स्वरुपाचा स्वामी - पावसचे संत स्वरुपानंद  

स्वरुपाचा स्वामी - पावसचे संत स्वरुपानंद  

माऊलीनेच इथे धाडिले। 
चैतन्यरूपी स्थिरावले। 
पावसक्षेत्री जन्मा आले। स्वामी स्वरुपानंद ।। 

सुमारे 114 वर्षांपूर्वी कोकणच्या पवित्र भूमीत रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गांवी रामचंद्र नावाचा एक बाळ एका सामान्य कुटुंबात जन्मास आला. गर्भावस्थेत मनुष्यदेह "सोऽहं सोऽ हं'' म्हणत असतो. परंतु जन्माला येताना तो "कोऽ हं, कोऽ हं'' म्हणत जन्माला येतो, असे शास्त्र सांगते. परंतु 15 डिसेंबरला पावसला हे बाळ जन्माला आले तेच मुळी सोऽ हं.. सोऽ हं.. म्हणत.

गुरुतत्व हे आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानतात. गुरु हा देवच मानावा ही आपली परंपरा स्वामींनी एका अभंगात सांगितली आहे. 
गुरू तो चि देव। ऐसा ठेवी भाव। 
सद्‌गुरू गौरव। काय वानू।। 
जे फक्त पोटभरीच्या विद्या शिकवितात ते गुरू असतात परंतु सद्‌गुरू नसतात. समर्थ रामदासांनी दासबोधमध्ये स्पष्ट सांगितले आहे. 
जो यातिचा व्यापार। सिकविती भरावया उदर। 
तेहि गुरू परी साचार। सद्‌गुरू नव्हेती।। 

स्वामी स्वरुपानंद यांचेकडे सद्विद्येची सर्व लक्षणे होती. 
दैवी संपत्तीच सर्व गुण व त्याचबरोंबर कृपाळूपण होते. 
प्रज्ञावंत, नीतीवंत, सद्विद्येने परीपूर्ण, स्वरुपी तल्लीन, देहातीत, सुख-दुःखातीत, अंतर्बाह्य शुद्ध, तिन्ही अवस्थांचा साक्षीभूत, सदासंतुष्ट, हरिदास, आत्मतृप्त, स्वानंदाची खाण, सुख-रूप, सच्चिदधन, स्वयंसिद्ध, नित्य शुद्ध, निवांत, निर्भय, साधनी दक्ष, सोऽ हं साधनी निमग्न, सद्‌गुरू नाथसंप्रदायी, साक्षात माऊलीनीच या भूतलावर पाठविलेले महानसंत म्हणजेच पावसचे परमहंस श्री स्वामी स्वरुपानंद. 

सध्याच्या काळात सामान्य जनता अंधश्रद्धेला बळी पडून अविद्येपोटी भोंदू महाराजांच्या मागे लागते. श्रद्धा हवी पण खोट्या चमत्काराला भुलू नका. आसाराम, राम पाल, राम रहिम बाबा. इत्यादी प्रचंड मोठी यादीच मध्यंतरी चर्चेत आली होती. 

