हम तो समझे थे के हम भूल गए है उन को.. (डाॅ. यशवंत थोरात)

Article in Saptaranga By Yashwant Thorat on muhammad yunus
Article in Saptaranga By Yashwant Thorat on muhammad yunus

जवळपास अर्धं आयुष्य खर्च करून जमवलेल्या कागदपत्रांचा ढीग पाहून माझा मलाच धक्का बसला होता. भूतकाळात हरवलेल्या अनेकानेक बैठकींच्या तपशीलवार नोंदींनी भरलेली नोटपॅड्‌स आणि डायऱ्या...खूप दिवस ठेवल्यामुळं पिवळी पडलेली वृत्तपत्रांची अनेक कात्रणं आणि ‘कधीतरी आपण हे नक्की वाचू,’ अशा उदात्त हेतूनं डाऊनलोड करून घेतलेली प्रिंटआऊट्‌स... व्यक्तिगत पत्रं आणि असं कितीतरी...थोडक्‍यात, डझनभर खोक्‍यांमध्येमध्ये जमलेले भूतकाळाचे तुकडे. माझी पत्नी उषा मला एकदा गमतीनं म्हणाली होती : ‘आत्मचरित्र लिहायची तुमची सुप्त इच्छा असावी, म्हणून तुम्ही मुद्दामच हा सगळा ढिगारा जपून ठेवलाय.’ ही कल्पना काही मला पटली नाही. मी आयुष्यात बरंच काही करू शकलो; पण स्वत:विषयी लिहिण्यासाठी ते पुरेसं नाही, याची मला जाणीव आहे.

तात्पर्य : उषाचं याबाबतचं मत चुकीचं होतं... शेवटचं खोकं उघडलं. त्यात काही जुन्या डायऱ्या आणि कागदपत्रं होती. वरवर चाळून मी ती बाजूला करणार होतो एवढ्यात ‘ती’ फाईल मला दिसली. खाकी रंगाच्या त्या फायलीतून बाहेर डोकावणाऱ्या काही खुणाही मी ठेवल्या होत्या. कोणे एके काळी त्याच फायलीनं माझ्यात आंतर्बाह्य बदल घडवून आणला होता. त्या फायलीवर दोन विषय लिहिलेले होते.

१) अभ्यासरजेचा काळ, राधानगरी, कोल्हापूर. 
      नोव्हेंबर, १९९७.

२) ग्रामीण बॅंक, बांगलादेश, मार्च १९९९.

माझं आयुष्य पुस्तक लिहिण्याइतकं महत्त्वाचं नसेल; पण ही फाईल एखादा लेख लिहिण्याइतकी नक्कीच महत्त्वाची होती. मी १९९७-९८ या काळात एका वर्षाची अभ्यासरजा घेतली होती. त्यामागं मुख्यत: दोन उद्देश होते. एक म्हणजे, जिथं गरिबी स्पष्ट दिसत होती, अशा ग्रामीण भागात जादा कर्जपुरवठा केला असल्याचा बॅंकांचा दावा मला तपासून पाहायचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे, ग्रामीण भागाला ज्याची खरी गरज होती, त्या गोष्टी त्यांना मिळत आहेत की नाहीत, हेही मला पाहायचं होतं. विशेषत: शेती करणाऱ्यांपेक्षा आपल्याला जास्त कळतं, असा ग्रामीण भागात पतपुरवठा करणाऱ्या आणि त्याबाबतचं धोरण ठरवणाऱ्या मंडळींचा दावा होता आणि त्याबाबत माझा भ्रमनिरास झाला होता; त्यामुळं मला वस्तुस्थिती तपासायची होती. पाहणीत या गोष्टींचा अंतर्भाव होता. त्यासाठीची पद्धती योग्य असल्याची काळजी मी घेतली होती. योग्य उदाहरणं मी निवडली होती आणि प्रश्नावलीही नेटकेपणानं तयार केली होती. माझ्या कामावर मी खूश होतो; पण मझी समजूत वस्तुस्थितीवर आधारित नव्हती. मला त्या वेळी हे माहीत नव्हतं, की हे निष्कर्ष आणि माझा अहंकार थोड्याच दिवसांत पश्‍चिम घाटातल्या दुर्गम भागातल्या वाऱ्यानं भुईसपाट होणार आहे. जे घडलं त्यात नाट्यमय असं काही नव्हतं. त्या भागातल्या वाताहत झालेल्या काही झोपड्यांची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. मी तिथल्या एका झोपडीत गेलो. माझी ओळख सांगितली, टेपरेकॉर्डर सुरू केला आणि तिथं असलेल्या गंगूबाई या वृद्ध महिलेला तिच्या स्थितीविषयी विचारलं. तिचं उत्तर धक्कादायक होतं. ती म्हणाली :‘‘विकास म्हणजे काय असतं, हे काही मला माहीत नाही. माझ्या झोपडीला आतापर्यंत कुणीही भेट दिली नाही आणि पुढंही कुणी देईल असं वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकत नाही. कृपया इथून जा’’.

