नागमणी आणि मंगळबाबा (उत्तम कांबळे)

Article in Saptraga by Uttam Kamble
Article in Saptraga by Uttam Kamble

डॉ.  नरेंद्र दाभोलकर आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या अथक प्रयत्नांतून अखेर जातपंचायतविरोधी कायदा अस्तित्वात आला. ‘नव्या शतकातली मोठी सामाजिक घटना’ असंच वर्णन उद्या इतिहासाची पानं लिहिणाऱ्यांना यासंदर्भात करावं लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. या कायद्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणारी पंचमंडळी तर आरोपी ठरणार आहेतच; पण बैठकीला हजर नसणाऱ्या पंचांनाही शिक्षा होणार आहे. पंचांच्या बैठकीच्या वेळी अशा निर्णयाला पाठिंबा देणारेही शिक्षेस पात्र होणार आहेत. पंचांना शिक्षेबरोबर जो काही आर्थिक दंड होईल, तो बाधित व्यक्तींना भरपाई म्हणून मिळणार आहे. हा कायदा आणखी परिणामकारक व्हायचा असेल, तर बहिष्काराचा निर्णय हा अजामीनपात्र गुन्हाच ठरायला हवा. काळाच्या ओघात, सुधारणांच्या प्रवासात असे बदल होत राहतात, अशी आशा बाळगायला आपल्या राज्यघटनेनं नेहमीच जागा ठेवली आहे. या कायद्याविषयीचा आनंद आणि त्याविषयीची साक्षरता, प्रबोधन करण्यासाठी ‘अंनिस’नं एक मोहीम सुरू केली आहे. जळगावमध्ये अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच एक कार्यक्रम झाला. महाराष्ट्रभर असे कार्यक्रम होऊ घातले आहेत.

ता. २५ जुलैचा कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ‘अंनिस’ला वाहून घेतलेल्या डी. एस. कट्यारे आणि ॲड. भारत गुजर यांच्याबरोबर एका हॉटेलमध्ये नाश्‍त्यासाठी गेलो. ‘उपमा, इडली वगैरे काही मिळणार नाही आणि कूकला सांगूनही ते शक्‍य नाही,’ असं वेटरनं एका झटक्‍यात सांगून टाकलं. आम्ही विकत घेतलेली पाण्याची बाटली - जी वापरलीच नव्हती - परत करून निघणार तोच गल्ल्यावर बसून देवपूजेत मग्न असलेला मालक म्हणाला ः ‘‘का निघालात?’’ आम्ही जे काही घडलं ते सांगितलं. त्यानं वेटरला झापलं आणि ‘रवा आहे का बघ...नसेल तर बाहेरून मागव आणि उपमा करून दे,’ असं सांगितलं. ‘भोवनीच्या वेळी गिऱ्हाईक घालवू नकोस,’ असं काय काय बोलत तो देवपूजेला लागला. मोठ्यामोठ्यानं आरती म्हणू लागला. आम्ही आपापल्या खुर्च्यांत बसलो.

आमची चर्चा अंधश्रद्धा निर्मूलनावर, जादूटोण्यावर पोचली. बोलता बोलता मी नागमण्याचा विषय काढला. नागमणी विकून उद्धार करण्याचा दावा करणाऱ्या कथित बाबांची अनेक प्रकरणं ‘अंनिस’नं बाहेर काढली होती. ती काढण्यात कट्यारे आणि ॲड. गुजर यांचाही पुढाकार होता.

