सोनेरी स्वप्नं : तीन रुपयांची गारीगार !

‘ड्रायफ्रूटवाली बटरस्कॉच आइस्क्रीम आणि हाफ मँगो मस्तानी विथ चेरी अ‍ॅण्ड क्रीम.’ एका दमात पोरगं असं बोललं आणि मी आवंढाच गिळला. लेकाला घेऊन आइस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो.
Ice Cream
Ice CreamSakal
Summary

‘ड्रायफ्रूटवाली बटरस्कॉच आइस्क्रीम आणि हाफ मँगो मस्तानी विथ चेरी अ‍ॅण्ड क्रीम.’ एका दमात पोरगं असं बोललं आणि मी आवंढाच गिळला. लेकाला घेऊन आइस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो.

‘ड्रायफ्रूटवाली बटरस्कॉच आइस्क्रीम आणि हाफ मँगो मस्तानी विथ चेरी अ‍ॅण्ड क्रीम.’ एका दमात पोरगं असं बोललं आणि मी आवंढाच गिळला. लेकाला घेऊन आइस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो. बसल्या बसल्या भिंतीवरचे बोर्ड वाचून लेकानी ऑर्डर दिली. त्याची ऑर्डर आली आणि तो मस्त रमत गमत त्या आइस्क्रीमचा आनंद घेऊ लागला. माझी नजर आइस्क्रीम पार्लरबाहेरच्या उघड्या नागड्या पोरांकडं गेली. दोन लेकरं मजेत खेळत होती. आधीमधी भिंतीवरच्या फोटोंकडं पाहत होती. काचेला तोंड लावत होती. पण, आतमधल्या सुंदर वातावरणात एसीचा आनंद घेत असताना बाहेरच्या गरिबीचा विचार नको म्हणून मी त्या पोरांकडं दुर्लक्ष केलं.

लेकाची आइस्क्रीम खाऊन झाली आणि मी काऊंटरवर दोनशे दहा रुपये टेकवले. तसा नाराजीच्या सुरात लेक दुकानदाराला म्हणाला, ‘काका मस्तानीमध्ये हेवी क्रीम होती. त्यामुळं मस्तानी खूप थिक झाली होती आणि बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये आलमंड खूप कमी टाकता तुम्ही.’ आइस्क्रीम पार्लरवाला सॉरी बोलला आणि मला लेकाचा अभिमानच वाटला. हा पोरगा भविष्यात देश घडवणार वगैरे विचार करत आम्ही बाहेर पडलो.

तोच बाहेरच्या दोन्ही पोरांनी माझ्यासमोर हात केले. लेक माझ्याकडं प्रश्‍नार्थक चेहरा करून बघत होता. त्याच्यासमोर त्या लेकरांना हाकलणं ठिक नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हणालो, तुम्हाला आइस्क्रीम खायची का रे? तसं त्यांनी समोरच्या लिंबाखालच्या गारीगारवाल्याकडं बोटं दाखवलं. म्हणलं चला. तिथं गेलो आणि त्या लेकरांना दोन गारीगार घेऊन दिल्या. तसा पोरगा म्हणाला, ‘पप्पा मी तुम्हाला गारीगार मागितली तर तुम्ही म्हणाला हे पाणी फिल्टर्ड नसतं आणि मग यांना का दिली?’ माझ्याकडं उत्तरच नव्हतं. म्हणलं, ‘तुला पाहिजे का?’ त्यानं होकार दिला. इच्छा नसताना त्याला एक गारीगार घेऊन दिली. लेकानी त्या पोरांसोबत गारीगार संपवली. तशी ती पोरं हसत निघून गेली. लेकही त्यांच्याकडं पाहत हसत होता. मी गारीगारवाल्याला बारा रुपये दिले आणि लेकाकडं पाहून म्हणालो, ‘मगाशी आइस्क्रीम खाल्यावर त्या काऊंटरवाल्या काकाला किती बडबड केली, क्रीम जास्त होती, बदाम कमी होते. आता यांच्याकडं कर की तक्रार काही.’

गारीगारवाला आमच्याकडं पाहून हसत होता. तसा पोरगा त्या गारीगारवाल्याकडं पाहत म्हणाला, ‘मस्त होती गारीगार.’ मला धक्काच बसला. अशानं याला गारीगार खायची सवय लागेल आणि ते दूषित पाणी त्याच्या पोटात जाईल, अशी मला भीती वाटली. आम्ही गाडीत बसलो. गाडी चालवता चालवता त्याला म्हणालो, ‘गारीगारचं पाणी चांगलं नसतं बरका. पोट दुखतं. आपली आइस्क्रीमच बरी.’ तसा लेक मला थांबवत म्हणाला, ‘पण त्या काकांना तुम्ही फक्त बारा रुपये दिले आणि पार्लरवाल्या काकांना दोनशे दहा. म्हणून मी गारीगारवाल्या काकांना म्हणालो गारीगार मस्त आहे. बाकी काही नाही.’

त्याच्या उत्तरावर मी स्तब्धच झालो. प्रत्येक पुढची पिढीच भन्नाट असते, असा विचार करत हसत हसत गाडी चालवू लागलो. देशाचं भविष्य उज्ज्वल आहे, माणुसकी अबाधित राहणार वगैरे विचार डोक्यात चालू झाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com