अपूर्णतेची हुरहूरच नव्या वाटा दाखवते (निखिल फाटक)

अपूर्णतेची हुरहूरच नव्या वाटा दाखवते (निखिल फाटक)

सोलो तबलावादन, गायन, वादन, नृत्याची संगत, तसंच फ्युजन म्युझिक या सगळ्या प्रकारांमध्ये मी काम करत आहे. अजून खूप जमायचं बाकी आहे, याची नक्कीच जाणीव आहे. हे सगळं करत असतानाच ‘मी संपूर्ण व्यक्त होण्यासाठी अजून उरलो आहे,’ असं वाटतं. हीच अपूर्णता किंवा मनातली हुरहूर नवीन वाटा शोधायला प्रवृत्त करते...

माझं तबल्याचं शिक्षण वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालं. इतर लहान मुलांप्रमाणे खेळत बसण्यापेक्षा खुर्चीवर, शाळेतल्या बेंचवर हातानं ताल धरणं किंवा घरी डबे बडवणं मला जास्त आवडायचं. आई-बाबांनी हे पाहिल्यावर त्यांना आनंदच झाला. कारण, बाबांना तबला आवडायचा. तसं आमच्या घरी संगीतात कुणी नव्हतं; पण सतत संगीत ऐकण्याचा संस्कार घरात होता. माझं नावदेखील ज्येष्ठ सतारवादक निखिल बॅनर्जी यांच्यावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांचं सतारवादन घरच्यांना बेहद्द प्रिय. माझ्या आजीनं वयाच्या साठाव्या वर्षी हार्मोनिअम शिकायला सुरवात केली आणि पासष्टाव्या वर्षापासून पुढं भजन-कीर्तनाला तिनं साथ केली.

माझी पहिली तबलाजोडी आजीनंच घेऊन दिली होती. सुरेश सामंत हे माझे पहिले गुरू. तबल्यावर आणि शिष्यांवर मनापासून प्रेम करणारे गुरू मला लाभले हे माझं भाग्यच. ‘सामंत तबला क्‍लास’ हा नावापुरता क्‍लास आहे, खरंतर ते गुरुकुलच होय. आमचा क्‍लास कधीच एका तासापुरता नसायचा. संध्याकाळी सातच्या बॅचला गेलं की घरी यायची वेळ ठरलेली नसे. क्‍लासमध्ये नवीन शिकणं, रियाज करणं, मग मोठ्या वादकांची रेकॉर्डिंग्ज्‌ ऐकणं, त्यावरची सरांची टिपण्णी ऐकणं, मोठमोठ्या वादकांच्या गोष्टी ऐकणं आणि मग ‘मलाही असं वाजवता आलं पाहिजे,’ हे ध्येय मनात ठरवून रात्री बारा-एक वाजता घरी जाऊन अंधारात डोळे उघडे ठेवून झोपणं...! अशी भारावलेली सात-आठ वर्षं काढल्यावर ‘दहावीनंतर काय करायचं’ हा प्रश्‍न माझ्यासमोर नव्हताच. ‘तबलाच करायचा’ हे नक्की होतं. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून मी तबल्यात बीए आणि एमए केलं. या पाच वर्षांच्या काळात माझा सांगीतिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.

सुरेश तळवलकर, भाई गायतोंडे, सामताप्रसादजी, अल्लारखा खाँ, सुधीर माईणकर, बिरजूमहाराज,  रोहिणी भाटे अशा दिग्गजांच्या कार्यशाळांमध्ये मला खूप शिकायला मिळालं.

माझे दुसरे गुरू योगेश समसी. हा देवानं दिलेला दुसरा आशीर्वाद मी मानतो. पहिला सामंत सरांच्या रूपानं, तर दुसरा योगेशदादांच्या रूपानं. अर्थात एका गुरूकडून दुसऱ्या गुरूकडं जाण्याचा प्रवास सुकर नव्हता. योगेशदादांचा सोलो तबला ऐकला आणि ‘हे मला आलं पाहिजे’ ही प्रांजळ इच्छा ठेवून मी त्यांच्याकडं गेलो. आपला शिष्य दुसऱ्या गुरूकडं गेला आहे, हे स्वीकारणं नक्कीच सोपं नसतं; विशेषतः जेव्हा १४ वर्षं एका विद्यार्थ्यावर मेहनत घेतलेली असते तेव्हा. यासंदर्भात सामंतसर त्यांच्या जागी बरोबर होते आणि आपला तबल्याचा व्यासंग वाढावा, नवीन गोष्टीही आत्मसात व्हाव्यात हा माझा हेतूही अयोग्य नव्हता; त्यामुळं त्यांनी मनात अढी ठेवली तरी माझी त्यांच्याविषयीची निष्ठा, प्रेम आणि आदर कधीच कमी झाला नाही. वडिलांच्या संस्कारांमुळं असेल कदाचित; पण त्यांच्याशी संबंध तोडावा, असं कधी मनाला शिवलंही नाही. गुरूंविषयींच्या कर्तव्यात मी कधी काही कमी पडू दिलं नाही आणि म्हणूनही असेल कदाचित; सामंतसर आणि माझ्यातलं नातं काळाच्या ओघात पुन्हा सुदृढ बनलं आहे.

