ढगांचं निवासस्थान (प्रा. शैलजा सांगळे)

ढगांचं निवासस्थान (प्रा. शैलजा सांगळे)

भारताच्या ईशान्येला जी सात राज्यं आहेत त्यातलं एक राज्य मेघालय. मेघालयाचं सौंदर्य काय वर्णावं! मेघालयातल्या हिरव्यागार टेकड्यांना सदैव ढगांनी आच्छादलेलं असतं, जणू टेकड्यांनी ढगांची ओढणीच पांघरली आहे, असं भासतं. खोलखोल हिरव्यागार दऱ्या, भरपूर पावसामुळं कोसळणारे धबधबे, खळाळत्या नद्या आणि आकाशात ढगांची गर्दी असं दृश्‍य असलेल्या प्रदेशातून प्रवास करताना कधी एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर पोचलो ते कळतसुद्धा नाही. प्रवासाचा शीण तर सोडाच; पण मन निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण पाहून खूप उत्साही आणि आनंदी होतं. इथल्या टेकड्या, धुकं, ढग, हिरवाई आणि एकूणच निसर्गसौंदर्य यामुळं मेघालयाची तुलना युरोपातल्या स्कॉटलंडशी होते आणि त्यामुळंच मेघालयाची राजधानी शिलाँगला ब्रिटिश लोक ‘स्कॉटलंड ऑफ...’ म्हणत असत. या राज्याची सफर आनंददायी होती. 

जगातलं सर्वांत जास्त पावसाचं ठिकाण म्हणजे चेरापुंजी. आता चेरापुंजीजवळच्या मावसिनराय गावातही सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मेघालयाच्या दक्षिणेला असलेल्या बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना बांगलादेशाच्या सपाट प्रदेशात कोणताच अडथळा नसल्यानं ते चेरापुंजीच्या खासी टेकड्यापर्यंत पोचतात आणि तिथं टेकड्यांच्या अडथळ्यामुळं त्यांना १३०० मीटर उंच जावं लागतं. उंचीवर थंड हवामान असल्यानं बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबांत होऊन ढग तयार होतात आणि वारे खासी टेकड्यावर भरपूर पाऊस देतात. वाऱ्यांमध्ये भरपूर बाष्प असल्यानं ढगांचं प्रमाण जास्त असतं आणि मुसळधार पाऊस पडतो. शाळेपासून भूगोलात चेरापुंजीचं नाव वाचलं होतं- ते प्रत्यक्षात पाहण्यातला आनंद वेगळाच होता. 

मेघालयात पर्यटकांचं आवडतं ठिकाण आणि नैसर्गिक आश्‍चर्य म्हणजे ‘लिव्हिंग रूट ब्रिज.’ झाडांच्या मुळ्या एकमेकात अडकून तयार झालेला पूल. हा पूल नैसर्गिकरित्या तयार होत असला, तरीसुद्धा जवळजवळ आणि एका रेषेत असणाऱ्या झाडांची मुळं एकात एक अडकवून त्यांची पुलाप्रमाणं रचना होईल, हे आदिवासी लोक बघतात. या पुलांवरून लोक ये-जा करतात. लाकडी पुलाला ते पर्याय असतात. एक भक्कम पूल तयार व्हायला १५ वर्षं लागतात आणि त्यानंतरही त्यांची वाढ चालूच असते आणि ते अधिकच मजबूत बनतात. काही पुलांना तर शंभर वर्षं झाली आहेत. मेघालयातल्या जंगलातल्या अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांवर असे पूल तयार झाले आहेत. काही ठिकाणी एकावर एक दोन पूल तयार झालेत. त्याला ‘डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज’ म्हणतात. दीडशे वर्षं जुना ‘डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज’ हा केवळ एकमेव नाही, तर चकित  करणारा आहे. रबराच्या झाडांच्या मुळांपासून हे भक्कम पूल होतात. 

