‘मिस्टर’ शेफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

फुटता चिक्की फुटेना...

फुटता चिक्की फुटेना...
माझ्या विवाहापूर्वीची गोष्ट. मी पुणे जिल्ह्यात आर्वी इथं तत्कालीन विदेश संचार सेवेमध्ये नुकताच रुजू झालो होतो. नारायणगावला खोली घेऊन एकटा राहत असे. सकाळी कार्यालयाच्या कॅंटीनमध्ये जेवण होत असे, तर सायंकाळी स्वयंपाकाचं ज्ञान असल्यामुळं हातानं बनवून खात असे. रोज स्वयंपाक करण्याच्या सवयीमुळं मी सर्व काही करू शकेन, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. एका रविवारी काही तरी गोड बनवावं जे इतर वेळी पण खाता येईल, असा विचार करून बनवायला सोपी अशी शेंगदाणा चिक्की बनवावी, असा विचार केला. फक्त गुळाचा पाक करायचा आणि त्यात भाजलेले शेंगदाणे टाकून हलवायचे. पाक थंड होत आला, की ताटात पसरवून चिक्की बनवायची, अशी साधी-सरळ सोपी रेसिपी मनात तयार करून बनवायला सुरवात केली. त्यावेळी माझ्याकडं एक स्वयंपाकाचा पितळी स्टोव्ह आणि पाणी गरम करण्यासाठी वातीचा स्टोव्ह होता. घाई नसल्यामुळं पितळेच्या पातेल्यात गूळ, थोडंसं पाणी टाकून वातीच्या स्टोव्हवर पाक करायला ठेवला. पाक तयार झाल्यावर शेंगदाणे टाकले आणि हलवून एकत्र केले. स्टोव्ह बंद करून मिश्रण थंड व्हायला ठेवलं. गरमागरम चिक्की खाण्याचा खूप मोह झाला होता; पण हात भाजेल म्हणून मन आवरतं घेतलं. बाहेर फिरून आल्यावर चिक्की ताटात काढण्याचा प्रयत्न केला; पण गुळामुळं ती इतकी घट्ट झाली, की निघता निघेना. उलथन्यानं काढण्याचा प्रयत्न केला तरी निघेना. शेवटी हातोडी आणि स्क्रू-ड्रायव्हरचा उपयोग केला; पण सर्व व्यर्थ. ठोकाठोकीचा आवाज ऐकून शेजारच्या वहिनींनी विचारलं, ‘‘भाऊजी काय चाललंय?’’ मी घडला प्रकार सांगितला. ते ऐकून त्या खूप हसल्या. म्हणाल्या, ‘‘एवढं करण्यापेक्षा बाजारातून पाच रुपयांची चिक्की विकत आणलेली परवडली असतो हो.’’ वेळ गेला, सामान वाया गेलं, एवढंच नव्हे, तर ते भांडंसुद्धा कामातून गेलं. अशा प्रकारे माझी शेंगदाणा चिक्की दगडी शेंगदाणा चिक्की झाली. हे माझे शेंगदाणा चिक्की प्रकरण माझ्या घरी; तसंच होऊ घातलेल्या सासरवाडीपर्यंत पोचलं. जो तो मला एकच प्रश्‍न विचारायचा- ‘शेंगदाणा चिक्की झाली का?’
- रत्नाकर वाणी, पुणे

---------------------------------------------------------------------------------
फसफसलेल्या खरवसाची कहाणी