आपल्याजवळ असलेल्या कलारूपी, विद्यारूपी बावनकशी सोन्यात- केवळ दागिना बनवण्यासाठी - तांबं म्हणजे करामती (गिमिक) मिसळणारे योगेशदादा नाहीत. कलेतला सच्चेपणा जपणाऱ्या गुरूंचे संस्कार मिळणं हे भाग्यच. योगेशदादांनी मला आणि सर्व गुरूबंधूंना तबल्याकडं किंवा संगीताकडं बघण्याची एक ‘नजर’ दिली. माझ्या कुवतीनुसार त्यांची तालीम पचवायचा मी प्रयत्न करत आहे. माझ्या वादनात जे कमी असेल, त्याला जबाबदार मी आहे. दोन्ही गुरूंनी मला जे भरभरून दिलं आहे ते मी पचवतोय आणि स्वतःत वाढ करण्याचा प्रयत्न करतोय. शिकण्याचा प्रवास अजून सुरूच आहे आणि मला त्यातच आनंद आहे.

उच्च कोटीचा कलाकार हा गुरू म्हणूनही उच्च कोटीचा असणं हा योग विरळाच असतो. हा योग योगेशदादांमध्ये जुळून आला आहे. त्यांचा शिष्य होण्याचं भाग्य माझ्या नशिबी आहे याचं मला खूप समाधान आहे.

तसं मंचावर तबला वाजवायला मी बाराव्या वर्षी सुरवात केली. शाळा-कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळाली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली. एकदा लक्ष्मी रस्त्यावर राघवेंद्रस्वामींच्या मठात मी अरविंद गजेंद्रगडकर यांना साथ करत होतो. त्या वेळी मी तेरा वर्षांचा होतो, श्रोते तबला ऐकून खूश होते. कुणी दोन, कुणी तीन, कुणी पाच रुपये बक्षीस म्हणून माझ्या तबल्यासमोर ठेवत होते. त्याच वेळी पंडित भीमसेन जोशी अर्थात अण्णा दर्शनाला मठात आले. दहा मिनिटं ऐकून निघून गेले. माझी आई अण्णांच्या गाण्याची चाहती; त्यामुळे त्या वयातही मला ते चांगले माहीत होते. त्या वेळी त्यांनी कौतुकानं माझ्याकडं बघून स्मितहास्य केलं होतं, ते अजूनही आठवतं. त्या कार्यक्रमात बक्षीस म्हणून मला ८० रुपये मिळाले होते. ते माझं पहिलं मानधन!

साथसंगतीच्या बाबतीत पहिला परिचय झाला तो नृत्याशी. गुरू मनीषाताई साठे यांच्याकडं चौदाव्या वर्षी वाजवायला सुरवात केली. मग सोळाव्या, सतराव्या वर्षी गुरू रोहिणीताई भाटे (बेबीताई) यांच्याकडं सुरवात झाली. नृत्यामुळे संगीताचं ‘दृश्‍यस्वरूप’ माझ्यासमोर आलं. त्यामुळे माझ्या जाणिवा नक्कीच विस्तारल्या. नृत्य किंवा संगीत म्हणजे फक्त तयारी, रियाज नसून त्याला अनेक  जाणिवांचे पदर आहेत, हे मला रोहिणीताईंच्या सहवासात समजलं.

राहुल देशपांडे हा माझा गुरुबंधू. तो सामंतसरांकडं तबला शिकलेला आहे. आम्ही असंख्य कार्यक्रम एकत्र केले आहेत. आमच्या मनाची तार जुळलेली आहे, असं मला वाटतं. गाण्याशी खऱ्या अर्थानं संबंध त्याच्यामुळेच आला. कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याशी नाळ जुळली तीही राहुलमुळेच. ‘वसंतोत्सव’ तसंच सर्व संगीतनाटकं या सगळ्यांचा मी एक भाग आहे, याचा खूप अभिमान वाटतो.

साथीदार-कलाकार हा फक्त मंचावर चांगला वादक असून चालत नाही, त्याची मंचाव्यतिरिक्तही मुख्य कलाकाराशी तार जुळलेली असणं आवश्‍यक असतं. महेश काळे हा माझा तसा तार जुळलेला, जिवाभावाचा मित्र आहे. त्याच्याबरोबरही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजवताना खूप आनंद मिळतो. रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, विजय कोपरकर, मंजूषा पाटील, सावनी शेंडे यांच्याबरोबरही माझं खूप छान नातं आहे. या सगळ्यांबरोबर वाजवताना त्यांच्या संगीताचा आनंद लुटता येतो. ज्येष्ठ कलाकारांमध्ये किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, अजय पोहनकर, आरती अंकलीकर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रोहिणी भाटे, मनीषा साठे आणि अशा अनेक कलाकारांना संगत करायचा योग आला. यामुळं मी खऱ्या अर्थानं संपन्न झालो. ‘सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सव’, ‘वसंतोत्सव’ तसंच देशा-परदेशांतल्या अनेक प्रसिद्ध संगीतसंमेलनांत मी तबलावादन करतो, याचा मला आनंद आहे.