आपलं दारिद्य्र हटवण्यासाठी, झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक ज्या काही भानगडी करतात किंवा त्यांना त्या करायला वेगवेगळे बुवा भाग पाडतात, त्यांपैकी एक नागमणी. या नागमण्याविषयी जगभरात अनेक दंतकथा आहेत; पण त्या वास्तवच असल्याचं समजून त्यांच्या नादाला लागणारे लोक सगळीकडंच मोठ्या प्रमाणात आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्‍ताईनगर तालुक्‍याच्या सीमेवर म्हणजे ‘एमपी’च्या बॉर्डरवरही असे बुवा-बाबा-गारुडी ठाण मांडून आहेत. ‘अंनिस’मुळं काहींची धरपकड झाली. काही पळून इतरत्र गेले. अशा प्रकरणात साक्षीदार-पुरावे गोळा करणं खूप अवघड असतं. जादूटोण्याचे बळी ठरलेलेही प्रतिष्ठेपोटी कायद्याकडं यायला तयार होत नाहीत. खरंतर हाही कायदा महाराष्ट्रातच प्रथम झाला, तोही ‘अंनिस’च्या पुढाकारानं. तरीही अजून बाधितांमध्ये निर्भय वातावरण नाही. नागमण्याच्या बाबतीत खूप मजेशीर घटना घडतात. ‘नागमणी देतो,’ असं सांगणारे बाबा सर्वप्रथम ग्राहक शोधतात. ‘नागमणी जवळ ठेवल्यास बरकत होईल, दुःखमुक्ती होईल,’ याची खात्री देतात. ग्राहकाची आर्थिक ऐपत असेल त्याप्रमाणे नागमण्याचा दर ठरतो. ग्राहक गब्बर असेल तर दर पाच-पंचवीस लाखांत जातो. ग्राहक गरीब असेल, तर तो हजारांपर्यंत खाली उतरतो. ग्राहक तयार झाला की नागमणी देण्यासाठी त्याला दुर्गम भागात आणलं जातं. कुठंतरी पडीक विहिरीत, कुठंतरी जंगलात झुडपाच्या पानावर, खडकावर चकाकणारा नागमणी दाखवला जातो. खूपच मोठा ग्राहक असेल तर एखादा गारुडी आपल्याकडच्या जिवंत नागाच्या फण्यावरचा मणी दाखवतो. अशा मण्याला अर्थातच मागणी आणि किंमतही खूप असते. ‘ओरिजनल मणी’, ‘प्रभावी मणी’ असं त्याचं वर्णन केलं जातं. ‘या मण्याचा उजेड घरातल्या वातावरणात पडला, की गुप्त खजिना शोधता येतो...घरातल्या अन्य पिडा ढुंगणाला पाय लावून पळून जातात’ वगैरे वगैरे सांगितलं जातं...बहुतेक वेळा पाण्यावर तरंगणारा किंवा झोळीत अंगारा-धुपारा देऊन, हळद-कुंकू लावून ठेवलेला मणी दाखवला जातो. अनेक जण झटपट मिळवायच्या संपत्तीला भुलतात. मुठीत नागमणी ठेवून पैशाचा पाऊसही पाडता येतो. अजून बरंच काही करता येतं. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर असल्यानं साहजिकच तिच्या काळजातली उघड आणि गुप्त संपत्तीही तिथंच असणार. मण्याच्या उजेडातच पृथ्वीवरचा व्यवहार चालत असतो. बरेच जण नागमणी मिळवण्यात यशस्वी होतात, म्हणजे तो विकत घेतात. पूर्वी असा प्रयोग मुंगसावर व्हायचा. कारण, ते कुबेराचं वाहन! पृथ्वीवरचे सर्व संपत्तीचे साठे त्यालाच माहीत असतात, या धारणेनं मुंगूस रानात, जंगलात फिरवायचं. ते जिथं थांबून माती उकरेल तिथं खड्डा काढायचा. अजूनही कुठं कुठं हा प्रयोग सुरू असतो. मुंगूस संपत्ती दाखवण्यासाठी नव्हे, तर स्वतःला लपवण्यासाठी कुठंतरी पोकळ जागेवर माती उकरत असतं, हे कळूनही मुंगसामागचा माणसाचा पाठलाग काही थांबलेला नाही. आपण कुबेराचं वाहन आहोत आणि संपत्ती कशाला म्हणतात, हे खरंच मुंगसाला ठाऊक असेल का? पण माणूस आपली तृष्णा वाढवून ती कशातही भरू शकतो. कुणाला कसलंही रूप देऊ शकतो. कारण, तो माणूस आहे.

