दर्द मिन्नत-कश-ए-दवा न हुआ ! (पराग पेठे)

parag pethe
parag pethe

गालिब यांचं व्यक्तिमत्त्व लोभसवाणं होतं. कुणीही प्रेमात पडावं असं !
तुर्कस्तानी लालसर गोरेपणा...भक्कम सैनिकी बांधा...बोलके डोळे...डोक्‍यावर नेहमीच लांब टोपी...हातात काठी...असा सर्वसाधारणतः त्यांचा रंग-ढंग असे. 
विख्यात कवी-गझलकार अली सरदार जाफरी गालिब यांच्याविषयी म्हणतात ः ‘‘स्वभावानं इराणी, धर्मानं अरबी; पण संस्कृतीनं पूर्णतः भारतीय असं हे काहीसं अनाकलनीय व्यक्तिमत्त्व होतं.’’ 
गालिब यांना जीवनाविषयी विलक्षण आसक्ती होती. आयुष्य उपभोगण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात वसत असे.
मद्याची-मदिराक्षीची आवड, छानछोकीचं जगणं, उत्तमोत्तम पोशाख, जुगाराची आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची आवड असं ते एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचं हे असं व्यक्तिमत्त्व ध्यानात घेतल्यावर त्यांचाच एक शेर इथं आठवतो ः

