स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

ग्रामपंचायत मौजे डोंगरगाव
प्रकाशक - मधुश्री प्रकाशन, पुणे (९८५०९६२८०७) / पृष्ठं - २५२ / मूल्य - ३५० रुपये

ग्रामीण भागातल्या राजकारणाचं अंतरंग उलगडून दाखवणारी ही कादंबरी. शाम शिंदे यांनी ती लिहिली आहे. डोंगरगाव नावाच्या एका गावाची, तिथल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची ही प्रातिनिधीक कथा. गुण्यागोविंदानं राहणाऱ्या गावकऱ्यांत राजकारणामुळं दोन गट तयार होतात, भ्रष्टाचार वाढत जातो, निवडणुकीत सगळे गैरमार्ग वापरले जातात. अशा वेळी लोकशाही जिवंत राहावी म्हणून एक तरुण या भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात कसा करतो, याची ही रंजक, डोळ्यांत अंजन घालणारी कथा.

सर विश्‍वेश्‍वरय्या
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १५० रुपये

अभियंते, अर्थतज्ज्ञ, लेखक अशा वेगवेगळ्या रुपांनी परिचित असलेले आणि भारतरत्न सन्मान मिळालेले सर विश्‍वेश्‍वरय्या यांचं हे चरित्र. मुकुंद धाराशिवकर यांनी ते लिहिलं आहे. अनेक वास्तूंच्या उभारणीपासून संस्थांच्या स्थापनांपर्यंत किती तरी गोष्टी विश्‍वेश्‍वरय्या यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी फक्त मोठी कामं केली नाहीत, तर त्यांच्यामागचं एक तत्त्वज्ञान, मूलभूत विचार या गोष्टी विकसित केल्या. प्रतिभेच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी अनेक मानदंड तयार केले. त्यांच्या या सगळ्या कार्याची ओळख या पुस्तकातून होते.

प्रेषित मोहम्मद
प्रकाशक - सलाम सेंटर, बंगळूर (०८०-२६६३९००७) / पृष्ठं - ३६८ / मूल्य - ४०० रुपये

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी माहिती देणारं हे पुस्तक. त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं कार्य, त्यांची गुणवैशिष्ट्यं यांच्याविषयी बंगळूरच्या सलाम सेंटरचे सय्यद हमीद मोहसिन यांनी लिहिलं आहे. छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रेषितांचं आयुष्य आणि तत्त्वज्ञान उलगडत जातं. प्रेषित मोहम्मद, इस्लाम धर्म यांच्याविषयी अनेक गोष्टी माहीत करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. सय्यद इफ्तेकार अहमद यांनी अनुवाद केला आहे.

सत्य सांगा ना...!
प्रकाशक - नावीन्य प्रकाशन, पुणे (९८२२९३९४४६) / पृष्ठं - १६८ / मूल्य - १८० रुपये

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. असहिष्णुता, नोटबंदी, काश्‍मीर प्रश्‍न, जेएनयूमधल्या घटना, केरळमधले हल्ले, देशाची सुरक्षा, पोकळ पुरोगामीत्व अशा वेगवेगळ्या विषयांवर विशिष्ट चौकटीतून डॉ. शेवडे यांनी मतं मांडली आहेत.

प्रयोग वनस्पती विज्ञानाचे, विज्ञानातील रंजकता
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४)/ पृष्ठं - ९२, ७८ (अनुक्रमे) / मूल्य - १२०, १०० रुपये (अनुक्रमे)

विज्ञानातल्या वेगवेगळ्या प्रयोगांबाबत डी. एस. इटोकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं. विज्ञानाची तत्त्वं अतिशय छोट्या छोट्या प्रयोगांद्वारे त्यांनी समजावून दिली आहेत. काही प्रयोग तर अगदी घरात नेहमी सापडणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येतील. ‘प्रयोग वनस्पती विज्ञानाचे’ या पुस्तकात इटोकर यांनी वनस्पतींची मुळं, खोड, पानं अशा सर्व अवयवांशी संबंधित किंवा अनुषंगिक गोष्टींशी संबंधित प्रयोग दिले आहेत. पानाला असणारी छिद्रं, पाण्याकडं वळणारी बियांची मुळं, पानांचं ऑक्‍सिजन सोडणं अशा अनेक गोष्टी या प्रयोगांतून माहीत करून घेता येतील. ‘विज्ञानातील रंजकता’ या पुस्तकात दृष्टीसातत्य, पृष्ठताण, गुरुत्वमध्य आदी तत्त्वांबाबतच्या प्रयोगांचा समावेश आहे. डोलणारा पक्षी, बाटलीतली पाणचक्की, वर चढणारा संकू, लाकडी नाव, हालचाल करणारं चित्र, चिकटणारं वर्तुळ, उडणारं बूच अशा अनेक गमतीदार वस्तूही तयार करून त्यांद्वारे विज्ञान शिकण्याची सुविधा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सागरशाळा
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं - १५० / मूल्य - १५० रुपये