नागमण्यावर आम्ही खूप वेळ चर्चा करत होतो. ‘नागमण्यामुळं आमची बरकत झाली आणि आम्हाला खजिना सापडला,’ असं सांगणारं अद्याप तरी कुणी भेटलेलं नाही. समजा, त्यांनी मुद्दाम हे लपवलं, असं गृहीत धरलं तरी विकासाची अशी नागबेटं कुठंही दिसत नाहीत. कोर्टात पुराव्याअभावी बाबा सुटतात. अर्थात, सगळेच सुटतात असं होत नाही. एका खटल्यात अडकलेला एक बाबा दुसऱ्या एका बाबाकडं म्हणजे महाराष्ट्रात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या मोठ्या बाबाकडं गेला. ‘काहीही करून या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता करा... पाहिजे तेवढे पैसे (दक्षिणा) देतो,’ असं त्याला म्हणाला. मोठा बाबा प्रसन्न झाला. त्यानं प्रथम आपली झोळी भरून घेतली.

चिमूटभर अंगारा त्याच्या तळहातावर ठेवला. ‘काहीही करून यातला एक कण आपल्या विरोधातल्या वकिलाच्या कोटावर टाक...मी त्याच्या शरीरात प्रवेश करेन आणि मला हवं तसं बोलून तुझी सुटका करेन,’ अशी गॅरंटी या मोठ्या बाबानं दिली. छोट्या बाबानं वकिलाच्या कोटावर अंगारा टाकला की नाही हे कुणाला ठाऊक नाही; पण तो निर्दोष सुटला. मोठ्या बाबानं पुन्हा दावा केला, की ‘मीच त्याच्या (वकिलाच्या) शरीरात प्रवेश करून तुझं काम करून घेतलं आहे.’ खरंतर नागमणी नागाच्या फण्यात नसतो, हेही सगळ्यांना ठाऊक आहे. तरीही नसलेल्या मण्यासाठी हा सगळा जादूटोणा वर्षानुवर्षं सुरू आहे. बाजारात दोन-पाच रुपयांना वेगवेगळे मणी मिळतात. त्यात पाण्यावर पोहणारे, झाडाच्या पानावर बसणारे...असे वेगवेगळ्या प्रकारचे मणी असतात. बऱ्याचदा गारुडीच आपण पकडलेल्या सापाच्या मस्तकावर किंवा चुकून नाग सापडला तर त्याच्या फण्यावर असे बोगस मणी चिकटवून देतो. मग गारुडी मण्यासाठी ग्राहकाच्या समोर नाग मारतो आणि बाबाच्या मदतीनं खोटा मणी विकून टाकतो लाखो रुपयांना...

नागमणी-पुराण बराच वेळ चाललेलं होतं. जिथं दारिद्य्र, निरक्षरता जास्त असते, अशा ठिकाणी कुणीतरी बाबा नागमणी हमखास घेऊन येणार, दारिद्य्रावर अंधश्रद्धेचं आवरण चढवणार हे ठरलेलंच. आपला भारत आता धावतोय ही चांगली गोष्ट आहे. अर्थात, हे धावणं अशा प्रदेशातल्या म्हणजे नागमण्याच्या मागं धावणाऱ्यांनाही दिसायला पाहिजे. अंतराळात तरंगणारे उपग्रहही त्याला दिसायला पाहिजेत. ते जेव्हा केव्हा दिसायला लागतील म्हणजे ज्ञानाचा, विज्ञानाचा, प्रगतीचा स्फोट होऊन त्यांचं सार्वत्रिकीकरण होईल, तेव्हा नागमण्याच्या मागं कुणी धावणार नाही. असो.