मात्र, एक गोष्ट खरी आहे. गरिबीत जन्म घेणं हा एक शाप आहे. जिची किल्ली परमेश्वरानं बाहेर फेकून दिली आहे, अशा एका कुलूपबंद खोलीत अडकून पडणं आहे. ‘‘गरिबी लई दांडगा वनवास आहे भाऊ, लई दांडगा वनवास आहे,’’ असं ती म्हणाली. गरिबी काही मला नवी नव्हती आणि मी ती पहिल्यांदाच पाहत होतो असंही नव्हतं; पण ज्या निश्‍चलतेनं, भावनाशून्य आवाजात आणि निस्तेज डोळ्यांनी ती जे बोलली, त्यानं माझं काळीज जणू उभं चिरलं गेलं. तिच्या त्या वाक्‍यानं, आपण स्वत:ला तपासावं, असं मला वाटायला लागलं. मी खऱ्यासारखा दिसणारा; पण भुसा भरलेला एक माणूस आहे, असं मला वाटायला लागलं. असा माणूस की जो श्रीमंतीत जन्मला आणि आता गरिबांविषयीचा कळवळा दाखवतोय. त्या वाक्‍याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला. आम्ही त्या पठारावरून खाली उतरलो, तेव्हा पाऊस पडायला सुरवात झाली होती. आमची जीप माझा निवास जिथं होता, त्या पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहापाशी आली. माझ्या मनातलं वादळ संपलं नव्हतं. मनात दाटलेल्या अंधाराशी सामना सुरू होता. मी आत न जाता विश्रामगृहाच्या आवारातच एका झाडाखाली बसलो. कितीतरी वेळ... पाऊस पडतच होता. पावसाचं पाणी खारं कसं झालं, याचं मला आश्‍चर्य वाटत होतं. मी देवाला दोष देत असल्याचं मला अस्पष्टसं आठवतंय. मी कदाचित जोरात ओरडलो असेन. कारण, माझा आवाज ऐकून चौकीदार धावत आला होता. त्यांनं माझी चौकशी केली आणि मला तसंच सोडून तो निघून गेला. थोड्या वेळानं मी विश्रामगृहातल्या माझ्या खोलीत गेलो आणि गरिबीविरुद्धच्या युद्धातल्या सगळ्यात ख्यातनाम असलेल्या बांगलादेशाच्या ग्रामीण बॅंकेचे संस्थापक महंमद युनूस यांना एक पत्र लिहिलं. मला त्यांच्या कार्याची माहिती होती; पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतो. मी त्या पत्रात काय लिहिलं, ते मला आता काहीच आठवत नाही. कदाचित एका व्यक्तीला साधी मदतदेखील करू न शकल्याबद्दलचं माझं दु:ख किंवा माझा राग किंवा माझी हतबलता मी त्यात व्यक्त केली असावी. माझ्या ड्रायव्हरनं दुसऱ्या दिवशी ते पत्र पोस्टात टाकलं. आपण असं काही पत्र पाठवल्याचं मी नंतर विसरूनही गेलो. त्यानंतर आठ महिन्यांनी मी अमेरिकेत गेलो होतो. वॉशिंग्टनमध्ये असतांना मला अचानक एक फोन आला. ‘प्रोफेसर युनूस यांना उद्या सकाळी न्याहरीच्या वेळी भेटू शकाल का?’ अशी विचारणा त्या फोनवरून करण्यात आली होती. युनूससाहेबांचं नाव त्या वेळी नोबेल पुरस्कारासाठी सगळ्यात आघाडीवर होतं.

