शेती, शेतकऱयाबद्दलचा अडाणीपणा!

Farmer
Farmer

स्मिता पटवर्धन यांनी eSakal.com वर 'शेतकरी खरेच जगाचा पोशिंदा आहे काय?' असा लेख लिहिलाय. जणू काही देश मागे राहण्यात शेतकऱ्यांचाच वाटा आहे, या दृष्टीने लेखात लिहून टाकलेय. 

शेतकरी जगाचा पोशिंदा नाही? 

मान्य. 

इतर व्यवसायांसारखा हा देखील व्यवसाय आहे. 

म्याडमनी कुठला तरी सर्व्हे केलाय म्हणे. नाव नाही महाविद्यालयाचं. तिथं म्हणे ग्रामीण भागात कमीत कमी तीन अपत्ये जन्माला घालतात. हे वाचून हसू फुटलं. असो. 

त्यांनी शेतकरी ५ ते ६ अपत्य जन्माला घालतो, असंही म्हणलंय. हे आधीच्या काळात होतं. जमिनीचे छोटे तुकडे यावरुन पडले. दहा-दहा अपत्य असल्याचं आम्हीसुद्धा बघितलंय. ते कोणत्या काळात झालं? त्यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार आजच्या इतका होता काय? कुटुंब नियोजन, आज जे केलं जातं ते त्या काळात ग्रामीण भागात कोणाला माहिती होतं का? त्यावेळी निरोध, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया त्या लोकांपर्यंत पोहचल्या होत्या का? याची उत्तरं कदाचित म्याडमना माहित नसावीत. 

ही लोकसंख्या वाढली त्याला ही कारणे आहेत. आजही भारतातल्या काही भागात कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक साधनांविषयी माहिती नाही. आज तारखेला पाचसहा अपत्य जन्माला घालायला कोण धजावतंय, हे कळतंच नाही.

शेतीतले शारीरिक कष्ट, ऊनपावसात शेतकरी राबतो याची तुलना म्याडमनी पुढं जाचक एसी रूममध्ये बसणाऱया 'आयटी'वाल्यांशी केलीय. एसी हे काँप्युटरसाठी असल्याचं त्या म्हणतात (तरीही काही मुर्ख लोकं बेडरूममध्ये एसी लावतात आणि काँप्युटरच्या खोलीत पंखा लावतात). एसीमुळे प्रचंड दुखणं वगैरे सुरू होतं, हाडं मऊ होतात, असे बरेच विकार-आजार होतात, असं त्या म्हणतात. 

ठीक आहे. 

याची शारीरिक कष्टाशी तुलना होवू शकते काय? तीही मान्य केली तर येणारं वेतन कोणाचं गच्च असतं? मग चिंता, मानसिक त्रास कोणाला होतो?

परदेशातल्या शेतीची आपल्या देशातल्या शेतीशी तुलना म्याडम करतात. तिकडे पस्तीस ते चाळीसेक एकर शेती एकगठ्ठा आणि कमी मनुष्यबळ वापरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केली जाते. ते मॉडेल इथं रुजवलं तर? भारताची लोकसंख्या सव्वाशे करोड ('प्यारे देशवासियों'वरून हे कळलं) आहे. त्यातील चाळीसेक टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे साधारण पंचेचाळीस करोड. यात तंत्रज्ञान वापरून शेती करायचं ठरवलं (फॉरेन मॉडेलने) तर निम्मी लोकसंख्या शेतीतून बाहेर पडेल. आज देशातील बेकारी डोळ्यापुढे आहे. शिकलेले इंजिनिअर बेकार आहेत. तरीही या मॉडेलने शेती करून पाहिली, तर जी लोकसंख्या बाहेर पडते शेतीतून, त्यांच्या रोजीरोटीचं कोण बघणार? आज बेकारी आहे म्हणून हे विचारत आहे. 

पुढे त्या म्हणतात, की शेतीत राबायला काही विशेष कौशल्य लागत नाही. हे वाचून मनाला अतिव आनंद झाला. कोणाला पेरणीसाठी शेतमजूर मिळत नसतील तर शहरातल्या बेरोजगार लोकांना आणावं, हा शोध लागला.

अर्धा एकर शेतीत ऊस किंवा द्राक्ष लावतात आणि नुकसान झालं की भरपाईची मागणी करतात, असं त्या लिहितात. अर्धा एकरात ऊस द्राक्ष लावणारे किती शेतकरी वर्षभर अर्ध्या एकरात रोज जावून बसतात? दुसरं काही करत नसतील? हे तर्कट अजबच वाटतं. 

पुढं महत्वाचा मुद्दा म्हणून त्यांनी पर्यावरणाविषयी लिहिलंय. 

शेती हा निसर्गावरचा पहिला घाला आहेच. रासायनिक आणि विषारी औषधं फवारणी करून शेतकरी भयंकर असं पाप करत असून तो लोकांना विष खायला घालतो, असं सांगण्याचा त्यांचा अविर्भाव आहे. सेंद्रिय शेती करायचा नाद करून भिकेला लागलेले कैक शेतकरी आहेत. कदाचित म्याडमना माहिती नसेल. शेण-गुळ वगैरे कालवायच्या रेसिपी अलिकडे जोर धरून सेंद्रिय नावाचा धोंडा शेतकऱयांच्या माथी मारायचं काम जोरदार चालू आहे. एकदा बघायला हरकत नाही; पण सेंद्रीय शेती खरंच चालते का? उत्पादन निघतं का? कीड पडलेली भाजी कोण घेतं का? सेंद्रिय औषध (निम पावडर, टोब्यॅको पावडर) रोगांचा सामना करते का? हे एकदा कृपा करून बघावं.

पटवर्धन म्याडमचा लेख वाचून छान मनोरंजन झालं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com