ओरडाही बसला; शाबासकीही मिळाली! (मिलिंद रायकर)

मिलिंद रायकर
रविवार, 9 एप्रिल 2017

किशोरीताईंची आणि माझी ओळख १९९६ पासूनची. त्या वर्षी आम्ही पंडित डी. के. दातार या माझ्या गुरूंचा सत्कारसोहळा आयोजित केला होता. तो सत्कार किशोरीताईंच्या हस्ते झाला. तत्पूर्वी, दूरदर्शनवर व्हायोलिनवादनाचा माझा कार्यक्रम दाखवला जाणार होता.

किशोरीताईंची आणि माझी ओळख १९९६ पासूनची. त्या वर्षी आम्ही पंडित डी. के. दातार या माझ्या गुरूंचा सत्कारसोहळा आयोजित केला होता. तो सत्कार किशोरीताईंच्या हस्ते झाला. तत्पूर्वी, दूरदर्शनवर व्हायोलिनवादनाचा माझा कार्यक्रम दाखवला जाणार होता.

‘तुम्ही माझा हा कार्यक्रम पाहावा,’ अशी विनंती मी किशोरीताईंना फोनवरून केली. ताईंनी कार्यक्रम पाहिला आणि नंतर मला म्हणाल्या ः ‘तू अतिशय सुंदर वादन केलंस. अतिशय सुरेल वाजवतोस. कधीतरी तू मला भेटायला ये.’ त्या वेळी या सत्कारसोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी तिथं प्राध्यापक केशव परांजपेही उपस्थित होते. त्यांना त्या म्हणाल्या ः ‘हा मुलगा व्हायोलिन खूप गोड वाजवतो’ आणि मग मला म्हणाल्या ः ‘तू माझ्याकडं शिकायला ये.’ ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती आणि त्या संधीचं मी सोनं केलं. मी त्यांच्याकडं शिकायला जाऊ लागलो.

मी त्या वेळी शाळेत शिकवत असे. ती अडचण मी ताईंना सांगितली. तर त्या म्हणाल्या ः ‘‘ठीक आहे. तू रविवारचा येत जा.’’ मी दर रविवारी त्यांच्याकडं सकाळी जायचो. यादरम्यान आणखी एक अडचण होती...याच वेळी दातारसाहेबांकडंही माझं शिक्षण सुरू होतं; पण दातारसाहेबांनीही मोठ्या मनानं ताईंकडं शिकायला जायची परवानगी मला दिली. अशा प्रकारे दोन महान गुरू मला लाभले. तेव्हापासून आतापर्यंत माझं शिक्षण सुरूच होतं.

१९९७ मधली गोष्ट. मी रियाजाला बसलो असताना मला फोन आला. तो ताईंचा फोन होता. त्यांनी मला विचारलं ः ‘माझ्याबरोबर येशील का? आपल्याला दिल्लीत राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळी कार्यक्रम करायचा आहे.’ साहजिकच मी ‘हो’ म्हणालो. त्यांनी लगेच माझी तिकडं जाण्यासंदर्भातली सगळी व्यवस्था केली आणि अशा प्रकारे माझा ताईंबरोबरचा पहिला कार्यक्रम झाला. मी ताईंकडं शिकावं, अशी माझ्या वडिलांची तीव्र इच्छा होती. मात्र, माझ्या इच्छेत त्या वेळी तेवढ्या तीव्रतेचा अभाव होता. माझे वडील हार्मोनिअमवादक होते. ते मला म्हणायचे ः ‘जर तुला व्हायोलिन वाजवायचं असेल, तर त्यातून किशोरीताईंसारखे स्वर वाजले पाहिजेत. स्वर किशोरीताईंसारखे आणि वादन दातारांसारखं असं झालं पाहिजे.’ वडिलांच्या आग्रहापोटी मी ताईंकडं जायचो. कारण, सुरवातीला मला ताईंबद्दल आदरयुक्त भीती होती. ‘त्या खूप कडक आहेत,’ असं मी ऐकून होतो; पण प्रत्यक्षात तसं अजिबातच नाही, हे माझ्या अनुभवाला आलं. ताई फणसासारख्या होत्या. बाहेरून कडक आणि आतून गऱ्यासारख्या गोड. ताईंनी मला एवढं प्रेम दिलं आहे, की ते शब्दात सांगता येणार नाही.