***
जळगावहून दुपारीच अमळनेरला पोचलो. यापूर्वी न दिसणारे असंख्य फलक या वेळी शहरात दिसत होते. रस्त्याच्या आजूबाजूला असंख्य खांब होते. ‘श्रीमंगळदेव ग्रहमंदिराकडे’, असं त्यावर लिहिलेलं होतं. मंदिराची दिशा दाखवणारा बाण होता. त्या दिशेनं प्रवास करत मंदिराकडं गेलो. एकदम चकाकणारं, भव्य आणि सुंदर मंदिर दिसलं. मंगळवार हा मंगळबाबाच्या भक्तीचा दिवस. या दिवशी हजारोंची गर्दी इथं होते. २५ रुपयातलं भोजन (महाप्रसाद) घेता येतं. एखाद्या विकसित पर्यटकाच्या थोबाडीत बसेल इतकं सुंदर हे केंद्र आहे. बागा आहेत. झाडी आहे. विशेष म्हणजे, डॉबरमन जातीचा गॅरंटेड कुत्राही इथं विकत मिळतो. मंदिराबाहेर एका टेबलावर हजारो भक्तांनी अभिप्राय लिहिलेली वही आहे. गायक आणि नटांच्या भेटी नोंदवलेल्या आहेत. ‘मंगळमंदिलारा भेट देऊन पिडा टळते,’ असा दावा करणारे भक्तही वहीत आहेत.

अनेकांना आपल्या नावामागं डॉक्‍टर, प्रा., ॲड. या मोठ्या कष्टानं किंवा बिनकष्टानं घेतलेल्या पदव्या आहेत. ‘तुम्हीही काहीतरी लिहा,’ असं मंदिरव्यवस्थापनाच्या सेवेतला एकजण म्हणाला. ‘थोडं घरी जाऊन सविस्तर लिहून पाठवतो,’ असं सांगून सुटका करून घेतली. १३ एकर एवढ्या भव्य जागेत मंगळबाबा विकास पावतोय. मासिक मानधनावर म्हणजे सहा हजार रुपये मासिक वेतनावर राबणारी ६० जणांची टीम इथं आहे. आपापल्या मैत्रिणींसोबत रेंगाळणाऱ्या तरुणांची गर्दी इथं दिसते. ‘मंगळबाबा लवकर लग्न लाव’, असं साकडं घालणाऱ्या तरुणीही दिसतात. कुणी सांगावं, नजीकच्या काळात हेही एक मोठं केंद्र होईल. कुणी सागावं, ते अन्य गाजणाऱ्या देवस्थानांच्याही पुढं जाईल. तयारी तर तशीच दिसतेय. मंदिराची माहिती देणारी पुस्तिका आहे. तीत ‘अंधश्रद्धेला थारा देऊ नका’, अशी विनंती करण्यात आलेली आहे. मंगळाची प्रार्थना करण्यासाठी मंत्र आहे.

धरणी गर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रथम्‌ ।
कुमारम्‌ शक्तिहस्तं च मंगलम्‌ प्रणमाम्यहम्‌ ।।

‘हा मंत्र रोज कितीही वेळा जपावा; माता-भगिनींनी पथ्य पाळावं,’ असा उपदेशही आहे. पृथ्वीपासून सुमारे आठ कोटी किलोमीटरवर असणारा ग्रह अमळनेरमध्ये कसा काय अवतरला, हा प्रश्‍न मनात घेऊनच सानेगुरुजींची कर्मभूमी, तत्त्वभूमी, संस्कारभूमी असलेल्या स्मृतिस्थळाकडं निघालो. सानेगुरुजींच्या अमळनेरमधल्या लेकरांनी एकत्र येऊन २० एकरांच्या जागेवर गुरुजींचं भव्य आणि विविधांगी स्मृतिस्थळ उभारण्याचं काम सुरू केलं आहे. त्याचा प्रारंभ म्हणून सुंदर झाडं लावली जात आहेत. तळ्याच्या खोदकामास प्रारंभ झाला आहे. आठ-दहा वर्षांनी हे स्मृतिस्थळ एक भव्य-दिव्य आणि विचार-संस्कारांचं केंद्र होईल आणि मंगळबाबाची कर्मकहाणी सांगेल, याविषयी मला शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com