दुसऱ्या दिवशी मी न्याहरीच्या वेळी त्यांना भेटलो. माझं पत्र त्यांच्या हातात होतं. ‘हे पत्र तू लिहिलंय का?’ असं त्यांनी मला विचारलं. होकारार्थी मान हलवली.  ‘तू अगदी अंत:करणापासून लिहितोस...अगदी एखाद्या कवीसारखं. मग रिझर्व्ह बॅंकेसारख्या रुक्ष संस्थेत कसं काय काम करतोस?’ असं ते म्हणाले. मी काही उत्तर दिलं नाही. ‘तुझा देवावरचा राग निरर्थक आहे, दु:खं माणसानं निर्माण केलंय, त्यानं नव्हे. तुझ्या प्रश्नांना अंतिम उत्तर देण्याची विनंती तू मला केली आहेस...पण असं काही उत्तर नसतं. ‘या विश्वात गोंधळ आहे की न्याय आहे?’ असं तू विचारलंस; पण ते नेमकं कुणाला माहीत असणार? जीवनाचा अर्थ तुला जाणून घ्यायचाय; पण मला त्याबाबत फारशी कल्पना नाही किंवा त्याची फारशी फिकीरही नाही. तुमचे थोर तत्त्वचिंतक स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटलं होतं, की मानवजात हळूहळू विनाशाकडं जात आहे. मला ते मान्य आहे; पण ते घडण्यापूर्वी आपण थोडा वेळतरी स्वत:ला विसरून इतरांसाठी काही करणार आहोत का? तू तसं करू शकलास तर तुला जाणवेल, की आपल्या प्रयत्नांतून इतरांच्या जीवनात बदल होताना पाहून जे सुख मिळतं, त्या सुखात स्वत:चीच अशी एक वेगळी शक्ती असते. कुठल्याही दु:खावर फुंकर घालणारी. हे काही अंतिम उत्तर नव्हे; पण मी या श्रद्धेवर जगत आहे. तुझ्याविषयी बोलायचं तर तुझा मार्ग तुला स्वत:लाच शोधला पाहिजे. ऑफिसमधून थोडा वेळ काढ आणि आपलं पद आणि नाव विसरून ज्यांना कधीच कुठलं पद किंवा नाव मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी काहीतरी कर. ग्रामीण बॅंकेत ये, ग्रामीण भागात काम कर. कदाचित यातूनच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. तुझी तयारी असेल तर तुला पाठवण्याबाबत तुमच्या गव्हर्नरांना मी विनंती करू शकेन. ठरव काय ते...’ एवढं सगळं सांगून त्यांनी संभाषण संपवलं आणि मी त्यांचा निरोप घेतला. त्या वेळचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रंगराजन यानी मला बांगलादेशात जाण्याची परवानगी दिली. मी ती फाईल उघडली. त्यातल्या पहिल्या नोंदीवरची तारीख होती १८ मार्च १९९९.