मेघालयात भरपूर पाऊस पडत असल्यानं अनेक धबधब्यांच्या सौंदर्याचा आस्वाद पर्यटक घेतात. नौकालीकाई धबधबा, एलिफंट धबधबा, सेव्हन सिस्टर धबधबा इथं पर्यटक आवर्जून भेट देतातच. चेरापुंजी इथला नौकालीकाई धबधबा हा भारतातला सर्वांत उंच धबधबा असून, १११५ फूट उंचीवरून इथं पाणी पडतं. धबधब्याच्या पायथ्याशी खडक फुटून मोठं तळं तयार झालं आहे आणि त्याचं पाणी हिरवं आहे. तिथल्या खडकातल्या द्रव्यांमुळं हिरवा रंग दिसत असावा. बऱ्याचदा ढगांमुळं हा धबधबा पूर्ण दिसत नाही. मात्र, वरपासून खालपर्यंत धबधबा बघायला मिळाला हे आमचं अहोभाग्यच. मेघालयातला दुसरा प्रेक्षणीय धबधबा म्हणजे ‘एलिफंट धबधबा.’ मेघालयाची राजधानी शिलाँगपासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याच्या एका बाजूला असलेल्या हत्तीच्या आकाराच्या खडकामुळं ब्रिटिशांनी त्याला एलिफंट धबधबा असं नाव दिलं; पण १८९७च्या भूकंपात तो खडक फुटला. त्याचे तुकडे होऊन ते वाहून गेले. आता या धबधब्याला ‘थ्री स्टेप्स धबधबा’ असंही म्हणतात. धबधब्याच्या वरच्या दोन स्टेप्स दिसत नाहीत. कारण त्या गर्द झाडीत आहेत; पण तिसरी स्टेप मात्र पर्यटकांना बघायला मिळते. या धबधब्याजवळ जाण्यासाठी बाजूला पायऱ्या बांधल्या आहेत. त्यामुळं पर्यटक धबधब्याजवळ जाऊन अंगावर तुषार घेण्याचा आनंद लुटू शकतात. पांढरं शुभ्र दुधासारखं फेसाळतं पाणी काळ्याकभिन्न खडकांच्या पार्श्‍वभूमीवर अधिक उठून दिसतं. मॉसमई खेड्यापासून १ किलोमीटर अंतरावर असलेला ‘सेव्हन सिस्टर धबधबा’ हा आगळावेगळा. ३१५ मीटर उंचीवरून जवळजवळच असलेल्या सात वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी पडतं. पूर्वेकडच्या सात राज्यांचं प्रतीक म्हणून सात ठिकाणांहून पाणी पडतं, असं तिथले लोक मानतात. म्हणूनच ते त्याला ‘सेव्हन सिस्टर फॉल’ म्हणतात. पावसाळ्यातच फक्त सातही ठिकाणाहून पाणी पडतं आणि त्यावरून ढग जात असतात. त्यामुळे जून ते सप्टेंबर या काळात हा धबधबा बघण्याची मजा औरच. 

मॉसमई खेड्याजवळच चुनखडक पाण्यात विरघळून तयार झालेल्या गुहा आहेत. त्यांना ‘मॉसमई गुहा’ म्हणतात. गुहांचं प्रवेशद्वार खूपच अरुंद आहे. तिथून आत गेल्यावर पाणी टपकत असतं आणि त्यामुळंच अधोगामी म्हणजे छताकडून तळाकडं आणि ऊर्ध्वगामी म्हणजे गुहेच्या तळाकडून छताकडे चुनखडकाचे संचय होऊन लवणस्तंभ तयार झालेत. काही ठिकाणी अधोगामी आणि ऊर्ध्वगामी लवणस्तंभ जुळल्यानं खांब तयार झालेत. गुहेच्या मध्यभागी खूपच अंधार आहे; पण टॉर्च किंवा मोबाईलचा उजेड पडताच ते चुनखडक स्फटिकासारखे चमकतात. चुनखडकावर पाण्याची रासायनिक प्रक्रिया झाल्यानं गुलाबी, पिवळा, राखाडी अशा विविध रंगांत तयार झालेले विविध आकार गुहेत बघायला मिळतात. 

