‘मिस्टर’ शेफ

‘मिस्टर’ शेफ

करायला गेलो शेवभाजी... झालं पिठलं!
तशी मला स्वयंपाक करण्याची खूप आवड. सायंकाळी किंवा आमच्या घरी कोणी पाहुणे मंडळी यायची असतील, किंवा मला स्वयंपाकाची लहर आली, तर मी स्वयंपाकघराचा ताबा घेतो. पोळ्या सोडून सर्व भाज्या मी उत्तम करतो. माझी बायको खानदेशची. ती शेवभाजी फार मस्त करते. अगदी झणझणीत.
एकदा माझी आणि तिची पैज लागली शेवभाजीवरून. शेवभाजी बिघडली, तर मी तिला साडी घेऊन देणार होतो.
ठरल्याप्रमाणं भाजी रविवारी करण्याचं ठरलं. तिनं त्या दिवशी तिच्या मैत्रिणीला आणि तिच्या यजमानांना खास आमंत्रण दिलं होतं. असे थंडीचेच दिवस होते. तिनं पोळ्या केल्या आणि ती बाहेर टीव्ही बघत बसली.
मी सगळी तयारी केली. चूल नसल्यामुळं कांदा गॅसवर भाजून घेतला. खोबरं किसलं. लाल मिरच्या घेतल्या. सर्व भाजलेला कांदा, किसलेलं खोबरं, मिरच्या, आलं, लसूण कमी तेलावर परतून घेतलं. मिक्‍सरमधून चांगलं बारीक केलं. नंतर ते वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं. त्यात गरम पाणी टाकलं, ते चांगलं उकळू दिलं आणि उकळत्या मसाल्याच्या पाण्यात आणलेली होती तेवढी सर्व तुरकटी शेव टाकली आणि झाकण ठेवलं. तेवढ्यात तिची मैत्रीण आणि यजमान आलेच. यजमानांच्या स्वागतासाठी म्हणून मी हॉलमध्ये गेलो. जेवणाची सर्व तयारी झाली. मी बाहेर भाजीची कढई घेऊन आलो. झाकण काढलं तर काय?... शेवभाजीचं पिठलं झालेलं. बायको माझ्याकडं बघतच राहिली. मला असं कसं झालं काही कळेना... शेवटी आम्ही सर्वांनी झालेलं पिठलं शेवभाजी समजून खाल्लं... मला साडीचा भुर्दंड बसला, हे वेगळं सांगायला नकोच!
- विठ्ठल तिखे, आकुर्डी, पुणे

-----------------------------------------------------------------
शिऱ्याचा चुकला ‘नेम’
आ  म्ही तिघं मित्र. मी मुकुंद देशपांडे, माधव भिडे आणि मधू चांदेकर. त्या वेळी आम्ही सातवी- आठवीमध्ये असू. दुपारी एकत्र अभ्यास करायचो. घरातल्या महिला त्यावेळेस विश्रांती घेत असायच्या. अशा वेळी दुपारी अभ्यास करून कंटाळा आल्यावर आता काय करावं याचा विचार चालला होता. थोडी भूकपण लागली होती.
अचानक एकाच्या डोक्‍यात विचार आला, चांदेकरचे आई-वडील बाहेर गेले आहेत, घरी कोणी नाही. मग, त्याच्या घरी जाऊन मस्तपैकी शिरा बनवून खाऊ. पण सामानाचं काय? मग प्रत्येकानं थोडं थोडं आणायचं ठरलं. माधव म्हणाला, ‘‘मी खिशात साखर घेऊन येतो.’’ मी रवा आणायचं ठरलं आणि मग चांदेकरकडं जमलो. घरातली मंडळी निवांत विश्रांती घेत होती, त्यामुळं हळूच आम्ही सामान गोळा करून जमलो. आता पुढं काय करायचं, याची माहिती अंदाजानंच तिघांना होती. चांदेकरनं स्टोव्ह पेटवला, पाणी उकळत ठेवलं आणि उकळल्यावर अंदाजे त्यात रवा टाकला. मग साखर टाकली आणि ढवळायला सुरवात केली. हळूहळू ते घट्ट व्हायला लागलं. तेवढ्यात आठवलं, की त्यात तूपपण टाकायचं असतं. मग त्याच्याकडं तुपाची शोधाशोध सुरू झाली. थोडंफार मिळालं तेपण त्याच्यात टाकलं; पण पाणी जास्त झालं होतं. त्यामुळं ते आटवत बसायला लागलं. शिऱ्याचा खमंग वास सुटायला पाहिजे होता; पण तो काही येत नव्हता. म्हणता- म्हणता पाणी आटून त्याचा गोळा झाला. तिघांनी तो चाखून पाहिला; पण तो तोंडात चिकटून बसला. तिघं एकमेकांकडं पाहत राहिलो. काही तरी घोटाळा झालेला दिसतोय. आता ही एवढी पातेलंभर खळ काय करायची? मित्राचे आई-वडील परत येण्याची वेळ होत आली होती. त्यांना कळलं तर, अशी भीती वाटायला लागली! मग काय, एकेकानं त्याचे गोळे केले आणि चक्क नेमबाजीची प्रॅक्‍टिस केली. असा आमचा फसलेल्या शिऱ्याचा बेत. त्यानंतर कित्येक दिवस ‘शिरा’ म्हटलं, की मला ती खळ आठवायची. त्यामुळं काही दिवस तरी मी शिऱ्याचा धसकाच घेतला होता. अशा प्रकारे आम्ही ‘मास्टर शेफ’ होता होता थोडक्‍यात वाचलो.
- मुकुंद देशपांडे, पुणे

