतताना त्याच काफिल्यांबरोबर हजारो घोडे आणले जात. त्या काळातल्या सैन्यासाठी आणि राजे-रजवाड्यांसाठी उमद्या घोड्यांची आवश्‍यकता असे.’’ 

कक्कड यांचा बचाव ऐकून मी थोडा चिडलो. मी त्यांना विचारलं ः ‘‘हा व्यवसाय तुम्ही नफा कमावण्यासाठी करत होता की देशभक्तीपोटी?’’ 

क्षणभर माझ्याकडं रोखून पाहत त्यांनी मला विचारलं ः ‘‘थोरातसाहेब, याच न्यायानं पाहायचं झालं, तर तुमचे पूर्वज सैन्यात कशासाठी जात असत? देशभक्तीसाठी की लुटालूट करण्यासाठी?’’ या मुद्द्यावर त्यांनी माझ्यावर मात केली होती. मी विषय बदलला. 

‘‘तुम्ही व्यापाराला तिथं जात होता तेव्हा तिथं घर करत होता का?’’ मी विचारलं. 
‘‘होय, तिथल्या व्यापारी धर्मशाळेत वर्षानुवर्षं राहणाऱ्या भारतीयांनी तिथं घरं केली आणि भारतापासून शेकडो मैल दूर भारतीयांची एक वस्ती उभी केली. आम्ही व्यापारात तरबेज होतो. व्यापारी, धान्यविक्रेते, सराफ, सावकार-जे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पैसे देत असत- आणि कुशल कामगार -ज्यांनी समरकंदमधली बीबी खानम मशीद बांधली अशा सगळ्यांची तिथं भरभराट झाली. सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे ४०० वर्षं अन्य हिंदू व्यापाऱ्यांबरोबर आम्ही मध्य आशियाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होतो. शेतकरी आमच्याकडून पेरणीसाठी कर्ज घेत असत. त्याबदल्यात हंगामात आम्ही त्यांच्याकडून धान्य विकत घेत असू. ते आम्ही ठोक बाजारात विकत असू. या व्यापाराचा कर गोळा करण्यात आणि राज्यात पैसा खेळता राहण्यात उपयोग होत असल्यामुळं तिथले राज्यकर्तेही आमच्यावर खूश असत. ते आम्हाला त्या व्यापारी धर्मशाळेत शांततेनं राहण्याची परवानगी देत आणि आमचा सन्मानही जपला जाई. आमच्या परंपरा जपण्याची आणि सण साजरे करण्याची परवानगीही त्यांनी आम्हाला दिली होती. आमचे धार्मिक समारंभ करण्यासाठी आम्ही भारतातून पुरोहितांनाही बोलावत असू,’’ कक्कड यांनी सांगितलं. 

कक्कड मला गोंधळात टाकत होते. त्यांच्याकडं पाहिलं तर ते फारतर एखाद्या गल्ल्यावर बसणारे शेठ वाटत होते; पण त्यांची बुद्धिमत्ता आणि तर्क स्तिमित करणारा होता. 

‘‘तुम्ही खरंच व्यावसायिक आहात का?’’ मी कुतूहलानं विचारलं. 

‘‘का? मी इतिहासाबद्दल साधार बोलतो यामुळं?’’ त्यांनी मला तोडत प्रतिप्रश्न केला. आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान बाळगणं हा जागतिक हक्क आहे. ती काही मूठभर लोकांची मक्तेदारी होऊ शकत नाही.’’ 

‘‘तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर तिकडं यायचे का?’’ मी विचारलं. 

ते थोडं हसले. म्हणाले ः ‘‘आमच्यापैकी अनेकजण अविवाहित होते; पण ब्रह्मचारी नव्हते. जे अधिक धाडसी होते, त्यांनी तिथल्या स्थानिक मुलींशी लग्न केलं होतं. काहींनी नुसतेच संबंध ठेवले होते; पण योग्य ती तडजोड करून ते घरी परतत असत. आमचं व्यापारीकौशल्य आणि संपत्ती यामुळं कधी कधी स्थानिक लोकांच्या मनात द्वेष निर्माण होत असे. मुघल कालखंडाचे प्रसिद्ध अभ्यासक व इतिहासकार मुजफ्फर आलम यांनी बुखाराविषयी लिहिलं आहे, की ‘‘आपल्या प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंदू व्यापाऱ्यांना लुटणं हा एक यशस्वी मार्ग मानला जाई.’’

‘‘हे व्यापारी त्यांच्या नफ्याचे पैसे भारतात परत कसे आणत?’’ मी विचारलं ः ‘‘रोख तर नक्कीच आणत नसतील.’’

