शेवटचा अभिजात कम्युनिस्ट नेता 

Fidel Castro
Fidel Castro

अमेरिकेसारख्या महासत्तेला दाद न देता फिडेल कॅस्ट्रो यांनी तब्बल पाच दशके क्‍यूबाची सत्ता एकहाती सांभाळली. अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरलेली त्यांची कारकीर्द दीर्घकाळ स्मरणात राहील. 

जगातला शेवटचा अभिजात (क्‍लासिकल) कम्युनिस्ट नेता फिडेल कॅस्ट्रो, त्याचे सहकारी माओ, हो ची मिन्ह यांच्या सान्निध्यात पोचला. 1956 मध्ये कॅस्ट्रोंनी क्‍यूबाचे हुकूमशहा बाटिस्टा यांच्या विरोधात संघर्ष सुरू केला.

बाटिस्टा असंतुलित देशभक्त (फॅसिस्ट) होता. क्‍यूबातल्या साखरसम्राट आणि धनिकांच्या मदतीने त्याने आपली लष्करी सत्ता शाबूत ठेवली होती. गरिबी आणि विषमता या रोगाने पछाडलेला देश त्याने लष्करी सत्ता वापरून, दडपशाही करून ताब्यात ठेवला होता. या कामी अमेरिकेची मदत आणि फूस बाटिस्टाला होती.

बाटिस्टाच्या राजवटीमुळं अमेरिकेचा आर्थिक फायदा होत होता. कॅस्ट्रो यांनी क्रांती करून 1959 मध्ये बाटिस्टा राजवट उलथून सत्ता काबीज केली. क्‍युबात कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. कॅस्ट्रोंनी दोन मोठ्या गोष्टी केल्या. जागतिक दर्जाची उत्तम आरोग्य व्यवस्था जनतेला मोफत उपलब्ध केली. आजही क्‍यूबन आरोग्य व्यवस्था आपला दर्जा आणि प्रतिष्ठा टिकवून आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम मोफत शिक्षण जनतेला दिले. माणसाच्या जगण्याच्या या दोन गोष्टी-शिक्षण व आरोग्य जनतेला मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. सुधारणेसाठी आवश्‍यक असलेला निधी आर्थिक बंधनांवर आधारलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमधून कॅस्ट्रो यांनी उभा केला. सर्व आर्थिक उत्पादनांचे राष्ट्रीयीकरण झाले. उत्पादन व्यवस्था कार्यक्षम आहे की नाही याची चौकशी सत्तेने केली नाही.

एकूणच समाजात मूल्य वाढत आहे की नाही (व्हॅल्यू ऍडिशन) याची काळजी सत्तेने केली नाही. बाजार म्हणजे पाप आहे असे मानून मागणी नियंत्रित केली आणि नियंत्रित मागणी पुरवेल तेवढाच पुरवठा करणारी उत्पादन व्यवस्था उभी केली. परिणामी उत्तम शिक्षण, चांगले आरोग्य हाताशी लागले. पण, जगण्याला आवश्‍यक वस्तू आणि सेवा नागरिकांच्या वाट्याला आल्या नाहीत.

देशात वस्तूंचा तुटवडा असे. वस्तू एक तर गायब तरी असत किंवा महाग तरी असत. वस्तूंच्या अभावावर माणूस एक उपाय शोधतो. तो अल्पसंतुष्ट होतो, जे असेल त्याच्याशी जुळवून घेतो. परंतु, जसा भारतीय समाज हजारभर वर्षे अल्पसंतुष्ट राहिला, तसे इतर समाजही मन आणि इच्छा मारून स्वस्थ बसतील अशातला भाग नाही. क्‍यूबातल्या जनतेत असंतोष निर्माण झाला. शिक्षण-आरोग्य या गोष्टी चांगल्या आहेत हे मान्य करूनही इतर सुखांची मागणी क्‍यूबन समाज करू लागला. मागण्या करण्याचे, असंतोष प्रकट करण्याचे लोकशाही स्वातंत्र्यही लोक मागू लागले.

कॅस्ट्रो यांनी या मागण्या प्रतिगामी ठरवून मागणी करणाऱ्यांना तुरुंगात डांबले, त्यांचा आवाज दडपून टाकला. शेजारी अमेरिकेसारखा मालामाल देश पाहताना क्‍यूबन जनता अस्वस्थ होती. अगदी तेच पूर्व जर्मनीत आणि सोव्हिएत युनियनमध्ये घडले. शेजारच्या युरोपातील, पश्‍चिम जर्मनीतील सुबत्ता आपल्या वाट्याला का नाही? असा प्रश्न सोव्हिएत जनतेत निर्माण झाला आणि सोव्हिएत रशियातली कम्युनिस्ट सत्ता कोसळली. क्‍युबामध्ये ते जमले नाही, अमेरिकेच्या हस्तक्षेपाचाही उपयोग झाला नाही.

कॅस्ट्रो आणि त्यांचा धाकटा भाऊ राओल या दोघांनी मिळून असंतोष काबूत ठेवला. अगदी अलीकडे म्हणजे 2010 नंतर क्‍यूबन अर्थव्यवस्थेमध्ये थोडेसे बदल झाले. कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले. काही प्रमाणात मुक्त व्यापाराला परवानगी मिळाली. काही प्रमाणात आणि रूपात खासगी व्यापारालाही परवानगी मिळाली. 1959 पासून शत्रुत्व पत्करलेल्या अमेरिकेने, ओबामांच्या सरत्या काळात, 2015 मध्ये क्‍यूबासोबतचे आर्थिक आणि राजकीय निर्बंध शिथिल केले. कॅथलिकांना त्यांच्या धर्मासाठी तुरुंगात घालणाऱ्या कॅस्ट्रोंनी 2015 मध्ये पोपना क्‍यूबात बोलावले, त्यांचे स्वागत केले.

काय गंमत आहे पाहा, चीनमध्ये आणि क्‍यूबात अर्थव्यवस्थेवरील कम्युनिस्ट नियंत्रणे कमी होताहेत. अमेरिकेत उत्पादन आणि उत्पादकांवर अधिकाधिक कर बसवून गरिबांच्या विकासाचे कार्यक्रम आखले जात आहेत. क्‍यूबामध्ये कॅस्ट्रो यांचे पुतळे दिसत नाहीत. क्‍यूबामध्ये कॅस्ट्रो यांच्या नावाचा एकही रस्ता नाही. पण फिडेल कॅस्ट्रो लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात 1956 ते 2016 अशी पन्नास वर्षे वास करून होते. निधनानंतर कॅस्ट्रो क्‍यूबन लोकांच्या मनात कदाचित उरणार नाहीत, पण इतिहासात मात्र ते नक्कीच उरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com