सोलो तबलावादन, गायन, वादन, नृत्याची संगत, तसंच फ्युजन म्युझिक या सगळ्या प्रकारांमध्ये मी काम करत आहे. अजून खूप जमायचं बाकी आहे, याची नक्कीच जाणीव आहे.

हे सगळं करत असतानाच ‘मी संपूर्ण व्यक्त होण्यासाठी अजून उरलो आहे,’ असं वाटतं. हीच अपूर्णता किंवा मनातली हुरहूर नवीन वाटा शोधायला प्रवृत्त करते, म्हणूनच तबला करतानाच मी इव्हेट मॅनेजमेंट कंपनीही चालवली. त्यातून ‘तबलामहोत्सव,’ ‘शाम-ए-गझल,’ ‘क्‍लासिकल डान्स कोरिओग्राफी फेस्टिव्ह,’ ‘अभिवृंद’ यांसारखे उपक्रम केले. काही संगीतनृत्याच्या डीव्हीडींची निर्मितीही केली. यात काही जिवाभावाच्या मित्रांचा उल्लेख करणं आवश्‍यक आहे. आदित्य ओक, राहुल गोळे, चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, आमोद कुलकर्णी, जयेश जोशी, स्वप्ना दातार यांसारखी मित्रमंडळी नवीन काहीतरी करण्यासाठी सातत्यानं ऊर्जा देत असतात.

मी ‘धा-ता क्रिएशन’ या नावाचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. मला आणि माझ्या मित्रांना व्यक्त होण्यासाठी हे एक मुक्त व्यासपीठ आहे. संगीत, साहित्य, नृत्य, तसंच इतर परफॉर्मिंग आर्टससाठी हे यू-ट्यूब चॅनल आहे.

कलाकार हा त्याच्या माध्यमापलीकडंही खूप उरलेला असतो, असं मला वाटतं. ते जे काही उरलेलं असतं ते व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ आहे असं मी मानतो. या चॅनलवर आम्ही अनेक सांगीतिक प्रयोग करणार आहोत. या चॅनलसाठी मी लहान मुलांच्या गोष्टी नुकत्याच लिहिल्या. त्या माझ्या बायकोनं (शर्वरी जमेनीस) फार सुंदररीत्या सादर केल्या आहेत. यातून एक वेगळंच समाधान मला मिळत आहे.

संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायची माझी इच्छा आहे. जगभरात कुठंही उत्तर हिंदुस्थानी संगीताचं शिक्षण घेतलं तर किमान पहिल्या पाच वर्षांचा अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती ही एक असावी असं मला वाटतं. म्हणजेच मी सामंतसरांकडं शिकलो नसतो तर पहिल्या पाच वर्षांत कंटाळून तबला सोडला असता किंवा अजून काही जास्त शिकलो असतो, ही अनिश्‍चितता संपायला हवी. वेस्टर्न म्युझिकच्या पाच परीक्षा उत्तीर्ण झालेली व्यक्ती ही जगभरात एका समान पातळीवर असते; पण आपल्या संगीतात असं अजून झालेलं नाही. दोन वेगवेगळ्या गुरूंकडं पाच वर्षं शिकलेल्या विद्यार्थ्यांची पातळी भिन्न आहे. काळानुरूप संगीत-शिक्षणपद्धतीत अमूलाग्र बदल आवश्‍यक आहेत, तरच नवनवीन प्रतिभावान कलाकार निर्माण होतील, असं मला वाटतं.

अजून खूप पल्ला मला गाठायचा आहे. गुरूंनी दिलेली थैली मोठी आहे, त्या थैलीतल्या सोन्याच्या मोहरांची गणती अजून सुरूच आहे, कदाचित ती गणती संपणारही नाही! गुरूंनी विद्यारूपी दिलेलं धन मोजण्यात आणि सांभाळण्यातच जन्म जाईल आणि खरंतर यातच खूप आनंद आहे. आई-वडील, बायको यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय हा प्रवास सुरू ठेवणं शक्‍य नाही. त्यांच्यामुळेच इथवर आलो आणि अजून पुढं जाईन, अशी आशा वाटते.

मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण मी कलाकार झालो. कलेच्या क्षेत्रात रोज नवीन गोष्ट सापडते, रोज नवीन अभ्यास सुरू होतो आणि मग अमुक एका ठिकाणी पोचण्यापेक्षा त्या प्रवासाचीच मजा येते आणि आयुष्य नकळत सुंदर बनतं. तबल्याची लय सांभाळताना सापडलेली ही आयुष्याची लय अशीच अखंडित राहो, ही ईश्‍वराकडं प्रार्थना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com