‘विमानातून बांगलादेशाकडं पाहिलं की हिरवी भातशेती, सोनेरी गहू आणि निळ्या नद्या यांचं एक सुंदर चित्र जमिनीवर रंगवल्यासारखं दिसतं. राधानगरीतून वॉशिंग्टन आणि तिथून ढाका - एक लांबचा; पण तितकाच आश्‍चर्यकारक प्रवास’ अशी नोंद त्या पानावर होती. आठवतंय, मी त्यांच्या कार्यालयात जेव्हा प्रवेश केला, तेव्हा दिलखुलास हसत त्यांनी माझं स्वागत केलं. त्यांच्या मनमोकळ्या हसण्यानं सगळी खोली प्रकाशानं भरून गेल्यासारखं मला वाटलं.‘तुझं स्वागत आहे; पण इथं मुख्य कार्यालयात तू काय करतोयस? तुला दिलुआबारी शाखेत जायचंय’ ते म्हणाले.ल्या लोकांना तू येणार हे माहीत आहे; पण तू कोण आहेस, हे मात्र माहीत नाहीय. तू आत्ता निघालास तर संध्याकाळपर्यंत पोचशील. लवकर निघ. तिथं बॅंकेच्या कार्यालयातच निवासी जागा आहे. तिथंच राहा. इथलं अन्न तुला ठीक वाटतंय ना? काही हरकत नाही, तुला एक-दोन दिवसांत त्याची सवय होईल. तुला शुभेच्छा...’ ते भराभरा बोलत होते. दिलुआबारीला मी मोटारीनं निघालो. बॅंकेची कर्मचारी तानवेना ही दुभाषा म्हणून माझ्याबरोबर होती. दारिद्य्रात बुडालेली घरं रस्त्यानं जाताना मी पाहिली. 

‘खरंच, तुमचा देश अतिशय गरीब आहे,’ मी म्हणालो. 

‘तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि चूकही आहे, थोरातसाहेब’ ती म्हणाली.

‘आम्ही गरीब जरूर आहोत; पण गरिबी ही काही फक्त बांगलादेशाची मक्तेदारी नाही. प्रत्येकच देशात ती छोट्या-मोठ्या प्रमाणात आहे. अगदी तुमच्यासुद्धा.’ ती म्हणाली.

तिचं म्हणणं खरं होतं. भूक ती भूकच. गरिबी ती गरिबीच. हिंदूंचं दारिद्य्र, मुस्लिमांकडची टंचाई आणि ख्रिश्‍चनांची उपासमार या सगळ्या एकसारख्याच गोष्टी मानायला हव्यात. 

‘मला माफ कर,’ मी म्हणालो, ‘मी हे विसरलो, की भूख आदब के साँचो में ढाली नही जाती ।’ 

तिनं चमकून माझ्याकडे पाहिलं. ‘तुम्हाला उर्दू येतं?’ तिनं आश्‍चर्यानं विचारलं. तिनं मला मारलेला टोमणा परतवण्याची आयतीच संधी मला मिळाली होती.  ‘उर्दू ही बांगलादेशाची किंवा फक्त मुस्लिमांचीच मक्तेदारी आहे, असं तुम्हाला कां वाटतं?’ विचारलं. ती मोकळेपणानं हसली. त्या क्षणापासून आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. आम्ही बॅंकेच्या शाखेत पोचलो. तिथं स्वयंपाकासाठी असलेल्या दादीमाँ यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. 

‘सगळे कुठं गेले?’ मी आश्‍चर्यानं विचारलं. 

सगळे बॅंकेच्या ग्राहकांबरोबर आहेत, अशी माहिती मला देण्यात आली आणि सांगण्यात आलं, ‘कार्यालयात बसून खुर्च्या उबवण्यात आम्हाला फारसं स्वरस्य नाही.’ आमच्या देशात बॅंकांच्या कॅमचाऱ्यांची फील्डवर जाऊन काम करण्याची फारशी तयारी नसते. अशा बॅंकांमध्ये लोकसंपर्कासाठी एक ‘वेगळा अधिकारी’ नेमलेला असतो. आपल्या बॅंकांची अशी अवस्था का असते? प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्यांपेक्षा कार्यालयात बसून काम करणाऱ्यांबद्दल आम्हाला जास्त प्रेम का वाटतं?