-----------------------------------------------------------------
भेंडीचा चिकटपणा
कु  किंग चॅनेल्स बघून मला विविध पदार्थ करायला तसे आवडतात. काही वेळा चवदार होतात, तर काही वेळा बिघडतातही. असंच एके दिवशी मला माझ्या हातची भेंडीची भाजी खाण्याचा मोह आला. मी किचनमध्ये गेलो. माझी आई आणि बायको बाहेर गेली होती. माझ्या अंगभूत पाककौशल्याच्या आधारे मी फोडणी व्यवस्थित करून भाजी शिजायला घातली. भाजी शिजताना नेहमीप्रमाणं मी त्यात थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवलं. पाणी घातल्यामुळं भेंडीची भाजी अजूनच चिकट झाली. म्हणून मी मोठ्या गॅसवर भाजी परतली, तर ती करपून कढईला चिकटायला लागली. खूप प्रयत्न केले, तरी भेंडीच्या भाजीचा चिकटपणा काही कमी होईना. शेवटी करपलेली भेंडी मी कढईत तशीच ठेवून आई आणि बायको घरी येण्याची वाट पाहत होतो. स्वयंपाकघरात अर्थातच पसारा पडलेला होता माझ्या भाजीच्या प्रयोगामुळं.
आई आणि पत्नी घरी आल्यावर मी भेंडीच्या भाजीचा सगळा वृत्तांत सांगितला. त्यावर आईनं चांगलं ठणकावून सांगितलं, की भेंडीच्या भाजीत पाणी घातलं तर ती चिकट होते, त्यामुळं भाजीत पाणी न घालता कढईवर ताट ठेवून त्यावर पाणी घालून वाफेवर शिजू द्यावी. या तिच्या सांगण्यामुळं माझ्या पाककृतीत सुधारणा होत गेली. त्या दिवसापासून माझ्या लक्षात आलं, की स्वयंपाक करताना बारीक-सारीक गोष्टींनाही खूप महत्त्व असतं.
- ॲड. सूरज ननवरे, पुणे

-----------------------------------------------------------------
रंगाचा ‘बेरंग’
मी  साधारणपणे दहा-बारा वर्षांचा असेन, त्या वेळी माझी पहिली स्वतंत्रपणे केलेली पाककृती मला चांगली आठवते. भजी खाण्याच्या मोहापायी घरात कोणी नसताना मी स्टोव्हवर डाळीच्या पिठाची भजी केली. भजीच्या पिठात खायचा सोडा टाकला, की भजी मस्त कुरकुरीत होतात, हे मला पक्कं ठाऊक होतं. म्हणून मी एक मोठा चमचा भरून खायचा सोडा भजीच्या पिठात टाकून पीठ भिजवलं. कढईतलं तेल गरम झाल्यावर त्यात भजी तळायला टाकली. तो काय- तेलात पीठ विरघळून फसफसून वर आलं. तरीसुद्धा ते जळकट तेलकट तळण मी बिनतक्रार खाल्लं. पुढं दोन- तीन दिवस माझा घसा बसला; पण तोंडातून ‘ब्र’ शब्द काढला नाही.
सध्या मी पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर आहे; पण अजून माझे ‘सुगरण प्रयोग’ चालू असतात. तीन वर्षांपूर्वीची घटना. आमच्या सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांना गावच्या कुलदेवतेस घेऊन जाण्याचं मी ठरवलं. गावी दुपारच्या जेवणासाठी पावभाजी करून नेण्याचा बेत आखला. पहाटे लवकर उठून पत्नीनं पावभाजी तयार केली. भाजी चांगली चवदार झाली होती; पण भाजीचा रंग मला पसंत पडेना. माझ्यात एकदम बल्लवाचार्य संचारला आणि मी भाजीला छान रंग येण्यासाठी खायच्या लाल रंगाची पावडर पत्नीच्या नकळत भाजीत कोंबली. डावानं भाजी एकसारखी करून पाहतो तो काय, भाजीचा रस्सा लाल रक्तासारखा दिसू लागला. ‘बापरेऽऽ!’ त्यातच पत्नीनं विचारलं, ‘‘अहो, काय केलंत तुम्ही हे? आता काय करायचं?’’ मला दरदरून घाम फुटला. प्रवासाला निघायची वेळ होत आली होती. क्षणभर मी निःशब्द झालो. दैवयोगानं माझ्यातला ‘मिस्टर शेफ’ जागा झाला. लाल रंगाच्या डबीशेजारीच खायच्या पिवळ्या रंगाची डबीपण होती. त्या डबीतला पिवळा रंग मी भाजीत टाकत गेलो. भाजीचा गर्द लालपणा कमी होऊन भाजी साधारणपणे लाल दिसू लागली. तेव्हा दोघांच्या जिवात जीव आला.
रात्री घरी परतल्यावर पत्नीनं विचारलं, ‘‘आवडली का हो पावभाजी सर्वांना?’’ मी म्हटलं, ‘‘अगं काय सांगू तुला, सर्वांचं एकच मत पडलं- भाजी एकदम बेस्ट!’’ पाककलेत एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की या कलेचा वसा घेतला, तर ती शिकत असताना आपण कधी चुकत जातो; पण त्याचबरोबर शिकतही जातो. परंतु, त्यासाठी मनात हवी जिद्द आणि अंगात थोडं धाडस!
- विनायक नंदे, पुणे
-----------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com