स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

सोनिया गांधी
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - ५१६ / मूल्य - ५०० रुपये
सोनिया गांधी यांचं हे ललित चरित्र. त्यांच्या काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारं, त्यांच्या घडत जाण्याची प्रक्रिया उलगडणारं आणि त्यांच्या एकेक निर्णयांमागच्या कारणमीमांसा सांगणारं हे चरित्र. इटलीतल्या सोनिया मायनो यांचं राजीव गांधी यांच्यावर प्रेम जडलं, राजीवजींशी लग्नानंतर त्या भारतात आल्या आणि पुढं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. बांगलादेशबरोबरचं युद्ध, इंदिरा गांधी यांचा निवडणुकीतला पराभव आणि पुन्हा सत्ताग्रहण, त्यांची हत्या, राजीव गांधी यांना करावा लागलेला राजकारणप्रवेश, एलटीटीईच्या कारवाया, राजीवजींची हत्या, त्यानंतर सोनिया यांचं राजकारणापासून बाजूला राहणं आणि प्रवेश करणं, पंतप्रधानपदाची संधी मिळूनही ती नाकारणं अशा अनेक घटनांचं चित्रण करणारं हे पुस्तक. हाविएर मोरो या स्पॅनिश लेखकानं लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद पीटर हर्न यांनी केला आहे, तर मराठी अनुवाद सविता दामले यांनी केला आहे.

फिरस्ती महाराष्ट्राची
प्रकाशक - प्रसाद प्रकाशन, पुणे (०२०-२४४७१४३७) / पृष्ठं - १७२ / मूल्य - १५० रुपये

शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा परिचय करून देणारं हे पुस्तक लिहिलं आहे. येलघोल, सोनगड, पोखर, जर्सेश्‍वर, गोंदेश्‍वर, धोमचं नृसिंह मंदिर अशा अनेक किल्ल्यांची, मंदिरांची, लेण्यांची ओळख त्यांनी करून दिली आहे. अनेक अपरिचित ठिकाणं त्यांनी मुद्दाम निवडली आहेत. त्या-त्या ठिकाणी जायचं कसं, पाहायचं काय, काळजी कोणती घ्यायची आदी गोष्टींबरोबरच भटकंतीदरम्यानचं खाणंपिणं, बॅगांचं पॅकिंग आणि इतर गोष्टींबाबत कानमंत्रही त्यांनी दिले आहेत.

जगणं ज्याचं त्याचं
प्रकाशक - रावा प्रकाशन, कोल्हापूर (९४२२०४४४६१) / पृष्ठं - २३६ / मूल्य - ३३० रुपये

रेखा खराबे यांचा हा कथासंग्रह. रोज आपल्या आजूबाजूला काहीतरी घडत असतं, अनेक व्यक्ती सहवासात येत असतात. प्रत्येकाचं जगणं निराळं, सुख-दु-ख निराळं. नकळत आपण त्यांच्याशी जोडले जातो आणि त्यातून कथा फुलत जातात. खराबे यांनी अशाच काही तरल अनुभवांतून लिहिलेल्या या कथा. सहजपणे वातावरणनिर्मिती करत त्या मोठं काही तरी सांगून जातात.

मला उंच उडू दे!
प्रकाशक - जे. के. मीडिया-सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी, मुंबई (९७६९१४१०७४) / पृष्ठं - ४० / मूल्य - ८० रुपये

एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेल्या नाट्यछटांचा हा संग्रह. शाळेची गॅदरिंग, वेगवेगळे उत्सव-समारंभ यांमध्ये सादरीकरण करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या या नाट्यछटा आहेत. बालकामगारांचा प्रश्‍न, वाचनाचं महत्त्व, कामांमधली एकाग्रता अशा विषयांपासून विनोदी, लहान मुलांना जवळचे वाटतील, अशा विषयांपर्यंत अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. वेगवेगळ्या म्हणी, वाक्‍प्रचार यांचा नेमका वापर करून त्यांतून शिक्षण देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिक्षणातील संक्रमण - नव्या वाटा आणि नवी वळणे
प्रकाशक - जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद (९४२२८७८५७५) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १०० रुपये

शिक्षण आणि उच्चशिक्षणासंदर्भात प्रा. जीवन देसाई यांनी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. जागतिकीकरण आणि उच्चशिक्षणातले क्रांतिकारी बदल, उच्चशिक्षणातलं परिवर्तन, उच्चशिक्षणात खासगी उद्योग क्षेत्राचा सहभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातले संबंध, वाणिज्य शाखेतलं व्यवसाय शिक्षण आणि रोजगार संधी आदी विषयांवर त्यांनी लिहिलं आहे. मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्राचा आढावाही त्यांनी घेतला आहे.