कर्ज देण्याच्या बाबतीतही बांगलादेशातली ग्रामीण बॅंक मला वेगळी वाटली. ही बॅंक खरोखर तारणाशिवाय कर्ज देते. बॅंकेचे व्यवस्थापक शेख यांनी मला ही कल्पना नेमकी समजावून सांगितली. ‘तारण ही नैसर्गिक गोष्ट नाही, तर ती भेद निर्माण करणारी गोष्ट आहे,’ असं ते म्हणाले. ज्याच्याकडं जास्त तारण, त्यालाच जास्त कर्ज मिळणार, हेच त्यातून स्पष्ट होतं. हे एकदा तुम्ही मान्य केलंत की मग जगाची विभागणी तुम्ही सरळसरळ दोन भागांत करता. ‘ज्यांच्याकडं तारण आहे, म्हणजे ज्यांना कर्ज मिळतं ते’ आणि ‘ज्यांना ते मिळत नाही’ असे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन खांबांवर आधारलेली अर्थव्यवस्था मुळातच कमजोर असते. याउलट जेव्हा तुम्ही समूहतारणाच्या आधारावर कर्ज देता, तेव्हा तुम्ही १०० खांबांवर आधारलेली अर्थव्यवस्था उभी करत असता, जी कधीच कोसळत नाही. आपली बॅंकिंग यंत्रणा गरिबातल्या गरिबापर्यंत पोचली आहे का आणि पोचली असेल तर किती प्रमाणात, हे जाणून घेण्यात मी माझं अर्धं आयुष्य खर्च केलं. माझा अभ्यास मला सांगतो, की याबाबत गेल्या काही वर्षांत बरीच सुधारणा झाली असली, तरी अद्यापही ही यंत्रणा तळाच्या २५ टक्के भागात खऱ्या अर्थानं पोचलेली नाही. तारणाचा शोध घेण्यातच आम्ही आजही मानसिकदृष्ट्या अडकलेलो आहोत. वस्तुस्थिती अशी आहे, की तारण ही गोष्ट गरिबांकडं नसते आणि तीच त्यांना श्रीमंतांपासून वेगळं ठरवते. आजही बॅंकेनं तारण घेऊ नये, यासाठी शब्द टाकण्यासाठी अनेक गरीब लोक मला विनंती करतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. सीमेच्या या बाजूला आणि त्या बाजूला जर सारखीच माणसं असतील, तर मग अधिकाऱ्यांच्या मनोरचनेत फरक का असावा? 

‘पूर्व बंगाल (East Bengal) स्वत:चं पोट भरू शकणार नाही,’ असं सर विल्यम हंटर यांनी शंभर वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं होतं. त्या वेळी त्या प्रांताची लोकसंख्या दोन कोटी होती. आता लोकसंख्या अनेक पटींनी वाढली असतानाही तो देश अन्न-धान्याच्या बाबतीत हळूहळू स्वयंपूर्णतेकडं वाटचाल करत आहे. निसर्गाची कृपा झाली तर हे शक्‍य आहे; पण प्रत्यक्षात तशी कृपा होत नाही. जेव्हा निसर्ग वादळ किंवा पुराच्या रूपानं आपला रुद्रावतार दाखवतो, तेव्हा हजारो एकर जमीन उद्‌ध्वस्त होते. हे चक्र नेहमीच सुरू असतं; पण ग्रामीण बॅंक आपल्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडत नाही. ती त्यांना आसरा, अन्न आणि औषधं तर पुरवतेच; पण तातडीनं नवा कर्जपुरवठा करून त्यांना संकटाच्या मानसिकतेतूनही बाहेर काढते. असं करताना ती बॅंक कर्जमाफी जाहीर करून त्यांचा अवमानही करत नाही. ती त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि त्या परिस्थितीतही ते ग्राहक तो विश्वास सार्थ ठरवतात. संकटकाळातच नव्हे तर इतरही वेळी ही बॅंक कर्जाबाबत खूपच उदारता दाखवते; पण कोणत्याही स्थितीत कर्जमाफी केली जात नाही. दुसऱ्या बाजूला आपण मात्र कर्जमाफीवर प्रेम करत असतो. जेव्हा गरज असते तेव्हा आणि गरज नसते तेव्हाही. आणखी वाईट म्हणजे, शेतकऱ्यांमध्ये आपण एक अशी मन:स्थिती निर्माण केली आहे, की अशी कर्जमाफी त्यांच्यासाठी चांगली आहे, एवढंच नाही तर तो त्यांचा हक्कच आहे.

