'स्वप्ना'मागचं सत्य (निनाद खारकर)

ninad kharkar
ninad kharkar

'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप लोकप्रिय झाली.

"द अमेरिकन्स' या मालिकेच्या सहाव्या आणि शेवटच्या सीझनचा नुकताच शेवट झाला. शीतयुद्धाच्या काळात, रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या दशकात तत्कालीन सोव्हिएत संघाचे गुप्तहेर अमेरिकन नागरिक बनून अमेरिकेत राहतात आणि गोपनीय माहिती मिळवतात, अशी या मालिकेची सर्वसाधारण गोष्ट. मालिका आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकी चित्रपटांत रशियन लोकांचं जे "राक्षसी'करण केलं जातं, ते इथं सर्वथा टाळण्यात आलं आहे. मालिकेचं कथन राजकीय मुत्सद्देगिरी, हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध, शीतयुद्ध, भांडवलशाही आणि कम्युनिझम या मुद्द्यांभोवती फिरत असलं, तरी मानवी संबंधांचं घट्ट आवरण आहे. ही मालिका बनवणारा जोसेफ वेशबर्ग हा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेत अधिकारी होता. म्हणून "द अमेरिकन्स' मालिकेचे भाग सर्वप्रथम सीआयएला आधी दाखवले जातात आणि त्यांची परवानगी असेल, तर पुढे प्रक्रिया केली जाते, अशी एक दंतकथाही आहे. या मालिकेचे चाहते खुद्द अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओमाबा होते. ते पदावर असताना त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डीव्हीडी पाठवल्या जात. हा शो संपल्यावर फेसबुकवर शो बंद होण्याबद्दल बरीच हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

मुळात मालिका, त्या मालिकेतली पात्रं, कथानक, सांख्यिकी तथ्य या बाबी समांतर ऐतिहासिक कलाकृतीत दुय्यम असतात. महत्त्वाचे असतात, ते जो काळ उभा करण्यात आला आहे त्या काळानं निर्माण केलेले प्रश्न आणि त्यात शोधली गेलेली उत्तरं. ग्राहकवादी भांडवलवादाचं स्वप्न दाखवणारं अमेरिकन ड्रीम आजही अनेक भारतीय लोकांना भुरळ पाडतं. भारतातल्या तत्कालीन आर्थिक परंपरेनं ना पुरेशा नोकऱ्या निर्माण झाल्या, ना शेतीचं भलं झालं. अशा अवस्थेत एक मोठा पांढरपेशा वर्ग संधी मिळताच उपयुक्ततावादी बनून स्थलांतरित झाला. रशियातल्या अशाच वर्गाचं प्रतिनिधित्व "द अमेरिकन' मधला नायक फिलिप जेनिंग्स करतो. त्याला "मदर रशिया'बद्दल प्रेम आहे आणि कर्तव्याची जाणीव आहे; पण रशियात गरिबीत गेलेलं बालपण, रेशनच्या दुकानासमोर लावलेल्या रांगा, उदरनिर्वाहाचा प्रश्न याही गोष्टी आहेतच. त्याच वेळी अमेरिका या शत्रूराष्ट्रात सर्वसामान्य नागरिक म्हणून राहताना अमेरिकेची आर्थिक सुबत्ता, राहणीमान, सहज मिळणाऱ्या दैनंदिन गोष्टी या त्याला हव्याहव्याशा वाटतायत. त्यातून "अमेरिकेत स्थायिक होऊया का?' या विचारांप्रत तो आला आहे. त्याची बायको एलिझाबेथ जेनिंग्जसुद्धा एक गुप्तहेर आहे. रशियाच्या केजीबीनं त्यांचं लग्न लावून देऊन हेरगिरीच्या कामगिरीवर पाठवलं आहे. एलिझाबेथ कर्तव्यकठोर आहे, रशियन क्रांतीच्या तत्त्वांनी भारावलेली आहे. या जोडप्याला अमेरिकेत झालेली मुलगी पेज आणि मुलगा हेन्‍री यांच्यावर होणाऱ्या अमेरिकी संस्काराबद्दल नाखूष आणि साशंक आहे. पुढं पेजला तिचे आई-वडील कोण आहेत, याची ओळख नंतर होते आणि तीसुद्धा त्यांना सहभागी होते. अशी ही कथेची तोंडओळख होत असताना त्यांच्याशेजारी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचा अधिकारी स्टॅन बिमन राहायला येतो आणि कथेत रंग भरायला लागतो. सोव्हिएत संघ सोडून अमेरिकेत हेर म्हणून स्थायिक झालेले फिलिप आणि एलिझाबेथ आपल्या मुळांपासून फार लांब आले आहेत. सोव्हिएत संघात त्यांना आता कोणी ओळखणारंसुद्धा नाहीत. त्यांची मुलंसुद्धा अमेरिकन संस्कृतीत वाढल्यानं त्यांच्या विचार करण्यात मोठी दरी आहे. या सगळ्यात तारेवरची कसरत करून फिलिप आणि एलिझाबेथ हेरगिरी करतात आणि आपलं कुटुंब सांभाळतात.

