‘मिस्टर’ शेफ

‘मिस्टर’ शेफ

भाजणीची चविष्ट ‘भाकरी’
मी  आमच्या कुटुंबात सर्व भावंडांत मोठा होतो. त्यामुळं आईला घरकामात मला मदत करावी लागे. शाळा आणि अभ्यास सांभाळून पाणी भरणं, झाडून काढणं, भांडी आवरणं या कामात आईला मदत करताना मला मोठी तारेवरची कसरत करावी लागे. कित्येक वेळा स्वयंपाकातही मला आईला मदत करावी लागली. त्याचा परिणाम असा झाला, की मलाही नवीन पदार्थ करण्याची आणि खाण्याची सवय लागली.

एके दिवशी आई दुपारी ओढ्यावर कपडे धुवायला गेली. त्या दिवशी शनिवार होता. शाळेला अर्धी सुट्टी. मी दुपारी घरीच होतो. मला भाजणीचं थालिपीठ करण्याचा आणि खाण्याचा मोह झाला. मग लगेचच थालिपीठ करण्याचा घाट घातला. मला थालिपीठ करण्याची जी कृती माहीत होती, त्याप्रमाणं मी सगळं साहित्य भराभरा काढलं. परातीमध्ये भाजणीचं पीठ घेतलं. त्यात बारीक चिरून कांदा, कोथिंबीर, चवीसाठी हळद, मीठ, तिखट, हिंग प्रमाणात टाकलं. परातीमध्ये पीठ मळलं. त्याचा गोळा केला. स्टोव्ह पेटवला. तवा ठेवला. गोळा गोल थापून तव्यावर टाकला. तोच आई आली आणि म्हणाली, ‘‘अरे पद्माकरा, हे काय केलं?’’ मी म्हणालो, ‘‘थांब जरा सांगतो.’’ ते थालिपीठ मी तव्यावरून खाली उतरवलं. स्टोव्हवर भाजले आणि म्हणालो, ‘‘मी भाजणीचं थालिपीठ केलंय.’’ आई म्हणाली, ‘‘वेड्या, असं थालिपीठ नाही करत. तव्यात तेल टाकून गोळा तव्यातच थापतात. मग झाकण ठेवून वाफाळल्यावर खाली काढतात. त्याला थालिपीठ म्हणतात. तुझी झाली भाकरी.’’ मी म्हणालो, ‘‘भाजणीची कांदा-कोंथिबीर घातलेली चविष्ट ‘भाकरी’ खाऊन तर बघ!
- पद्माकर पोफळे, पुणे.

--------------------------------------------------------------------------
भाजीत भाजी भेंडीची!

सा  धारणपणे दहा वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग. मी नोकरीनिमित्तानं महाड तालुक्‍यातल्या नाते या ठिकाणी कार्यरत होतो. नाते हे रायगड किल्ल्याच्या रस्त्यावरचं निसर्गरम्य गाव. माझ्या पत्नीला गावाकडं नोकरी मिळाली म्हणून ती गावी आली. मी एकटाच खोलीमध्ये हातानं स्वयंपाक करून कसाबसा खात असे. कारण कोकणात आपल्यासारखी खाणावळीची सोय नव्हती. त्यांच्या जेवणात भात आणि तांदळाची भाकरी असायची. मला चपाती, ज्वारीची भाकरी, पातळ भाजी असं जेवण आवडायचं.
स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. फक्त पाहून थोडीफार माहिती होती. आता स्वतः स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाजी बाजारातून भेंडी आणली. भेंडी बारीक चिरली. नंतर भाजीला फोडणी दिली. तिखट तेल टाकलं. भाजी परतून घेतली. नंतर भाजी शिजविण्यासाठी इतर भाजीमध्ये पाणी टाकतात तेवढं माहीत होतं. त्याप्रमाणं मी भेंडीच्या भांड्यात पाणी ओतलं. भेंडी शिजू लागली. भेंडीची भाजी शिजली; पण ती खूप चिकट झाली होती.  नक्कीच काय झालं ते काहीच कळेना. भाजीची अवस्था खाण्यासारखी नव्हती. भाजी इतकी चिकट झाली होती, की ती एखाद्या चिकट गोळ्यासारखी झाली होती.

नंतर मी पत्नीला फोन करून सांगितलं, तर ती फोनवरतीच हसू लागली. ती म्हणाली, ‘‘अहो, भेंडीच्या भाजीत पाणी ओतायचं नसतं.’’ आठवड्यानं रविवारी सुटीमध्ये गावी आलो, तर माझ्याकडं बघून सगळे हसत होते. त्याअगोदरच माझ्या भाजीचा किस्सा समजला होता. माझ्याकडून सगळ्यांनी परत विचारून घेतलं आणि सगळे हसले. त्यानंतर मी ठरवलं. परत कधीच भेंडीची भाजी करायची नाही.
- भरत कोलते, पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे.

--------------------------------------------------------------------------
न शिजलेली ‘डाळ’

‘मे’  महिन्याचे दिवस. त्यात रविवार- सुटीचा दिवस. शाळांना सुटी असल्यामुळं पत्नी मुलांना माहेरी घेऊन गेलेली. रोज ऑफिसमध्ये लंच होत असे. आज आमटी-भात करूया, असा विचार करून किचनमध्ये गेलो. थोडे-फार डबे शोधल्यावर तूरडाळ आणि तांदूळ मिळाले. कुकरमध्ये पाणी घातलं. दोन पातेल्यांमध्ये डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले. कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवलं. थोडी वाफ आल्यावर शिट्टी लावली. थोड्या वेळात कुकरच्या दोन शिट्ट्या वाजल्या. गॅस बंद केला. थोड्या वेळानं कुकरचे झाकण उघडले. वरच्या पातेल्यातला भात झालेला; पण खालल्या पातेल्यातली डाळ मात्र अर्धवट झालेली. पुन्हा एकदा शिजवण्यासाठी ती कुकरमध्ये ठेवायला गेलो, तर कुकरमध्ये घातलेलं पाणी कमी झालं होतं. एकच शिट्टी झाल्यावर करपण्याचा वास येऊ लागला. ताबडतोब गॅस बंद केला. कुकर खाली उतरवला. थोड्या वेळानं उघडला. पाहिलं तर डाळ तशीच्या तशीच होती. लक्षात आलं, की डाळीत पाणी फारच कमी झालं होतं, त्यामुळं दोन वेळा कुकरमध्ये ठेवूनही डाळ ‘जैसे थे’! शेवटी तशीच अर्धवट शिजलेली डाळ भातावर घेतली आणि कशी तरी भूक भागवली.
- रामचंद्र बिदनूर, नवीन पनवेल
--------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com