‘प्रथमोपचार रोग बरा करू शकत नसतात,’ हे आपण कधी समजून घेणार? आम्हाला फक्त राजकीय मलमपट्ट्या नकोत, तर ग्रामीण भागात रस्ते, बाजार, साठवणगृह, शीतगृह आणि पुरवठायंत्रणा हवी आहे. स्वाभिमान नष्ट करणारी माफी आणि अनुदानं नकोत. ग्रामीण बॅंक ही कर्ज देण्याच्या बाबतीत जितकी संवेदनशील आहे, तितकीच ती कर्जवसुलीबाबत जागरूकही आहे; पण कर्जवसुलीतल्या या कठोर शिस्तीचा माझ्यावर फारसा प्रभाव पडला नाही. अगदी सावकारही कठोरपणे कर्जवसुली करतात. ग्रामीण बॅंकेनं कर्ज घेणाऱ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला, ही मला अधिक प्रभावित करणारी गोष्ट होती. कर्जफेडीचा साप्ताहिक हप्ता भरणाऱ्या कर्जदारांच्या रांगेत कुणालाही कर्जदाराचं एक वाक्‍य सहजपणे ऐकायला मिळेल. ते म्हणजे, ‘आम्ही कर्ज घेतलंय, भीक नव्हे...आम्ही कर्जदार आहोत, लाभार्थी नव्हेत...आम्ही अडचणीत आहोत; पण संपलेलो नाहीत...आमच्या अडचणी असल्या तरी आम्ही कर्जाचा हप्ता देणारच, कारण त्यातच आम्हाला समाधान आहे.’ ग्रामीण बॅंकेचा नियम सगळ्यांसाठी आहे, कुणीही त्याला अपवाद नाही. मी एका बैठकीत उपस्थित होतो. तिथं त्यांच्या विभागीय व्यवस्थापकांचं भाषण झालं. मुख्य भर शिस्तीवर होता. तुम्हाला कर्ज हवं असेल तर नियम तुम्हाला पाळावेच लागतील, असं ते सांगत होते. ‘माणसानं कायद्याचं पालन केलं, तरच त्याला स्वर्ग मिळतो,’ असं कुराणातही म्हटलं असल्याचा दाखला त्यांनी दिला; पण पृथ्वीवरच जर स्वर्ग हवा असेल, तर तुमचं भवितव्य तुम्हालाच ठरवावं लागेल. तुमच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्याची तरतूद तुम्हालाच करावी लागणार आहे. या गोष्टी तुम्हाला हव्या असतील, तर तुम्हाला कर्ज घेणं आवश्‍यक आहे. तुमच्या मदतीसाठी ग्रामीण बॅंक सदैव सज्ज आहे; पण त्यासाठी तुम्हाला नियम हे पाळावेच लागतील. तुम्ही नियम पाळले, तरच तुम्हाला कर्ज मिळेल. तुम्ही नियम मोडलेत तर तुम्हाला बॅंकेतून कर्ज मिळणार नाही. आश्‍चर्य म्हणजे, अनुकंपा आणि शिस्त यांचा एक सुंदर समतोल या बॅंकेनं साधला आहे.

