झब्बू कासव आणि मासे (मुक्ता मनोहर)

झब्बू कासव आणि मासे (मुक्ता मनोहर)

‘आपल्याला तहानलेला कावळा बघेल...पाण्यात दगड टाकेल...पाणी वर खेचेल आणि आपल्याला खाऊन टाकेल...’ अशी चिंता माशांना होती. असं झालं तर काय करावं, अशा चिंतेत ते असतानाच धप्प आवाज झाला व त्यात झब्बू कासव बुद्दकन्‌ पडलं. कासव पडलेलं पाहून पाण्यातले मासे अगदी घाबरून गेले.

इसापच्या जंगलात त्या दिवशी जरा गोंधळच झाला. झब्बू नावाच्या छोट्या कासवाला त्याच्या आईनं एक काम सांगितलं होतं. काम तसं सोपच होतं. नदीच्या किनाऱ्यालगत काही औषधी झुडपं होती. त्यांचा थोडा पाला आईला हवा होता. तर झब्बू निघाला. घाई काहीच नव्हती. दुपार संपायला आली होती. ऊन्ह उतरतीला आलं होतं.

झाडांच्या सावल्या लांब व्हायला लागल्या होता. झब्बूला वाटेत त्याच्या आवडीचं छोट्या फळांचं झुडूप दिसलं. त्याला वाटलं, ‘चला, थोडी फळ खावीत.’ मग तो त्या झुडपाजवळ थांबला. ती छोटी छोटी फळ फारच गोड आणि मस्त होती. तो फळं खात बसला. किती वेळ गेला ते त्याला समजलच नाही; पण मग त्याला वाटलं, ‘अरे, आपण हे काय करत बसलो आहोत?

आईचं काम करायला उशीर होईल...’ आई नेहमी सांगायची ती गोष्टही त्याच्या मनात जागी झाली.
त्याच्या पणजोबांना एकदा एका सशानं मुद्दाम खिजवण्यासाठी विचारलं ः ‘‘चल, टेकडीवरच्या देवळावर पोचायची माझ्याशी शर्यत लाव.’’ झब्बूचे पणजोबा अगदी साधे, सरळ मनाचे होते. ससा आपल्याला मुद्दाम डिवचत आहे, हे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. ते म्हणाले ः ‘‘चालेल मला. लावू आपण शर्यत.’’ ससा एकदम फास्ट धावणारा आणि बिचारं कासव आपला पाठीचा डोलारा सांभाळत सांभाळत हळूहळू चालणारं. काय, ‘आपणच जिंकणार’ अशी सशाला जरा जास्तच खात्री होती. म्हणून तो पळत निघाला; पण वाटेत त्याला खूप कोवळं छान गवत दिसलं. मग त्याला वाटलं, ‘चला, कासव पोचायला तर खूप वेळ आहे. आपण थोडं गवत खाऊ या.’ गवत इतकं मस्त होतं, की त्यानं ते खूप म्हणजे खूपच खाल्लं. इतकं की त्याला झोपच आली. सशाला वाटलं, ‘आता आपण एक झोपही काढावी.’ मग त्यानं दिली ताणून हिरवळीवरच. इकडं झब्बूचे पणजोबा मात्र कुठं म्हणजे कुठेच थांबले नाहीत. ते अगदी नेटानं चालत राहिले. वाटेत त्यांनी त्या सशाला झोपेलेलंही पाहिलं होतं; पण ते निश्‍चयानं पुढं पुढं गेले आणि टेकडीवरच्या देवळावर पोचलेसुद्धा! तरीही इकडं सशाला जाग आली नाही. जाग आली तेव्हा सशाला एकदम त्या पैजेची आठवण झाली.
तो धावत निघाला; पण काय उपयोग? झब्बूच्या पणजोबांनी तर पैज जिंकली होती.
मग झब्बूची आई झब्बूला सांगे ः ‘‘हे बघ, असं कुठंही इकडं-तिकडं न बघता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं, तर अशक्‍य कोटीतलं यश आपल्याला मिळतं.’’ झब्बूला ही गोष्ट आठवली. तो म्हणाला ः ‘‘हे काय? आपण मध्येच थांबून ती फळं खात बसलो. खरंतर आईनं सांगितलेला पाला ओस पडलेल्या नदीच्या किनाऱ्याजवळ शोधावा लागणार आहे. आणि एकदा का अंधार झाला, की ते काम अवघड होऊन जाईल. आपण उगाचच फळं खात बसलो.’ झब्बू कासव लुगूलुगू चालायला लागलं आणि असं चालता चालता ते एका खोल खड्ड्यात पडलं. त्यात पाणी होतं आणि शिवाय मासेही होते. ‘आपल्याला तहानेलेला कावळा बघेल... पाण्यात दगड टाकेल...पाणी वर खेचेल आणि आपल्याला खाऊन टाकेल...’ ही चिंता माशांना होती. असं झालं तर काय करावं, अशा चिंतेत ते असतानाच धप्प आवाज झाला होता व त्यात झब्बू कासव बुद्दकन्‌ पडलेलं असतं.

कासव पडलेलं पाहून पाण्यातले मासे पारच घाबरून गेले. त्यांना वाटलं, की कावळा काठावर आला आहे व त्यानंच दगड टाकला आहे. ते ओरडले ः ‘‘लपा, लपा. कावळा आला. तो आपल्या पाण्यात दगड टाकतोय.’’

घाबरलेला झब्बू म्हणाला ः ‘‘नाही, नाही. मी झब्बू कासव आहे. मी दगड नाही.’’ लपलेल्या माशांनी कपारीतून हळूच डोकावून पाहिलं, तर काय! खरंच ते झब्बू कासव होतं. चला, त्यांना एकदम हायसं वाटलं. झब्बू मात्र मोठ्यानं रडायला लागला. तो म्हणाला ः ‘‘आता मी काय करू? आईचं काम कसं करू’’ त्यावर मासे त्याला म्हणाले ः ‘‘घाबरू नकोस. आम्ही तुला मदत करू. काही तरी मार्ग काढू. तू कावळ्यानं टाकलेला दगड नाहीस, याचाच आम्हाला आनंद झाला आहे. तू आम्हाला मदत कर, आम्हीही तुला मदत करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com