खासी टेकड्यांमध्ये असलेलं मावलीनाँग खेडं स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. आशिया खंडातलं सर्वांत स्वच्छ गाव म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळं जगभरातून अनेक पर्यटक या खेड्याला भेट देतात. या गावात सगळा ओला कचरा बांबूनं बनवलेल्या कचरापेटीत जमा करून त्याचं सेंद्रीय खत बनवलं जातं. प्लॅस्टिक पिशव्या आणि सार्वजनिक धूम्रपानाला पूर्वीपासूनच बंदी आहे. कुठंही उघडी गटारं नाहीत. ड्रेनेजलाइन जमिनीखाली आहेत. घरोघरी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणं आणि गावाच्या स्वच्छतेची प्रत्येक नागरिकानं जबाबदारी घेणं हा इथला अलिखित नियम आहे. पर्यटकांसाठी सर्वत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय आहे. तिथं पाणी भरपूर असून, ती स्वच्छ आहेत. त्यांची स्वच्छता त्या स्वच्छतागृहाजवळच्या घरांतले लोक ठेवतात हे विशेष. 

शिलाँग ही मेघालयाची राजधानी आणि थंड हवेचे ठिकाण. शिलाँगमध्ये भारतातलं फुलपाखरांचं एकमेव खासगी म्युझियम आहे. इथं अनेक रंगांची आणि आकाराची फुलपाखरं बघायला मिळतात. त्यातली काही फुलपाखरं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तिथं फुलपाखरांचं पुनरुत्पादन केंद्र असून, तिथून जगात सर्वत्र फुलपाखरांची अंडी आणि कोश यांची निर्यात होते. शिलाँगमधलं डॉन बास्को म्युझियम म्हणजे ईशान्य भारतातली आदिवासी जमातीतली समृद्धी आणि विविधता दाखवणारा आरसाच आहे. आशिया खंडातलं हे सर्वांत जुनं म्युझियम मानलं जातं. हे म्युझियम म्हणजे डोळ्याला मेजवानी आणि मेंदूला ज्ञानाचा खजिनाच. आदिवासींचं राहणीमान, जीवनशैली, पेहराव, समजुती, इतिहास, पारंपरिक वाद्यं, शस्त्रं, हस्तकला, दागदागिने, परंपरा, सणवार इत्यादींबद्दल इथं सखोल माहिती मिळते. सात मजली इमारतीत ५६,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं आणि १५,१५४ चौरस फूट आकारमानाची भिंत डिस्प्लेसाठी असलेलं, हे जगातल्या मोजक्‍या म्युझियम्सपैकी एक. त्याचे सात मजले ईशान्य भारतातल्या सात राज्यांचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. त्याची वास्तुकलासुद्धा आगळीवेगळी आहे. इमारतीचा आकार षटकोनी आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांतल्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन या इमारतीतल्या १७ दालनांत होतं. शिलाँगच्या उत्तरेला १५ किलोमीटर अंतरावर उमाईम सरोवर आहे. उमाईम नदीवर धरण बांधून हे सरोवर तयार केलंय. त्याचा विस्तार २२२० चौरस मीटर आहे. वॉटर सायकल, वॉटर स्कूटर, बोटिंग, कयाकिंग इत्यादी स्पोर्टससाठी ते प्रसिद्ध आहे. परिसरातल्या हिरव्यागार खासी टेकड्या, वरती निळं आकाश, खाली चमचमतं पाणी आणि पाण्यात पडणारं झाडांचं आणि आकाशाचं प्रतिबिंब यामुळं या सरोवराचं सौंदर्य अवर्णनीय आहे. 