मी कधी कधी माझ्या बॅंकेत जाऊन तिथल्या शाखा व्यवस्थापकाशी बोलतो, तेव्हा ते म्हणतात की जर एखादा माणूस एखादं छोटं दुकान चालवत असेल, तर ते त्याच्या प्रामाणिकपणाचं, कौशल्याचं आणि निष्ठेचं प्रतीक मानलं पाहिजे आणि त्यावरून त्याला कर्जासाठी पात्र मानलं पाहिजे. मात्र, खूप वर्षांपूर्वी युनूस यांनी मला सांगितलं होतं, की हे धोकादायक विधान आहे; यातून कर्जाची पक्षपाती पद्धत सुरू होते. आपलं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं ठेवण्याइतके सगळेच जण भाग्यवान नसतात, असं ते म्हणाले होते.  ‘यशवंत, तुला माहीत आहे की टिकून राहण्याचं सामर्थ्य हेच प्रत्येकाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. मी जर तुला आत्ता ढाक्‍याच्या मध्यवस्तीत सोडलं आणि तुझ्या खिशात एक पैसाही नसेल तर अवघ्या ४८ तासात तू गुडघे टेकत शरण येशील; पण गरीब माणूस तसा शरण येणार नाही. तो परिस्थितीचा मुकाबला करील. माझ्या दृष्टीनं टिकून राहण्यासाठी तो जे मार्ग हाताळतो, जो संघर्ष तो करतो, तो त्याच्या कर्ज घेण्याच्या पात्रतेसाठी पुरेसा आहे. बॅंकेनं एवढंच करायचंय, की त्यांच्या या शक्तीचं कर्जाच्या साह्यानं उत्पन्नाच्या स्रोतात रूपांतर करायचं. एवढं तुम्ही करू शकलात तर त्यांचं भविष्य तेच घडवतील. त्यांची कुंडली तेच तयार करतील,’ 

...मी विचारात इतका गढून गेलो होतो, की उषा मला हाक मारत आहे, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आमचे दिवाणजी शंकर यांनी ते माझ्या लक्षात आणून दिलं. ‘वहिनीसाहेब, तुम्हाला बोलावतायत,’ असं ते म्हणाले.

मी तंद्रीतून जागा झालो तेव्हा ती मला म्हणत होती : ‘‘-माझा आवाज ऐकू येतोय का? ती चार खोकी आवरायला तुम्हाला आणखी किती वेळ लागणार आहे?’’‘‘झालंच’’ असं मी खोटंखोटंच सांगितलं आणि हातातल्या फायली शंकरच्या हातात दिल्या. माझ्याकडं गोंधळून बघत ‘यांचं मी काय करू?’ असं तो विचारत होता.

‘‘काही नाही... जाऊ दे’’... म्हणालो.

तो बाहेर गेला आणि त्याच्याबरोबर माझ्या मनातलं विचारांचं काहूरही. माझ्या एका पत्रकारमित्राला मी हा लेख पाठवला. तो वाचून त्यानं विचारलं, ‘तुम्ही परत कधी गंगूबाईच्या झोपडीला भेट दिलीत का?’ मी भेट दिली नव्हती; पण अशी भेट द्यायला पाहिजे, असं मला वाटलं. उषा आणि मी काल तिथं गेलो. ते पठार पूर्वी होतं तसंच होतं आणि दूरवरचं क्षितिजही! डोंगरावर जाणारी वाट आणि तिच्या कडेकडेनं असणारी झाडंही तशीच होती. जाणवलं की फक्त मी बदललो होतो. मी बदललो होतो आणि गंगूबाई आता कुठल्याही बदलाच्या पलीकडं गेली होती. तिच्या झोपडीचे आता फक्त अवशेष उरले होते. केवळ दगडांचा ढिगारा! मी तिच्या आठवणीत क्षणभर सुन्न होऊन तिथं बसलो. मी पूर्वी तिथं आलो होतो. माझं काम केलं होतं आणि निघून गेलो होतो...

पण तिचं काय झालं? मला असं वाटतं, की तिच्या खोलीच्या किल्ल्या बाहेर फेकणाऱ्या परमेश्वराला त्या पुन्हा सापडल्या असतील आणि तिच्या मृत्यूपूर्वी त्यानं त्या तुरुंगाची दारं उघडली असतील. 

मी मनातल्या मनात म्हणालो :

नही आती याद तो महीनों तक नही आती
मगर जब याद आते हैं, तो अक्‍सर याद आते हैं ।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com