गावगाड्याबाहेर
प्रकाशक - गोदावरी प्रकाशन, नगर (०२४१-२४२१२७२) / पृष्ठं - ४१६ / मूल्य - ४५० रुपये

गावातल्या व्यवस्थेचं स्वरूप वर्षानुवर्षांच्या प्रथांनुसार रूढ झालं असलं, तरी एक मोठा समाज या गावगाड्याबाहेरच आहे. गावगाड्याबाहेरच्या अशा वेगवेगळ्या जातींची माहिती करून देणारं हे पुस्तक प्रा. प्रभाकर मांडे यांनी लिहिलं आहे. मांग, वडार, रायरंद, पारधी, कंजारभाट, कोल्हाटी, कैकाडी, डक्कलवार, वैदू अशा अनेक समाजांतल्या प्रथा, त्यांचे व्यवसाय, वेगवेगळे विधी, समज, स्त्रियांची स्थिती अशा अनेक गोष्टींवर प्रा. मांडे यांनी प्रकाश टाकला आहे. अनेक लोकांशी संवाद साधून, संदर्भपुस्तकांचा वापर करून त्यांनी ही अभ्यासपूर्ण महिती दिली आहे. गुन्हेगार जमातीच्या कायद्याचे दुष्परिणाम, त्यांच्या कथा आणि व्यथा, मुस्लिम भटक्‍या जातींची उपेक्षा, भटके-विमुक्तांचं प्रथमवसन आणि विकास-स्थिती आदींबाबतही त्यांनी चर्चा केली आहे.

समष्टीचे मूल्यभान
प्रकाशक - सुविद्या प्रकाशन, पुणे (९८८१०६५८९७) / पृष्ठं - १९२ / मूल्य - २५० रुपये

बी. जी. वाघ यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील वैचारिक लेखांचं हे संकलन. ‘सौंदर्य आणि न्याय’, ‘माणूस प्रबुद्ध का झाला नाही?’, ‘समकालीन व्यवस्था व न्याय’, ‘दु-खही हवं सर्जनशील’, ‘ज्ञान म्हणजेच विद्रोह’, ‘माणूस कशासाठी जगतो?’ ‘निसर्ग अधिक क्रूर की मानव?’, ‘मौन म्हणजे अंत’ आदी शीर्षकं असलेल्या लेखांचा पुस्तकात समावेश आहे. समाज, शिक्षण, स्वातंत्र्य, निसर्ग, सत्य, सौंदर्य, परिवर्तन, क्रांती, प्रेम अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

महान भारतीय संत
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये

अनेक संतांनी भारताला मौलिक विचारधन दिलं. जातिभेदापासून कर्मकांडांपर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी साहित्यातून प्रहार केला. अशाच काही संतांचा परिचय करून देणारं हे पुस्तक. वेगवेगळ्या अभ्यासकांनी या संतांचा परिचय करून दिला आहे. देविदास पोटे यांनी संपादन केलं आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांच्यापासून तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशा अनेक संतांची माहिती या पुस्तकात आहे. संत कबीर, पुरंदरदास, नरसी मेहता, भक्त कबन, तिरुवल्लुवर, योगी अरविंद अशा महाराष्ट्राबाहेरच्याही संतांची माहिती पुस्तकात वाचायला मिळते.

शरदाचे चांदणे
प्रकाशक - चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - ४१६ / मूल्य - ६२५ रुपये

डॉ. शरद घाटे यांनी घेतलेला हा मराठी प्रेमकवितेचा रसास्वाद. साधारण १८८५ ते १९८० या कालखंडातल्या कविता त्यांनी विचारात घेतल्या आहेत. या प्रेमकवितांचे वेगवेगळे कंगोरे त्यांनी उलगडून दाखवले आहेत. प्रेमकवितांतली रूपगुणवर्णनं, प्रेमाची निर्मिती आणि महत्त्व, विरह-शृंगाराची कविता, साठोत्तरी मराठी कविता, स्त्रीवादी कविता अशा अनेक गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, माधव ज्युलिअन यांच्या कवितांचंही त्यांनी रसग्रहण केलं आहे. कवितांच्या रसास्वादाबरोबर महत्त्वाच्या कवींचा परिचय, त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्यं याही गोष्टी त्यांनी दिल्या आहेत.

