‘मिस्टर’ शेफ

‘मिस्टर’ शेफ

जायफळाची ‘झोपाळू’ कॉफी
आमच्या इतक्‍या वर्षांच्या संसारात सुख-दुःखाचे, अपघाताचे अनेक प्रसंग आले; पण मला कधीही स्वयंपाक करावा लागला नाही. माझी पत्नी स्वतः सुगरण असल्यामुळं माझ्यावर स्वयंपाकघरात जाण्याची वेळच कधी आली नाही.

स्वतःपुरता चहा तेवढा करता येतो मला. मी मधुमेहाचा रुग्ण असल्यानं तसा चहा जरा ‘स्पेशल’ असतो; पण पत्नी अपर्णा मात्र कॉफी पीत असल्यानं तिची कॉफी तीच बनवत असते. परंतु, मध्यंतरी तिच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं तिला स्वयंपाकघरात प्रवेश बंद झाला आणि एके सकाळी नाश्‍त्याबरोबर कॉफी देण्याची वेळ माझ्यावर आली.

मला माहीत होतं, की तिला मद्रास फिल्टर कॉफी आवडते आणि त्यात ती जायपळ किसून घालते. मी ठरवलं की तशीच कॉफी करायची. त्याप्रमाणं मी कॉफी केली. ‘‘ही कॉफी आणि नाश्‍ता घेऊन तू आता झोप,’’ असं मी तिला सांगितलं. तिलाही खूप आनंद वाटला; पण प्रत्यक्षात कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर ती म्हणाली, ‘‘अहो, आता औषध घेऊन झोपायची गरजच नाही. मी तशीच गाढ झोपेन.’’
मग माझ्या लक्षात आलं- मी एक कप कॉफीसाठी तब्बल एक चमचा जायफळ पूड टाकली होती!....आता मात्र मी छान कॉफी बनवायला शिकलो आहे.

- अनिलकुमार गोसावी, पुणे

--------------------------------------------------------------------------
करतो कोण...खातो कोण?

मी  महाविद्यालयात होतो, तेव्हाचा हा किस्सा. माझ्या चुलत बहिणीचं पुण्याला लग्न होतं, म्हणून मी सोडून सगळे जण पुण्याला गेले होते. कारण, बीएच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा अगदी चार-पाच दिवसांनी सुरू होणार होती.

अभ्यास करण्यासाठी आणि काही पुस्तकं बदलून घेण्यासाठी अहमदनगर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जायचं होतं; तेव्हा नाश्‍ता आणि जेवण एकत्रित असं म्हणून मी दोन अंड्याचं आम्लेट तयार केलं आणि तव्यावरून काढून थंड होण्यासाठी ताटलीत ठेवलं.
आमच्या घराच्या खिडकीला जाळी नव्हती. त्यामुळे मांजराचा वावर नेहमी घरात होता. ब्रेड आणण्यासाठी घराला कडी घालून गेलो आणि ब्रेड घेऊन घरी आलो. घर उघडून घरात येऊन पाहतो तर मांजरानं आम्लेट तोंडात धरून खिडकीतून बाहेर प्रयाण केलं.

शेवटी चहा केला आणि चहा-ब्रेड खाऊन कॉलेजमध्ये गेलो. आम्लेट खायची इच्छा त्या दिवशी काही पूर्ण झाली नाही. करतो कोण...खातो कोण?

- मधुकर तांबोळी, चिंचवड.

--------------------------------------------------------------------------
अखेर उसळ शिजलीच नाही!

ब    रीच जुनी गोष्ट. मी एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी कानपूर इथं गेलो होतो. आम्ही १५-२० जण होस्टेलवर राहत होतो. बाहेरचं जेवण घेण्यापेक्षा आम्ही चार-चार जणांचा ग्रुप करून रूमवर स्वयंपाक करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार सगळ्या सामानाची तयारी केली.

एके दिवशी किराणा सामान आणताना मला हिरवा वाटाणा दिसला, म्हणून एक पाकीट घेतलं. रूमवर आल्यावर आज मी मटारची उसळ करणार आहे, असं सर्वांना सांगितलं. खरं म्हणजे त्या वेळी मला स्वयंपाकातलं ज्ञान नव्हतं; पण लहर आली आणि उसळ करण्याचं ठरवलं. एका पातेल्यात तेल, मोहरी, हळद घालून फोडणी केली. नंतर पाकीट फोडून मटार फोडणीत टाकून परतून घेतला. तिखट, मीठ, मसाला सर्व काही घालून झाकण ठेवलं. एक वाफ आल्यावर पाणी घालून उकळी येण्याची वाट पाहत होतो. थोड्या वेळात उकळी आली म्हणून चव पाहावी या उद्देशानं मटाराचा एक दाणा हातात घेऊन पाहिला; परंतु तो कडक होता. शिजण्यासाठी पुन्हा पाणी घातलं. असं दोन-चार वेळा झालं. पाणी संपत होतं; पण मटार शिजतच नव्हता. शेवटी कंटाळून नाद सोडला. नंतर असे का झाले हे विचारल्यावर कळले की ओला मटार लगेच शिजतो; पण बाजारातून आणलेला वाळलेला मटार करण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवावा लागतो. एकदम तेलात परतल्याने तो अधिकच कडक झाला आणि तो अखेरपर्यंत शिजलाच नाही. अजूनही मटार उसळ पाहिली की या घटनेची आठवण होते.

- पद्माकर नेर्लेकर, पुणे.

--------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com