तत्कालीन सोव्हिएत संघानं आपल्या अनेक हेरांना सर्वसामान्य नागरिक म्हणून अमेरिकेत पाठवलं होतं. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी त्यांना "द इलिगल्स प्रोग्रॅम' या ऑपरेशनअंतर्गत पकडलं. सर्वसामान्य नागरिक म्हणून पाठवताना मृत अमेरिकन लोकांचे डिटेल्स घेऊन बनावट ओळखी बनवल्या गेल्या आणि रशियन हेरांना नवीन अमेरिकन ओळख देण्यात आली. या मालिकेचा लेखक "द इलिगल्स प्रोग्रॅम'मध्ये अमेरिकन अधिकारी म्हणून सहभागी होता, म्हणून त्या व्यवस्थेचं असं स्वतःच आकलन या मालिकेत पुरेपूर आलं आहे. या मालिकेच्या लेखनाचं विशेष कौतुक करावंसं वाटतं, ते या कारणासाठी की सोव्हिएत हा अमेरिकन लोकांचा शत्रू असला, तरी बऱ्याच रशियन व्यक्तिरेखा नायकाच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षक म्हणून बघताना त्यांच्याविषयी कणव, सहानुभूती वाटते. मालिकेचं लेखन करताना लेखकांना "तुम्ही रशियन लोकांच्या जागी असता तर कोणती भूमिका घेतली असती?' असा विचार करून लिहायला सांगितलं होतं. जेम्स बॉंड, रॅंबो वगैरेंच्या चित्रपटांसारखे थंड डोक्‍यानं माणसं मारत सुटणारे नायक इथं दिसत नाहीत. अपर्याप्त हिंसा आणि त्यातून घडत जाणारी व्यक्तिमत्त्वं ही कथेची जमेची बाजू. नियती ही हिंसेपेक्षा क्रूर आणि अधिक वेदना देणारी असते, हे घडणाऱ्या घटनांबरोबर आपल्याला जाणवतं. कथानक पुढं नेण्यासाठी पात्रांना मारून टाकणं वगैरे सोपे उपाय न घेता कथानक एक वेगळ्या सैद्धांतिक पातळीवर जातं, तेव्हा कथेमागं घेतलेले कष्ट दिसतात. कोणतीही व्यवस्था कार्यरत असण्यासाठी एका सुमारतेची आवश्‍यकता असते. ती सुमारता विचार करणाऱ्या लोकांना नेहमीच अस्वस्थ करते. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण फक्त एक माध्यम आहोत, ही जाणीव झाल्यावर रशियन हेर फिलिप आणि अमेरिकन एजंट स्टॅन बिमन या दोघांत होणारा बदल लक्षणीय पद्धतीनं दाखवलाय. सहा भागांच्या मालिकांचा शेवट हा तत्कालीन सोव्हिएत संघाच्या आणि गोर्बाचेव्ह यांच्या "पेरेस्त्रोइका' आणि "ग्लासनस्त'नं होतो.

"द अमेरिकन्स' ही फक्त मारधाड करणारी हेरकथा राहत नाही. रशियातून लांब आपली ओळख लपवून राहत असलेल्या जोडप्याची आणि अमेरिकेत जन्माला आलेल्या दोन मुलांची कथा होते. या मालिकेचं नाव "द अमेरिकन्स' ठेवण्यामागं एक सैद्धांतिक कारण असावं अशी शंका येते. ती शंका म्हणजे अमेरिकन माणसं व्यापार, युद्ध, संस्कृती देवाणघेवाणीच्या निमित्तानं जिकडेजिकडे गेली, तिकडेतिकडे आपल्या अमेरिकन संस्कृतीची बीजं पेरून आली. जिकडे त्यांना ती पेरायला जमलं नाही, तिकडे राजकीय हस्तक्षेप केला, व्यापारी करार-मदार केले आणि आपलं वर्चस्व कायम राहील हे बघितलं. या कथेतसुद्धा रशियन हेर असलेले नायक आणि नायिका त्यांच्या जीवनशैलीमुळे अमेरिकन झाले आहेत आणि त्यांची मुलं तर अमेरिकेत जन्माला येऊन अमेरिकन झालीच आहेत. जेनिंग्ज जोडप्याची मुलगी पेजला चर्चच्या कार्यक्रमांची आवड आहे, वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांत भाग घेऊन ती नागरिक असल्याची जाणीव दाखवून देते, तर दुसरीकडे मुलगा हेन्‍री "अमेरिकेत सर्वांना समान संधी मिळते; पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात,' या तत्त्वावर ठाम. तो मेहनत करून चांगले मार्क मिळवतो, चांगल्या शैक्षणिक संस्थेची माहिती काढतो, शिष्यवृत्ती मिळवतो, बुडत चाललेल्या बिझनेससाठी फंडिंग जमा करायच्या आयडिया शोधून काढतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडियो गेम मनापासून एंजॉय करतो.
या शोच्या निर्मात्यांना जगाचं भविष्य अमेरिकन ड्रीम असणार आहे असं सांगायचं आहे की काय, असं वाटतं. आता आतापर्यंत बऱ्याच देशातल्या लोकांना अमेरिका ही कर्मभूमी वाटत आली आहे ती तिच्या उदारमतवादी धोरणांमुळे. अमेरिकेला आणि जगाला लागलेलं उजवं वळण भर जोमात असताना अशा मालिका अंतर्मुख करतात. अमेरिकन नागरिक म्हटलं, की जी एक लिबरल प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, तशी ती पुढे राहील का, हासुद्धा प्रश्‍न ती उभा करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com