वाटचाल फर्ग्युसनची
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं - ५९८ / मूल्य - ७५० रुपये

फर्ग्युसन महाविद्यालय हे केवळ एका महाविद्यालयाचं नाव नाही, तर अनेक रथी-महारथी जिथं शिकले, जिथं त्यांनी राजकारणापासून साहित्यापर्यंत अनेक प्रेरणा मिळवल्या असं ते स्थान आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेला सव्वाशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. वि. मा. बाचल यांनी त्याचा सांगोपांग इतिहास लिहिला आहे. या महाविद्यालयाच्या वाटचालीचे अनेक टप्पे आहेत. डॉ. बाचल यांनी या टप्प्यांची तीन भागांमध्ये मांडणी केली आहे. स्थापना ते सुवर्णमहोत्सव (१८८५-१९३५), सुवर्णमहोत्सव ते शताब्दी (१९३५-१९८५), शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव (१९८५-२०१०) अशा तीन भागांमध्ये त्यांनी फर्ग्युसनची वाटचाल मांडली आहे. डॉ. राजा दीक्षित यांनी संपादन केलं आहे.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
प्रकाशक - स्वरमहिमा प्रकाशन, पुणे (९९७५६२१५४४) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १५० रुपये

ॲड. सुनीता प्रभू यांनी लिहिलेला हा कथासंग्रह. स्त्रीच्या मनाचा वेध घेणाऱ्या, वास्तवावर प्रकाश टाकणाऱ्या कथांचा त्यात समावेश आहे. प्रभू यांनी पाठराखीण भगिनी साह्य समिती या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या कामातून त्यांना अनेक स्त्रिया भेटल्या, अनेक अनुभव मिळाले. त्यातून आणि प्रभू यांच्या निरीक्षणांतून या कथा साकार झाल्या आहेत. स्त्रीस्वभाव, जोडीदाराचं वर्तन, माहेर-सासरच्या मंडळींचे स्वभाव, नात्यांमधले बंध आदी अनेक गोष्टींवर या कथा प्रकाश टाकतात.

सहज लिहिताना
प्रकाशक - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं - १९२ / मूल्य - २०० रुपये

शहाजी कांबळे यांच्या छोटेखानी ललितलेखांचा हा संग्रह. त्यांच्या संवेदनशील मनाला वेळोवेळी जे स्पर्शून गेलं, त्यांनी स्वत- जे अनुभवलं ते त्यांनी तरलपणे या पुस्तकात शब्दबद्ध केलं आहे. कोणतीही चौकट न मानता त्यांनी लेखन केलं आहे. श्रद्धा, वारी अशा विषयांपासून माझा कोपरा, चहा, लग्नाचा वाढदिवस अशा अनेक विषयांपर्यंत त्यांनी लिहिलं आहे. कोणताही फापटपसारा न मांडता केलेलं हे लेखन. वेगवेगळे अनुभव, व्यक्तींविषयीचं निरीक्षण, किस्से अशा गोष्टी या पुस्तकात आहेत.

साभार पोच

  •      हीच देवपूजा खरी / स्वामी वरदानंद भारती यांच्या विचारांचं संकलन / संकलन - वसुधा परांजपे/ प्रबोध प्रकाशन, पुणे / पृष्ठं - ३६६ / मूल्य - २०० रुपये
  •      श्रीगणेशसहस्रनाम / अाध्यात्मिक / संकलन - श्रीदिगंबरतनय/ श्री देवदेवेश्‍वर संस्थान, पुणे (८९२८७२०४१५) / पृष्ठं - ११२ / मूल्य - ५० रुपये
  •      मनाच्या अभयारण्यात / कवितासंग्रह / कवी - जीवन आनंदगावकर (९८५०५०७६०२)/ जे. कृष्णमूर्ती विचारमंच, पुणे (९४२२३५०३५०) / पृष्ठं - ९६ / मूल्य - ८० रुपये
  •      दासबोध बोध / दासबोधाचं विवेचन / धनश्री कानिटकर (८३९०२५०९६०)/ मोरेश्‍वर कानिटकर, मिरज / पृष्ठं - ६८ / मूल्य - ५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com