समिट अटेंप्टचा क्षण आला (मिशन एव्हरेस्ट)

उमेश झिरपे
शुक्रवार, 19 मे 2017

गेले दोन दिवस बरेच तणावाखाली गेले, कारण अंतिम चढाईसाठी सज्ज झाल्यानंतर ती पुढे ढकलावी लागते तेव्हा तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात. अर्थात निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर दडपण येत नाही. मी आणि विशाल कडूसकर म्हणूनच निश्चींत होऊन चढाईसाठी रवाना झालो आहोत

एव्हेरस्ट परिसरातील हवामान यंदा वेगळीच कसोटी पाहते आहे. गेले तीन दिवस हवामानाचे वेगवेगळे अहवाल प्रतिकूल आल्यामुळे आम्ही समिट अटेंप्टसाठी रवाना झालो नव्हतो. अखेरीस हा क्षण शुक्रवारी उजाडला. सायंकाळी बेस कँपवरील टेंटमध्ये पुजा-आरती करून आम्ही रवाना झालो आहोत. 17 तारखेला रात्री रवाना होण्याचा आमचा मानस होता, पण त्यादिवशी दुपारी अचानक प्रतिकूल अहवाल आले. साधारणपणे स्विस आणि अमेरिकन हे दोन अहवाल इथे ग्राह्य धरले जातात. यंदा नेपाळ सरकारने सुद्धा अहवाल जारी करण्यास सुरवात केली आहे. आठ हजार पेक्षा जास्त उंची असलेल्या सर्व शिखरांच्या परिसरातील हवामानाचे अद्यवात अहवाल जारी केले जातात. सर्वच अहवालांमध्ये गेले दोन दिवस प्रतिकूल भाकित वर्तविण्यात येत होते. बेस कॅम्पवर भारतीय नौदल, ओएनजीसी अशा इतर भारतीय पथकांचाही समावेश आहे. नौदलाच्या पथकाचे लिडर कुलकर्णी हे नाशिकचे आहेत. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

आम्ही 17 तारखेला रवाना झालो नाही हे योग्यच ठरल्याचे लवकरच स्पष्ट झाले. 17 व 18 तारखेला कँप दोन किंवा आणखी वरपर्यंत चढाई केलेल्या बऱ्याच गिर्यारोहकांना खाली परत यावे लागले. काही जण साऊथ कोलमध्ये अडकले होते. अनेक गिर्यारोहकांचे वरच्या कँपवर लावण्यात आलेले टेंट फाटले.

हवामानाच्या अहवालांचा अभ्यास करणे आणि चढाईची रुपरेषा आणि एकूणच नियोजन ठरविणे सोपे नसते. 2012 मध्ये एव्हरेस्ट मोहीम हाती घेताना आम्ही सखोल नियोजन केले. त्यात हवामानात डोके घालू शकतील अशी क्षमता काही सदस्यांमध्ये निर्माण व्हायला हवी यावर कटाक्ष होता. त्यासाठी भूगोलाचा प्राध्यापक अविनाश कांदेकर, गणेश मोरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी गणेशच्या आम्ही संपर्कात आहोत. 

गेले दोन दिवस बरेच तणावाखाली गेले, कारण अंतिम चढाईसाठी सज्ज झाल्यानंतर ती पुढे ढकलावी लागते तेव्हा तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात. अर्थात निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर दडपण येत नाही. मी आणि विशाल कडूसकर म्हणूनच निश्चींत होऊन चढाईसाठी रवाना झालो आहोत. बेस कँपवर अजित ताटे आणि डॉ. सुमित मांदळे यांच्या संपर्कात आम्ही राहू. त्यांच्यामार्फत तुमच्याशी संवाद साधत राहीन. आमच्या मोहीमेला यश यावे म्हणून आपल्या शुभेच्छांची आवश्यकता आहे.

(क्रमशः)