१९९७ च्या कार्यक्रमानंतर माझी त्यांच्याबरोबर तालीम सुरू झाली. त्या एकदा जगजितसिंग यांचा कार्यक्रम ऐकायला गेल्या होत्या. त्या कार्यक्रमात त्यांनी जगजितसिंग यांच्या साथीदाराचं व्हायोलिनवादन ऐकलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मला म्हणाल्या ः ‘तो वादक व्हायोलिन इतकं गोड वाजवत होता, की मला क्षणाक्षणाला तुझी आठवण होत होती. ते ऐकून मला असं वाटलं, की तुलाही मी माझ्याबरोबर साथसंगतीला घेतलं पाहिजे. तू वाजवशील का?’ अर्थातच लगेचच होकार दिला. त्यानंतर आमचा रियाज सुरू झाला. त्यांची गायकी समजून घेऊन ती शैली आत्मसात करायला मला खूप वेळ लागला. तरी दातारसाहेबांनी मला जे शिकवलं होतं, त्यामुळे ते सोपं होतं. पुढं पुढं मी संध्याकाळीही त्यांच्याकडं रियाजाला जाऊ लागलो. सन १९९९ मध्ये पंडित बिरजूमहाराज, किशोरीताई आणि झाकीर हुसेन यांचा ‘एनसीपीए’मध्ये एक कार्यक्रम होता. साथीला येण्याविषयी ताईंनी मला विचारलं. लगेच होकार दिला आणि ‘मला सांभाळून घ्या’ असं त्यांना सांगितलं. मग रोज सकाळ-संध्याकाळ आमचा रियाज सुरू झाला. त्याआधी अनेक छोटे छोटे कार्यक्रम मी केले होते; पण तो माझ्या आयुष्यातला ताईंबरोबरचा मोठा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमानंतर मग माझा ताईंबरोबर साथसंगीताचा मोठा प्रवास सुरू झाला. त्यातही त्यांनी माझी तऱ्हतऱ्हेने परीक्षा घेतली. मी कोणत्याही कार्यक्रमात ताईंच्या उजव्या हाताला बसायचो; पण एकदा तिरुअनंतपुरमला कार्यक्रम होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं ः ‘तू तिकडं नको; माझ्या डाव्या बाजूला बस.’ पहिल्यांदाच डाव्या बाजूला बसून वाजवायचं म्हटल्यावर माझ्यावर तणाव आला. कारण, जबाबदारी वाढली! पडदा उघडला. एरवी नेहमी ताई गाणं सुरू करतात; पण या वेळी मला म्हणाल्या ः ‘तू वाजव.’ धडकी भरली; पण काय करणार? मी पहिला नमस्कार केला आणि नेहमीचे आलाप सुरू केले. पहिल्याच सुराला मला ताईंनी दाद दिली. त्या ‘वाह’मुळं माझा आत्मविश्‍वास भरपूर वाढला. तो कार्यक्रम झाल्या झाल्या ताईंनी मला विचारलं ः ‘तू लंडनला येशील का?’ लगेच ‘हो’ म्हटलं आणि मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर परदेशात कार्यक्रम केला. तिकडंही त्यांनी सुरवात मलाच करायला सांगितली. अशा रीतीनं विविध प्रकारे माझी परीक्षा त्यांनी घेतली. रियाज करताना ‘प्रत्येक जागा बरोबर आलीच पाहिजे; का येत नाही?’ असं विचारून त्यासंदर्भात विविध प्रयोग ताई करायला लावायच्या. ती जागा येईपर्यंत कटाक्षानं त्यांनी माझ्याकडं लक्ष दिलं.

-माझ्या घरच्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. माझं लग्न झालं तेव्हा त्यांनी माझ्या बायकोला छानपैकी साडी दिली. माझ्या लहान मुलाला त्यांनी खेळवलं...प्रसंगी त्याला भरवलंही!

आम्ही लंडनला गेलो होतो, तेव्हा माझ्या डोक्‍यावर कर्ज होतं. माझं कर्ज लवकर फिटावं म्हणून त्यांनी मला त्या कार्यक्रमाची बिदागीही जास्त दिली होती. त्यावेळी त्या मला म्हणाल्या होत्या ः ‘हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तुझ्या डोक्‍यावर कर्ज आहे, हे मला माहीत आहे. तुझ्या डोक्‍यावरचा तो बोजाही कमी होईल.’

ताईंचा जो दरारा होता, तेवढाच फक्त लोकांना माहीत असतो. त्यांच्या चांगल्या गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत. २०१५ मध्ये ‘गुरुवंदना’ नावाचा माझा अल्बम बाजारात आला. तो अल्बम मला ताईंना समर्पित करायची इच्छा होती. तसं मी त्यांना सांगितले. ‘तसं केलं तर ते तुम्ही स्वीकाराल का?’ असं विचारल्यावर त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी मला विचारलं ः ‘काय वाजवणार तू?’ म्हणालो ः ‘रागेश्री वाजवण्याचा विचार आहे.’ तर म्हणाल्या ः ‘छान. मी तुला शिकवते.’ मग परत आमची तालीम सुरू झाली. कारण २०१० च्या सुमाराला माझे कार्यक्रम वाढल्यानं मी त्यांच्याकडं रियाजाला रोज जाऊ शकत नव्हतो; पण ताईंबरोबर कार्यक्रमाला मात्र जरूर जात असे. त्या अल्बमसाठी मला त्यांनी रागेश्री, बसंती केदार हे दोन राग शिकवले. त्यांनी बसंती केदारची नवीन बंदिश तयार केली. त्या अल्बमध्ये त्यांच्या विनंतीनुसार मी त्यांचं ‘म्हारो प्रणाम’ हे भजनही वाजवलं. त्यांनी या अल्बमसाठी खूपच मदत केली; अगदी तो बाजारात येईपर्यंत. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी लागणाऱ्या शाली आणि पुष्पगुच्छही त्यांनी प्रेमानं मला देऊ केले होते.
माझा मुलगाही नशीबवान ठरला...त्यालाही थोडं का होईना शिक्षण ताईंकडून मिळालं. त्याला कसं शिकवावं, हेही ताईंनी मला सांगितलं. आम्ही तयारी करताना ताईंचा ओरडा जसा आम्हाला बसला, तशीच त्यांच्या शाबासकीची थापही पाठीवर पडलेली आहे. आता इथून पुढं कौतुकाची अशी थाप पाठीवर पडणार नाही...!

Web Title: milind raikar write article on kishori amonkar in saptarang