‘कि   चन’ ही नवनवीन पदार्थ बनविण्याची, त्यांचे प्रयोग करण्याची ‘लॅब’ आहे, असं अस्मादिक समजतात. त्यातूनच कोहळाचं चिकन, कोहळाचं मटण (नारळाच्या पाण्यात शिजवलेलं), ब्राह्मणी पद्धतीचं चिकन, मटण (थोडासा गूळ घातलेलं गोडसर), खिम्याचं घावन (तांदळाच्या पिठाचं), खिमा करंजी, खिमा मोदक (सेव्हन सिस्टर्समध्ये ज्याला ‘मोमोज’ म्हणतात) अशा अफलातून पदार्थांची निर्मिती आजवर माझ्याकडून झालेली आहे. काही पदार्थ फसलेही. आता सांगतो, एका फसलेल्या (फसफसलेल्या) खरवसाची सुरस कहाणी. त्याचं झालं असं- बऱ्याच दिवसांनी दूधवाल्याकडं लकडा लावल्यानंतर त्यानं एकदाचं चिकाचं दूध आणून दिलं. बाजारात ‘चायना ग्रास’चा खरवस मिळतो. घरगुती खरवस खायला मिळणार म्हणून सगळे उत्सुक, आनंदात होते. शेवटी मी आमच्या लॅबमध्ये (किचनमध्ये) खरवस बनवायला सिद्ध झालो. चिकाच्या दुधात अजून दूध मिसळलं. वेलची पूड, गूळ (खमंग लागण्यासाठी) घालून पातेलं गॅसवर ठेवलं. बराच वेळ उकळत ठेवल्यानंतर वाफ येऊ दिली आणि झालं असेल म्हणून ‘रेडी टू सर्व्ह’ खाली काढलं. गार झाल्यावर ते मिश्रण घट्ट होऊन त्याच्या वड्या पाडता येतील, म्हणून थोडा वेळ वाट पाहिली. परंतु कसचं काय अन्‌ कसचं काय! सर्वच चोथापाणी झालं होतं. नंतर आमच्या नेहमीच्या स्वयंपाकीण बाईंकडून कळलं, की चिकाच्या दुधात साधं दूध घालून साखर, गूळ घालून ते कूकरमध्ये शिजवायचं असतं. शेवटी या फसलेल्या पदार्थाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझा ‘शेफ’पदाचा राजीनामा ‘गृह’ मंत्रालयाकडं पाठवून दिला. म्हणतात ना, ‘जेनु काम तेनु थाय, बिजाकरे तो गोता खाय!’
- अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे (जि. पुणे)

---------------------------------------------------------------------------------
पोह्यांचा लगदा

सा   धारण २०-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट. निवडणुकीच्या कामाकरिता पत्नीची दूरगावी नेमणूक झाली होती. निवडणुकीचं काम टाळणं शक्‍य नव्हतं. दोन दिवस नेमणुकीच्या गावी मुक्काम करणं अपरिहार्य होतं. एक दिवसाच्या पोटापाण्याची व्यवस्था करून पत्नी निवडणुकीच्या कामाकरिता गेली; पण दुसऱ्या दिवशी मुलांना काहीतरी गरम-गरम खाण्याची लहर आली. कांदेपोहे आवडता पदार्थ. बालहट्ट पुरवायचा ठरवलं. त्यातल्या त्यात झटपट होणारा पदार्थ ‘बाबा आज तुम्हीच करा ना! बाहेर नको.’ मग काय नाईलाजास्तव करणं भागच होतं.
मिरच्या, कांदे-बटाटे चिरून घेतले. खोबरं मस्तपैकी खोवलेलं होतंच. फोडणीचं साहित्य माहीत होतं. कढीपत्ता टाकून जिरे-मोहरीची फोडणी केली. चवीनुसार मीठ टाकलं. पण चुकून कांदेपोह्यांऐवजी पातळ पोहे भिजवले गेले. मऊ छान झाले. जरा आनंद झाला. पण त्यातल्या त्यात पाणीही थोडं जास्तच झालं. कढईत हलवल्यावर पिठल्याचा व्हावा तसा लगदा झालेला. सुटं होता होईना. वर कोथिंबिर, खोबऱ्याची सजावट पाहून मुलं खूश झाली, आणि चावण्याचा काही प्रश्‍नच आला नाही. ‘‘बाबा, आईचे पोहे जसे दिसतात तसे तुमचे दिसतच नाहीत,’’ असं ती म्हणाली. मी निरुत्तरच. काय उत्तर देणार मुलांना? ‘‘खा रे गुपचूप. आवडले ना?’’ मी म्हणालो. गप्प बसली! भूक खूप लागली होती ना! चेहरे बघण्यासारखे झाले.
शिलकी पोह्याची (की पिठल्याची---) पत्नीनं आल्यावर चव बघितली. डबे माहीत नाहीत, हे तिला कळलंच. शब्दांचा भडिमार आणि शाबासकी पण (कुत्सित उपहासानं) मिळाली. शेवटी निश्‍चय केला, व्यवस्थित डबे, पदार्थ, वस्तू पाहूनच पाककृतीचे प्रयोग करायचे.
- कन्हैयालाल देवी, पुणे

---------------------------------------------------------------------------------
वनभोजनाची ‘चविष्ट’ आठवण