ते सांगू लागले ः ‘‘नाही. ते जिथं असतील तिथून भारतात परतण्यापूर्वी ते त्यांच्याकडच्या रोख पैशांची हुंडी काढत असत. आजच्याप्रमाणे त्याही काळात तो पैसे नेण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग होता. ते जेव्हा मुलतानला परतत, तेव्हा व्यापाऱ्यांकडं ते ती हुंडी वटवत. त्यांची देणी देऊन टाकत आणि शांत व स्थिर जीवन जगत. त्यांच्यातले अधिक महत्त्वाकांक्षी लोक स्वत: उद्योग-व्यवसाय सुरू करत. त्यांची व्यापारातली ही भरभराट मुघल राजवटीत आणि नंतर जवळजवळ एकोणिसाव्या शतकापर्यत कायम राहिली. मात्र, रशियाचं वाढतं साम्राज्य आणि ब्रिटिश व अफगाण यांच्यातल्या युद्धानं ती संपुष्टात आणली. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एकोणिसाव्या शतकापर्यंत जागतिक व्यापारावर युरोपियनांचं वर्चस्व नव्हतं. पाश्‍चात्य देशांत झालेल्या औद्योगिक क्रांतीपूर्वी भारत आणि चीन हे दोन सगळ्यात मोठे व्यापारी देश होते आणि जगातला एकूण ४० टक्के व्यापार या दोन देशांकडून होत असे. भारत आणि चीन यांच्या व्यापारातली सध्याची वाढ पाहिली म्हणजे हे दोन्ही देश लवकरच १७५० पूर्वीची स्थिती गाठतील असा मला विश्वास वाटतो.’’ 
ते क्षणभर थांबले. ‘‘आता सांगा, हे सगळं थरारक आहे की नाही?’’ त्यांनी मला 
विचारलं. 

‘‘नक्कीच!’’ -मी म्हणालो. 

‘‘तुमच्या कहाणीनं मला धक्का तर बसलाच; पण मला खोलवर विचारही करायला लावला. इतिहास हा भूतकाळात घडलेल्या घटनांविषयीचा असतो; पण भविष्यातल्या वाटचालींसाठी कुणी या घडामोडींचा अभ्यास करतो का?’’ 

‘‘नक्कीच करतो,’’ ते उत्साहानं म्हणाले ः ‘‘वस्तू आणि सेवांचा विनिमय ही मनुष्यजातीत होणारी नैसर्गिक गोष्ट आहे. माणसं परस्परांबरोबर व्यापार करतात आणि त्यातून संपत्ती निर्माण होते.’’ 

‘‘मला मान्य आहे; पण ही गोष्ट वरवर वाटते तेवढी साधी आहे का? यात राज्यकर्त्यांची किंवा शासनाची काही भूमिका नसते का?’’ मी विचारलं. सरकार यात मदत करतं. माणसं संपत्ती निर्माण करतात; पण सरकार त्यासाठी अनुकूल स्थिती व वातावरण निर्माण करतं. कोणतंही सरकार जेव्हा शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि पायाभूत सोई निर्माण करतं, तेव्हा लोकही प्रतिसाद देतात. सरकार जेव्हा लोकांचा जीव आणि मालमत्तेच्या सुरक्षेची हमी देतं, योग्य पायाभूत सुविधा निर्माण करून देतं आणि अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांचं निवारण करतं, तेव्हा उद्योग आणि व्यापार यांची भरभराट होत असते. त्यातूनच रोजगार निर्माण होतो. बाजारात माल यायला लागतो, मालाची वाहतूक सुरळीत होते, करसंकलन वाढतं आणि एकूणच जीवन संपन्न होतं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं म्हणजे, सुशासनातूनच संपन्नता निर्माण होते...’’ 

‘‘पण अशी परिस्थिती सध्या आहे का?’’ मी विचारलं. 

‘‘मी राजकारणी नाही; पण तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो की भारत आणि मध्य आशियातल्या राज्यकर्त्यांनी त्या काळात यातल्या अनेक सोई निर्माण केल्या होत्या. शेरशहा सुरीचंच उदाहरण घेऊ या. त्यानं दुतर्फा झाडी असलेले, सावली असलेले रस्ते बांधले. प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधल्या. काफिले लुटणाऱ्या अफगाण टोळ्यांविरुद्ध अकबरानं कठोर कारवाई केली. अन्य देशांनीही त्याचं अनुकरण केलं. यातून बुखारामधल्या उझ्बेक खान याच्यासाठी प्रशासनात विशिष्ट पद निर्माण केलं गेलं. ‘यासवुल-इ-हिंदुवान’ म्हणजेच ‘हिंदूंचा पालक’ असं ते पद होतं. हिंदू व्यापाऱ्यांची काळजी घेणं आणि असहिष्णू मुस्लिमांनी थकवलेलं त्यांचं कर्ज वसूल करून देणं हे त्याचं मुख्य काम होतं. पर्शियन राज्यकर्त्यांनीही हिंदू व्यापाऱ्यांचं आणि त्यांच्या काफिल्यांचं रक्षणच केलं.’’ 

‘‘सुशासन नसेल तर काय होतं?’’ मी विचारलं. 

