मिशन एव्हरेस्ट

उमेश झिरपे
गुरुवार, 11 मे 2017

पुणेस्थित गिरीप्रेमी संस्थेने 2012 मध्ये एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखराची महत्त्वाकांक्षी नागरी मोहीम तडीस नेली. एका क्‍लबच्या एका पथकातील एका मोहिमेत आठ जणांनी एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर 2013 मध्ये आणखी तीन जणांनी एव्हरेस्टचे स्वप्न साकार केले. या दोन्ही मोहीमांचा लीडर उमेश झिरपे याने यंदा एव्हरेस्टचे मिशन हाती घेतले आहे. त्याशिवाय तरुण गिर्यारोहक विशाल कडुसकर हा सुद्धा एव्हरेस्टवीर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. यंदाचा एव्हरेस्ट मोसम अंतिम टप्यात आला आहे. या मोहिमेची तसेच एव्हरेस्ट मोसमातील महत्त्वाच्या घडामोडींची रोजनिशी आजपासून सुरू करीत आहोत.

प्रतिकूल हवामानात प्रतीक्षा वेदर विंडोची
जगातील सर्वोच्च उंचीचे एव्हरेस्ट शिखर हे गिर्यारोहकांसाठी ऑलिंपिक आहे. प्रत्येक उदयोन्मुख क्रीडापटू ऑलिंपियन बनण्याचे स्वप्न पाहतो. त्याचप्रमाणे प्रत्येक गिर्यारोहकाला एव्हरेस्टवीर बनण्याचा ध्यास असतो. गेल्या तीन वर्षांतील प्रतिकूल घडामोडींनंतर यंदाचा एव्हरेस्ट मोसम अंतिम टप्यात आला आहे. 2014 मध्ये हिमप्रपात, तर 2015 मध्ये भूकंपाचे धक्के बसले. मी गेली सहा वर्षे किमान एव्हरेस्ट बेस कॅंपपर्यंत येत आहे. यंदा मला ठळकपणे जाणवलेला बदल म्हणजे हवामान. तसे पाहिले तर एव्हरेस्ट बेस कॅंप गाठण्यासाठी 17 हजार 600 फुटापर्यंत ट्रेकिंग करावे लागते. यात नामचे बाजारच्या तीव्र उंचीच्या चढाईचा समावेश असतो. लुक्‍लापासून सुरू झालेला ट्रेक पुढे सरकत जातो तशी हवा विरळ होत जाते. ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असते. नुसता एव्हरेस्ट बेस कॅंपचा ट्रेक हा ट्रेकरच्या तंदुरुस्तीची कसोटी पाहणारा असतो. यात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मनोधैर्याचाही कस लागतो.

2012 मधील ऐतिहासिक यशानंतर मी 2013 मध्ये गणेश मोरे, भूषण हर्षे आणि आनंद माळी यांच्या साथीत एव्हरेस्ट मोहीम आखली होती. तेव्हा ऐन मोक्‍याच्या क्षणी ऑक्‍सिजन सिलिंडर कमी पडल्यामुळे आणि इतरांना संधी मिळावी म्हणून मी साउथ कोलमधून परत आलो होतो. त्यानंतर 2014 मध्ये हिमप्रपातामुळे मला एव्हरेस्ट मोहीम अर्धवट सोडावी लागली. मग 2015 मध्ये भूकंपाचा धक्का बसला. 2014 मध्ये ज्यांनी परमीट काढले होते, त्याची मुदत या दोन दुर्घटनांमुळे वाढविण्यात आली. ती यंदा संपत आहे. त्यामुळे यंदाच्या मोहिमेसाठी मी कसून तयारी केली. माझ्या साथीला गिरीप्रेमीमधील तरुण गिर्यारोहक विशाल कडुसकर आहे.

आम्ही कॅंप 2 च्या पायथ्यापर्यंत जाऊन आलो आहोत. वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया (ऍक्‍लमटायझेशन प्रोसेस) पार पडली आहे. माझ्या अनुभवात यंदाचे हवामान सर्वाधिक प्रतिकूल आहे. बर्फवृष्टी आणि वादळी वारे वाहण्याचे प्रमाण आणि त्याचा कालावधी वाढला आहे. आणखी एक महत्त्वाची नोंद म्हणजे शेर्पांवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. त्यांना टायगर्स ऑफ द स्नो असे बिरुद बहाल करण्यात आले आहे. कॅंप 2 आणि कॅंप 1 वर सुद्धा काही शेर्पा जायबंदी झाले. त्यामुळे त्यांचा रेस्क्‍यू करावा लागला.

अशा प्रतिकूल हवामानात गिर्यारोहक वेदर विंडोची प्रतीक्षा करीत आहेत. आधी या वेदर विंडोविषयी थोडा तपशील विस्ताराने द्यावासा वाटतो. अंतिम चढाईच्या प्रयत्नासाठी (समिट अटेंम्ट) अनुकूल हवामान कोणत्या कालावधीत असेल याचा अंदाज गिर्यारोहकांना घ्यावा लागतो. त्यास वेदर विंडो असे संबोधले जाते.
एव्हरेस्टचा मोसम पुढे सरकतो तसे माऊंटन गाइड रुट ओपनिंगचे काम पूर्णत्वाच्या दिशेने नेतात.

यंदा बुद्ध पौर्णिमेला समिटपर्यंतचा रुट ओपन होईल अशी अपेक्षा होती, पण प्रतिकूल हवामानामुळे तसे होऊ शकले नाही. बुधवारपर्यंत बाल्कनीपर्यंतचाच रुट ओपन झाला होता. पौर्णिमेच्या दोन दिवस अलीकडे-पलीकडे हवामान लहरी असते. शेर्पा फार श्रद्धाळू असतात. ते बुद्धाला मानतात. बुद्ध पौर्णिमा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस असतो. रुट ओपनिंगची प्रक्रिया लवकरच पार पडण्याची अपेक्षा आहे. साधारण 14 तारखेनंतर वेदर विंडोचे चित्र स्पष्ट होईल.

(क्रमशः)