मी    त्या वेळी पुणे जिल्ह्यातल्या पानशेतमध्ये हायस्कूलमध्ये शिकत होतो. आम्ही काही मित्रांनी दिवाळीची सुटी झाल्यावर रानात वनभोजन करण्याचं ठरवलं. स्वयंपाकाची मला खूप माहिती आहे, असं इतर मित्रांना सांगून, वरण, भात, शिरा, वांगी, बटाटा आणि हरभऱ्याची ‘शाक’ (मिक्‍स) भाजी असा साधा मेनू ठरवला.
रविवारचा दिवस गाठून, साहित्याची जमवाजमव केली. प्रत्येकाच्या घरातून मोठा पेलाभर आंबेमोहरचा तांदूळ, एक-एक वाटी तूरडाळ जमा केली. प्रत्येकी एक रुपया वर्गणीप्रमाणं दहा-बारा रुपयांच्या रकमेतून भाजीचे पदार्थ, रवा, साखर, डालडा इत्यादी घेतले. शिऱ्यात टाकायला प्रत्येक घरातून लोटीभर मिळून दीड लिटर दूध मिळालं. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी जमा करून गावाबाहेरच्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली वनभोजन साहित्याचा सरंजाम ठेवला. त्या काळात खेड्यापाड्यात गॅसशेगड्या, स्टोव्ह नव्हते.
आम्ही सिनियर मुलांनी तीन-तीन दगडांच्या दोन चुली तयार केल्या. इतर मित्रांनी सरपण (लाकडं) जमा केली. जवळच्या विहिरीमधून पाणी आणलं. आता चूल पेटवून डाळ, भात शिजायला टाकायचा, तोपर्यंत भाजी चिरायची आणि शेवटी शिरा करायचा असा बेत ठरला. सुरवातीलाच चूल पेटविण्यासाठी काड्याच्या पेटीची शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक जण आपले खिसे तपासू लागला. मग लक्षात आलं, की काडेपेटी घरीच विसरली होती. पटकन पळत जाऊन एका लहान मुलानं ती आणली. चुली पेटवल्या. मोठ्या पातेल्यात भात शिजत टाकला. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाणी थोडं कमीच पडलं. दुसऱ्या चुलीवर वरणाची डाळ शिजायला ठेवली. चूल पेटण्यासाठी पुठ्ठ्यानं हवा द्यावी लागत असल्याने मध्येच एका मुलाचा वरणाची डाळ असलेल्या पातेल्याला धक्का लागला आणि डाळ टोपासकट भुईसपाट झाली. एकमेकांवर राग काढून नंतर भाजी थोडी पातळ करण्याचं ठरलं. भात थोडा कच्चाच शिजला; पण खमंग, करपट वास येत होता. भाजीत जास्त तिखट पडल्याचं रंगावरून दिसत होतं.
त्यानंतर शिरा करायला घेतला. आमच्यापैकी कुणीही शिरा करताना अद्याप पाहिलं नव्हतं. मोठा आचारी असल्याचा आविर्भाव आणून शिरा मीच करण्याचं ठरवलं. रवा डालड्यात अगोदर भाजायचा असतो, ते तत्त्वज्ञान मला फार उशिरा समजलं. पातेल्यात पाणी टाकून साखरेचा पाक तयार केला. उकळी आल्यावर त्यात रवा टाकला. हे मिश्रण पळीनं हलवून पुन्हा उकळी आल्यावर डालडा वरून सोडला आणि हलवण्यास सुरवात केली. चारही घटक एकमेकांवर रुसले. मिश्रण घट्ट आणि एकजूट होण्याचं नाव घेईना. कृतीत काहीतरी गडबड-घोटाळा झाल्याचं समजलं. तोपर्यंत एक युक्ती सुचली. वरून दूध टाकून कमीत कमी खीर तरी होईल असं वाटलं. बराच वेळ हे मिश्रण हलवल्यानंतर त्यानं पांढऱ्या रंगाच्या पातळ खिरीचं स्वरूप धारण केलं. थोडा आशेचा किरण दिसू लागला.
जेवणाची पंगत बस्कर टाकून सुरू झाली. कच्च्या भाताला वेगळीच चव आली होती. भाजी लाजवाब, कोल्हापुरी रश्‍श्‍याची चव. शिरा फसल्यामुळं झालेली खीर प्रत्येकानं आनंदानं आणि मोठ्या चवीनं वाट्या भरून प्यायली. वनभोजनातले पदार्थ फसले, तरी फसलेल्या पदार्थांची वेगळी चव आम्हाला अनुभवायला मिळाली. ही चव अजूनही जिभेवर रेंगाळते. आजही आम्ही मित्र एकत्र आलो, की फसलेल्या वनभोजनाच्या बेताची आठवण होते आणि आम्ही खो-खो हसतो. बालपणात रमून जातो.
- विठ्ठलराव ठाकर-पाटील, पुणे

Web Title: mr shef article in saptarang