देवेंद्र कांदोळकर यांनी गुजरातमधल्या कच्छ भागात आणि इतर परिसरांत उभारलेल्या सागरशाळांची ही कहाणी. गोव्यातल्या शाळेतल्या शिक्षकाच्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून कांदोळकर गुजरातसारख्या अपरिचित भागात गेले. युसुफ मेहेरअली सेंटर आणि राष्ट्र सेवा दल यांच्या सहकार्यानं त्यांनी सागरशाळा सुरू केल्या. अनेक समस्यांनी रापलेल्या मुलांना त्यांनी शिक्षणाची गोडी लावली. रंधबंदर, लुणी, कुतडी अशा भागांत वेगवेगळे प्रयोग केले. सागरशाळांच्या या प्रयोगांत त्यांना वेगवेगळे चांगले-वाईट अनुभव आले, शिकायला मिळालं. कांदोळकर यांनी हे सगळे अनुभव प्रांजळपणे दिले आहेत. सकारात्मक पद्धतीनं विचार केला, तर किती छोटे-मोठे बदल होऊ शकतात, याचा वस्तुपाठच हे पुस्तक देतं.

जन ठायीं ठायीं तुंबला
प्रकाशक - जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद (९४२२८७८५७५) / पृष्ठं - ३४४ / मूल्य - ४०० रुपये

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, विचारवंत विनय हर्डीकर यांच्या वेगवेगळ्या राजकीय लेखांचं हे संकलन. वेगवेगळ्या निमित्तांनी २००४ ते २०१५ या काळात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. ‘काँग्रेस आणि भाजप’, ‘शेती आणि समाज’, ‘शरद पवार आणि त्यांचे राजकारण’, ‘व्यक्ती आणि विचार’ आणि ‘संकीर्ण’ अशा पाच विभागांत मांडणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयांवर अतिशय खोलात जाऊन केलेली चिकित्सा हे या लेखनाचं वैशिष्ट्य. हर्डीकर यांनी त्यांच्या खास शैलीत आणि अर्थातच विशिष्ट वैचारिक चौकट घेऊन लिहिलेले हे लेख नवा दृष्टिकोन देतात. मांडणी आणि प्रस्तावना राम जगताप
यांची आहे.

नाश्‍ता प्लेट-डोंट बी लेट
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं - १३४ / मूल्य - १५० रुपये

भरपेट नाश्‍ता करणं प्रकृतीसाठी चांगलं असतं, असं सांगितलं जातं. ऋजुता वाकडे यांनी नाश्‍त्यासाठीच्या वेगवेगळ्या पाककृती या पुस्तकात सांगितल्या आहेत. पारंपरिक पदार्थांना आधुनिक ‘टच’ दिल्यामुळं सगळ्याच पिढ्यांतल्या खवय्यांना हे पदार्थ आवडतील. खजुराच्या साटोऱ्या, कोहळा डिलाइट, सोया-पनीर पराठा, इडली बर्गर, उपमा-इडली कटलेट, दह्यातले नूडल्स, खिचडी पराठा अशा नावीन्यपूर्ण पदार्थांच्या पाककृती या पुस्तकात आहेत. पावाचे पदार्थ, डोसे, गोडाचे पदार्थ, पराठे, अनोखे चटपटीत पदार्थ, सूप्स आणि सरबतं अशा विभागांत पाककृतींची मांडणी करण्यात आली आहे.

शिकारनामा
प्रकाशक - मनाक्षरे पब्लिकेशन्स, पुणे (९५९५३१९९०९) / पृष्ठं - १९८ / मूल्य - २५० रुपये   

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या तत्कालीन माहूर संस्थानचे राजे उदाराम यांच्या घराण्यातले राजे मधुकर देशमुख यांनी त्या काळात केलेल्या शिकारींच्या या कथा. ते पुस्तक आता नव्यानं भेटीला आलं आहे. देशमुख यांनी शिकारींच्या वर्णनांबरोबरच वेगवेगळ्या प्राण्यांची, निसर्गाची वर्णनं, प्राण्यांबाबतची निरीक्षणं या सगळ्या गोष्टीही मांडल्या आहेत. त्यांना आलेले अनुभव, त्यांची माहिती, वेगवेगळे तपशील याही गोष्टी पुस्तकात आहेत. एक वेगळ्याच प्रकारचं विश्‍व या पुस्तकातून उभं राहतं.

साभार पोच

  •      रावीचा मोर / बालसाहित्य / लेखन आणि चित्रं - ल. म. कडू / गमभन प्रकाशन, पुणे (०२०-२४४५८१४१) / पृष्ठं - १६ / मूल्य - २० रुपये
  •      आनंदयात्री / मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेषांक/ संपादक - अमेय गुप्ते/ विश्‍लेषा प्रकाशन, कान्हे, ता. मावळ पुणे / पृष्ठं - २४ / मूल्य - ४० रुपये
  •      शरदाचे चांदणे / कवितासंग्रह / कवयित्री - प्रा. जयश्री थोरवे (गव्हाणे) (९८५०९०७२०२) / स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं - ८४ / मूल्य - १०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com