मेघालय राज्याच्या पश्‍चिमेला आणि दक्षिणेला बांगलादेशाची सीमारेषा आहे. मेघालयाच्या जैतिया जिल्ह्यात बांगलादेशाच्या सीमेजवळचं गाव दावकी. तिथं दावकी-तामाबिल ही भारत-बांगलादेश सीमारेषा आहे आणि भारताच्या सीमेवर प्रवेशालाच कमान आहे. भारताच्या दोन जवान तरुणी तिथं बंदूक घेऊन पहारा देत होत्या. त्यांच्याकडं बघून अभिमान वाटला. बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर उमगोट नदी आहे. ती दोन देशांतली नैसर्गिक सीमारेषा आहे. या नदीत भारतीय आणि बांगलादेशाचे लोकसुद्धा बोटिंग करतात. उमगोट नही ही आशियातली सर्वांत स्वच्छ नदी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचं पाणी इतकं स्वच्छ आहे, की तळाचे दगडगोटे मोजता येतात. अशा स्वच्छ नदीतल्या बोटिंगचा आनंद वेगळाच होता. आम्ही बोटिंग करून आलो, तेव्हा साडेपाच वाजले होते आणि सर्वत्र अंधार पडला होता. नदीपलीकडे दिवे लागले आणि बांगलादेशाची दाट वस्ती दिसू लागली. इथं सकाळी साडेपाच वाजता उजाडतं आणि सायंकाळी साडेपाच वाजता अंधार पडतो. 

मेघालयात संगीत आणि नृत्य हे जीवनाचं मुख्य अंग आहे. गारो, खासी, जैतिया या तिन्ही आदिवासी जमातीचे लोक गायन आणि नृत्यात प्रवीण असतात. कानाला गोड वाटणारी गीतं, पारंपरिक बांबूची वाद्यं आणि विशिष्ट लय हे त्यांच्या नृत्याचं वैशिष्ट्य. मेघालयात नृत्य कोणत्याही बंदिस्त हॉलमध्ये करत नाहीत, तर मोकळ्या मैदानात आकाशाखाली करतात. पारंपरिक वेशभूषा हे इथल्या सर्व जमातींचं वैशिष्ट्य. त्यांच्या जमातीची ओळख वेशभूषेवरूनच होते. गारो महिला कमरेभोवती कापड गुंडाळतात, त्याला डाकमांडा म्हणतात. त्याला सहा ते दहा इंचांची बॉर्डर असते आणि त्या बॉर्डरवर पानाफुलांचं डिझाईन असतं. डाकमांडावर त्या लांब ब्लाऊज घालतात. खासी महिला कमरेभोवती कापड गुंडाळतात. ते खाली घोट्यापर्यंत असतं. त्याला जैनसेन म्हणतात. त्यावर लांब ब्लाऊज व सुती शाल घेतात. जैतिया महिला वेल्वेटचे ब्लाऊज आणि लांब स्कर्ट घालतात आणि चौकडीचं डिझाईन असलेल्या कापडानं डोक्‍याला गुंडाळतात. महिलांच्या सर्व वेशभूषेवर पानं, फुलं, निसर्गातले देखावे यांचं डिझाईन असतं. गडद रंगाचा वापर खूप असतो. पुरुष लुंगीसारखं सुती कापड गुंडाळतात. वर जाकीट आणि पागोटं घालतात. आज संपूर्ण जगात पाश्‍चात्य संस्कृतीचा आणि वेशभूषेचा प्रभाव असताना मेघालयाच्या लोकांना मात्र पारंपरिक वेषात वावरण्याची लाज वाटत नाही. उलट त्यांना त्याचा अभिमान वाटतो. पारंपरिकता आणि संस्कृती याचं जतन कसे करायचं, हे या राज्यातल्या लोकांकडून भारतीयांनी शिकायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com