तुकाराम महाराजांचा अभंगच आहे

ऐसे कैसें जाले भोंदू। कर्म करोनि म्हणति साधू। 
तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती ।। 
विषयांचा सोहळा भोगणाऱ्या अशा तथाकथित साधू मंडळींना पाहिले की मन उद्‌वीग्न होत. तुकोबांची, समर्थांची व स्वामी स्वरुपानंदांची शिकवण आठवते. स्वामी स्वरूपानंदांनी सामान्य लोकांना खरे ज्ञान दिले. अनेकवेळा सावध केले. बहुतांशी या परमार्थाच्या मार्गात असणारे लोक कळत नकळत जाळ्यात अडकतात. लोक व्यवहारच असा आहे. 
दावी चमत्कार त्यासी नमस्कार। 
लोक व्यवहार ऐसा असें।। 
स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी। 
नसे चि आवडी स्वाभाविकी।। 
थोडीशी साधना करून सिद्धी प्राप्त करायची.  किंवा त्याचा आभास निर्माण करावयाचा. जादूगारासारखे चमत्कार दाखवून लोकांचे नमस्कार घ्यायचे. मी बोलतो ते खरे होते. यातूनच त्यांचे अमर्याद दुराचार चालू होतात. सामान्य लोकांना नादी लावणं, प्रसिद्धी मिळवणं, राजाश्रय घेणं या गोष्टींना ऊत येतो. कारण लोकांना कृत्रीमाची गोडी आहे. 
स्वामी स्वरुपानंदांनी हे 50 वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. 
साधी रहाणी, स्वामींचा वेष साधा, कोणतेही थोतांड नाही, ढोंग नाही, चमत्काराला स्थान नाही, प्रसिद्धीची हाव नाही असा हा सिद्ध पुरुष. त्यामुळेच स्वामी स्तुती करताना अंतरीचे बोल येतात. 
धवल धोतर कटी विलासे। 
तैसेचि बंडि वरतीच शोभे। 
विदेही अवस्थे शरीरधारी। 
तुजविण स्वामी मज कोण तारी।
स्वामींच बालपण क्रीडा युक्त होत. पण ते क्रीडा सक्त नव्हते. 
रत्नागिरीचे "नागू' हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा ज्ञानेश्‍वरी- दासबोध - गीता- उपनिषदे यांचा अभ्यास चालूच होता. कुशाग्र बुद्धि, सुसंस्कार यामुळेच त्यांची अभ्यासात प्रगती होती. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना बाबा वैद्य उर्फ गणेशनाथ हे गुरू लाभले. वाङ्मय विशारद पास झाले. महात्मा गांधीजींच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. स्वावलंबनाश्रम स्थापन केला. देवगड, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई असा प्रवास करून लोकजागृती केली. तारुण्यात राष्ट्रकार्याला वाहून घेतले. 
वयाच्या तिसाव्या वर्षी शारिरीक आजाराचे निमित्त झाले.  अन्  योगसाधनेन अत्युत्तम अवस्था प्राप्त झाली. स्वामी क्षेत्र सन्यासी झाले. देह दिसायला गलीतगात्र परंतु मुख तेजस्वी. मन पराकोटीचे स्थिर व शांत. अंतर्बाह्या हर्षी, सोऽहं साधनकारणें'' अशी अवस्था. 

देसाई यांच्या अनंत निवासात स्वामी 40 वर्षे होते. स्वामींचे त्यावेळचे "आशिर्वादम्‌। कल्याणमस्तु।'' हे उद्‌गार व कोमल स्पर्श आजही आम्हाला निर्भय व निवांत जगण्याची प्रेरणा देतात. 

स्वामींची सोऽ हं साधना 
स्वामींनी सोऽ हं म्हणजे तो मीच आहे. नाभीपासून ब्रम्हरंध्रापर्यंत वायू वर जाताना "सो' असा (सः) ध्वनी येतो व ब्रम्हरंध्रापासून खाली येताना "अहम्' (हं) असा ध्वनी होतो. हा ध्वनी (अनाहत) सहज होतो. तिकडे फक्त अवधान असावे.

साधा प्राणायाम व सोऽहं ह्यातील फरक सांगताना स्वामींनी स्पष्ट केले. भाव हाच फरक. तो ईश्‍वर मी आहे. चैतन्य मी आहे. त्या भगवंताच्या कृपेने हे सर्व चालले आहे. असा भाव करून समर्पण भावनेने केलेले प्राणायाम म्हणजे सोऽ हं'' 

नाभीपासून ब्रम्हरंध्रात । सोऽ हं ध्वनी असे खेळत। 
तेथे साक्षेपे देवोनि चित्त । रहावें निवांत घडी घडी ।। 

स्वामींनी अशी साधना लाखो साधकांकडून प्रत्यक्ष करून घेतली. सर्व मानसिक, शारिरिक, सामाजिक ताणतणाव दूर ठेवायचे असतील तर एकांती बसून सोऽ हं साधना करावी. जीवन कृतार्थ होईल यात शंकाच नाही.  