‘‘इतिहास असं सांगतो की राज्यकर्ते जेव्हा दुबळे, आपापसात भांडणारे आणि लोभी असतात, तेव्हा देशाच्या संपत्तीचा आणि सामर्थ्याचा विनाश होतो. अठराव्या शतकात मुघलांची केंद्रसत्ता दुबळी झाल्यामुळंच नादिरशहासारख्या क्रूर आक्रमकाला भारतावर आक्रमण करण्याची आणि १७३९ मध्ये दिल्लीची सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली. परिणामी, दिल्लीतल्या शांतता व सुरक्षिततेचं वातावरण संपलं आणि असुरक्षितता व अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळं व्यापार बंद पडला. यातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्यकर्त्यांनी वातावरण सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला एक मर्यादा असते. व्यापार आणि गुंतवणुकीतून माणसं संपत्ती निर्माण करत असतात. जर शासनानं आर्थिक घडामोडीत दखल द्यायला सुरवात केली तर कालांतरानं ते अयशस्वी ठरतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे, भारतातल्या ‘लायसन्स राज’चं देता येईल. 

‘‘खरंय तुमचं म्हणणं,’’ म्हणालो. ‘‘तुमच्या पूर्वजांनी वाढवलेला हा व्यापार हे एक प्रकारे जागतिकीकरणच नव्हतं का?’’ मी विचारलं. ‘‘होतंच मुळी’’ ते म्हणाले ः ‘‘यातून एक शिकायला मिळालं, की जो देश व्यापारासाठी आपल्या सीमा खुल्या करायला घाबरत नाही, तिथं संपत्ती निर्माण होते. व्यवसाय हा गतिमान असतो आणि जुनं तंत्रज्ञान जाऊन नवं तंत्रज्ञान त्याची जागा घेत असतं. देशानं आपल्या सीमा व्यापारासाठी कधीही बंद करू नयेत. दुर्दैवानं आपण १९५०ते १९९० या काळात त्या बंद केल्या. आपण अन्य देशांशी स्पर्धा करू शकणार नाही, अशा निराश मनःस्थितीतल्या राज्यकर्त्यांनी ही धोरणात्मक चूक केली. पूर्वी आपण एक संपन्न आणि प्रबळ व्यापारीदेश होतो ही गोष्ट ते विसरले. भारताची अर्थव्यवस्था चार दशकं एका कोशात बंदिस्त करून ठेवण्याऐवजी आपण काळाची गरज ओळखून १९९१च्या कितीतरी आधी आपली अर्थव्यवस्था खुली करायला हवी होती. त्यांचं म्हणं अगदी खरं होतं. या दिशेनं नेमकं पाऊल उचललं गेलं तेव्हा आपल्या संगणकक्षेत्रातल्या आणि सेवाक्षेत्रातल्या उद्योगांनी बुद्धिमत्तेच्या कसोटीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली. सॉफ्टवेअर आणि सेवाक्षेत्रातल्या जागतिक प्रतिसादामुळं भारताला जागतिक स्तरावर नवा सन्मान मिळाला आणि त्यातून आपला आर्थिक प्रगतीचा दर उंचावला आणि लाखो जणांना रोजगार मिळाला.’’ 

आमचं संभाषण सुरू असतानाच दिल्लीला जाणारं विमान उड्डाणासाठी तयार असल्याची घोषणा झाली. वाट पाहत असलेल्या प्रवाशांची लगबग सुरू झाली. मी सहज घड्याळ पाहिलं. तीन तास उलटून गेले होते. कक्कड यांचं बोलणं ऐकताना मला वेळेचं भान राहिलं नव्हतं. व्यापारातली थरारकता आणि आकर्षकता यांचं अतिशय मार्मिक आणि रसीलं वर्णन त्यांनी विमानतळावरच्या लॉबीत केलं होतं. त्यांच्या बोलण्यातून मला मध्य आशियातले ते बर्फाळ, डोंगरी रस्ते आणि तिथून प्रवास करणारे काफिले, प्रवाशांसाठी बांधलेल्या सराया आणि व्यापाऱ्यांची आणि दुकानदाराची वर्दळ अशा कितीतरी गोष्टी अनुभवायला मिळाल्या. 

इतिहास हा जीवनाबद्दल असतो, मृतांबद्दल नव्हे, हे त्यांनी मला जाणवून दिलं. आपण कुठं जात होतो किंवा आपण कुठं जायला हवं होतं, याचं ज्ञान इतिहास आपल्याला करून देत असतो. मला त्या वेळी जाणवलं नाही; पण त्या चर्चेचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला. इतिहासाकडं व्यापार, राजकारण, संरक्षण, सामाजिक अभिसरण यासंदर्भात वेगळ्या भूमिकांतून पाहण्याची दृष्टी त्या चर्चेनं मला दिली. त्या तीन तासांत त्यांनी मला असं काही दिलं होतं, की मी जे कधीच परत करू शकणार नाही. 

निरोप घेताना मी त्यांना म्हणालो ः ‘‘तुम्ही व्यापारी कुटुंबातले आहात, असं म्हणालात...पण सध्या काय करता, हे सांगितलं नाहीत...’’ त्यांनी खिशातून एक कार्ड काढून मला दिलं. त्यावर लिहिलं होतं ः 

नरेश कक्कड, 
पी. एचडी, डी. फिल., 
रीडर इन हिस्टरी 

त्याखाली जागतिक दर्जाच्या एका नामवंत विद्यापीठाचं नाव होतं. आश्‍चर्याचा एवढा धक्का बसला, की माझं विमान चुकण्याची वेळ आली होती!