प्रज्ञा, करुणा व शील

मिलिंद बोकील
बुधवार, 10 मे 2017

'प्रज्ञा, करुणा आणि शील' ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही अत्यंत महत्त्वाची अशी मूल्यं आहेत. त्यांचा नेमका अर्थ विशद करणारा लेख. आज साजऱ्या होत असलेल्या बुद्धपौर्णिमेनिमित्त.

माणूस म्हटला की त्याला बुद्धी असणार, हे ओघानेच आले. त्यातून ज्याला तीव्र बुद्धी असते किंवा जो बुद्धिवान मानला जातो, त्याला सामाजिक व्यवहारात विशेष स्थान असते. पण बुद्धीपेक्षाही एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे प्रज्ञा. वरवर पाहता या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे असे वाटेल; पण प्रत्यक्षात ते तसे नाही. प्रज्ञा म्हणजे सम्यक बुद्धी. अशी बुद्धी, की जी सर्व गोष्टींचा समग्रपणे विचार करू शकते. एवढेच नाही तर, ती सर्व गोष्टींकडे समदृष्टीने पाहते. नेहमीची जी बुद्धी आहे, ती एकांगी किंवा एकारलेली असू शकते. तिला अमुक एका विषयाचे चटकन्‌ आकलन होऊ शकेल; पण तो विषय ज्या व्यापक समष्टीमध्ये सामावलेला आहे, त्याचे आकलन प्रज्ञाच करू शकते.

बुद्धी तीव्र असते, तर प्रज्ञा विशाल. बुद्धीमुळे ज्ञान प्राप्त होते, तर प्रज्ञेमुळे सुज्ञता येते. दुसरी गोष्ट अशी, की नेहमीच्या बुद्धीला विकार घेरू शकतात. त्या विकारांनी म्हणजे मद, मोह, लोभ, माया, मत्सर अशा अवगुणांनी ती दूषित होऊ शकते. प्रज्ञा मात्र विकारांच्या पलीकडे, विकारमुक्त अशी असते. विकार तिला बाधित करू शकत नाहीत. त्या अर्थाने निर्मल बुद्धी म्हणजे प्रज्ञा. पुढची गोष्ट म्हणजे बुद्धी ही चंचल किंवा अस्थिर असू शकते, प्रज्ञा मात्र स्थिर आणि अचल असते. बुद्धी मानवी मनाला चंचल करते, तर प्रज्ञेमुळे मन स्थिरावते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रज्ञा ही कल्याणमयी असते. नेहमीची बुद्धी ही कल्याणकारी असेलच असे नाही. त्या बुद्धीचा वापर दुष्ट, विनाशकारी आणि हिंसक मार्गांसाठी होऊ शकतो. प्रज्ञा मात्र सुष्ट, अविनाशी आणि अहिंसक अशीच असते.

नेहमीच्या व्यवहारात आपण सहानुभूती हे मूल्य मानतो. दुसऱ्याविषयी सहानुभूती ठेवली तरी पुरे, अशी आपली समजूत असते. याच्याशीच निगडित भावना म्हणजे दया. पण सहानुभूती किंवा दया यांच्या पलीकडेही एक मूल्य आहे, ते म्हणजे करुणा. आता कोणाच्याही मनात असे येईल, की निव्वळ सहानुभूती किंवा दयाभाव पुरेसा नाही का? करुणा कशासाठी हवी? सहानुभूती आणि करुणा यामध्ये काय फरक आहे? यामध्ये फरक असा आहे, की करुणेमध्ये कृती ही अध्याहृत म्हणजे सामावलेली असते. सहानुभूती किंवा दया या मनात येणाऱ्या भावना आहेत; पण करुणा त्या भावनांचे रूपांतर सेवेमध्ये करते. दुःखितांची किंवा पीडितांची जर प्रत्यक्ष सेवा केली, तर ती करुणा. नुसती मनात दयेची भावना आली एवढे पुरेसे नाही, तर त्या भावनेला अनुसरून सेवेची कृतीही व्हायला पाहिजे. तशी कृती झाली तरच दुःख किंवा वेदना दूर होऊ शकतात. म्हणून सहानुभूती व दयेपेक्षा करुणा मोठी आहे.

दैनंदिन व्यवहारात आपण चारित्र्य हे मूल्य मानतो. माणसाचे चारित्र्य स्वच्छ असले पाहिजे अशी आपली इच्छा असते. सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तींचे तर ते असायलाच हवे, अशी अपेक्षा असते. पण, चारित्र्याहूनही मोठे असे मूल्य आहे, ते म्हणजे शील. चारित्र्य आणि शील यांमध्ये काय फरक आहे? चारित्र्य हा अंगभूत गुण आहे; पण शील ही आचरणातून प्रत्यक्षरीत्या व्यक्त होणारी गोष्ट आहे. त्या अर्थाने तो नुसता गुणधर्म नाही, तर आचारधर्म आहे. आपण प्रत्यक्ष व्यवहारात कसे वागतो, यावरून आपले शील काय आहे ते दिसते. चारित्र्य ही अकर्मक गोष्ट आहे. स्वच्छ, शुद्ध चारित्र्य ही कृतिप्रवण गोष्ट असतेच असे नाही. शीलाचे मात्र तसे नाही. शील ही कृतीतून दिसणारी आणि कृतीला प्रवृत्त करणारी गोष्ट आहे. त्यात वृत्ती आहे, तसेच प्रवृत्तीही आहे. चारित्र्यवान मनुष्य हा कोणतीही कृती न करता चारित्र्यवान राहू शकतो; पण शीलवान मनुष्य हा कृतीवीर असतोच. कारण शीलाची कसोटी ही कृतीतूनच लागत असते.

अशा तऱ्हेने प्रज्ञा, करुणा व शील या गोष्टी बुद्धी, सहानुभूती व चारित्र्य यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि त्यांच्याही पलीकडे जाणाऱ्या आहेत. प्रज्ञा बुद्धीपेक्षा विशाल आहे; पण निव्वळ प्रज्ञा असून उपयोगी नाही, तिला करुणेची जोड पाहिजे. तसेच, निव्वळ प्रज्ञा व करुणा असून पुरणार नाही, तर ती व्यक्ती शीलवंत असली पाहिजे आणि शीलयुक्त कृती करणे हा तिचा आचारधर्म असला पाहिजे.
आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा, करुणा व शील यांचा संगम असला पाहिजे, हाच बुद्धपौर्णिमेच्या (10 मे) निमित्ताने लक्षात ठेवण्याचा संदेश आहे.