परमार्थातील शिकवण आपल्या भेटीला आलेल्या उपासकाला, भक्ताला नीट समजावी म्हणून स्वामी सहजच एखादी गोष्ट संदर्भवजा पण अगदी थोडक्‍यात सांगत असत. त्यामुळे ऐकणाऱ्याला आनंद, बोध व समाधान प्राप्त होत असे. स्वामींच्या भेटीला आलेल्या व्यक्तीला एखादा अभंग, एखादी ओवी वाचावयास देत असत. साक्षीत्वाने कर्मे कशी करावीत. व्यवहार व नाम यांची कशी सांगड घालीवी यासाठी ते कांगारूची गोष्ट सांगत. 
ते क्रिया जात आघवे। जे जैसे निपजेल स्वभावे। 
ते भावना करोनि करावे। माझिया मोहरा।। 
साक्षित्त्वाच्या शिकवणुकीच्या ज्ञानेश्‍वरीतील ओव्या स्वामी अनुभवत. 
नाशिवंत देह पुत्र वित्त गेह। याचं भान हवे. देह, पुत्र, संपत्ती, घर-दार, आप्तेष्ट, मान, यश, किर्ती हे सारे फुटणारे फुगे आहेत. ज्ञानी भक्त गेलेल्याबद्दल शोक करत नाहीत. अज्ञानी माणूस शोक मोह माया सागरात या संसारचक्रात गुरफटतो. संजीवनी गाथेत स्वामी सांगतात.

स्वामी म्हणजे स्थिर हरिपद एक। 
तेथे तू निःशंक राहे सदा।। 

स्वामींचा साधकांना सरळसाधं सांगणं असे. प्रत्येकाने आपल्या मूळच्या सत्‌+चित्‌+ आनंद या स्वरुपाची जाणीव ठेवून सोऽहं भावाने सर्व प्राप्त कर्तव्ये अनासक्त बुद्धीने व ईशपूजन या भावनेने करावित.'' भगवंताला भक्तिशून्य ज्ञान आवडत नाही. भक्तीशून्य योग आवडत नाही. आंधळी म्हणजे ज्ञानविरहित भक्ती नको. संपूर्ण श्रद्धेशिवायची अनन्यता रहित "दांभिक'' भक्तीही आवडत नाही. भक्ती ज्ञानयुक्त व योगयुक्त असावी. ज्ञान व योग भक्तियुक्त हवेत. 

प्रत्येक कृत्य सेवामय, ज्ञानमय, प्रेममय व्हावे. परमार्थ हा सुखाची प्राप्ती करून देणारा नसून प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला तो शिकवतो. ""वेदांत सृष्टि मिथ्या असे सांगतो, तर भक्ताला तीच सृष्टि हरि-रूप दिसते. हे तत्व स्वामी विशद करतात. 
भक्त तो चि ज्ञानी, ज्ञानी तो चि भक्त। 
जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे।। 
संयमी जीवनाची आवश्‍यकता आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकालाच आहे. अती सर्वत्र वर्ज्ययेत्‌'' ही शिकवण स्वामी देतात. आपण कोणत्याही क्षेत्रात असाल, विद्यार्थी असाल, करीअर करीत असाल. स्वामींचा हा अभंग नित्य स्मरणात ठेवा. आचरणात आणा. यशस्वी जीवनाची हीच खरी शिकवण आहे. 

नको निराहार नको सेवूं फार। 
सदा मिताहार असों द्यावा ।।1।। 
नको अति झोंप नको जागरण। 
असावें प्रमाण निद्रेमाजीं ।।2।। 
नको बोलूं फार, नको धरूं मौन । 
करावें भाषण परिमित ।।3।। 
स्वामी म्हणे तुज योग-सिद्धि ।।4।। 
(संजीवनी गाथाः 116) 
स्वामींनी आपल्या  शिष्य गणाला ""सोऽ हं'' साधना शिकवली. 
सर्व भक्तगणांना ""ओम राम कृष्ण हरि'' हा मंत्र दिला. 
उदाराजगदाधारा ही वरद प्रार्थना म्हणजे पसायदानच. 
काहीही झालं तरी रागावयाचे नाही. म्हणजे "अक्रोधत्व'' या प्रकारे सर्व गुणांचे स्वामी स्वरुपानंद आहेत.

संस्कृतातील गीता माऊलीनी प्राकृतात तर स्वामींनी ""अभंग ज्ञानेश्‍वरी'' मध्ये तुम्हा आम्हाला समजेल अशी मराठीत सांगितली. अमृतधारा सह अनेक ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. 
साहित्य निर्मले, तुम्ही आम्हासाठी। 
होवोनिया काठी आंधळ्याची।। 
स्वामींनी आपल्या 261 अभंगातून अत्यंत सोप्या भाषेत तुकोबा-माऊली सारखे संजीवन दिले. विस्ताराने लहान, बिंब बचका ऐवढे...'' याप्रमाणे अनुभूतीने - महान अशा तीन प्रवचनातून सोऽ हं बोधाचे सोपे स्पष्टीकरण केलेले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com