नाकर्दा गुनाहों की भी हसरत की मिले दाद 
यारब अगर इन कर्दा गुनाहों की सजा है। 
अर्थ ः जर मी ही केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असेन, तर मग मनात येऊन गेलेल्या कितीतरी वाईट गोष्टी मी केलेल्याच नाहीत. त्या न केलेल्या गोष्टींबद्दलचं बक्षीस मला तू कधी देणार आहेस, देवा ? 
असा जगावेगळा विचार गालिब यांनाच सुचू शकतो! 
त्यांची ही अशीच एक सुंदर गझल ः
***
दर्द मिन्नत-कश-ए दवा न हुआ ।
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ ।
अर्थ ः माझ्या प्रेमरोगावर औषधाचा काहीच परिणाम झाला नाही. मी बरा झालो नाही, हे तसं एकाअर्थी चांगलंच झालं म्हणायचं. औषधाचा आभारीच आहे मी. कारण, औषध निष्प्रभ ठरल्यामुळं माझ्या प्रेमवेदना तशाच राहिल्या. चांगलंच झालं की!
(*मिन्नत-कश-ए-दवा=औषधाचा आभारी) 
***
जम्‌अ करते हो क्‍यूं रकीबों को?
इक तमाशा हुआ, गिला न हुआ ।
अर्थ ः आज मात्र हद्द केलीस तू. प्रेमातल्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांना गोळा करून त्यांच्यासमोर माझी अब्रू काढलीस. त्यांना कशाला मध्ये घ्यावंस तू? ही कसली तक्रार करायची पद्धत तुझी? तक्रार करण्याच्या नावाखाली निव्वळ तमाशा केलास तू आज! (*जम्‌अ=गोळा करणं; एकत्र बोलावणं/*रकीब = प्रतिद्वंदी, शत्रू/ *गिला = तक्रार, गाऱ्हाणं)
***
हम कहाँ किस्मत आजमाने जाएँ?
तूही जब खंजर-आजमा न हुआ। 
अर्थ ः गालिब प्रेयसीला म्हणतात ः या जीवनातल्या दुःखांना कंटाळलोय मी आता. तुझ्याकडं येतो मी. खंजीर खुपसून माझा अंत करून टाक. रोजच्या कटकटीतून सोडव मला. अरे, पण हे काय? तू मला संपवायलाही नकार देतेस? अरे दैवा! आता मी कुठं जाऊ माझं फुटकं नशीब अजमावण्यासाठी? माझ्या सगळ्या दुःखद गोष्टी जिला माहीत होत्या, अशी तू एकटीच तर होतीस. आपल्या प्रेमाचं एक वेळ राहू दे बाजूला; पण तुझ्या हातून मरणसुद्धा येऊ नये ना? काय हे दुर्भाग्य! 
(*खंजर-आजमा=खंजीर चालवणारा)
***
कितने शिरीं हैं तेरे लब, कि रकीब- 
गालियाँ खा के बे-मजा न हुआ ।
अर्थ ः तुझ्यावर फिदा असणारा प्रेमातला माझा जे प्रतिस्पर्धी आहे, त्याची आता मला कीव येते. तुझ्या शिव्या खाऊनसुद्धा तो तुझा पिच्छा सोडायला तयार नाही. तुझे ओठ कितीही गोड असले तरी शिव्या खाऊनसुद्धा तुझ्यावर मरत आहे तो.
(शिरीं/शिरीन=गोड, मधुर/*लब=ओठ/*रकीब=प्रेमातला प्रतिस्पर्धी/*बे-मजा=नाराज)
***
है खबर गर्म उन के आने की
आजही घर में बोरिया न हुआ।
अर्थ ः आज ती माझ्या घरी येणार आहे, अशी सगळीकडं जोरदार चर्चा आहे; पण माझं कमनशीब बघा...नेमकी आजच माझ्याकडं एखादी छानशी सतरंजीसुद्धा नाहीए. ती माझ्या घरी कधी नव्हे ती येणार आणि तिला बसायला एखादी सतरंजीही नसावी ना?
(*बोरिया = सतरंजी, चटई)
***
क्‍या वो नमरूद की खुदाई थी ?
बंदगी में मेरा भला न हुआ ।
अर्थ ः नमरूद नावाचा एक जुलमी बादशहा होता. तो स्वतःला देव समजत असे; पण होता मात्र अत्यंत अत्याचारी. त्याच्या राज्यात परमेश्‍वराची उपासना करूनसुद्धा त्याच्या जुलमांमुळं लोकांचं भलं झालंच नाही कधी. गालिब इथं आपल्या प्रेयसीला नमरूदच्या क्रूरतेची उपमा देतात. ते म्हणतात ः ‘‘माझंही भलं झालंच नाही. मी तर प्रेयसीलाच ईश्‍वर मानलं होतं!’’
(*नमरूद=प्राचीन काळी होऊन गेलेला अत्याचारी बादशहा/*खुदाई=सृष्टी, जग, संसार/ *बंदगी=उपासना, ईश्‍वरचिंतन)
***
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यूँ है कि हक अदा न हुआ ।
अर्थ ः मी जन्माला आलो ही केवळ परमेश्‍वरी कृपाच होय. त्यानंच जीवन दिलंय; पण ते जीवन कशा प्रकारे व्यतीत केलं मी? कुठंतरी आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येक विचारी माणसाच्या मनात अशा प्रकारचा पश्‍चात्ताप येतोच. हातून काही समाजोपयोगीही घडलं नाही की ईश्‍वरचिंतनातही मन रमलं नाही. केवळ मिळेल त्या गोष्टींचा उपभोग घेत राहिलो मी व तुझ्याकडं हक्क म्हणून वेळोवेळी काही ना काही मागतच राहिलो. हा देह, हा प्राण सगळं काही तूच दिलेलं आहे; पण या दोहोंच्या माध्यमातून मनुष्य म्हणून जी काही कर्म-कर्तव्यं करायची असतात, ती करायलाच विसरलो मी. हा शेर म्हणजे जणू काही कुण्या संत-माहात्म्यानं लिहिलेलं संचवचनच. गालिब यांचे अशा प्रकारचे शेर अक्षरशः झपाटून टाकतात. ‘गालिब’ यांच्या अशा आध्यात्मिक, उद्बोधक शेरांचा स्वतंत्रपणे अभ्यास करायला हवा. 
गालिब म्हणजे मदिरा-मदिराक्षी-ऐयाशी एवढंच नाही, हे निश्‍चित. 
(*जान = जीव, प्राण/*हक्क = सत्य, कर्तव्य)
***
जख्म गर दब गया, लहू न थमा
काम गर रुक गया, रवा न हुआ ।
अर्थ ः भळभळा वाहणाऱ्या जखमेवर हात दाबून धरला तर रक्त वाहायचं थांबतं थोडंच? हाच जर निसर्गनियम आहे, तर मग तिच्याकडून मला मिळणारा प्रतिसाद एकदम बंद कसा झाला ? हे काही योग्य झालं नाही. 
(*लहू = रक्त/*रवा होना =चालू होणं) 
***
रहजनी है कि दिलसितानी है?
ले के दिल दिलसिताँ रवाना हुआ।
अर्थ ः अरे, ही तर वाटमारी झाली! ती सरळ आली आणि माझं हृदय घेऊन निघूनही गेली. काय म्हणावं या असल्या वाटमारीला?
(*रहजनी=लूटमार/वाटमारी * दिलसितानी=हृदय चोरणं)
(दिलसिताँ = प्रेयसी, हृदय काबीज करणारी)
***
कुछ तो पढिए कि लोग कहते हैं
आज ‘गालिब’ गजलसरा न हुआ ।
अर्थ ः गालिब, काहीतरी मस्त ऐकवा...या मैफलीची सांगता तुमच्या गझलेनं होऊ देत. नाहीतर लोक म्हणतील ः ‘गालिब’नं काहीचं ऐकवलं नाही!’
(*गजल-सरा = गझल ऐकवणारा, गझल वाचणारा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com