मी सावित्री बोलतेय

Savitribai Phule google doodle
Savitribai Phule google doodle

नमस्कार .....
मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले.

पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबानी खुप कष्ट घेऊन मला शिकविले, अन मला ही शिकण्याची हौस होतीच. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत शिकविण्यासाठी मी तयार झाले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हतेच शिवाय मी शाळेला जात असताना लोक मला शिव्या शाप देऊ लागले. माझ्या अंगावर शेण टाकू लागले. मला दगड गोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरले नाही, की डगमगले नाही. मी मुलींना शिकविण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले. ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पहायला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटते. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलाचा सहभाग नाही. पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. घराच्या उंबरठ्याबाहेर पडायची सुद्धा तिला परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्यामुळे महिलांची आज प्रगती दिसून येत आहे. माझ्या जीवनात जे काही दुःख आणि कष्ट आले ते दुःख सर्व महिलांच्या जीवनात येत असतात. म्हणून महिलानी मागे येऊ नये. जी

वनात आलेल्या संकटाला फक्त महिलाच यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. तेवढी ईश्वरदत्त देणगी सहनशक्ती तिला प्राप्त असते. माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्या सारखेच सर्वसामान्य सावित्री राहिली असती क्रांतिज्योति कधीच झाली नसती. म्हणून मला आज एकच गोष्ट सांगावेसे वाटते की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. तिला खुप शिकवा. तिचे शिक्षण हे तिच्या एकटी पुरते मर्यादित नसते तर ती आपल्या घरातील सर्वाना शिक्षण देण्याचा विचार करू शकते. मात्र तेच जर निरक्षर स्त्री असेल तर ती आपल्या घरातील कोणत्याच सदस्याच्या शिक्षणाची काळजी करणार नाही. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते ते काही उगीच नाही. 

पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खुप हाल व्हायचे. तिला विद्रूप केल्या जायचे. तिला समाजात कोठेही मानाचे स्थान मिळायचे नाही. त्या सर्वासाठी खुप कष्ट घेतले परंतु आज ही समाजात काही मोठा बदल झाला आहे दिसत नाही. आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहेत हे पाहून मनाला खुप खंत वाटते. जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपवायचे पातक शिकलेला समाज करताना पाहून दुःख वाटते. मुलगा हवा या हट्टापायी कित्येक मुलींचे गर्भ खुडणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? मला वाटते त्यास कारण समाजातील चालू असलेल्या चालीरीती हे कारणीभूत असू शकतात. मुलीचा बाप म्हणजे डोक्याला ताप अशी विचारधारा समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुलींच्या बापाला काय कष्ट आहेत हे मुलांच्या बापाला नक्कीच कळणार नाही त्यासाठी जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे या उक्तीनुसार मुलीच्या बाप होऊन पहावे लागेल. जोपर्यंत लग्नात वधू पक्षा कडून घेण्यात येणारी  हुंडा पध्दत बंद होणार नाही तोपर्यंत हे असेच चालत राहणार असे वाटते. मुळात लग्न ही प्रक्रिया पारंपरिक व पुरातन  पध्दतीने आज ही चालू आहेत. जसे पूर्वी लग्न लावले जायचे अगदी त्याच प्रकारे आज ही लग्न लावले जातात.यात कुठे तरी बदल करणे अपेक्षित आहे.

आजच्या विवाह पध्दतीमध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही वारेमाप खर्च होतो मात्र त्याची खंत कोणालाच नाही. पोरीचा बाप जर गरीब असेल तर या लग्नविधीमध्ये त्याचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. त्याच मुळे कदाचित त्यास मुलगी नको असते की काय अशी शंका येते. शासन ही मुलीला वाचविण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा यासारखे अभियान राज्यात राबवित आहे. तरी मुलींच्या शिक्षणात म्हणावा तेवढा फरक पडला नाही. स्त्री भ्रूण हत्येवर बंदी घातली तरी दर हजारी पुरुषा मागे स्त्रियांची संख्या काही वाढली नाही. आज ही तिला दुय्यम स्थान मिळते. 

साहित्य क्षेत्रात महिलांची म्हणावी तशी प्रगती नाही. ज्याप्रमाणात पुरुष मंडळी लिहितात आणि प्रकाशात येतात त्या प्रमाणात महिला लिहितात पण प्रकाशात येत नाहीत. काही वर्तमानपत्र महिलासाठी खास जागा ठेवतात किंवा पुरवणी सुध्दा काढतात जेणे करून सर्व स्त्रियांना लेखनाची संधी दिली जावी. पण येथे ही त्याच त्या महिला नियमित लेखन करतात. कविता किंवा लेख लिहिण्याच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळविता यावी असा उद्देश्य असतो. परंतु महिला कोणत्या ना कोणत्या वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धिपासून दूर राहतात. मनात एक वेगळी अनामिक भीती राहते. अश्या या परिस्थिती मध्ये सुद्धा काही महिला प्रसिद्धि माध्यमाच्या क्षेत्रात पुरुषापेक्षा काकणभर जास्त चांगले काम करीत आहेत याचे मात्र मला अभिमान वाटत राहते. महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. घराबाहेर पडणारी स्त्री मनातल्या मनात घाबरून राहत असते. रात्री ची वेळ ही तर स्त्रियासाठी जीवघेणीच असते. यापूर्वी दिल्ली शहरातील निर्भया प्रकरण कसे घडले हे आपण जाणून आहोतच. रोजचे वर्त्तमानपत्र उघडले की महिलांवर होणारे अत्याचाराची बातमी प्रकाशित झाल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महिला शिकली, सवरली आणि कमावती सुध्दा झाली पण अजुनही ती स्वतः मुक्त झाली नाही. ज्या दिवशी ती स्वतः चे निर्णय घेईल तो तिच्या जीवनात सोनियाचा दिन असेल.

हे सर्व जेंव्हा मी उघड्या डोळ्याने पाहते तेंव्हा मला अस्वस्थ वाटायला लागते. मला पुन्हा एकदा जन्म घ्यावे लागेल की काय असे ही कधी कधी वाटते. पण माझी काही गरज नाही, फक्त तुम्ही तुमच्या मुलींना उच्च शिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभी राहण्याची क्षमता तयार करा तोच माझा पुनर्जन्म असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com